"साफसफाईतील, "खजिना"-भाग -२": !
आज कपाटातील खणाचीसाफसफाई करताना, बाईंडींग केलेल्या माझ्या संग्रहातील हा "खजिना" !:
हे बाड माझ्याकडे बरीच वर्षे पडून होते. त्यातील मला आलेल्या मान्यवरांच्या प्रतिसादांच्या रूपातील, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व-
श्री. पु. ल. देशपांडे,
प्रख्यात डॉक्टर वि. ना. श्रीखंडे
आणि
विनोदी लेखनाचे बादशहा-
श्री. वि. आ. बुवा यांच्या पत्रांचे
काही निवडक अंश येथे पेश करतो:
१.
।।श्री।। मुंबई 54
प्रिय सुधाकर,
तुमचे पत्र येऊन बरेच दिवस झाले.
मी मुंबई बाहेरच होतो, नुकताच परत आलो.
त्यामुळे पत्रोत्तराला उशीर झाला.
तुमच्या वडिलांप्रमाणे आणि बहिणी प्रमाणे तुम्हालाही साहित्याची आवड आहे, हे पाहून आनंद झाला.
'आपण लेखक व्हावं अशी माझी इच्छा नाही', असं आपण लिहिलं आहे. पण तुमचं पत्र वाचताना लेखक होण्याचे सर्व गुण तुमच्यात आहेत, असे मला वाटले. शिवाय सार्या गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे थोड्याच होतात ! इच्छा नसतानाही तुम्ही लेखक होऊन जाल आणि तसे झाले, तर मला खूप आनंद होईल.
आपला
पु ल देशपांडे
---------------------------
२.
27 4 1986 रूपाली, पुणे-४
प्रिय श्री नातू,
तुमचे पत्र मिळाले.
'गुण गाईन आवडी', वाचून दिलेली दाद पोहोचली. 'दाद' ही सुद्धा एखाद्याचा आवडलेला गुण गाण्याच्या वृत्तीतूनच उमटते. तुमच्या पत्रातून तुमच्या रसिकतेचा चिंतनशीलतेच्या खुणा पटल्या.
त्यामुळे तुमची दाद मोलाची वाटली.
तुमचे रंगभूमीबद्दलचे विचारही मला आवडले. नाटक हा एक प्रेक्षक आणि नट यांनी मिळून घ्यायच्या सौंदर्यपूर्ती आणि आनंददायी अनुभव आहे. मला वाटतं की, हे सगळ्याच परफॉर्मिंग आर्टला लागू पडणारे सूत्र आहे.
पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो
तुमचा,
पु. ल. देशपांडे
--------------------------
३.
26 10 86
रूपाली 777 शिवाजीनगर पुणे 4
प्रिय सुधाकर नातू,
तुमचे हिरवेगार पत्र मिळाले.
मनःपूर्वक धन्यवाद.
दीपावलीच्या शुभेच्छांचा स्वीकार करावा,
ही विनंती.
तुमचा
पु ल देशपांडे
तुमचा पत्र लिहिताना तुमच्या घराजवळच्या मधुमेह रुग्णालयाचे नांव 'रहेजा' असण्याऐवजी 'चलेजा' असे त्या व्याधीला सांगणारं असायला हवं होतं,
असं वाटलं !
पुलदे
-------------------------
४.
Dr. VN Shrikhande Shrikhande Clinic
Hindu Colony,
Dadar Mumbai 14
12 June 1998
प्रिय सुधाकर नातू
यास स.न.वि.वि.
आपण मोठ्या अगत्याने व प्रेमाने लिहिलेला लेख पाठवलात, याबद्दल आभारी आहे.
चतुरंगच्या पंचविसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांमध्ये, मी जे विचार मांडले त्याबद्दल मला बरेच दूरध्वनी आले. हा एक सुखकर अनुभव मला आला.
गेल्या आठवड्यात डॉक्टर रविन थत्ते यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी, 'ग्रंथाली' मार्फत जो एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी अंतर्मुख करणारे काही विचार मी स्पष्टपणे मांडले. ते लोकांना बहुतेक आवडणार नाहीत असे मी गृहीत धरले होते.
परंतु बुद्धिवादी लोकांनी समाजात विचारमंथन करावयाचे कार्य सुरू करण्याकरता स्वतःच्या मताशी प्रेरणा न करता खरे बोलावे, ही लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेली सुवर्णसंधी असते. व्याख्यान लोकांना अतिशय आवडले. वैचारिक क्रांती झाल्याशिवाय समाजात योग्य तो मूलभूत फरक पडणार नाही, हे आपल्याला इतिहासात दिसून येते.
आपला
वि. ना. श्रीखंडे
--------------------------
५.
वि. आ. बुवा,गडकरी निवास मुरबाड मार्ग
कल्याण ४२१३०१
।।श्री।।
दिनांक २४ मार्च शहात्तर,
श्री सुधाकर नातू
यांना सनविवि.
आपले १९ मार्चचे पत्र आज पोहोचले. आभारी आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या 'होळी' विशेषांकातील माझा 'श्रीयुत तीन' हा लेख आपणास आवडला, हे वाचून आनंद झाला. हे सविस्तर कळविण्याची आपण जी आपुलकी दाखवलीत, त्याबद्दल समाधान वाटले.
हे इतके विनोदी लेखन करणे कसे जमते, असे आपण विचारले आहे. याला नेमके काय उत्तर द्यावे? अनेक मजेशीर कल्पना सुचत असतात, त्याच प्रमाणे जीवनातील अनेक गोष्टींचे निरीक्षण करण्याचा छंद आहे. शिवाय जगात वंडरफुल गोष्टीही नेहमी घडत असतात. या गोष्टीही लेखनाला विषय पुरवीत असतात. माझे बहुतेक लेखन वरील तीन कारणावरून होते.
या निमित्ताने आपला परिचय होत आहे, याबद्दल आनंद वाटतो.
कळावे
आपला
वि. आ. बुवा
-----------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
"व्यावहारिक जीवनोपयोगी विषय व ज्योतिषावरील अनेक विडीओजचा खजिना":
ही लिंक उघडा......
https://www.youtube.com/user/SDNatu.
विडीओज् आवडले........
ही लिंक शेअर करा.......
तर चँनेल subscribe सुध्दा करा......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा