" कर्तबगारीची अविस्मरणीय 'लकाकी' !":
"काळा पुढची पावले" हे कै. शंतनुराव किर्लोस्कर ह्यांचे चरित्र वाचले. त्यांच्या पिताश्रींनी 'लकाकीं' नी आपल्या उद्योगसमूहाचीसुरुवात कशी केली आणि अनंत अडचणी व संघर्षाला तोंड देऊन पुढील शंभर वर्षांत त्या बिजाचा वटवृक्ष कसा झाला, त्याचे उगवते चित्र ह्या पुस्तकातून नजरेसमोर उभे राहिले. एखादा माणूस पहाडाएवढा कसा मोठा होतो व आपल्या उण्यापुऱ्या साठ-सत्तर वर्षांच्या व्यावसायिक जीवनात हजारोंचा पोशिंदा कसा होतो, हे खरोखरच आश्चर्यजनकच ! शंतनूरावांचे हे असामान्य कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व जसे लोभस, तसेच आयुष्याच्या अखेरपर्यंत अनेक आघात सोसून ते ताजेतवाने कसे राहिले, हेही खरोखर एकमेवाद्वितीयच.माणूस मोठा होण्यासाठी व ते मोठेपण टिकवण्यासाठी, तसेच जीवन समृद्धपणे जगावे कसे, हे उमजून घेण्यासाठी, हे खरोखर चरित्र निश्चितच प्रेरणादायी व उद्बोधक ठरावे. जे गुणविशेष या पिता-पुत्रांच्या बाबतीत, त्या दृष्टीने मला आढळले ते असे: 'स्वतःला झोकून द्यावे असे ध्येय, त्या ध्येयपूर्तीसाठी अहर्निश कष्ट, विरोध पत्करायची व संघर्ष करावयाची तयारी, जे काम करावयचे, त्यावर निष्ठा, ते उत्तम व्हावे अशी स्वतःची ईर्षा व सर्वात महत्त्वाचे, ते काम मनापासून स्वतःला आनंद देणारे मानण्याची वृत्ती, तसेच माणसे जोडण्याची, लोकांमधील गुण ओळखण्याची गुणग्राहकता, पारदर्शक व्यक्तिमत्व व स्पष्टवक्तेपणा, घेतलेला निर्णय व कृतीमधून निर्माण होणाऱ्या परिणामांची संपूर्ण तयारी'... इत्यादी इत्यादी'.....
हे पुस्तक वाचून संपल्यावर जाणवले ते म्हणजे, हे असे व कौटुंबिक 'उद्योगवृक्ष' पुढील काही दशकांनंतर कां उतरणीला लागतात/ पुढच्या पिढ्यांमध्ये भाऊबंदकी वा विभिन्न विचारांच्या, जीवनशैलीच्या समस्येमुळे? कां इतर काही कारणामुळे? मूळ पुरुषाने उभारलेले जे स्वप्न असते, ते विरत कां बरं जाते, असं कां होतं? जास्तीत जास्त दोन किंवा तीन पिढ्यांनंतर, हा असा अनुभव, अशा पुष्कळशा कौटुंबिक उद्योगव्यवसायात आढळतो. एखादा शतकानुशतके चालू असलेला उद्योग समूह पहायला मिळणे विरळच.
दुसरे असे प्रकर्षाने जाणवले की, जीवनात नांव कमावणारी मंडळी अगोदर किती विविध समस्यांना कष्टदायक प्रसंगांना तोंड देत पुढे जात असतात असे प्रेरणादायी चित्र आपल्याला अनेक मंडळी मध्ये आढळते
अशा काही निवडक मंडळींची ही मांदियाळी पहा: डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पंडित जसराज, निळू फुले, 'चिपको' आंदोलन फेम सुंदरलाल बहुगुणा, अण्णा हजारे, धीरूभाई अंबानी मुकेश अंबानी, एन आर नारायण मूर्ती इ.इ....
ह्या सारख्या दिग्गज व्यक्तिंचे जीवनपट आपण अभ्यासपूर्ण रीतीने तपासले, तर त्यामागे एक तत्व आढळू शकते ते असे:
"आपण जेव्हा परिवर्तनासाठी काम करतो, तेव्हा आपल्या अपेक्षांमध्ये अशा एका शक्यतेसाठी ही जागा ठेवली पाहिजे की, कदाचित आपल्याला हवे असे, काही अपेक्षित बदल होणारही नाहीत, मात्र तरीही आपल्याला निष्ठा ठेवून आपल्या ध्येयाप्रमाणे काम करायचे आहे आणि ते आपण तनमन लावून करायचेच !"
हा जीवन मंत्र जो आहे तो ज्यांनी-ज्यांनी पाळला ते ते थोर तर झालेच, परंतु त्यांचे योगदान समाजासाठीही विलक्षण हितकारक, मार्गदर्शक आणि अर्थातच प्रगतीपर ठरले यात वाद नाही.
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा