मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

"पिंपळपान !":

 "पिंपळपान !":

पिंपळपान, आठवणीत जपून ठेवावे ते पिंपळपान ! जाळी असणारं, हृदयाच्या आकारासारखं, म्हणूनच बहुदा भावबंधांतील आठवणी या पिंपळपानासारख्या वाटतात, भासतात, पुन्हा पुन्हा पाहाव्या, आठवाव्या वाटतात.

माणसाचा डोळा हा जगातला सर्वोत्तम कॅमेरा असावा. कारण समोरची प्रतिमा, एवढंच काय, तर मनातील आठवणीतली कुठलीही प्रतिमा, तो हुबेहूब मनःपटलावर, अंतकरणावर क्षणार्धात उमटवू शकतो. पण जे डोळ्यांना जमतं, ते हाताना जमेलच असं नाही. नव्हे, बहुतेकांना ते जमतच नाही. केवळ काही हातांनाच आठवणी, प्रतिमा, दृश्ये हुबेहूब जशीच्या तशी कागदावर उमटवता येऊ शकतात. म्हणूनच चित्रकार हा एक श्रेष्ठ कलावंत, निसर्गाची तादात्म्य पाहणारा हा कलावंत, खरा भाग्यवंत !

जी गोष्ट प्रतिमा आणि चित्र यांची, तीच गोष्ट आवाजाच्या दुनियेतील वाणीची. ती आपल्याला मिळालेली एक श्रेष्ठ देणगी आहे आणि तिचा उपयोग, आवाज योग्य प्रकारे, शब्दांच्या रुपात काढून आपण आपल्या मनातील विचार व्यक्त करत असतो. तर त्या आवाजाला अधिक कसरतीने योग्य ते स्वरूप देऊन स्वर, सूर, ताल आणि लय यांच्या जोडीने मधूर श्रवणीय गायनाची कला काही मूठभर कलावंतांनाच अवगत असते. त्यांचे स्वर कानांना संतोष देणारे असतात, तसे इतर सर्वसामान्यांचे असत नाहीत, ते बेसूर वाटतात. म्हणजे इथे कान आणि रसना अर्थात वाणी यांचा जो अतूट संबंध आहे तो आपल्याला प्रकर्षाने दिसतो, जाणवतो. चित्रकला हातात असणाऱ्यांच्या नजरेत म्हणजे डोळ्यांमध्ये आणि हातांमध्ये, मेंदूच्या बुद्धीच्या साह्याने समन्वय साधला जातो, तो आणि तसाच !

निसर्गाने मानवाला ज्ञानेंद्रिये दिली आहेत, ती ही अशी अद्वितीय कामगिरी करू शकतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. याच दिशेने जर विचार करत गेलो, तर बुद्धी, मेंदू आणि प्रेरणा या जोडीने हात आणि पाय ह्यांचा जर अचूक लयबद्ध समन्वय साधला गेला, तर त्यातून उत्तमोत्तम क्रीडापटू व कसरतपटू होऊ शकतात, हे आपल्या ध्यानात येईल.

आता शेवटी राहता राहिली ती म्हणजे आंतरिक प्रतिभाशक्ती नवनिर्मिती करु शकणारी अशी सरस्वती देवीची देणगी म्हणजे विचार करणे योग्य त्या दिशेने सर्वांगीण विचार करण्याची समतोल बुद्धिमत्ता असणे आणि प्रतिभेच्या आंतरिक स्फुरण तिच्या जोरावर विविध प्रकारचे साहित्य मौलिक वेळ विचार यामुळे मानव जातीचे कल्याण होऊ शकेल किंवा इतरांना नवी दिशा, नवा मार्ग देता येऊ शकेल. प्रतिभावंत वक्ते, श्रेष्ठ गुरु वा संत, लेखक आणि कवी ही जी मांदियाळी आहे, ती अशा प्रकारची आंतरिक अद्भुत प्रतिभाशक्ती असणारी माणसं !

म्हणजे अनेक प्रकारचे गुण हे आपल्याच जवळ असतात फक्त त्याची जाणीव ज्याची त्याची, त्याला व्हायला हवी आणि आपण आपल्याला निसर्गाने एकूण सर्व सजीवांमध्ये सर्वश्रेष्ठ, एकमेवाद्वितीय असा जो मानव देह दिला आहे, त्यामधून आपल्याला काय काय साध्य करता येऊ शकतं, याचा लेखाजोखा जाणून घेऊन, आपल्यातील
शक्तीस्थळांचा विकास करणं, त्यांना जोपासणे हे गरजेचं आहे.

बघा कुठे होतं पिंपळपान आणि तिथून जी सुरुवात केली, तिला आपण कुठे आणून ठेवले !
पण त्यामधून एकंदर कला, गुणवत्ताविश्वाचं विश्वरूप दर्शन, जणु आपल्या समोर उभं आहे, असं म्हणता येईल.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.

"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा