शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

"कर्तबगारीची अविस्मरणीय 'लकाकी' !":

 " कर्तबगारीची अविस्मरणीय 'लकाकी' !":

"काळा पुढची पावले" हे कै. शंतनुराव किर्लोस्कर ह्यांचे चरित्र वाचले. त्यांच्या पिताश्रींनी 'लकाकीं' नी आपल्या उद्योगसमूहाचीसुरुवात कशी केली आणि अनंत अडचणी व संघर्षाला तोंड देऊन पुढील शंभर वर्षांत त्या बिजाचा वटवृक्ष कसा झाला, त्याचे उगवते चित्र ह्या पुस्तकातून नजरेसमोर उभे राहिले. एखादा माणूस पहाडाएवढा कसा मोठा होतो व आपल्या उण्यापुऱ्या साठ-सत्तर वर्षांच्या व्यावसायिक जीवनात हजारोंचा पोशिंदा कसा होतो, हे खरोखरच आश्चर्यजनकच ! शंतनूरावांचे हे असामान्य कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व जसे लोभस, तसेच आयुष्याच्या अखेरपर्यंत अनेक आघात सोसून ते ताजेतवाने कसे राहिले, हेही खरोखर एकमेवाद्वितीयच.

माणूस मोठा होण्यासाठी व ते मोठेपण टिकवण्यासाठी, तसेच जीवन समृद्धपणे जगावे कसे, हे उमजून घेण्यासाठी, हे खरोखर चरित्र निश्चितच प्रेरणादायी व उद्बोधक ठरावे. जे गुणविशेष या पिता-पुत्रांच्या बाबतीत, त्या दृष्टीने मला आढळले ते असे: 'स्वतःला झोकून द्यावे असे ध्येय, त्या ध्येयपूर्तीसाठी अहर्निश कष्ट, विरोध पत्करायची व संघर्ष करावयाची तयारी, जे काम करावयचे, त्यावर निष्ठा, ते उत्तम व्हावे अशी स्वतःची ईर्षा व सर्वात महत्त्वाचे, ते काम मनापासून स्वतःला आनंद देणारे मानण्याची वृत्ती, तसेच माणसे जोडण्याची, लोकांमधील गुण ओळखण्याची गुणग्राहकता, पारदर्शक व्यक्तिमत्व व स्पष्टवक्तेपणा, घेतलेला निर्णय व कृतीमधून निर्माण होणाऱ्या परिणामांची संपूर्ण तयारी'... इत्यादी इत्यादी'.....

हे पुस्तक वाचून संपल्यावर जाणवले ते म्हणजे, हे असे व कौटुंबिक 'उद्योगवृक्ष' पुढील काही दशकांनंतर कां उतरणीला लागतात/ पुढच्या पिढ्यांमध्ये भाऊबंदकी वा विभिन्न विचारांच्या, जीवनशैलीच्या समस्येमुळे? कां इतर काही कारणामुळे? मूळ पुरुषाने उभारलेले जे स्वप्न असते, ते विरत कां बरं जाते, असं कां होतं? जास्तीत जास्त दोन किंवा तीन पिढ्यांनंतर, हा असा अनुभव, अशा पुष्कळशा कौटुंबिक उद्योगव्यवसायात आढळतो. एखादा शतकानुशतके चालू असलेला उद्योग समूह पहायला मिळणे विरळच.

दुसरे असे प्रकर्षाने जाणवले की, जीवनात नांव कमावणारी मंडळी अगोदर किती विविध समस्यांना कष्टदायक प्रसंगांना तोंड देत पुढे जात असतात असे प्रेरणादायी चित्र आपल्याला अनेक मंडळी मध्ये आढळते

अशा काही निवडक मंडळींची ही मांदियाळी पहा: डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, पंडित जसराज, निळू फुले, 'चिपको' आंदोलन फेम सुंदरलाल बहुगुणा, अण्णा हजारे, धीरूभाई अंबानी मुकेश अंबानी, एन आर नारायण मूर्ती इ.इ....

ह्या सारख्या दिग्गज व्यक्तिंचे जीवनपट आपण अभ्यासपूर्ण रीतीने तपासले, तर त्यामागे एक तत्व आढळू शकते ते असे:

"आपण जेव्हा परिवर्तनासाठी काम करतो, तेव्हा आपल्या अपेक्षांमध्ये अशा एका शक्यतेसाठी ही जागा ठेवली पाहिजे की, कदाचित आपल्याला हवे असे, काही अपेक्षित बदल होणारही नाहीत, मात्र तरीही आपल्याला निष्ठा ठेवून आपल्या ध्येयाप्रमाणे काम करायचे आहे आणि ते आपण तनमन लावून करायचेच !"

हा जीवन मंत्र जो आहे तो ज्यांनी-ज्यांनी पाळला ते ते थोर तर झालेच, परंतु त्यांचे योगदान समाजासाठीही विलक्षण हितकारक, मार्गदर्शक आणि अर्थातच प्रगतीपर ठरले यात वाद नाही.

धन्यवाद
सुधाकर नातू

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

"पिंपळपान !":

 "पिंपळपान !":

पिंपळपान, आठवणीत जपून ठेवावे ते पिंपळपान ! जाळी असणारं, हृदयाच्या आकारासारखं, म्हणूनच बहुदा भावबंधांतील आठवणी या पिंपळपानासारख्या वाटतात, भासतात, पुन्हा पुन्हा पाहाव्या, आठवाव्या वाटतात.

माणसाचा डोळा हा जगातला सर्वोत्तम कॅमेरा असावा. कारण समोरची प्रतिमा, एवढंच काय, तर मनातील आठवणीतली कुठलीही प्रतिमा, तो हुबेहूब मनःपटलावर, अंतकरणावर क्षणार्धात उमटवू शकतो. पण जे डोळ्यांना जमतं, ते हाताना जमेलच असं नाही. नव्हे, बहुतेकांना ते जमतच नाही. केवळ काही हातांनाच आठवणी, प्रतिमा, दृश्ये हुबेहूब जशीच्या तशी कागदावर उमटवता येऊ शकतात. म्हणूनच चित्रकार हा एक श्रेष्ठ कलावंत, निसर्गाची तादात्म्य पाहणारा हा कलावंत, खरा भाग्यवंत !

जी गोष्ट प्रतिमा आणि चित्र यांची, तीच गोष्ट आवाजाच्या दुनियेतील वाणीची. ती आपल्याला मिळालेली एक श्रेष्ठ देणगी आहे आणि तिचा उपयोग, आवाज योग्य प्रकारे, शब्दांच्या रुपात काढून आपण आपल्या मनातील विचार व्यक्त करत असतो. तर त्या आवाजाला अधिक कसरतीने योग्य ते स्वरूप देऊन स्वर, सूर, ताल आणि लय यांच्या जोडीने मधूर श्रवणीय गायनाची कला काही मूठभर कलावंतांनाच अवगत असते. त्यांचे स्वर कानांना संतोष देणारे असतात, तसे इतर सर्वसामान्यांचे असत नाहीत, ते बेसूर वाटतात. म्हणजे इथे कान आणि रसना अर्थात वाणी यांचा जो अतूट संबंध आहे तो आपल्याला प्रकर्षाने दिसतो, जाणवतो. चित्रकला हातात असणाऱ्यांच्या नजरेत म्हणजे डोळ्यांमध्ये आणि हातांमध्ये, मेंदूच्या बुद्धीच्या साह्याने समन्वय साधला जातो, तो आणि तसाच !

निसर्गाने मानवाला ज्ञानेंद्रिये दिली आहेत, ती ही अशी अद्वितीय कामगिरी करू शकतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. याच दिशेने जर विचार करत गेलो, तर बुद्धी, मेंदू आणि प्रेरणा या जोडीने हात आणि पाय ह्यांचा जर अचूक लयबद्ध समन्वय साधला गेला, तर त्यातून उत्तमोत्तम क्रीडापटू व कसरतपटू होऊ शकतात, हे आपल्या ध्यानात येईल.

आता शेवटी राहता राहिली ती म्हणजे आंतरिक प्रतिभाशक्ती नवनिर्मिती करु शकणारी अशी सरस्वती देवीची देणगी म्हणजे विचार करणे योग्य त्या दिशेने सर्वांगीण विचार करण्याची समतोल बुद्धिमत्ता असणे आणि प्रतिभेच्या आंतरिक स्फुरण तिच्या जोरावर विविध प्रकारचे साहित्य मौलिक वेळ विचार यामुळे मानव जातीचे कल्याण होऊ शकेल किंवा इतरांना नवी दिशा, नवा मार्ग देता येऊ शकेल. प्रतिभावंत वक्ते, श्रेष्ठ गुरु वा संत, लेखक आणि कवी ही जी मांदियाळी आहे, ती अशा प्रकारची आंतरिक अद्भुत प्रतिभाशक्ती असणारी माणसं !

म्हणजे अनेक प्रकारचे गुण हे आपल्याच जवळ असतात फक्त त्याची जाणीव ज्याची त्याची, त्याला व्हायला हवी आणि आपण आपल्याला निसर्गाने एकूण सर्व सजीवांमध्ये सर्वश्रेष्ठ, एकमेवाद्वितीय असा जो मानव देह दिला आहे, त्यामधून आपल्याला काय काय साध्य करता येऊ शकतं, याचा लेखाजोखा जाणून घेऊन, आपल्यातील
शक्तीस्थळांचा विकास करणं, त्यांना जोपासणे हे गरजेचं आहे.

बघा कुठे होतं पिंपळपान आणि तिथून जी सुरुवात केली, तिला आपण कुठे आणून ठेवले !
पण त्यामधून एकंदर कला, गुणवत्ताविश्वाचं विश्वरूप दर्शन, जणु आपल्या समोर उभं आहे, असं म्हणता येईल.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.

"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू


रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

"पुढचं पाऊल": "संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य: '१ नोव्हे'२१ ते ३१ डिसेंबर'२२':

 'नियतीचा संकेत':  

"पुढचे पाऊल"
अर्थात संक्षिप्त वार्षिक राशीभविष्य":
१नोव्हें’21 ते ३१ डिसें''22

प्रास्ताविक:

भारतीय ज्योतिष चंद्राला महत्व देते तर पाश्च्यात्य
 ज्योतिष रविला. त्यामुळे, आपल्या जन्मवेळी चंद्र 
ज्या राशीत असतो, ती आपली जन्मरास मानली 
जाते. चंद्र सर्वसाधारणपणे एका महिन्यात बाराही 
राशींचा प्रवास पूर्ण करतो, त्यामुळे आपली जन्मरास ठरविताना, जन्मतारिख महिना वर्ष व जन्मवेळ माहीत असावी लागते. चंद्रावर आधारित भारतीय ज्योतिष अधिक सूक्ष्मपणे वस्तुनिष्ठ, तसेच व्यक्तिनिष्ठ विचार करते. 

आपले आयुष्य ही विशिष्ठ परिस्थितींत घेतलेले वा न घेतलेले निर्णय आणि त्यानुसार केलेली क्रुती वा न केलेली क्रुती ह्यांच्या परिणामांची अखंडीत श्रुंखला असते. परिस्थितीदेखिल नित्य नव्याने बदलत रहात असते. ह्या सर्व घडामोडींमागे आपले मन एखाद्या सारथ्याची भूमिका बजावत असते. मानवी मनावर चंद्रभ्रमणाचा यथोचित परिणाम होत असतो आणि प्रुथ्वीवरील समुद्राच्या भरती ओहोटीचा संबंध चंद्राच्या दररोजच्या भ्रमणावर अवलंबून असतो हे सर्वश्रुत आहे. आपल्या शरिरात सुमारे सत्तर टक्के पाणी असते. सहाजिकच चंद्रभ्रमण आपले विचार निर्णय व क्रुतीवर प्रभाव पाडत असते, हे ओघाने आले. ह्या विचारमंथनामुळे चंद्रभ्रमणाला केंद्रीभूत मानणारे भारतीय ज्योतिष तर्कशास्त्राला पटू शकेल असे तथ्य आहे.

अनुकूल गुण पद्धती:

कालचक्र अव्याहत फिरत असते, माणसाच्या आयुष्यात काही दिवस सुखाचे तर काही दु:खाचे असतात. हा क्रम प्रत्येकाला अनुभवाला येतो. उद्याचा दिवस, आजच्यापेक्षा अधिक चांगला जावा ह्या आशेवर माणूस जगत असतो. उद्याचे पुढचे पाऊल कसे असेल, येणारा काळ कसा असेल, अनुकूल वा प्रतिकूल आणि तोही किती प्रमाणात हे कळण्याच्या इच्छेने तो दर वर्षी उत्सुकतेने राशीभविष्य पहात असतो.

माणूस उंच वा बुटका आहे, जाडा किंवा बारिक आहे, तो गरिब वा श्रीमंत आहे अशा विधानांवरुन आपल्याला निश्चित अशी काही कल्पना येत नाही. ती येण्यासाठी कोणते तरी त्या विषयाशी संबंधित असे अनुरूप संख्यात्मक परिमाण आवश्यक असते. जसे उंची 
सेंटी मीटर, वजनासाठी किलोग्राम, आर्थिक 
स्थितीसाठी रुपये असे परिणाम संख्यात्मक द्रुष्टिने 
दाखवता येते. ह्याच पद्धतीने आपले आगामी दिवस कोणाला कसे जातील, हे भविष्याच्या ज्ञानाच्या 
आधारे सांगण्याची पद्धत म्हणजे राशीभविष्य होय. 

नशिबाच्या परिक्षा: 

पहिल्या स्तंभात प्रत्येक राशीच्या खाली डाव्या बाजूला त्या राशीचा नशिबाचा ह्या वर्षीचा तर उजव्या बाजूस मागील वर्षीचा अनुक्रम दाखवला आहे.  

३१ दिवसांचा महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे जास्तीत जास्त गुण १८६, तर 30 दिवसांच्या महिन्यांचे जास्तीत जास्त गुण १८० आणि फेब्रुवारी २०22चे जास्तीत जास्त अनुकूल गुण १६८. याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ग्रह किती शुभ दिवस आहेत ते अनुकूल गुण दाखवले आहेत. त्या आधारे प्रयत्न आणि अपेक्षा यांचा समतोल राखत समाधान मिळवण्याची युक्ती तुम्हाला मिळू शकेल अशी अनुकूल गुणांची कल्पना आहे. 

अनुकूल गुणांच्या पद्धती: नियम
आम्ही गेले तीन दशके त्याकरता अभिनव अशा अनुकूल गुणांच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत. प्रत्येक राशीला सहा प्रमुख ग्रहांच्या बदलत जाणार्या स्थितीचा अभ्यास करून ज्योतिषांतील पुढील नियमांचा आधार घेऊन वर्षभरात प्रत्येक माहवार किती दिवस अनुकूल आहेत त्याचे गणित मांडून अनुकूल गुण 
देतो. ते नियम असे आहेत:

रवि: ३,६, १० व ११ वा शुभ
मंगळ: ३,६, व ११ वा शुभ
बुध: २,४,६,८,१० व ११ वा शुभ
गुरू: २,५,७,९, व ११ वा शुभ
शुक्र: १,२,३,४,५,८,९,११ व१२ वा शुभ
शनी: ३,६, व ११ वा शुभ

"नशिबाची गटवारी":

आगामी १४ महिन्यांच्या कालखंडात वरील महत्वाच्या ग्रहांच्या विविध राशीप्रवेशानुसार ह्या नियमांचे आधारे ते किती दिवस शुभ आहेत, ते आजमावून माहवार शुभदिवस अर्थात अनुकूल गुण देऊन, त्याप्रमाणे राशीनिहाय अनुकूल गुण कोष्टक पुढे दिलेले आहे. तशीच एकूण संपूर्ण कालखंडातील गुणांच्या बेरजेवरून पुढील पाच सुलभ गटात त्यांची विभागणी केली आहे
१.उत्तम पहिला गट: व्रुश्चिक, सिंह, कुंभ व मीन राशी.
२.उजवा दुसरा गट: कन्या, धनु राशी. 
३.मध्यम तिसरा गट: मेष, व्रुषभ, कर्क राशी. 
 राशी.
४.डावा चौथा गट: तुला, मिथून व मकर राशी.
५.त्रासदायक पाचवा गट: कुणीही नाही.

शनीची साडेसाती:

साडेसाती म्हणजे काय? गोचरीचा शनि जेव्हां 
तुमच्या चंद्रराशीच्या मागील राशीत येतो, तेव्हा  
साडेसाती सुरू होते व  तुमच्या राशीच्या पुढील 
राशीनंतर येणार्या राशींत जातो, तोपर्यंत साडेसाती 
असते.
उदा: सध्या मकर राशींत शनी आहे, म्हणून आता 
धनु, मकर  कुंभ राशींना साडेसाती आहे. शनी कुंभेत 
जेव्हा प्रवेश करेल, तेव्हा धनु राशीची साडेसाती 
संपेल.
✴९. धनु▪ २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु झालेली असुन दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.​
✴१०. मकर▪२६ जानेवारी २०१७ रोजी  सुरु 
झालेली असुन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.​
११. कुंभ:
शनीची साडेसाती २४ जानेवारी'२०२० पासून सुरु झाली, ती २३ फेब्रुवारी'२०२८ पर्यंत असेल.

"राशीनिहाय संक्षिप्त राशीभविष्य":
सोबत राशीने हाय या संपूर्ण कालखंडातील माहवार अनुकूल गुणांचे कोष्टक दिले आहे प्रत्येक महिन्यामध्ये राशीचा नशीबाचा क्रमांक ही खाली दिलेला आहे वर्ष कालखंडाच्या अखेरीस मागच्या वर्षीच्या तुलनेत अनुकूल गुण तसेच क्रमांक नशिबाच्या बाबतीत कुठला ते देखील दिले आहे त्यावरून तुमचे तुम्हालाच समजू शकेल की आपले नशीब इतरांच्या तुलनेत कसे आहे. या पद्धतीमुळे आपण आपल्या अपेक्षा आणि प्रयत्न यांची सांगड घालून योग्य ते कृती करून आपल्या समाधानाचा मार्ग शोधू शकता तुमचे नशीब तुमच्या हातात असाच जणू काही हा एकंदर मार्ग.

मागील व यंदाच्या एकूण अनुकूल गुणांचा विचार करता, राशीनिहाय नशिबाचा चढ उतार हा असा असेल:

१मेष रास: ५ व्या क्र. वरून ७ व्या क्रमांकावर घसरलेली आहे.

२.व्रुषभ रास: तुमची देखील ६ व्या क्रमांकावरून आता ८ व्या पायरीवर नशीबाच्या परिक्षेत घसरण झाली आहे.

३.मिथून राशीच्या नशिबी मागील ८ व्या स्थानावरून आता ११ व्या स्थानी जाण्याची वेळ आली आहे.

४. कर्क राशीचे नशीब ११ क्र.वरुन आता थोडे सुधारुन ९ व्या स्थानी असेल. 

५ सिंह मंडळी नशीबवान असून तिसर्या स्थानावरून पुढे सरकत सर्व बारा राशींमध्ये दुसर्या क्रमांकावर दिसतील.

६ कन्या रास पाचव्या समतोल साधणार्या जागी, मागील कालखंडातील  कटकटी वाढवणार्या ९ व्या क्रमांकावरुन उडी घेतील.

७ तुळा राशीला ह्या वर्षीही दहाव्याच स्थानी कष्टकारक अनुभव पचवावे लागतील.

८ व्रुश्चिक रास सर्वात भाग्यवान ह्याही कालखंडात, कारण आता सुद्धा प्रथम क्रमांक मिळाला आहे, तुम्हाला नशिबाच्या परिक्षेत !

९ धनु राशीच्या गुणांमध्ये खूप घसरण झाल्यामुळे तुम्हाला तळागाळातील शेवटचा बारावा क्रमांक मागच्या कालखंडात स्विकारावा लागला होता. परंतु आता उत्साहवर्धक सुधारणा होऊन समतोल साधणार्या ६ स्थानी तुम्ही असाल.

१० मकर राशीचे नशीब गुणांमध्ये खूप घसरण झाल्यामुळे यंदा सातव्या क्रमांकावरून शेवटच्या बाराव्या स्थानी ढकललेले गेले आहे.

११ कुंभ राशीच्या गुणांमध्ये चांगली सुधारणा आहे, सहाजिकच मागील ४थ्या स्थानावरून तिसर्या क्रमांकावर तुम्ही रहाल.

१२  मीन रास सुखावह दुसर्या स्थानावरुन थोडे खाली सरकून चौथ्या स्थानी असेल.

वयोमानानुसार आता मी वैयक्तिक ज्योतिष सल्ला देणे बंद केले आहे, ह्याची क्रुपया नोंद घ्यावी.

सर्व वाचकांना आगामी कालखंड सुख शांती व समाधानाचा जावो ही मनःपूर्वक शुभेच्छा.

धन्यवाद
सुधाकर नातू

।। शुभम् भवतु ।।

ता.क.

"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू




माझे गॅलेक्‍सी मधून पाठविले

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

👍👍"मुक्तसंवाद-संगीत ही मानवाने, मानवजातीला दिलेली अद्वितीय देणगी !":

 👍👍"मुक्तसंवाद-संगीत ही मानवाने, मानवजातीला दिलेली अद्वितीय देणगी !":👌👌


ध्वनी अर्थात आवाजा विषयी काही मूलभूत विचार मांडणार आहे सर्व समस्त विश्वाची निर्मिती
"ओम्" कारातून अर्थात ध्वनी मधून, आवाज यामधून झाली हे आपल्याला सर्वश्रुतच आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर उत्तरोत्तर शेती, त्याचप्रमाणे अग्नी अशा प्रकारचे विविध असे शोध लावत अखेरीस यंत्रयुग तंत्रयुग आणि आता तर इंटरनेटचे मायाजाल यामधून वैश्विक प्रगतीची गरुड झेप घेतली. वेगवान विकास, सुखसोयी आणि सुलभ कार्य आदि आधुनिक जगाला इथपर्यंत आणण्यासाठी विज्ञान हे कारणीभूत होते यात वाद नाही.

परंतु त्या गोष्टींचा विकासाच्या (घातक ठरलेल्या) कल्पनांचा जो काही अतिरेक झाला, त्यामुळे पर्यावरणावर अर्थात निसर्गाच्या नैसर्गिक संरचनेवर विघातक परिणाम झाला. त्यामधून आता विविध प्रकारचे भयानक प्रपात घडत आहेत, कधी नव्हे अशी महासंकटे येत आहेत. ते पाहता विज्ञान हे आपल्याला कुठे घेऊन आले आहे, असा प्रश्न निर्माण होतो.

या सर्व पार्श्वभूमीवर, मला असं वाटतं की, मानवाने त्याच्या कल्पक बुद्धीच्या जोरावर अद्वितीय अशी देणगी जर मानव जातीला दिली असेल, तर ती म्हणजे संगीत होय. ध्वनी आणि त्याला नवरूपात ताल, स्वरांबरोबर योग्य त्या लयीत रुपांतर देऊन जे श्रवणीय संगीत निर्माण केलं गेलं, ते संगीत हीच अद्वितीय अशी देणगी मानवाने मानवजातीला दिली आहे. संगीताची महती अजोड व अगाध आहे. आता तर संगीताचे आधारे रोगोपचार करण्याचा यशस्वी प्रयत्न करणारी शाखाही विकसत आहे.

एखाद्या चित्रपटातमध्ये कथाबीज जरी नसलं, तरी जर त्याच संगीत उत्तम असेल तर तो चित्रपट हीट होतो, कमालीचा लोकप्रिय होतो, हे आपल्या अनुभवायला मिळतं. संगीताचे विविध प्रकार आता आपल्याला ज्ञात आहेत. त्याच प्रमाणे संगीताच्या जोडीला वाद्यवृंद आणि त्यामधून योग्य त्या सरगम टीमवर्कसारखी सरगम निर्माण करणारी अदभुत मेलोडीची मालिका निर्माण केली जाते, तो म्हणजे संगीताला दिलेली अलंकाराची अमूल्य भेटच असते.

संगीताचे अनंत प्रकार आहेत. त्यामध्ये शास्त्रीय संगीत असे पायाभूत आहे, ते म्हणजे जणू काही एकंदर ध्वनीच्या जगाचा मूलभूत शास्त्रीय आविष्कार होय. शास्त्रीय संगीताची आवड असणारे वेगळे आणि भावसंगीत किंवा इतर अशी श्रवणीय सुमधुर गीते ऐकण्याची सवय असणारे वेगळे आपल्याला आढळून येतात. शास्त्रीय संगीताचे खरोखरच जे दर्दी असतात, ते जणू तालमीत जाणाऱ्या मल्लाप्रमाणे त्या त्या कसरती जाणणारे असतात. परंतु ते, त्या मानाने एकंदरीत लोकसंख्येच्या कमीच असतात भरत असतात.

सर्वसामान्यांना मात्र भावसंगीत किंवा चित्रपट संगीत, भावगीत अशा तर्‍हेची किंवा लावणी, भजन अशा तऱ्हेची संगीताची जी मालिका आहे ती आवडत असते. सुखदुःखाच्या पलीकडे जाण्यासाठी, संगीत ही अद्वितीय देणगी आहे असं मला आज वाटलं आणि त्यामधून हे आजचे
मुक्तसंवादाचे काही बोल मी निर्माण केले. खरंच जे गायक वादक किंवा जे संगीतकार आणि अर्थातच गीतामधील भावगर्भ शब्द निर्माण करणारे कवी, रागदारी निर्माण करणारे, बंदिशी निर्माण करणारे जे जे कोणी आहेत, होते व होतील त्या सर्वांना माझा मनःपूर्वक प्रणाम.

आवाज चांगला असणे, ही खरोखर दुर्मिळ व स्वर्गीय देणगी आहे आणि कदाचित निसर्गाशी तादात्म्य मिळवायची शक्ती ज्यांच्याजवळ आहे अशां मोजक्याच भाग्यवंतांच्या नशिबी हे भाग्य येते असे माझे मत आहे. जसे शास्त्रीय संगीत जाणणारे मूठभरच, तसेच लोकांना ऐकावसं वाटतं अशा सुमधूर स्वरात गाणारे गायकही दुर्मिळ असतात. प्रत्येक कुटुंबात असा एखादा किंवा तीन चार जणं चांगला आवाज असणारे असतातच असतात आणि त्या मधूनच श्रेष्ठ दर्जाचे असे गायक गायिका निर्माण होत असतात, संगीतकार निर्माण होत असतात. त्यामुळे सध्याच्या दूरदर्शन किंवा इडियट बॉक्सवरती ह्या गुणांना प्रोत्साहन देणारे अनेक कार्यक्रम-'सारेगमप'सारखे प्रसारित होतात.

पट्टीचा आवडता गायक जेव्हा गातो, तेव्हा आपल्याला स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो. वेळ कुठलीही असो आपल्याला भावपूर्ण संगीत ऐकावसं वाटतं. तेव्हा आजचा हा माझा मुक्तसंवादाचा विचार "संगीत हीच मानवाने, मानवाला दिलेली सर्वात श्रेष्ठ देणगी आहे' कसे वाटले, ते प्रतिसादात जरूर कळवा.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

"साफसफाईतील "खजिना"- भाग २"

 "साफसफाईतील, "खजिना"-भाग -२": !

आज कपाटातील खणाची
साफसफाई करताना, बाईंडींग केलेल्या माझ्या संग्रहातील हा "खजिना" !:

हे बाड माझ्याकडे बरीच वर्षे पडून होते. त्यातील मला आलेल्या मान्यवरांच्या प्रतिसादांच्या रूपातील, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व-
श्री. पु. ल. देशपांडे,
प्रख्यात डॉक्टर वि. ना. श्रीखंडे
आणि
विनोदी लेखनाचे बादशहा-
श्री. वि. आ. बुवा यांच्या पत्रांचे
काही निवडक अंश येथे पेश करतो:

१.
।।श्री।। मुंबई 54

प्रिय सुधाकर,
तुमचे पत्र येऊन बरेच दिवस झाले.
मी मुंबई बाहेरच होतो, नुकताच परत आलो.
त्यामुळे पत्रोत्तराला उशीर झाला.

तुमच्या वडिलांप्रमाणे आणि बहिणी प्रमाणे तुम्हालाही साहित्याची आवड आहे, हे पाहून आनंद झाला.
'आपण लेखक व्हावं अशी माझी इच्छा नाही', असं आपण लिहिलं आहे. पण तुमचं पत्र वाचताना लेखक होण्याचे सर्व गुण तुमच्यात आहेत, असे मला वाटले. शिवाय सार्‍या गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे थोड्याच होतात ! इच्छा नसतानाही तुम्ही लेखक होऊन जाल आणि तसे झाले, तर मला खूप आनंद होईल.

आपला
पु ल देशपांडे
---------------------------
२.
27 4 1986 रूपाली, पुणे-४

प्रिय श्री नातू,
तुमचे पत्र मिळाले.
'गुण गाईन आवडी', वाचून दिलेली दाद पोहोचली. 'दाद' ही सुद्धा एखाद्याचा आवडलेला गुण गाण्याच्या वृत्तीतूनच उमटते. तुमच्या पत्रातून तुमच्या रसिकतेचा चिंतनशीलतेच्या खुणा पटल्या.
त्यामुळे तुमची दाद मोलाची वाटली.
तुमचे रंगभूमीबद्दलचे विचारही मला आवडले. नाटक हा एक प्रेक्षक आणि नट यांनी मिळून घ्यायच्या सौंदर्यपूर्ती आणि आनंददायी अनुभव आहे. मला वाटतं की, हे सगळ्याच परफॉर्मिंग आर्टला लागू पडणारे सूत्र आहे.

पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो
तुमचा,
पु. ल. देशपांडे
--------------------------
३.
26 10 86
रूपाली 777 शिवाजीनगर पुणे 4

प्रिय सुधाकर नातू,
तुमचे हिरवेगार पत्र मिळाले.
मनःपूर्वक धन्यवाद.
दीपावलीच्या शुभेच्छांचा स्वीकार करावा,
ही विनंती.
तुमचा
पु ल देशपांडे
तुमचा पत्र लिहिताना तुमच्या घराजवळच्या मधुमेह रुग्णालयाचे नांव 'रहेजा' असण्याऐवजी 'चलेजा' असे त्या व्याधीला सांगणारं असायला हवं होतं,
असं वाटलं !
पुलदे
-------------------------
४.
Dr. VN Shrikhande Shrikhande Clinic
Hindu Colony,
Dadar Mumbai 14
12 June 1998

प्रिय सुधाकर नातू
यास स.न.वि.वि.

आपण मोठ्या अगत्याने व प्रेमाने लिहिलेला लेख पाठवलात, याबद्दल आभारी आहे.

चतुरंगच्या पंचविसाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांमध्ये, मी जे विचार मांडले त्याबद्दल मला बरेच दूरध्वनी आले. हा एक सुखकर अनुभव मला आला.
गेल्या आठवड्यात डॉक्टर रविन थत्ते यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी, 'ग्रंथाली' मार्फत जो एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी अंतर्मुख करणारे काही विचार मी स्पष्टपणे मांडले. ते लोकांना बहुतेक आवडणार नाहीत असे मी गृहीत धरले होते.

परंतु बुद्धिवादी लोकांनी समाजात विचारमंथन करावयाचे कार्य सुरू करण्याकरता स्वतःच्या मताशी प्रेरणा न करता खरे बोलावे, ही लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेली सुवर्णसंधी असते. व्याख्यान लोकांना अतिशय आवडले. वैचारिक क्रांती झाल्याशिवाय समाजात योग्य तो मूलभूत फरक पडणार नाही, हे आपल्याला इतिहासात दिसून येते.

आपला
वि. ना. श्रीखंडे

--------------------------
५.
वि. आ. बुवा,गडकरी निवास मुरबाड मार्ग
कल्याण ४२१३०१

।।श्री।।
दिनांक २४ मार्च शहात्तर,

श्री सुधाकर नातू
यांना सनविवि.

आपले १९ मार्चचे पत्र आज पोहोचले. आभारी आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या 'होळी' विशेषांकातील माझा 'श्रीयुत तीन' हा लेख आपणास आवडला, हे वाचून आनंद झाला. हे सविस्तर कळविण्याची आपण जी आपुलकी दाखवलीत, त्याबद्दल समाधान वाटले.

हे इतके विनोदी लेखन करणे कसे जमते, असे आपण विचारले आहे. याला नेमके काय उत्तर द्यावे? अनेक मजेशीर कल्पना सुचत असतात, त्याच प्रमाणे जीवनातील अनेक गोष्टींचे निरीक्षण करण्याचा छंद आहे. शिवाय जगात वंडरफुल गोष्टीही नेहमी घडत असतात. या गोष्टीही लेखनाला विषय पुरवीत असतात. माझे बहुतेक लेखन वरील तीन कारणावरून होते.

या निमित्ताने आपला परिचय होत आहे, याबद्दल आनंद वाटतो.
कळावे
आपला
वि. आ. बुवा
-----------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
"व्यावहारिक जीवनोपयोगी विषय व ज्योतिषावरील अनेक विडीओजचा खजिना":
ही लिंक उघडा......

https://www.youtube.com/user/SDNatu.

विडीओज् आवडले........
ही लिंक शेअर करा.......
तर चँनेल subscribe सुध्दा करा......

"साफसफाईतील "खजिना" भाग १":":

 "साफसफाईतील, "खजिना"-भाग -१": !

आज कपाटातील खणाची
साफसफाई करताना, बाईंडींग केलेल्या माझ्या संग्रहातील हा "खजिना" !:

हे बाड माझ्याकडे बरीच वर्षे पडून होते त्यामध्ये काही स्वनिर्मित साहित्याचे अवश्य लेख स्वरूपात अथवा वर्तमानपत्रातील पत्रव्यवहाराच्या स्वरूपात होते तर काही मला आलेल्या मान्यवरांच्या प्रतिसादा चा रूपात होते प्रथम माझ्या स्वनिर्मित साहित्यातील काही निवडक अंश येथे पेश करतो. दुसऱ्या भागात मान्यवरांचे प्रतिसाद देणार आहे.

"अणुकथा":

"मीठ"
नीट साऱ्या तपासण्या करून झाल्या,
मला मूल होऊ शकणार नाही हे निश्चित झाले. संसारात सारच उरले नाही.
चारचौघीत झिडकारलेली मी झाले.
"त्या" क्षणांची तर गोडीच नासून गेली.

एवढ्या गडगंज मालमत्तेला वारसा मिळावा,
दुडूदुडू पाउलांनी घर-अंगण फुलावे,
म्हणून...म्हणून.....
त्याने दुसरे लग्न करावे हा माझा हट्ट.
एक जगावेगळी मागणी !
त्याचा निक्षून नकार,
खूप अनामिक सुख संवेदना नकळत निर्माण झाल्या.

पण....पण....
तेव्हापासून एक माझा नवाच हट्ट !
त्यानही त्याची पूर्ण तपासणी करून घ्यावी हा.
त्याचे प्रथम दुर्लक्ष.
माझा आग्रह, त्याचा नकार, माझा अट्टाहास.
त्याचे चवताळणे आकांडतांडव करणे.

तेव्हापासून तर,
एक नवीनच शंका मन पोखरत्ये,
हा तरी पुरुष-पूर्ण पुरुष आहे कां, ही !
आणि...आणि....
आधीच बेचव असलेल्या,
नीरस संसारात,
मीठ की हो पडून गेले.

सुधाकर नातू
("रोहिणी अंक" ऑगस्ट १९८५)
--------------------------
"एकटेपणा":
एकटेपणाच्या आव्हानातील अस्तित्वाचे हे प्रश्न: 'बरं मग जगायचे कशासाठी? कोणासाठी?' असा विचार नेहमीच प्रत्येकाच्या मनात येतो. माणसाची भौतिक, वैचारिक, मानसिक व आध्यात्मिक प्रगती केवळ त्याच्या चिंतन क्षमतेमुळे होत राहिली आहे. या नव्या दिशेने चिंतनशक्तीचे प्रेरणादायी स्रोत निर्माण होत आहेत. इतिहासाचा दाखला देऊन असे म्हणता येईल की, सामाजिक सुधारणांची लाट गेल्या शतकात आली आणि इतकी वर्षे कोशात असलेली स्त्री उंबरठ्याबाहेर येऊन, आपले स्वत्व शोधू लागली.

मी कोण आहे, मला जगायचे आहे म्हणजे काय करायचे आहे, असे प्रश्न अनेकांना पडू लागावेत ही चिंतेची बाब बिलकूल नसून मानव जीवनाच्या उत्क्रांती प्रवासातील एक आनंददायी गरुड झेप आहे. याचा एक कटु अर्थ स्पष्ट आहे, असे प्रश्न पडण्याआधी मानवसमाज जे काही जीवन जगत होता, त्याला मर्यादा होत्या. इतर काही जणांच्या जीवनकक्षेच्या थोडेसे पुढे इतकीच जन्मणे जगणे-मरणे या साखळीची कक्षा होती.

एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब, स्वतंत्र व्यक्तिमत्व या प्रवासातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर आता आपण येऊन ठेपलो आहोत. ज्ञानेंद्रिये व त्यावर नियंत्रण ठेवणारी विचारशक्ती यांच्या चिंतनाच्या माध्यमातून, विचार करून माणूस आपल्या अस्तित्वाचे खरेखुरे मर्म शोधून काढू शकणार आहे, ते आजच्या एकटेपणाच्या अस्वस्थतेच्या आव्हानामुळे, ज्ञानामुळे माणसाच्या बुद्धीचा प्रचंड आवाक्याचा दणका बसून या मूलभूत प्रश्नांची उत्तरे आणि जीवन जगण्याचा नवा मार्ग म्हणूनच मिळणार आहे.

सुधाकर नातू
माहीम, मुंबई १६
( "बहुतांची अंतरे" महाराष्ट्र टाईम्स, २१ नोव्हेंबर ९८)
-----------------------------
"कोठे चीन आणि कोठे आपण?":
चीनच्या प्रबळ वेगवान आर्थिक प्रगतीचे सार्थ विवेचन करणारे दोन लेख म. टा. मध्ये वाचले. त्यातील एका वाक्यातच फार मोठे सत्य लेखकाने सांगितले आहे:
"आपल्या देशाचे, देशाच्या नागरिकांचे भले व्हावे, अशी मनापासूनची कळकळ चीनच्या नेत्यांना होती व आहे हे चीनचे सद्भाग्य."

आपल्याकडे शतकापूर्वी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, अगदी अशीच स्थिती होती. देशहितासाठी सर्वस्वावर लाथ मारणारे अनेक लहान थोर पुढारी भारताला लाभले होते. म्हणूनच भारताला स्वातंत्र्याचा
मंगलकलश प्राप्त झाला. त्यानंतर मात्र गेल्या ५० वर्षांचा आपला इतिहास पाहता, जो तो नेता आणि सामान्य माणूसही आपले स्वतःचे भले कसे होईल, याचीच चिंता करून स्वार्थ साधण्याचा धडा गिरवत असल्याने, आपली सर्वच आघाड्यांवर पिछेहाट होत आहे.

लोकसंख्यावाढ, बेकारी, दारिद्रय रेषेखालील जनता, निवारा, पिण्याचे पाणी इत्यादी इत्यादी अनेक बाबतीत याच पन्नास वर्षात चीन आपल्या कितीतरी योजने पुढे गेला आहे. त्यामागे तेथील नेत्यांची दूरदृष्टी व देश हिताची आस कारणीभूत आहे. घोटाळ्यांच्या जंगलामागे घोटाळणार्या भारतवासीयांनासमोर मात्र भयानक अंधकार आहे.

सुधाकर नातू
माहीम, मुंबई.
( बहुतांची अंतरे महाराष्ट्र टाईम्स, १५/७/१९९७)
----------------------------
शेवटी,
माझी एक पूर्वप्रकाशित कविता:

"शोध":

उधळुनी अनंगाचे
अनंत रंग,

घेऊनी सहवासाचे
विविध सुगंध,

शोधिता परि
मिळेना,
प्रीतीची सरि
जुळेना.

असे कां ती
भावनांची असोशी?
कां ती मुळी
वासनांची कासाविशी?

काहीच कळेना
तार ही जुळेना.
अन्
येशी अवचित जीवनी
'तिला' नकोशी मला हवीशी,
खुपता मज,
आसवे तव लोचनी.
खुलता सुयश तवगे,
सुहास्य मम आननी !
अन्
गवसे सहजी अर्थ,
प्रीतीचा हाची गर्भ,
आपुलकीचे सारे मर्म,
एकमेकांचा खरा दर्द,
एकमेका देई दर्द !

सुधाकर नातू

('रोहिणी' मासिकातली कविता )
----------------------------

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
"व्यावहारिक जीवनोपयोगी विषय व ज्योतिषावरील अनेक विडीओजचा खजिना":
ही लिंक उघडा......

https://www.youtube.com/user/SDNatu.

विडीओज् आवडले........
ही लिंक शेअर करा.......
तर चँनेल subscribe सुध्दा करा......

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

"ह्रदयसंवाद-संकल्पांवर बोलू काही":

 "ह्रदयसंवाद-संकल्पांवर बोलू काही":


संकल्प केव्हाही करावेत आणि माणसं नेहमी काही ना काही तरी संकल्प करूनच पुढची कृती करत असतात. दररोजचे व्यवहारही त्यामुळेच पुढे पुढे जाऊन रोजचं जीवन घडत असतं. संकल्प करायला दोन मुहूर्त चांगले असतात एक म्हणजे नववर्ष आणि दुसरा म्हणजे वाढदिवस जेव्हा असेल ते त्या वेळेला आपल्याला स्फूर्ती येते आणि आपण संकल्प करत असतो.

त्यातील विशेषतः नववर्षाचे संकल्प केले जातात, पण सहसा ते पाळले जातात असे नाही. जे वर्ष गेले त्यामध्ये आपल्या कमतरतांचा आढावा घेऊन सुधारणा करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे माणूस नेहमी निश्चयाने नववर्षाला संकल्प करतो. मात्र जसजसे वर्ष सरत जाते, तस तसे ते संकल्प विरत, विसरत जातात, दरवर्षीचा हा अनुभव सालोसाल आढळतो परंतु तरीही संकल्प केले जातातच.

या पार्श्वभूमीवर काही प्रातिनिधिक संकल्प असे असू शकतात:
१. प्रामुख्याने प्रत्येकाने तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्याकरता सकाळी फिरायला जावे, आंघोळीनंतर वा अगोदर माफक कां होईना, व्यायाम करावा आणि योग्य तो आहार, योग्य वेळी घेणे आणि भरपूर पाणी रोज पीणे. त्याचप्रमाणे झोप देखील पुरेशी घेणे.
२. सगळ्या गोष्टी वेळच्यावेळी कराव्यात. त्याकरता आवराआवर नियमित करावी, पसारा करू नये, व्यवस्थितपणा हवा. "तहान लागली की विहीर खोदायची" हा प्रकार थांबूवून, कोणतीही गोष्ट जिथल्या तिथे, जेव्हाचे तेव्हा आणि ज्याचे त्याला" हा सोपा मंत्र अंगीकारावा.
३. जवळची नाती बिघडू शकतील असे वागणे टाळावे. त्याकरता काही कृती करण्यापूर्वी किंवा काही बोलण्यापूर्वी, कुणाशी काय, कशाकरता बोलतो आणि त्यांचे काय परिणाम होतील याची जाणीव ठेवूनच कृती करावी अथवा बोलावे. नाती सुधारता आली, तर ती सुधारावी.
४ दिवसातून एकदा स्वतः अंतर्मुख होऊन, विचार करणे, ते तपासणे आणि प्रसंगी ते लिहिण्याची संवय लावून घेणे, ही आपल्या प्रत्येकाच्या जवळची सर्जनशीलतेची, आनंद देणारी कृती असते. त्यामुळे मनातील नवनवीन कल्पना तर्कशास्त्राच्या आधारे तावून-सुलाखून पाहण्याची सवय आपल्यात अंगीकारा. केवळ वाहवा मिळवण्यासाठी नव्हे, तर आपल्यासाठी हा एक विरंगुळा आहे, असे समजून नियमित काही ना काही लिहित जावे.
५. समस्या या जीवनात अधून मधून प्रत्येकाच्याच आयुष्यात येत राहतात. त्या समस्यांचे वेळच्यावेळी जर काही कृती करून निराकरण केले नाही, तर चिंतेत रूपांतर होते. चिंता ही स्वयंभू अग्नी सारखी असते, ती जितकी जास्त करावी, तितकी वाढत जाऊन, त्या काळजीच्या काजळीत, आपण एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात अडकावे, तसे गुरफटत जातो. त्या चिंतेच्या फेऱ्यातून बाहेर न पडता आल्यामुळे, आपण शक्यतोवर समस्ये पासून दूर दूर पळतो आणि तितकी ती समस्या अधिक तीव्र होते.

त्याचा परिणाम चिंतेची आग भडकण्यात होऊ लागतो. काय करावे, कशी सुटका करावी, काहीच उपाय न मिळाल्याने, आपण हतबल निराश आणि उदास होतो. अशा वेळी खरे शहाणपण समस्येचे चिंतेत रूपांतर होण्याआधीच, आपण त्या समस्येकडे तिच्या संभाव्य परिणामांकडे, अधिक समंजस डोळसपणे पहावे. तसेच गरजेचे असते, त्या परिणामांना तोंड देण्याची आपण तयारी ठेवणे. समस्येच्या कारणांचा विचार करून, समस्येची उकल काय आहे आपण ती सुलभतेने कशी सोडवू याचा विचार करावा. हे उपाय प्रत्यक्षात आणण्याचा स्वतः प्रयत्न करावा, त्यातूनही जमले नाही तर दुसऱ्या कुणाची मदत घेता येईल कां, याचा शोध घ्यावा. त्या माणसाकडून त्या समस्येवरील उपाय प्रत्यक्षात आणावे. एवढे होईपर्यंत शांत अलिप्त राहावे. पुष्कळशा समस्या अशा रीतीने सुटतात किंवा सुटू शकतात.
६ सरते शेवटी....
असे वाटले तर........
चालावे असे वाटले तर-सन्मार्गाने चाला,
धरावे असे वाटले तर-चांगली संगत धरा,
पळावे असे वाटले तर- दूर्जनांपासून दूर पळा,
सोडावे असे वाटले तर-वाईट संगत सोडा,
सोडावे असे वाटले तर-दुर्व्यसन सोडा,
टाळावे असे वाटले तर-आळस टाळा,
गिळावे असे वाटले तर-राग गीळा,
द्यावे असे वाटले तर-प्रेम द्या,
घ्यावे असे वाटले तर-सद्गुण घ्या,
रहावे असे वाटले तर-समाधानाने रहा,
गावे असे वाटले तर-थोरांचे गुणगान गा !

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

"जादुचा कंदील !":

 "जादूचा कंदील !":

सिनेमा हा एक जादूचा कंदील आहे हे मला श्री. अवधूत परळकर यांचा "आठवणींचे असेच असते" या पुस्तकातील लेख वाचून समजले. जागतिक सिनेमाच्या अद्भुत दुनियेमधून आपल्याला मुक्त संचार करणारा, करवून आणणारा हा लेख खरोखर मनावर एक असीम ठसा उमटवून गेला.

सिनेमा कां बघावा, कसा बघावा त्यासाठी कोणती दृष्टी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे लेखातील- लेखनातील शब्दांची भाषा आणि सिनेमातील चित्रांची भाषा, यातील फरक कोणता आणि तो कसा समजून घ्यायचा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या लेखामधून मिळून गेली. त्यावरून लक्षात आले की, प्रत्येक माध्यमाची एक वेगळी भाषा, आगळी खुमारी असते, त्या त्या माध्यमाचा आस्वाद घेण्यासाठी विशिष्ट प्रकारची आवड असावी लागते, हे जसे उमजले आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक माध्यमाच्या शक्तीस्थळांचा योग्य तो प्रत्यय आल्याशिवाय, ते माध्यम आपल्यावर गारुड करत नाही हेही उमजले.

जाणिवा नेणीवांच्या महासागरामध्ये कसंही, कुठेही वहावत जाणार्या जीवनाचा एक वेगळा अर्थ, मर्म आपल्याला ह्या अशा विविध माध्यमांमधून समजता येऊ शकते, याचीही एक अनाहुत जाण ह्या लेखाच्या वाचनावरून मनःपटलावर उमटली. त्यासाठी रसिकता मात्र रोमरोमात हवी आणि ती जर असेल, तर जे जे चांगले आहे, ते ते तिथे तिथे जाऊन त्या त्या माध्यमातून रसिक मिळवू शकतो, नव्हे अट्टाहासाने तो मिळवतच असतो. जर अंगी रसिकता असेल, तर जीवन अधिकाधिक समृद्ध होत कसे जाते हेही पाहता पाहता मला वाटू लागले. नशिबाने कणभर का होईना अशा प्रकारची रसिकता आपल्यात जरूर आहे, ह्याची जाणीव हा संदेश लिहीत असताना आपोआपच माझ्यामनामध्ये जागी झाली.

"आठवणींचे असेच असते":
श्री अरुण शेवते संपादित आठवणींचे असेच असते हा ऋतुगंध दिवाळी अंकांतील विविध वर्षांत मध्ये प्रसिद्ध झालेल्या २५ च्या आसपास विविध क्षेत्रातील नामवंतांच्या लेखांतून प्रकट होणारा वैविध्यपूर्ण जीवनपटलांतील वेचक वेधक आणि मनोज्ञ आठवणींचा संच आहे.

सर्वश्री मृणाल गोरे, अरुण साधू, कुमार केतकर, निळूभाऊ फुले, रणजित देसाई, गिरीश कुबेर, गुलजार, डॉक्टर उदय निरगुडकर, शंकर वैद्य, नाना पाटेकर, अमृता शेरगील.. इत्यादी इत्यादी...आणि अर्थातच अवधूत परळकर अशांच्या आठवणींची जादुई मांदियाळी ह्या संग्राह्य पुस्तकात आहे.

"विश्वरुप दर्शन":

मृणाल गोरे आणि बंडू गोरे यांचे उणेपुरे १० वर्षाचे सहजीवन आणि त्यातील त्या दोघांचे देशसेवा आणि समाज सेवा यासाठी घेतलेले व्रत, ह्या पुस्तकात वर्णिलेले आहे. त्या वेळच्या अनेक गोष्टीपैकी एक कदाचित माहीत नसलेली गोष्ट म्हणजे, मृणालताईंनी एम. बी. बी. एस. ला प्रवेश घेऊन पहिल्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतरच शिक्षण सोडून स्वतःला संपूर्ण समाजसेवेत झोकून दिले होते, ही. खरंच त्या वेळची तरुण पिढी, स्वातंत्र्य मिळविण्याच्या ईर्षेने आणि समाजाच्या हितासाठी आपण काहीतरी योगदान दिलेच पाहिजे, अशा मनोवृत्तीची होती, हे देखील त्या लेखातून उमजते.

शिरीष पै, अर्थात आचार्य अत्रे यांच्या कन्या, त्यांच्या जीवनपटाचा बालपणापासूनचा जो चित्रविचित्र घडामोडींचा आलेख आपल्यासमोर उभा राहतो, तो देखील असाच लक्षात ठेवण्याजोगा. त्याकाळचे जुने पुणे, तेथील वाडासंस्क्रुती त्याकाळचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि या साऱ्यांमधील आचार्य अत्रे यांच्यासारख्या पहाडाएवढे कर्तृत्व व भाषाप्रभूत्व असलेला, वक्ता दशसहस्त्रेषु आणि त्यांच्याच भाषेत दहा हजार वर्षात असे व्यक्तिमत्व एखादाच घडते, त्याचेही चित्र इथे हक्क करून जाते.

याउलट श्री यशवंतराव गडाख यांच्या लेखामधून
मेळघाट व गडचिरोलीमधील आदिवासी समाजाचे जे दर्शन घडते आणि आमटे कुटुंबीयांच्या असामान्य योगदानाचे जे काही वर्णन आहे ते निश्चितच प्रेरणा देणारे आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये अजूनही असा अशिक्षित, त्याचप्रमाणे अत्यंत मागासलेला, बाहेरच्या जगाची कुठलीही जाणीव नसलेला समाज येथे जंगलामध्ये राहून आपले जीवन व्यतीत करतो आहे, हे देखील समजून मनाला चटका बसतो.

कुमार केतकर ह्यांनी त्यांच्या रशियामधील प्रवासाचे जे वर्णन केले आहे, त्यामुळे तेथील एकंदर परिस्थिती ही "दाखवायचे दात वेगळे आणि खरे वेगळे" अशी किंवा "बडा घर पोकळ वासा" अशी होती हे प्रकर्षाने ध्यानात येते. कोणताही इझम् हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुखसमाधान आणतोच असं नाही हेच यावरून मनावर ठसते.

अमृता प्रीतम यांच्या कथेमधून ज्योतिष आणि पुढे काय होणार याची स्वप्नांतून माणसाला कशी पूर्वकल्पना येऊ शकते, त्याची अद्भुत व चित्तथरारक कहाणी आहे. तर डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या प्रशिक्षणानिमित्त केलेल्या ब्राझीलवारी मधून, त्या दूरवरच्या देशातील खेडोपाडींचे नगर शहरांचे, तेथील समाज जीवन तसेच विविध व्यक्तिमत्वांचे आपल्याला आतून-बाहेरून दर्शन होते. अमृता शेरगील ह्यांच्यासारख्या फक्त २८ वर्षांचं आयुष्य लाभलेल्या जागतिक कीर्तीच्या चित्रकर्तीचे कलात्मक चित्राविष्कार आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनात येणाऱ्या अनेक माणसांबरोबर कस कसे अनोखे जगावेगळे भावबंध होते, तसेच आयुष्यातील नाट्यमय घडामोडी आणि उलथापालथीचे प्रसंग आपल्याला खरोखर चटका लावून जातात.

एवढे पुरे नाही म्हणून की काय, मुकेश माचकर ह्यांनी नेपोलियन गांधी अब्राहम लिंकन, विवेकानंद आदी अनेक महान व्यक्तींच्या आठवणींमधून, खूप मनोरंजक घटना वर्णिलेल्या आहेत. त्यामधून अनेकानेक मान्यवर व्यक्तीमात्रांच्या जीवनातील चटकदार भेळपुरी बरोबर, एक मसालेदार अशी चव आणणारे अनुभव त्या छोट्या व गंमतीशीर गोष्टींमधून येतात.

ही केवळ वानगीदाखल विविध अशा अनुभवांची जीव़ंत उदाहरणे. अशा जवळजवळ २५ व्यक्तींची व्यक्तीचित्रे किंवा जीवनपटांतील आठवणी या पुस्तकात शोभादर्शक यासारख्या वेगवेगळ्या अशा अनुभूतींची जाणीव करून देतात. उगाच मी म्हटले नाही की, जणू हे पुस्तक वाचन म्हणजे समाजजीवनाचा, मानवजीवनाचा विश्वरुप दर्शनाचा आराखडा आहे.

प्रत्येकाने वाचावेच असे हे पुस्तक आहे, कारण त्यामधून जणू प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची कादंबरी आणि त्यामधून आगळ्यावेगळ्या अशा जीवन पटलांचा आस्वाद आपल्याला घेता येतो आणि जणु समस्त मानवी जीवनाचे विश्वरूप दर्शनच अगदी जवळून, त्या वाचनातून होते हे मला जरूर सांगावेसे वाटते.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू