शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

"आजोबांचा बटवा-९": "हे प्रणयगंध किती अनंत-३":


 "आजोबांचा बटवा-९":
"हे प्रणयगंध किती अनंत-३":

"अधुरी ही प्रेमकहाणी":

मी आज ४८ वर्षांची आहे अन् तरीही लग्न केलेले नाही, आश्चर्य वाटावे अशीच ही गोष्ट आहे. मी वडिलांची एकुलती एक मुलगी अन पाठीमागे दोन भाऊ. मला चांगली नोकरी आणि रूपही चारचौघींसारखे. तरीही मी विवाह वेदीवर चढले नाही, त्याचे कारण फक्त मलाच माहित आहे.

लहानपणापासून ज्याच्याबरोबर वाढले तो चंदू माझ्या मनाचा सम्राट. मी खूप शिकले, पण तो मॅट्रिकच्या पुढे जाऊ शकला नाही. पण त्याचे कुरळे केस गोरा वर्ण, देखणे रुप आणि बेफिकीर वृत्ती यावर मी मोहित झाले. आमच्या घरी त्याच्याशी लग्न करायला परवानगी मिळणे शक्यच नव्हते. दुरूनच अबोल प्रेम आम्हा दोघात अंकुरत गेले मी नोकरीत खूप बढती मिळवत होते, तरी पण चंदूचे कुठेच काही खरे नव्हते. कुठलासा टर्नरचा कोर्स केला होता, त्यामुळे काही महिने त्याला तात्पुरती नोकरी मिळात असे, तर बाकी सर्व काळ बेकारी. सहाजिकच मोकळ्या वेळात लागणारी सारी वाईट व्यसने त्याला लागली.

पण अशी सारी विपरीत स्थिती असुनही, काही केल्या माझ्या मनातून अन् स्वप्नातून चंदू जात नव्हता. त्याच्याही मनातून मी काही हलत नव्हते. वडील भावा बरोबर एका खोलीच्या घरात तो राहतो. त्याची वहिनी काहीशी वेडसर आहे. त्यामुळे तो त्या घरात मला पत्नी म्हणून घेऊन जायला तयार नाही. कां? तर त्या सार्‍या वातावरणाचा मला त्रास होऊ नये म्हणून! इतकी त्याला माझ्या विषयी काळजी आहे. शिवाय बायको वेडसर असूनही तिच्यावर मनापासून प्रेम करणारा मोठा भाऊ असल्यामुळे त्याचा आदर्श चंदू पुढे आहे.

घरातून पळून जाऊन त्याच्याशी लग्न करायचीही माझी तयारी होती आणि त्याच्यापाशी चार जणांच्या कुत्सितत हल्ल्याला तोंड द्यायची धमक होती. एवढेच काय माझ्या पैशातून कर्ज काढून कुठेतरी ब्लॉक घेऊन संसार काढणे अशक्य नाही, हे ही मी त्याला पटवून देत आले आहे. पण अत्यंत मानी स्वभावाचा चंदू त्या गोष्टीला तयार नाही. तो म्हणतो 'नंदा, मी असा जरी सध्या असा फाटका असलो तरी, एक ना एक दिवस मी माझे विश्व उभे करीन. माझ्या धमक आहे, मी स्वतःच्या कष्टाने खूप पैसा मिळवेन यशस्वी होईन आणि तेव्हाच माझ्या नंदुराणीला स्वतंत्र घरात घेऊन जाईन, तरच खरा चंदू!'

त्याच्या अशा स्फूर्तीदायी वाक्यांवर मी विसंबून आहे, स्वप्ने बघत आहे, माझे सारे स्त्रीत्व जपले आहे ते त्याच करता, जेव्हा चंदूच्या घरात उंबरठा ओलांडून मी जाईन तेव्हा. पण तो क्षण मात्र मला वर्षानुवर्ष वाकुल्या दाखवतो आहे. बरोबरीच्या मुलींची लग्ने होऊन त्या स्वतः आता काही वर्षांनी सासुबाई होतील इतक्या अवस्थेत पोहोचल्या आहेत आणि मात्र मी? मी मात्र वाट नाही, गाडी चुकल्यासारखी एकाच ठिकाणी उभी आहे. साऱ्या कुटुंबियांच्या भावना दुखवत, समाजाच्या विचित्र नजरांना टोमण्यांना तोंड देत, शरीराच्या सुलभ, हळूवार भावना आपल्या मनातल्या मनात जाळीत, माझ्या चंदुकरीता, आमच्या अबोल प्रीतीकरिता....
आमचे जमले या जन्मी, तर ठिकच. नाही तर मी अनंतकाळपर्यंत, अगदी पुढच्या जन्मापर्यंत वाटच पाहत राहणार आहे.....

हा सारा तिचा अट्टाहास कां? कशाकरिता?
हा असा कसा मनस्वी अन् तपस्वी प्रणयगंध?

सुधाकर नातू

( ही कथा 'रोहिणी' मासिक जून १९८३ च्या अंकात प्रकाशित)

ता.क.
ता.क.
असेच चित्ताकर्षक साहित्य आणि तसेच १५० हून अधिक वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

संग्रही जरूर ठेवून शेअरही करा.....

"आजोबांचा बटवा-८": "हे प्रणयगंध किती अनंत-२":


"आजोबांचा बटवा-८":
"हे प्रणयगंध किती अनंत-२":

विश्वाच्या संक्रमणातून मानव उत्पन्न झाल्यानंतर, शरीराबरोबर त्याला देण्यात आलेले तरल मन हा त्या विश्वंभराच्या सामर्थ्याचा परमोच्च बिंदू होय. स्त्री-पुरुषांच्या मनाच्या अनंत संवेदनांपासून चित्रविचित्र प्रणयगंध फुलत राहिले. संस्कृतीच्या विकासातून निर्माण झालेल्या विवाह रूढीने या प्रणयगंधांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न अपुरा ठरला, इतके हे पाश अतिविशाल आणि गूढ रम्य आहेत. त्यांना स्थळ-काळ, वय, जात-पात नातीगोती कशाकशाचे म्हणून बंधन मान्य नाही.
दोन व्यक्ती एकमेकांना कां आणि कधी आवडाव्यात कराव्यात, हा एक अनाकलनीय प्रश्न आहे.

मनाच्या गाभार्‍यात त्यामुळे अनेक कल्लोळ जन्मतात. जितक्या व्यक्ती, तितक्या मनोहारी त्यांच्या अभिव्यक्ती. दोन व्यक्ती एकमेकांना कां कधी आवडाव्यात याला उत्तर नाही. कुणाला एखादीचे हास्य मोहित करते, तर कुणाचे बालिश डोळे, एखादीचा ठाव घेतात, कुणाचा भोळाभाबडा स्वभाव एखादीला आवडतो, तर एखादीच्या अनुकंप अवस्थेतून सहानुभूती मधून प्रणय भावना फुलत जाते. किती किती म्हणून हे प्रणयगंध आठवायचे !

"स्मृतिची ती उलगडता पाने":
तीन-चार दशकांपूर्वी काही नियतकालिकातील माझे प्रकाशित साहित्य चाळत असताना, अचानक ह्या माझ्या तीन रचना मला गवसल्या.
प्रणयभावनेच्या शोभादर्शकासारख्या बदलत्या रंगसंगतीचे हे तीन चित्तथरारक काव्यमय आविष्कार:

त्या इथे देत आहे....

"सीमोल्लंघन"!:
हे प्रणयगंध किती अनंत.....
अनंगरंगी हे अनंगरंग....
विविधरंगी ते भावतरंग....
शब्दांचे ते झेल.....
नजरेचे हे खेळ.....
भावनांचे ते वेल.....
वासनांचे हे मेळ......
आज मर्यादांचे सीमोल्लंघन.....
करिती सर्वस्वाचे समर्पण.....
दोन जीवांचे मीलन ज्वलंत.....
हे प्रणयगंध किती अनंत.....

###################

"कां?... कां?...कां?...."
भोग, भोगून भागतो कां?
योग, जुळवून जुळतो कां?
राग, रागवून रहातो कां?
प्रीत, रीत जाणते कां?
गीत, गाऊन संपते कां?
वाट, पाहून दमतो कां?
याद, विसरून चालते कां?
वाद, वदवून विझतो कां?
गंध, घेऊन उडतो कां?
नाद, निंदून सुटतो कां?
पाप, पचवून पचते कां?
चाल, चालून चुकते कां?
काळ, कळवून येतो कां?

###################

"शोध":
उधळूनी अनंगाचे अनंत रंग....
घेऊनी सहवासाचे विविध सुगंध....
शोधिता परी मिळेना.....
प्रीतीची सरी जुळेना....
असे कां, ती भावनांची असोशी....
कां, ती मुळी वासनांची कासाविशी.....
काहीच, मुळी कळेना.....
तार,कशी ही जुळेना....
अन्
येशी अवचि जीवनी.....
तिला नकोशी, मला हवीहवीशी....
खूपता मज, आसवे तव लोचनी....
सुयश तव, सुहास्य मम आननी..
अन्
गवसे, सहजी अर्थ..
एकमेका देई दर्द....
प्रीतिचा हाचि रे गर्भ.....
आपुलकीचे सारे मर्म......

सुधाकर नातू....
###################
ता.क.
असेच मननीय लेख आणि तसेच ३५० हून अधिक वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

संग्रही जरूर ठेवून शेअरही करा.....

मंगळवार, २८ जुलै, २०२०

"आजोबांचा बटवा-७": "आगे बढो वसंतरावजी":


 "आजोबांचा बटवा-७":
"आगे बढो वसंतरावजी":

प्रा. वसंतराव कानेटकर यांच्या नाटकांची पंचविशी. १ मे १९७९ चा तो दिवस, प्रख्यात नाटककार वसंतराव कानेटकरांच्या पंचविसाव्या नाटकाचा, शंभरावा प्रयोग: 'चंद्रलेखा' प्रकाशित 'गोष्ट जन्मांतरीची' चा.

हा असा अद्भुत सोहळा साजरा करायचे, हे नशिबी यायला आपणही तसेच अद्भुत असावे लागते. मराठी रंगभूमीच्या इतिहासात मध्यरात्रीच्या नाट्यप्रयोगांची पहाट सुरू करणारी शनिवारवाड्याचे दरवाजे त्याच्या 'स्वामी' साठी उघडणारी, एकाच दिवसात एकाच नाटकाचे चार प्रयोग करून धमाल उडवणारी आणि हे पुरे नाही, म्हणून की काय, पाण्यावर नाट्यप्रयोग करण्याचा सन्मान मिळवणार्या 'चंद्रलेखा' या अद्भुत नाट्यसंस्थेच्या भाळी हा हृदयंगम अनुभव साजरा करणे होते.

तुडुंब भरलेल्या रविंद्र नाट्यमंदिरात आपल्या आपल्या चाहत्यांना धन्यवादाचे चार शब्द सांगताना म्हणूनच प्रा. वसंतराव कानेटकर यांना गहिवरून आले. "ऐतिहासिक, सामाजिक पौराणिक नाटकांचे विषय हाताळल्यानंतर, मराठी प्रेक्षकांना अद्भुतरम्य नाटकांची चुणूक दाखवावी या इराद्याने 'गोष्ट जन्मांतरीची' हे नाटक आपण लिहिले; इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, माणूस हा नियतीच्या हातचे बाहुले न बनता, नियतीचा नियंता होऊ शकतो, ते त्याच्या विचारशक्तीच्या जोरावर. हे सांगायला जेव्हा नाटक लिहायला त्यांनी घेतले तेव्हा साऱ्यांनीच त्यांना वेड्यात काढले होते, हा प्रयोग फसणार असेच अवतीभोवतीचे म्हणत होते. परंतु तरीही ते खोटे ठरवून आज हा सुदिन उगवला यातच आपल्याला सारे काही पावले. ही अशीच रंगभूमीची सेवा करायला आपल्याला मिळावी, हीच रंग देवते पुढे प्रार्थना आहे!" अशा शब्दात त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले.

प्रख्यात अभिनेत्री शशिकलाबाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या हृदयंगम सोहळ्यात, नाटकाशी संबंधित अशा सर्वांना चंदेरी, रूपेरी अश्वप्रतिमा देण्यात आल्या. "गोष्ट जन्मांतरीची" नाटकाचा प्रयोगही नेहमीप्रमाणे देखणा झाला आणि ह्या संस्मरणीय प्रसंगाला उपस्थित रहायला मिळाले, म्हणून साऱ्यांनाच मनातून धन्य धन्य वाटत असले पाहिजे. अर्थात माझ्या ही पदरी हे नशीब यायला, मला आठवड्यापूर्वी नाशिकला जावे लागले होते. तसा मी जवळ जवळ वीस बावीस वर्षांनी नाशिकला जात होतो. तेव्हाचे नाशिक आणि आताचे नाशिक यात विशेष फरक पडला आहे. 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' सारख्या स्फुरण चढवणाऱ्या कविता करणार्या कुसुमाग्रजांचे नाशिक, ह्यात आता नाटककार कानेटकरांचे नाशिक, अशी महत्वपूर्ण भर पडली आहे.

सकाळी साडेनऊ वाजता वसंतरावांच्या "शिवाई" बंगल्यावर मी पोहोचलो. वसंतराव मला लगेच माडीवर लेखनकक्षात घेऊन गेले. तिथे येऊन पांढर्या स्वच्छ चादर अंथरलेल्या गादीवर तसाच गुबगुबीत तक्क्या ठेवून समोरच्या सागवानी लाकडाच्या सुरेख डेस्कवर, हा तपस्वी सदाबहार, हसतमुख माणूस, जेव्हा आपली लेखणी हातात घेतो, तेव्हाच मोत्यासारख्या मौल्यवान आणि सुवर्णासारख्या कांतिमान शब्दांची विचारधारा जणू मोरासारखी तिथे थुई थुई नाचत कशी असेल, हे मला आमच्या त्या दोन तासांच्या गप्पात दिसून आले.

एका प्रख्यात कवीच्या पोटी जन्मलेल्या आणि शिक्षणाचे नेहमीचे गड सरासर पार करत गेलेल्या, ह्या वसंताला कॉलेजमध्ये, केवळ चोविसाव्या वर्षी प्राध्यापकी मिळणे, हेच मुळी एक आनंदाचे लेणे वाटत होते. किर्लोस्करसारख्या दर्जेदार मासिकात पहिली कथा वयाच्या अठराव्या वर्षी येऊनही 'घर' 'पंख' 'पोरका' यासारख्या कादंबऱ्या लिहूनही जी तार म्हणावी, ती मुळी गवसतच नव्हती. वर्षे भुरु भुरु पंखांनी उडून जात होती. पस्तिशीने गाठले कधी हे कळलेही नव्हते. अशा क्षणी, अशीच एक कादंबरी लिहायला बसलेल्या, वसंतला काहीतरी वेगळेच वाटायला लागले, संवाद लेखणीतून झरझरा उतरून लागले अन् कादंबरी लिहायला घेतल्याचे नाटक 'वेड्याचे घर उन्हात बांधून' दिल्यासारखे झाले. नस सापडली होती, तार जुळली होती. कानेटकरांमधल्या साहित्यिकाला योग्य तो मार्ग सापडला होता. कथावस्तू संवादातून फुलवत नेता नेता, करमणुकीच्या आडून प्रेक्षकांच्या अंतर्मनाला कुठेतरी साद घालणाऱ्या नाटकांची जणु गुहाच कानेटकरांचे समोर दत्त म्हणून उभी राहिली.

प्रसंग १९५७/५८ चा, म्हणजे नाट्यसृष्टीला वखत आणीबाणीचा होता. रांगणेकरांची 'कलानिकेतन' बाबुराव गोखले यांची 'श्री स्टार्स' आणि पेंढारकरांची 'ललितकलादर्श' वगळता, तर बाकी सारे सामसूमच होते. अशा वेळेला नाटकाची नाट टाकाला लागणे, म्हणजे खरोखर वेड्यांचा बाजार होता. पण प्रत्येकाच्या नशिबी कुणी ना कुणी सहाय्यकर्ता, केव्हा ना केव्हा अनाहूतपणे अचानक धावून येतो. वसंतरावांना तो कुसुमाग्रजांच्या रुपाने मिळाला. त्यांना नाटक इतके आवडले की ते लगेच त्यांनी पुण्याला नेऊन प्राध्यापक भालबा केळकर यांना दाखवले. 'पूना ड्रँमँटिक असोसिएशनने', ते राज्य नाट्यस्पर्धेत सादर करून पहिले बक्षीस मिळवले. त्यातूनच डॉ. श्रीराम लागूंसारखा खंदा नटसम्राट रंगभूमीला मिळाला. त्या पुढचा इतिहास तसा ताजाच आहे...........
--------------------------
"गोष्ट जन्मांतरीची" हे कानेटकरांचे २५ वे नाटक. या नाटकानेही शंभरी ओलांडली. याच वर्षात
"कोपता वास्तू देवता" या निमित्ताने कानेटकरांचे चिरंजीव प्रियदर्शनही नाट्यलेखनाच्या प्रांतात आले, हा एक योगायोग. प्रा. वसंतराव कानेटकर यांच्या या नाट्यनिर्मितीच्या प्रवासाबाबत त्यांच्याशी केलेले हे माझे हितगुज, 'साप्ताहिक मनोहर' २७ मे ते दोन जून १९७९ ह्या अंकामध्ये जसे प्रसिद्ध झाले, तसे इथे दिले आहे....
---------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असे खुसखुशीत नवनवीन लेख आणि तसेच १५० हून अधिक वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

संग्रही जरूर ठेवून शेअरही करा.....

सोमवार, २७ जुलै, २०२०

"तोल मोलके बोल":


"तोल मोलके बोल":
पहिल्याच भेटीत एखाद्या व्यक्तीची आपली ओळख नसताना तिच्याबद्दल आपले जे मत तयार होते ते नीट विचार करून बोलायला हवे, नाहीतर त्या व्यक्तीचा उपमर्द होऊन परस्पर संबंध कटू होऊ शकतात. त्यादृष्टीने जिभेवर कायम संयम हवा.

तसा माझ्या एका मित्राचा एक अनुभव आहे. त्याला आले मनात की, बोलून टाकलं जनात अशी संवय आहे. एका ठिकाणी तो कुटुंबियांसमवेत पहिल्यांदाच जात होता. तिथे त्यांचे स्वागत एका वयस्क दिसणाऱ्या स्त्रीने आणि तिच्यापेक्षा तरुण वाटणाऱ्या पुरुषाने केले. तेव्हा त्या पहिल्याच भेटीत, एकमेकांची ओळख करून देताना, ह्याने त्या पुरूषाला विचारले "ही तुमची आई आहे कां?" खरं म्हणजे त्याने तसं बोलणं बरोबर नव्हतं. ते दोघं स्वत:ची काय ओळख करून देत आहेत, ते ऐकायला हवं होतं. कारण नंतर समजलं, की, ते दोघं नवरा-बायको आहेत! त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे ह्यांचे संबंध कायमचे बिघडले.

दुसरा अनुभव असाच विचित्र. मुलीला स्थळ शोधण्यासाठी ही मंडळी एका घरी गेली असताना, वयस्कर पुरुष व त्याच्या मानाने तरुण भासणार्या स्रीने त्यांचे स्वागत केले. तेव्हा ह्या मित्राच्या सौ.ने त्या बाईला विचारले की, हे ग्रहस्थ तुमचे सासरे आहेत कां? दुर्दैवाने तो तिचा नवरा निघाला. परिणाम काय झाला, ते सांगायची गरजच नाही!

गरज असेल तेव्हाच मुद्देसूद बोलावे. अति बोलणे, आपल्या प्रतिमेची हानी करते. अंतिमत: आपल्या तब्येतीवर व परस्पर संबंधांवर अनिष्ट परिणाम होतो.

आपले बोलणे काय परिणाम करेल, त्याचा विचार आपण बोलण्यापूर्वीच करायला हवा. आपल्याला अंतिमत: जे काम साध्य करायचे आहे, त्यासाठी आपले बोलणे, हा अडथळाच ठरत नाही ना, ह्याचे तारतम्य पाळायला हवे. जी व्यक्ती आपले काम तडीला नेणार आहे, तिला पहिल्याच भेटीत केवळ तर्कसंगत असे नियम कठोरपणे सांगत, तिच्याकडे असलेल्या अपुऱ्या माहितीबद्दल अवहेलना करणारे शब्द बोलूच नये. नेहमी त्या व्यक्तीच्या कलाने घ्यावे, नाहीतर मूळ काम होणे, तर दूरच पण वेगळेच काहीतरी होऊन, सगळं ठप्प होऊन बसते! तुसडेपणा झिडकारल्यागत वागणे, त्या प्रकारे बोलणे म्हणजे बेपर्वाई झाली. डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवावी.

माझाच एक अनुभव सांगतो. घरात रंगकाम करायचे होते. ते करणार्या कंपनीचा माणूस जेव्हा आमच्या घरी आला, तेव्हा त्याच्याजवळ विशेष काही माहिती नव्हती. तेवढ्या आधारावर, मी वाटेल तसं अद्वातद्वा बोललो आणि ग्राहकाकडे येण्यापूर्वी पूर्ण माहिती का करून घेतली नाही, अशा तर्हेचे त्याला खूप लागेल असे बोललो. परिणामस्वरूप, रंगकाम रखडले, नुसते वादविवादच होत गेले! म्हणून डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर हवी.
-------------------------
"लेेेथ जोशी": एक निरीक्षण
मी 'लेथ जोशी' चित्रपट ह्या लाँकडाऊनच्या काळातच टीव्हीवर बघितला आणि त्यामुळेच कदाचित तो मनावर अधिकच विलक्षण परिणाम करून गेला.

झपाट्याने बाजारू झालेल्या माहोलात इथे, एका मनस्वी, अंगभूत कलेत तपस्वी माणसाची जी ससेहोलपट अखेरपर्यंत होत जाते, तिने कुणाही संवेदक्षम माणसाचे ह्रदय पिळवटून निघेल. असे असामान्य व अप्रतिम चित्रपट कधी पडद्यावर येतात अन् अंतर्धान पावतात ते कुणाच्या खिजगणतीतही नसावे ही आपली दारुण शोकांतिका आहे.
---------------------------

"अनुभवाचे बोल":

# "जे जे करावयाचे, ते ते आपआपल्या परिने सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करणे, हे अवर्णनीय आत्मानंद देणारेच असते.

# "बेसावधपणे सारासार विचार न करता घेतलेले महत्वाचे निर्णय अखेर घातकच ठरतात."

# जो समाज कायदा व नैतिकता मानत नाही, त्याचा भविष्यकाळ अंध:कारमय राहील हेच खरे.

# "मी म्हणते ते तेव्हाच्या तेव्हाच झालं पाहिजे, मला जे वाटतं ते अन् तेच बरोबर", अशा दुराग्रही हट्टीपणापायी, संसारात बेबनाव होऊन शांती ढळते."
--------------------------------
"खास कोडे"व उत्तरे":

१ जगात सर्वात लांब कीडा कोणता?
Stick insect
२ जगात असा कोणता तलाव आहे जो बारा वर्षात गोड व नंतर बारा वर्ष खारट होतो?
तिबेटमध्ये उरुसी तलाव
३ वर्तुळात किती बाजू असतात?
दोन
४ Army चा full form सांगा.
Alert Regular Mobility Young
५ अकरामध्ये चार मिळवले, तर तीन होतात, ते कसे?
घड्याळात
६ २००० हजार रुपये १०० ची नोट न घेता २० नोटांमध्ये कसे विभागाल?
200 च्या 8, 50 च्या 6, 20 च्या 4, 10 च्या 2
७ Unbreakable पुस्तक आत्मकथा कोणी लिहीले आहे?
मेरी कोम
८ कोणता पक्षी सगळ्यात छोटं अंड देतो?
हमिंग बर्ड
९ युरोपची कोणती नदी कोळशाची नदी म्हटली जाते?
र्हाईन नदी
१० आठवड्यातील सात वार सोडून अजून तीन वार सांगा.
काल, आज व उद्या
११ गायत्री मंत्र कोणत्या ग्रथांत आहे?
आणि हेही सोडवता आले.नाही?
रुग्वेद
------------------------

'यक्षप्रश्न': व उत्तरे:
१ 'स्वामिनी' मालिकेमधील रमाच्या माहेरचे गांव कोणते?
गराडं
२ पाठीचा ताठ कणा या पुस्तकाचे लेखक कोण?
डॉ पी आर रामाणी
३ 'ऋणानुबंधाच्या ह्या, फिरून पडल्या गाठी' या गीताचे गीतकार व संगीतकार कोण?
बाळ कोल्हटकर
४ 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील राधिके च्या भावाचे नाव काय?
शिरीष-किशोर माने ह्यांनी सादर केलेली भूमिका
५ जयद्रथाचे पांडवांशी नाते काय?
पांडवांचा चुलतभाऊ दुर्योधनाच्या बहिणीचा-दुःशलाचा नवरा
६ 'धुंद मधुमती नाच रे, नाच रे' गीताचा चित्रपट कुठला?
चित्रपट कीचक वध
७ ' संकेत मिलनाचा नाटकाचे नाटककार कोण?
प्रा. वसंत कानेटकर
८ 'सारी सारी रात, तेरी याद सताये' या गीताचे गायक कोण? चित्रपट कोणता?
गायिका:लता मंगेशकर.
चित्रपट: अजी बस शुक्रीया
९ रामायणात लक्ष्मणाचा जीव वाचवण्याकरता हनुमान कोणता पर्वत आणि कोणती वनस्पती आणतो?
द्रोणागिरी पर्वत, संजीवनी वनस्पती.
१० सात चिरंजीव पुरुष कोण?
बली, अश्वत्थामा, पाराशर व्यास, विभीषण
क्रुपाचार्य, परशुराम, हनुमान आणि मार्कंडेय रुषी आठवे चिरंजीव

धन्यवाद
सुधाकर नातू

सोमवार, २० जुलै, २०२०

"आनंदाने जगा':

'आनंदाने जगा':

आनंदाने जीवन जगणं ही एक कला आहे. सुख व दुःख हे व्यक्तीसापेक्ष किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर ठरते. नित्य काहीच नसते, सुख व दुःख आलटून-पालटून क्रमाने येतच असते. एक ध्यानात घ्या, की आनंद तुम्हाला अनेक विविध गोष्टीतून वेचता येत असतो. वाचन, चिंतन, कलाविष्कार किंवा व्यक्तीच्या कर्तृत्वाच्या संघर्षातून, उत्कर्षाच्या कहाणीतून, प्रवासातल्या अनुभूतीतून व निसर्गाच्या गूढरम्यतेमधून, अनेक गोष्टी तुम्हाला आनंदाचा अनुभव देऊ शकतात. पण आनंद कोठून कसा मिळवायचा, हे ज्याच्या त्याच्या उपजत वृत्तीतूनच ठरते.

आपण म्हणूनच आपले आनंदक्षण निवडायचे वेचायचे आणि अनुभवायचे. अशा आनंददायी अनुभवातूनच आपले जीवन अर्थपूर्ण व समृद्ध होत असते. फुले वेचीत जावे तसे हे आनंदक्षण रोज आस्वादत जायचे आणि दररोज सकाळी कालचे तीन-चार आनंदानुभव रोजनिशीमध्ये नियमाने लिहायची सवय लावून घ्या. बघा काय सकारात्मक बदल तुमच्या जीवनांत होतो ते! शेवटी, एक मंत्र सर्वात महत्वाचा, आपल्याकडे काय नाही, ह्याची खंत करण्यापेक्षा, आपल्याकडे काय आहे, ह्याचा शोध घ्या. ही गोष्ट आजपासूनच, ह्या क्षणापासून सुरुवात करा आणि आनंदाने जगायला शिका.

'चांगुलपणाची साखळी':
अचानक आपण कधी मधी, अडचणीत सापडतो. प्रवासात तर अशी वेळ खूप वेळा येते किंवा दररोजच्या जीवनसंघर्षाच्या रहाट गाडग्यात, आपला मार्ग सुलभ व्हावा म्हणून कुणीतरी न मागता व काहीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत करून जाते व आपली अडचण संकट व दररोजचा आटापिटा कमी होतो किंवा त्याने दिलेल्या संधीमुळे आपला फायदा होतो प्रगती होते यालाच चांगुलपणा म्हणतात.

कधीतरी याच विषयावरचा एक लेख वाचला होता, चांगुलपणाची एक अनोळखी साखळी असते, हे मांडणारा! मग मनात विचार आला की, असे चांगुलपणाचे अवतार प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी येतच असावेत.

मला आठवले, माझ्या बालपणी सायन ते दादरला शाळेत जाताना मला अधून मधून, आमच्या परिसरातील एक डॉक्टर न चुकता त्यांच्या हिल्मन गाडीतून सोडत असत. त्यांचा मुलगाही त्याच शाळेत माझ्याच बरोबर होता, हे जरी खरे असले, तरी मला ती एक प्रकारे चांगुलपणाने केलेली मदतच होती. पुढे शिक्षण घेताना असे चांगुलपणाचे अनेक प्रकार आढळले. शाळेतही माझे इंग्रजी चांगले व्हावे, म्हणून वडिलांचाच एक स्नेही शिक्षक मला कोणतीही फी न घेता शिकवत असत.

नंतर कॉलेजमध्येही गणितामध्ये किचकट अशी गणिते सोडवायला कॉलेजमधल्या प्राध्यापकांनी आपण होऊन मदत केली. इंजिनिअरिंगला, मशीन ड्राँईंग सारखा मला किचकट वाटणारा विषय, ज्यात मी एकदा नापास झालो होतो, अशा वेळेला माझ्या वडीलांच्या एका मित्राने, मला न चुकता तो विषय चांगल्या प्रकारे समजावला आणि मी पास झालो.

फार कशाला दररोज न बोलता न चुकता सकाळी वेळेवर चहा, नंतर नाश्ता ठराविक वेळी भोजन, घरातली टापटीप आणि एकंदरच मुलांचे संगोपन ह्या सगळ्या संसारांच्या जबाबदार्यांत, माझ्या सौभाग्यवतीचा जो काही सिंहाचा वाटा कायमच लाभला आहे, तो देखील चांगुलपणाच्या साखळीतला एक दुवा नव्हे कां?

तसेच नोकरीमध्ये माझ्यातले गुण हेरून मला लेखनाची चांगली संधी मिळावी, म्हणून आमच्या क्षेत्रातल्या असोसिएशनच्या मासिकामध्ये संपादकीय सल्लागार म्हणून, आमच्या कंपनीतर्फे माझ्याच एका वरिष्ठाने शिफारस केली, हासुद्धा, एक चांगुलपणाचा प्रकार. तसंच मला चांगल्या व्यवस्थापकीय पदव्युत्तर पार्ट टाईम मास्टर्स कोर्समध्ये माझी निवड झाली, तेव्हा कंपनीतील दुसऱ्या एका वरिष्ठाने कंपनीतर्फे मला प्रायोजित केले. तेही चांगुलपणाचेच लक्षण नव्हे कां?

माझ्या पहिल्या वहील्या अन् एकमेव पुस्तकाला-"प्रगतीची क्षितीजे", महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक विभागातील सर्वोत्तम पुस्तकाचा पुरस्कार मिळाला. हयामागे एका प्रकाशक पत्रकाराने दिलेले प्रोत्साहन व मार्गदर्शन कारणीभूत होते. त्यांचा हा चांगुलपणा मी कसा व कां म्हणून विसरेन?

थोडक्यात जीवनामध्ये कोणी ना कोणीतरी अचानक भेटते आणि आपल्याला मदत करून जाते. माझी व्यवस्थापकीय प्रशिक्षण देण्याची कला, अशाच एका दुसऱ्या संस्थेतील वरिष्ठाने, स्वत:हून जाणून घेतली आणि त्याने मला अनेक ठिकाणी प्रशिक्षणाचे कार्यक्रम दिले. खरं तर त्याची माझी ओळखही नव्हती, पण मी ज्योतिष बघायचो आणि अशाच एका गृहस्थाने ज्याची पत्रिका मी बघितली होती व सल्ला दिला होता, त्याच गृहस्थाचा हा वरिष्ठ मित्र होता आणि तेवढ्या दुव्यावर मला फार मोठ्या संधी, प्रशिक्षण देण्यासाठी लाभल्या. माझ्या सर्वांगिण जडणघडणीत, ह्या अवचित मला लाभलेल्या चांगुलपणाच्या साखळीमुळेच मी आयुष्यात चांगली प्रगती करू शकलो, मानसन्मान मिळवू शकलो.
चांगुलपणाची ही साखळी, आपणही दुसर्यांना तशीच मदत करून कायम अभेद्य व वाढती ठेवली पाहिजे.
चांगुलपणाच्या अशा साखळीमुळेच मला आठवला:
"समाजकारणाचा मतितार्थ":
समाजकारण हया शब्दांतच तयाचा मतित़ार्थ वा प्रयोजन दडलेले आहे. समाजासाठी, समाजोप़योगी कृत्य, निरपेक्ष बुद्धिने करत रहाणे. सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य, वैचारिक अशा अनेक क्षेत्रांत अनेक व्यक्ति निरलस प्रवृत्तीने काम करत असतात.

माझ्या परिचयांतील एक मुलबाळ नसलेले ग्रहस्थ, पत्नीचे निधन झाल्यानंतर गेली ३०/३५ वर्षें अनाथ बालसंगोपनासारखे काम, तन मन धन अर्पण करून आवडीने पुढे नेत आहेत. आज त्यांनी पेरलेले हे रोपटे वटवृक्षाइतके मोठे झाले आहे. अशी माणसे आज काल दुर्मिळ होत चालली आहेत.

ही सर्वस्व ओतून समाजोप़योगी कामे करणारी माणसे वेगल़्याच मातीची बनलेली असतात. आपण आपल्या जीवनांत काही तरी अर्थपूर्ण आणि इतरांना ऊपयुक्त काम केले पाहिजे, अशी आस त्यांच्या मनात निर्माण होत असावी. पुढे ही माणसे त्यातून काय आपल्याला मनापासून आवडेल, तसेच जमेल, तशा निवडीनूसार ही माणसे दुसर्यांच्या गरजा, व्यथा आपल्याच मानून मनापासून काम करत असतात. अशा देवमाणसांना माझे शतश: प्रणाम!

शेवटी जाता जाता मनात विचार येतो, की असे त्यागमयी कार्य करणारी देवमाणसे ज़र आजच्या मतलबी राजकारणात येणे,ही काळाची नितांत गरज आहे1

शेवटी सांगावेसे वाटते ते,
"समाधानाचे रहस्य":
जीवनशैली, माणसापाशी असलेल्या ऐहिक साधन संपत्तीच्या मोजमापावरून, कधीही ठरवली जाऊ नये; तर ती त्याच्या विचार, वर्तुणुकीवरुन, सभोवतालच्या जगाकडे बघण्याच्या, त्याच्या द्रुष्टिकोनांतून आजमावली जाणेच इष्ट आहे.

जीवनामध्ये तीच माणसे खरीखुरी सुखी व समाधानी, ज्यांना आपल्याला आवडणार्या गोष्टी, निर्धोकपणे सातत्याने करावयाची संधी मिळते. त्यांत कलावंत व खेळाडू ह्यांचा अग्रक्रम असतो.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
माझ्या ब्लॉगवर 250 हून अधिक असेच वाचनीय व वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय.......
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट तसेच ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे विडीओज् पहाण्यासाठी........

माझ्या You tube वरील...
moonsun grandson चँनेल:
ही लिंक उघडा.......शेअरही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

"अनमोल घडी":

"अनमोल घडी":
"गरज ही शोधाची जननी असते" या सूत्राचा मला दोनदा पडताळा आला. कसा ते सांगतो:

१ माझ्या सोशल मीडियावरचे संदेश वा लेखांसंबंधी, एका मित्राला जेव्हा मी विचारले की,
"तू ते वाचतोस कां?" तेव्हा त्याने मला उत्तर दिले "हल्ली वयोमानपरत्वे डोळे नीट काम देत नाहीत, त्यामुळे वाचणे आणि त्यातून मोबाईलवरचे वाचणे फार जड जाते. तेव्हा तूझे विचार मला ऐकायला मिळाले तर सोपे जाईल".

ह्या त्याच्या गरजेमधून, माझ्या ध्वनीफितींचा जन्म झाला. ध्वनीफित हा संपर्काचा प्रकार खरोखर निर्मितीला सहज-सोपा, केव्हाही बनवून पाठवण्या जोगा. म्हणून आपोआपच मी बऱ्याच ध्वनिफिती बनवल्या:

"आवर्जून ऐकाव्या, अशा ध्वनीफिती":
सध्याच्या लाँकडाऊनच्या काळात, मी विरंगुळ्यासाठी आणि मार्गदर्शक विचारांसाठी हा खास नवा उपक्रम मी सुरू केला आहे.

आजपर्यंत मी निर्माण केलेल्या ध्वनिफिती ह्या आहेत:
१ 'वाचा व फुला, फुलवा'
२ 'ऐवज' एक रसास्वाद
३ 'व्यक्तिचित्रे-अनुभवांचा ठेवा'
४ 'घरात बसण्याचे फायदे'
५ 'एक गुरुमंत्र'
६ 'घटका गेली पळे गेली'
७ 'आशा ठेवा, हेही दिवस जातील'
८ 'नवी दिशा नवे मार्ग'
९ 'सेवकाची कदर'
१० संयम हवा
११ मुंगीचे महाभारत
१२ वेळेची किंमत जाणा
१३ सासूरवास व सूनवास
१४ Accept & Adopt.
१५ एक अनुभव
१६ आव्हान स्वीकारा
१७ सत्ताधीश कसा असावा व नसावा
१८ माणसं वाचायला शिका
१९ Welcoming New Year
२० Management Musings
२२ Managing Change
२३ Boon in Disguise
२४ वाणी आणि शब्दब्रम्ह
२५ जीवननैय्या
२६ जीत्याची खोड
२७ युक्तीची शक्ती
२८ भाषाशैली
२९ दिल्या वचनांची शपथ तुला

अधून मधून अशा ध्वनीफिती बनविण्याचा माझा उद्योग आता थोडा बदलणार आहे. कसा ते पुढे वाचा.
त्यापूर्वी त्यांना मिळालेले निवडक प्रतिसाद असे:
# आपण सुंदर कार्य करत आहात....
आपलं कार्य असंच अविरतपणे चालू राहो...
# सरजी.. ध्वनीफित... अप्रतिम
# छान आहे आवडलं
* हो नक्कीच. अप्रतिम मार्गदर्शन
# खूपच आपण महत्वपूर्ण आयुष्यात मार्गदर्शन मिळेल असं देत असता.....

ज्यांना ध्वनीफिती हव्या असतील, त्यांनी ध्वनीफितींचा क्रमांक व आपला whatsapp mb number प्रतिसादात क्रुपया द्यावा.

२ ध्वनीफिती ते विडीओज्
माझ्या ध्वनीफिती "व्हाट्सअप" वर अनेकांना पाठवल्या. त्या हळूहळू पसंतीला आल्या. परंतु नंतर लक्षात आले की, आपण ध्वनीफिती फेसबुक व युट्युब वर आपल्या चॅनेलवर टाकू शकत नाही. तसे जर करू शकलो, तर व तरच त्यांचा प्रसार अधिकाधिक सर्वदूर होऊ शकेल.

याच गरजेतून, ऑडिओ मधून व्हिडिओज् बनवता आले तर किती बरे, असे वाटून एक नवाच ज्ञानयज्ञ प्रयत्नपुर्वक चालू झाला. त्याचेच आज फलित, ही ध्वनिफीत "गुरुमंत्र" अशा चपखल नावाची निर्माण झाली. तिची लिंक पुढे देतो:

https://youtu.be/btADrxBMSAsती जरूर युट्युब वर ऐका.
माझा moonsun grandson
चॅनेल जरूर सबस्क्राईब करा....
अन्
ह्या "अनमोल घडी"चे साक्षीदार बना...

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
माझ्या ब्लॉगवर १५० हून अधिक वैविध्यपूर्ण
लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय माझ्या यू ट्यूब चॅनेलवरील......
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट तसेच ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे विडीओज् पहाण्यासाठी..
ही लिंक उघडा....

https://www.youtube.com/user/SDNatu

हा चँनेल.......
आजच subscribe करा...


शुक्रवार, ३ जुलै, २०२०

"पहिल्यात पहिले: माहितीचा खजिना-२":


" पहिल्यात पहिले: माहितीचा खजिना-२":

चिरंतन स्मृतीचा हा ठेवा:

ज्या दिग्गजांनी कोणीही आधी न चोखाळलेल्या मार्गावरून प्रथम पदार्पण करून आपल्या गेल्या दोन शतकांचा इतिहास बदलला अशा असामान्य माणसांची ही दुसरी मालिका ह्या लेखात सादर करताना मला मनापासून आनंद व समाधान वाटत आहे. कारण ह्या डिजिटल माध्यमाद्वारे त्या थोरांची चिरंतन स्मृती जागवली जाणार आहे. जसजशी माहिती मिळाली, तसतशी ती नोंद कागदांवर ठेवली. ही मालिका श्रेष्ठ कनिष्ठ, वा कालमानानुसार नाही, ह्याची जशी जाण ठेवावी, तद्वतच तसेच ती परिपूर्ण नाही. त्यामध्ये अनेक अज्ञात नामवंत समाविष्ट नाहीत आणि हा एक प्रातिनिधीक प्रयत्न आहे:
१ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन १८८८-१९७५: भारताचे दुसरे राष्ट्रपती व थोर तत्वज्ञ
तत्त्वज्ञ,

२ उदय शंकर १९००-१९७७: पहिले जागतिक कीर्तीचे नर्तक

३ धुंडिराज गोविंद फाळके १८७०-१९४४: पहिले भारतीय चित्रपटनिर्माते व ज़नक

४ विष्णूपंत छत्रे १८४०-१९४६: उत्तम अश्वशिक्षक व भारतीय सर्कसचे जनक

५ पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर १८६७-१९६८: प्राचीन वेदाभ्यास प्रथम मराठीत आणला.

६ दादासाहेब खापर्डे १८५४-१९३८: पहिले मराठी नाट्यसंमेलन अध्यक्ष

७ डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे १८७२-१९४८: भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक

८ सेनापती पां.म. बापट १८८०-१९६७: मुळशीचा सत्याग्रह अन्यायाचा प्रतिकार लढाऊ स्वातंत्र्य सैनिक

९ डॉ. रघुनाथ माशेलकर: १९४३-   : DG CSIR जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ

१० फ्लाईंग आँफिसर गुंजून सक्सेना १९७५-   : पहिली महिला वैमानिक

११ सत्यजित रे १९२१-१९९२: जागतिक कीर्तीचे चित्रपट निर्माते दिग्दर्शक-पथेर पांचाली

१२ डॉ. सरोजिनी नायडू १८७९-१९४९: पहिल्या महिला राज्यपाल

१३ शिवराम म परांजपे १८६४-१९२९: काळ व्रुत्तपत्राचे संपादक, जनजागृती करणारे देशभक्त पत्रकार

१४ पहिले फिल्ड मार्शल सँम माणेकशा: १९१४-२००८ : पाकिस्तान बरोबरचे बांगला देशचे १९७१ चे युध्द जिंकले.

१५ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी १९०१-१९९४: मराठी विश्वकोश निर्मितीसंस्थेचे संस्थापक पहिले संचालक

१६ शेर्पा तेनसिंग १९१४-१९८६:  अत्युच्च हिमशिखर एव्हरेस्ट विजेता-१९५३

१७ धनंजयराव गाडगीळ १९०१-१९७१: ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, सहकार चळवळीचे प्रणेते

१८ आचार्य विनोबा भावे १८८५-१९८३: क्रांतिकारी भूदान चळवळीचे प्रणेते व आधुनिक रुषि

१९ शंकर काशिनाथ गर्गे १८८९-१९३१: प्रभावी नाट्यछटाकार

२० खान-पाणंदीकर १९२७-पहिला आंतरधर्मिय विवाह

२१ शं. बा. दिक्षीत १८५३-१८९८: प्रथम सोप्या मराठीतून विज्ञान प्रसार करणारे

२२ गोपाळ विनायक १८८१-१९६४: पहिले नकलाकार

२३ डॉ. रा.भा.भांडारकर १९१७ मध्ये भारतीय प्राच्यविद्या संस्था स्थापली.

२४ कपिल देव १९५९-    :१९८३ पहिला भारतीय विश्वचषक विजेता अष्टपैलू कर्णधार

२५ डॉ. प्रमोद सेठी १९२७-    :अपंगांना वरदान ठरणार्या जयपूर फूटचे जनक

२६ डॉ. सलिम अलि १८९५-१९८७: जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ज्ञ व नँचरल हिस्टरी सोसायटीचे अध्वर्यू

२७ रघुनाथ क्रु फडके १८८४-१९७२: अग्रगण्य शिल्पकार-चौपाटीवर लोकमान्य टिळक पुतळा व मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बनविला.

२८ डॉ महेंद्रलाल सरकार १८३३-१९०४: होमिओपॅथीचे पहिले भारतीय प्रवर्तक

२९ साधु वासवानी १८७९-१९६६: तत्त्वज्ञ संत

३० केरूनाना छत्रे १८२४-१८८४: सूर्यावरील डाग व हवामान संशोधन

३१ डॉ विष्णू म घाटगे १९०८-१९९१: भारतीय विमान निर्मितीची मूहूर्तमेढ

३२ कर्नल जिम काँर्बेट १८७५-१९५५: वन्यपशुंचा सखा, अभयारण्य जनक

३३ भाई श्रीपाद अम्रुत डांगे १८९९-१९९१: भारतीय साम्यवादी चळवळीचे जनक

३४ बच्छेंद्री पाल १९५४-     : एव्हरेस्ट शिखर विजेती पहिली भारतीय महिला

३५ डॉ होमी भाभा १९०९-१९६६: विश्वविख्यात अणुशास्त्रज्ञ, परमाणु उर्जा प्रकल्पाची मुहूर्तमेढ

३६ पी.टी उषा: १९६४-    आंतरराष्ट्रीय कीर्तीची पहिली भारतीय महिला धांवपट

३७ डॉ भीमराव आंबेडकर १८९१-१९५६: भारतीय घटनेचे शिल्पकार

३८ डॉ. व्हर्गिस कुरियन १९२१-   : सहकारी चळवळीतून अमूल दूधाचा महापूर

३९ डॉ विजयालक्ष्मी पंडित १९००-१९९०:  लंडनमध्ये पहिल्या महिला हायकमिशनर व युनोच्या अध्यक्ष
४० डॉ चिंतामणी देशमुख १८९६-१९९२: पहिले रिझर्व्ह बँक गव्हर्नर


४१ कल्पना चावला १९६१-   :पहिली भारतीय महिला अंतरराळयात्री

४२ डॉ एपीजे अब्दुल कलाम १९३१-२०१५ : राष्ट्रपती व संरक्षण विकास व मिसाईल मँन

४३ कुमार गंधर्व १९२४-१९९२: कीर्तीमंत गुणवंत गायक

४४ स्वामी विवेकानंद १८६३-१९०२: राष्ट्रीयत्वाचे स्फुल्लिंग चेतवणारे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्वज्ञ विचारवंत

४५ राखाल बँनर्जी १८८६-१९३०: मोहनजो दारो ऊत्खनन

४६ पं. महादेवशास्त्री जोशी १९०६-१९९२: भारतीय संस्कृती कोशाचे अनेक खंडांचे जनक

४७ विश्वनाथन आनंद १९६९-    : पहिला अग्रगण्य बुद्धीबळपटू ग्रँड मास्टर

४८ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक १८५६-१९२०: भारतीय असंतोषाचे जनक व अग्रगण्य राष्ट्रीय नेते, गणितज्ञ व तत्वज्ञ-गीतारहस्य ग्रंथकार

४९ एकनाथजी रानडे १९१४-१९८२: कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद ह्यांचे स्मारक निर्मिती
५० सुश्मिता सेन १९७५-    : विश्वसुंदरी

५१ गानकोकिळा लता मंगेशकर १९२९-    : भारतरत्न, विक्रमी मधूर गीत गायिका

५२ स्वामी रामानंद तीर्थ १९०३-१९७३: हैद्राबाद मुक्तीसंग्राम प्रणेते

५३ लक्ष्मणराव का. किर्लोस्कर १८६९-१९५६: पहिले यशस्वी मराठी उद्योजक

५४ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर १८८३-१९६६: क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक, कवि नाटककार समाज सुधारक, वैज्ञानिक द्रुष्टिचे द्रष्टे

५५ मिर्झा गालीब १७९७-१८६९: गझल शायर सम्राट

५६ अमर्त्य सेन १९३३-   : नोबेल पुरस्कार विजेते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ

५७ लक्ष्मीबाई टिळक १८६८-१९३६: कवि रे. टिळकांची पत्नी, स्मृतीचित्रे हे आत्मचरित्र

५८ प्रभात फिल्म कंपनी १९२९-१९५३: कुंकू शेजारी असे एकाहून एक सरस दिशादर्शक चित्रपटांची निर्मिती संस्था

५९ श्रीनिवास रामानुजन् १८८७-१९२०: अद्वितीय गणितज्ञ

६० मानवेंद्रनाथ राँय १८८९-१९५४: असामान्य तत्वचिंतक राजकारणी

६१ महर्षि धोंडो केशव कर्वे १८५८-१९६२: महिला शिक्षणाचा पाया घालणारे शतायुषी

६२ महात्मा गांधी १८६९-१९४८: अहिंसा सत्याग्रह ह्या अनोख्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता
६३ मदर तेरेसा १९१०-१९९७: नोबेल पुरस्कार विजेती समाजसेविका संत

( वरील नोंदीमधील, चुकभूल द्यावी घ्यावी)

अंगभूत गुणवत्ता, दूरद्रुष्टी आणि ईप्सित ध्येयासक्ती ह्या जोडीला जिद्द आणि प्रामाणिक अहर्निश कष्ट घेणारी व्यक्ती, सामान्यातून असामान्यत्व मिळवते. सामान्य अनंत असतात, त्यांच्यामधूनच अशा पथदर्शी अद्वितीय योगदान देणारी मंडळी निर्माण होत असते. समाजाचे आणि देशाचे पुनरूत्थान ही महान दिग्गजांची मांदियाळी करत असते. आज आपण प्रगतीचे नवनवीन मानदंड पार करून पुढे पुढे जात आहोत. आपण त्यांचे शतश: रुणी आहोत, त्यांच्यापुढे नतमस्तक होणार आहोत. असा अनमोल ठेवा मला गवसला हे माझे भाग्य ह्या लेखाच्या रुपाने तुमच्या ओंजळीत टाकत आहे.

सुधाकर नातू