बुधवार, २९ जानेवारी, २०२०

रंगांची दुनिया-५": "रंगदर्शन-३": "व्हँक्युम क्लिनर": "एक फार्सिकल फँटसी?"


 "रंगांची दुनिया-५":
"रंगदर्शन-३":
"व्हँक्युम क्लिनर":
"एक फार्सिकल फँटसी?"

"व्हँक्युम क्लिनर" हे नाटक म्हणायचे की एक स्वप्नातली फार्सिकल फँटसी? काही कळायला मार्ग नाही. घसघसशीत चारशे रुपयांची तिकीटे काढून, इतके लोक कां जात असतील ह्या कचाकचा आक्रस्ताळेपणाच्या खेळाला? बहुदा केवळ त्यात, अशोक सराफ सारखा खंदा लोकप्रिय बुजूर्ग अभिनेता आणि निर्मिती सावंत सारखी चतुरस्र अभिनेत्री असल्यामुळेच जात असावेत, नाही तर खरं म्हणजे या धांगडधिंग्यात खास दम आहे, असं काही, मला तरी आढळलं नाही.

असे असूनही, ह्या नाटकाने चक्क दोनशेव्या प्रयोगापर्यंत मजल मारली, हे रंगभूमीच्या प्रेक्षकांची अभिरुची बदलल्याचे लक्षण होय. असाच बाष्कळ खेळ असलेल्या "एका लग्नाची पुढची गोष्ट" नाटकाचीही विक्रमी प्रयोगांकडे दौड सुरुच आहे. डोकं गहाण ठेवून नाही तरी, हल्ली छोट्या पडद्यावरच्या धो धो पाणी घालत, निरर्थक लांबवलेल्या मालिका, बिनडोक झालेले प्रेक्षक पहातातच की! दुसरं कारण वा प्रमुख कारण केवळ नाटकातील सेलिब्रिटी कलाकार पहायला मंडळी हल्ली गर्दी करतात. हलकं फुलकं
काहीही चालतं त्यांना. सहाजिकच अशी नाटके दर्दी नाट्यरसिकांसाठी नसतातच मुळी!

नवल हे की, "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" सारखे त्रिगुणात्मक अभिजात नाटक पाहिल्यानंतर, हा धेडगुजरी फार्स पहायची आम्हाला बुद्धी झाली.

• अजून एक बात मला सांगावी अशी वाटते, की महोत्सवी प्रयोगाला शक्यतोवर आपण जाऊ नये. कारण त्या दिवशी ह्या फँटसीच्या २०० व्या प्रयोगाची तिकीटविक्री जेव्हा प्रथम सुरू होणार होती, त्या दिवशी प्रारंभीच्या वेळेनंतर फक्त एका तासातच जाऊन तिकीट काढायला गेलो, तरी आम्हाला तिकीट मिळालं चक्क M ह्या तेराव्या रांगेतलं! हे काय गौडबंगाल होतं कल्पना नाही. निमंत्रित एवढे प्रचंड किंवा ऑनलाईन बुक करण्यासाठी राखलेल्या, पुढच्या १२ रांगातील सगळ्या जागा राखीव? काय भानगड असते काय माहित नाही. आम्ही नाटके नेहमी जास्तीत जास्त, पहिल्या सात रांगांतल्या जागी बघतो. नाहीतर त्यामागील जागी, विशेषतः ऐकण्यात वा द्रुष्टीदोषापायी वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांना गंमत मिळणार नाही. आमचा हा सारा खेळखंडोबा त्या दोनशेव्या प्रयोगापायी झाला असेल. त्यामुळे शक्यतोवर महोत्सवी प्रयोगाला जाऊ नये, वा कॉन्ट्रॅक्ट शोलाही जाऊ नये, हा धडा आम्हाला मिळाला.

त्या दिवशी प्रयोगाला मात्र एकंदर जो काही प्रेक्षकवर्ग व वातावरणातला माहोल होता, तो पूर्वी रंगभूमी जेव्हा ऐन बहरात होती त्या जमान्यातल्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारा होता. अगदी तसेच चांगले नटून-थटून आलेले विविध वयोगटातील स्री पुरुष, अन् आश्चर्य, त्यामध्ये तरुण वर्गही भरपूर होता, बहुदा महोत्सवी प्रयोगामुळे असे घडले असेल. मराठी माणसाला जी खरीखुरी आवड आहे की, काही करून नाटकाला जाणं, ती तिथे दिसली. दुसरे म्हणजे दादरच्या शिवाजी मंदिर सारख्या हॉलमध्ये जाऊन नाटक बघण्याची जी गंमत आहे, ती इतरत्र मला तरी कुठेही आढळत नाही.

हे नाटक एका चौकोनी कुटुंबाचं आहे. नवरा अनुभवी प्रोफेशनल, स्वतःची कंपनी असलेला आणि पत्नी हाउसवाइफ, एक मुलगा, एक मुलगी आणि जावई. वडिलांचे "नाच्या" मुलाशी हाडवैर अन् जावई लाडका. हाडवैर मुलाबरोबर कारण तो पूर्णवेळ डान्सिंग करण्यात मग्न व आईसुध्दा मुलाला साथ देणारी!

मुख्य म्हणजे नवरा, त्याच्या तापट स्वभावामुळे आक्रस्ताळा इतका की, पहिल्या अंकात केवळ हेच दिसतं की हा माणूस ऑफिसमधून आल्यावर सारखा रेड्याप्रमाणे रेकल्यासारखा सगळ्यांवर डाफरत काय बसतो आणि बायको आहे कायम शॉपिंग मध्ये पैसे उडवणारी पण एक गरिब घरबशी गाय. हा बिचारा नवरा भरपूर मेहनत करतोय धो धो पैसा मिळवतोय, पण बायको मात्र ह्याचं बाहेर काहीतरी लफडं आहे, असा संशय घेणारी. सहाजिकच दोघांची ह्या ना कारणावरून सदान् कदा भांडणं, वादविवाद ज्यात बहुशः नवर्याचेच वीट येईल इतके आकांडतांडव की ते पहिला अंकभर जवळजवळ व्यापून रहाते.

या पार्श्वभूमीवर बायकोने एक महागडा व्हँक्युम क्लिनर आणलेला असतो. तो चालू करून ह्या दोघांपैकी एक जण हात लावल्यावर बसतो, भयानक शाँक! त्याची सुटका करायला जोडीदार पुढे येतो, तर दोघंही फेकले जाऊन बेशुद्ध पडतात. इथे पहिल्या अंकाचा दि एंड.

इथून दुसऱ्या अंकात, जो फार्सिकल फँटसीचा धिंगाणा, ही दोघं शुद्धीवर आल्यावर होतो तो शेवटपर्यंत! कारण जणु काही परकायाप्रवेश केल्यासारखे, मनातून, नवरा होतो बायको आणि बायको नवरा होते! आता पुढचा, थयथयाट नवरारूपी बायकोने घालताना व नवरारूपी बायकोची होणारी तारांबळ, इतक्या काही अनाकलनीय गोष्टी घडत जातात, की बोलायची सोय नाही. शेवट काय होतो, ते नाटकाचे इतके महाभारत वाचल्यावर, ज्यांना पहायची इच्छा उरली असेल, त्यांनी रंगमंचावरच बघावे.

थोडक्यात "व्हँक्युम क्लिनर, उर्फ एक फार्सिकल फँटसी" म्हणजे नवरा व बायको या दोन भूमिका आलटून पालटून करणाऱ्या अशोक सराफ व निर्मिती सावंत ह्यांची फक्त अभिनय स्पर्धाच होय. दोघांमध्ये, भूमिका कशी केली, कोणी चांगली केली ते व ही स्पर्धा बघायची असेल तर नाटक पहा, एवढेच म्हणायचे. आम्हाला विचाराल तर, येथे दुसर्या अंकानंतर नवरा झालेली बायको-निर्मिती सावंत ह्यांचा परफॉर्मन्स अधिक उजवा वाटला.

ह्या मंथनातून जर कोणता धडा संसारी माणसांनी घ्यायचा? तर तो असा:
"संसारात एकमेकांची व्रुत्ती, स्वभाव व गुणदोष तसेच द्रुष्टीकोन नीट समजून घ्यावा, कारण "द्रुष्टी बनवते स्रुष्टी". सर्वात महत्त्वाचे: जोडीदार जसा आहे तसा तो समजून घेऊन त्याचा स्वीकार केला तरच जोडीचा संसार गोडीचा होतो."

सुधाकर नातू

सोमवार, २७ जानेवारी, २०२०

"रंगांची दुनिया-४": "शारदोत्सव-३": "किस्त्रीम" दिवाळी अंक'१९चा रसास्वाद":


 "रंगांची दुनिया-४":
"शारदोत्सव-३":
"किस्त्रीम" दिवाळी अंक'१९चा रसास्वाद":

दिसामाजी काही ना काही नव नवे वाचत जावे, काही बघत वा ऐकत जावे आणि त्यातील मनाला भिडलेल्या निवडक मुद्दांवर नीरक्षीर विवेकबुद्धीने जसे जमेल तसे भाष्य करावे अशी माझी प्रवृत्ती असल्याने हा रसास्वाद....

नुकताच मी "किस्रीम दिवाळी अंक'१९ वाचला.
"श्री दीपलक्ष्मी" पाठोपाठ यंदा मला जर दुसरा कुठला दिवाळी अंक मला वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधता साधणारा वाटत असेल, तर तो म्हणजे "किस्रीम" दिवाळी अंक होय.

या संग्राह्य अंकाच्या वाचनाने, माझ्या मनावर जी भावचित्र उमटली ती पुढे विस्ताराने देत आहे:

# या अंकात विशेषतः इतिहासाच्या काही पानांची उजळणी खुबीने केली आहे त्यामध्ये मला मेघश्याम सावकार ह्यांनी चपखलपणे चितारलेले, बाबाराव सावरकर यांचे, तसे दुर्लक्षित राहिलेले परंतु स्वातंत्र्यवीरांइतक्याच तोलाचे व मोलाचे त्यागमय कष्टमय जीवनचरित्र वाचून खरोखर मन भरून आले. अगाध आणि अमोल देशप्रेमापोटी, ह्या दोन सावरकर बंधूनी भयानक अशा काळरात्रीप्रमाणे असणारी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. कदाचित जगाच्या इतिहासात हे असे एकमेव उदाहरण असेल की, जेव्हा दोन सख्खे बंधू इतक्या कष्टमय अशा दुःखभोगांना सामोरे गेले. आपले दुर्दैव हे आहे की, इतक्या अफाट अचाट कर्तृत्वाच्या माणसांचा ना त्यांच्या आयुष्यात यथोचित कदर केली गेली, ना झाला त्यांच्या मृत्यूनंतर उचित गौरव.

# अंकामधील डॉ शामाप्रसाद मुखर्जींविषयीच्या इतिहासाची तपशीलवार कहाणी डॉ गिरीश दाबके ह्यांनी मांडली आहे. ती निश्चितच चटका लावणारी आहे व मला ह्या घडामोडी अपरिचित असल्याने त्याची दाहकता अधिकच होती. कालौघात बदलणारे देशाचे नेत्रुत्व देशाच्या भवितव्याला कलाटणी देणारे असते ही जाणीव मला झाली.

# ह्या अंकातील प्रियदर्शनी तगारे ह्यांची "ती" ही कथा खरोखर उत्कंठापूर्ण व पुढे ह्या माणसाचे व त्या बाईचे काय नाते असेल ह्याची उत्सुकता वाटत असताना 'ती' त्याचीच बिचारी अभागी आई असते, हे समजून चर्र झाले.

# ह्या अंकात अनिरुद्ध बिडये ह्यांच्या लेखात हाँटसन व सोलापूर मार्शल लाँ ह्या तशा अपरिचीत व कदाचित विस्मृतीत गेलेल्या प्रकरणाची आठवण ओघवत्या भाषेत पुनश्च जागी केली आहे.

# तसेच अंकातील प्रा. मिलींद जोशी ह्यांची "लग्नकल्लोळ" ही नांवाप्रमाणेच मनात हल्लकल्लोळ करणारी, एका अभागी तरुणाची व्यथित करणारी कहाणी, खरोखरच उत्कंठापूर्ण होती. विवाह दोन वेळेस अपयशी ठरण्याची अशी वेळ कुणावर येऊ नये, ह्या सदिच्छेने बहुदा कथेचा गोड व समंजस शेवट केला आहे.

# एक मात्र नमूद करावेसे वाटते की अंकातील कवितांच्या भाऊगर्दीत न समजणाऱ्या अशाच रचना अधिक आहेत आणि लक्षात राहतात त्या फक्त मोजक्या दोनच, मकरंद करंदीकरांनी संग्रहित केलेल्या ज्ञानेश्वर व कुसुमाग्रज ह्यांच्या.
जीवनानुभवांचे वास्तववादी परंतु अचूक भाष्य करणार्या ह्या दोन रचना, खरोखर ह्या दोन दिग्गजांचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात.

# आता अखेरीस स्वतः संपादक श्री. विजय लेले हँयांनी सिद्ध केलेल्या "इतनी नफरत क्यू है भाई?" असा भक्तगणांच्या अनिच्छेने का होईना पण वास्तवात निर्माण होत असलेल्या प्रश्नाचे शीर्षक घेतलेल्या लेखासंबंधी, बहुदा काहींना मान्य न होणारे दोन शब्द:

शेवटी माणूस कितीही गुणवंत आणि कर्तृत्ववान असला, तरी शेवटी त्याच्यातील कमतरता केव्हा ना केव्हा तरी आपले रूप दाखवतात हेच खरे मानायला हवे. तरच वरील प्रश्नाचे अधिक पारदर्शक पद्धतीने उत्तर मिळू शकेल. "आपला तो बाब्या अन् दुसर्याचा मात्र पाग्या" अशा भूमिकेतून केवळ एका विशिष्ट चष्म्यातून जर बघितले तर हा प्रश्न अप्रस्तुत वाटणे सहाजिकच आहे.

परंतु त्याचे उत्तर सत्ता मिळविण्यासाठी, जी जी काही आश्वासने किंवा जुमले बिनदिक्कत दिले त्यांचे शेवटी काय झाले, काय होत आहे हे बघितले पाहिजे. त्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण कां होत आहे, ते समजेल. तुघलकी पद्धतीने लादलेल्या नोटाबंदीमुळे व दिशाहीन धोरणांमुळे ज्या बिकट अवस्थेत सध्याची देशाची आर्थिक व व्यावहारिक स्थिती आणली गेली आहे, ते पहाता, आता "अच्छे दिन" ही संकल्पना खरोखर हास्यास्पद ठरली आहे, हे कोणीही मान्य करील.

सारांश, काय काय करायला नको होते आणि काय खरोखर कालमानाप्रमाणे आवश्यक होते ह्या प्रश्नांची जर प्रामाणिकपणे उत्तरे शोधली तर मूळ प्रश्नाचे खरे उत्तर मिळू शकेल.

चुक भूल द्यावी घ्यावी.

धन्यवाद.
सुधाकर नातू

शनिवार, २५ जानेवारी, २०२०

"घरच्या घरी ज्योतिष-२": "नियतीचा संकेत-२": "अनुभवाची निरीक्षणे-१":"जन्मगांठीचे रहस्य":

"घरच्या घरी ज्योतिष"-२":
"नियतीचा संकेत-२":
"अनुभवाची निरीक्षणे-१":
"जन्मगांठीचे रहस्य":

# सप्तम स्थान आणि पंचम स्थान ही वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातात.

# मंगळ दोष हा विवाह जुळवताना मोठा अडथळा ठरतो. मंगळाची सप्तमावर दृष्टी असली की तो मंगळ दोष होतो. बारावे, पहिलं चौथे आणि सातवे वा आठवे, या स्थानी जर मंगळ असला तर मंगळ दोष आहे असे मानतात.

# मंगळ दोषाला समोरची पत्रिका देखील मंगळ दोषाची लागते आणि नंतरच गुणमेलन करावे लागते.

# मंगळ दोष असून जर गुणमेलन न करता विवाह केला तर वैवाहिक सौख्यात बाधा येऊ शकते.

# शनि पहिल्या तिसर्‍या आणि सातव्या आणि दहाव्या दृष्टीने बघतो. त्यामुळे शनी जर पहिल्या पाचव्या सातव्या आणि दहाव्या स्थानी असेल तर, त्या पत्रिकेत शनीचा दाब असतो. मंगळ दोषाच्या पत्रिकेशी अशी पत्रिका गुणमेलन करून जुळू शकते.

# राहू-केतू वा मंगळ शनीसारखे पापग्रह जर दुसऱ्या किंवा बाराव्या स्थानी असतील, तर सप्तमेशच्या षडाष्टकात असल्यामुळे अशा बाबतीत विवाह जुळवायला विलंब होऊ शकतो. किंवा वैवाहिक जीवनात अडचणी व एकमेकांशी कलह अशी फळे अनुभव येऊ शकतात.

# पंचमेश हा जोडीदाराशी तुमचे कशा प्रकारचे नाते असेल याचे निदर्शक आहे. प्रेम कसे किती आणि एकमेकांच्या मनाच्या तारा कशा जुळतात, याचे दिग्दर्शन पंचम स्थान करते.

# सप्तमेश पंचमात असला तर एकमेकांचे चांगले प्रेम असते किंवा प्रेम विवाहाची शक्यता असते.

# सप्तमेश सप्तम, लाभ वा भाग्य किंवा पराक्रम स्थानी असला तर वैवाहिक जीवन प्रगतीचे सुख-समाधानाचे जाऊ शकते.

# पंचमेश आठव्या बाराव्या किंवा दुसऱ्या स्थानी अनिष्ट ठरू शकतो. वैवाहिक जीवनात पुरेसे सुख न मिळणे अथवा कलह असे अनुभव येऊ शकतात. त्यातून मंगळच जर पंचमेश असेल आणि तो जर या तीन स्थानात असेल तर त्याची तीव्रता वाढू शकते.

# सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पत्रिकेचे पूर्ण निदान करताना केवळ एवढ्याच निरिक्षणांचा आधार न घेता, पत्रिकेतील इतरही शुभाशुभ, स्वस्थानी उच्चनीचतेचे ग्रहयोग कोणते आहेत, ते बघूनच त्याप्रमाणे योग्य ते असे निदर्शन करणे, आवश्यक असते.


लेखाच्या शेवटी, You tube वरील माझ्या चँनेलची ओळख करून देतो: You tube वर search मध्ये माझ्या चँनेलचे हे नांव लिहाः moonsungrandson तेथे आगामी वर्षाच्या संपूर्ण राशीभविष्याचे उपयुक्त विडीओज् पहा. चँनेल subscribe करा.. 

 माझ्या ब्लॉगची लिंक: http//moonsungrandson.blogspot.com शेअरही करा.... 

 धन्यवाद.
 सुधाकर नातू   
ता.क.
वयोमानामुळे मी आता वैयक्तिक ज्योतिष सल्ला देणे बंद केले आहे.

"ह्रदयसंवाद-५": "स्मृतिची ती उलगडता पाने":

"ह्रदयसंवाद-५":
"स्मृतिची ती उलगडता पाने":

तीन-चार दशकांपूर्वी काही नियतकालिकातील माझे प्रकाशित साहित्य चाळत असताना, अचानक ह्या माझ्या तीन रचना मला गवसल्या. त्या इथे देत आहे....
"सीमोल्लंघन"!:
हे प्रणयगंध किती अनंत.....
अनंगरंगी हे अनंगरंग....
विविधरंगी ते भावतरंग....
शब्दांचे ते झेल.....
 नजरेचे हे खेळ.....
भावनांचे ते वेल.....
वासनांचे हे मेळ......
आज मर्यादांचे सीमोल्लंघन.....
करिती सर्वस्वाचे समर्पण.....
दोन जीवांचे मीलन ज्वलंत.....
हे प्रणयगंध किती अनंत.....

सुधाकर नातू
###################
"कां?... कां?...कां?...."
भोग, भोगून भागतो कां?
योग, जुळवून जुळतो कां?
राग, रागवून रहातो कां?
प्रीत, रीत जाणते कां?
गीत, गाऊन संपते कां?
वाट, पाहून दमतो कां?
याद, विसरून चालते कां?
वाद, वदवून विझतो कां?
गंध, घेऊन उडतो कां?
नाद, निंदून सुटतो कां?
पाप, पचवून पचते कां?
चाल, चालून चुकते कां?
काळ, कळवून येतो कां?

सुधाकर नातू
###################

"शोध":
उधळूनी अनंगाचे अनंत रंग....
घेऊनी सहवासाचे विविध सुगंध....
शोधिता परी मिळेना.....
प्रीतीची सरी जुळेना....
असे कां, ती भावनांची असोशी....
कां, ती मुळी वासनांची कासाविशी..... काहीच, मुळी कळेना..... तार,कशी ही जुळेना....
अन्
येशी अवचि जीवनी.....
तिला नकोशी, मला हवीहवीशी....
खूपता मज, आसवे तव लोचनी....
सुयश तव, सुहास्य मम आननी.. 
अन्
गवसे, सहजी अर्थ..
एकमेका देई दर्द....
प्रीतिचा हाचि रे गर्भ.....
आपुलकीचे सारे ते मर्म......

सुधाकर नातू....
###################

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

"घरच्या घरी ज्योतिष" "नियतीचा संकेत १ :  जन्मपत्रिकेची ओळख":


"घरच्या घरी ज्योतिष"
"नियतीचा संकेत १ :
जन्मपत्रिकेची ओळख":

"प्रास्ताविक":

उद्या काय होणार ह्याची उत्सुकता सर्वांनाच असते. येणारा काळ आपल्याला अनुकूल वा प्रतिकूल आहे हे जाणण्यासाठी राशिभविष्य पुष्कळजण वाचतातच. ज्योतिषामधील विविध ग्रह व त्यांचे योग, त्यांच्या महादशा, राशी, स्थाने, जन्मपत्रिका आणि विविध  नियमांचा इ.इ. मुलभूत माहितीची, सोप्या समजेल अशा भाषेंत ही क्रमवार लेखमाला, माझ्या चार दशकांच्या ज्योतिषज्ञानाच्या अभ्यास व अनुभवावर आधारित, मी आता दर आठवड्याला लिहीणार आहे. 'ह्या ह्रदयीचे, त्या ह्रदयी' करण्याचा, हा प्रयत्न तुम्हाला आवडेल व मार्गदर्शक ठरेल, ह्याची मला खात्री आहे.

"जन्मलग्नपत्रिकेचा फलादेश":

जन्मलग्नपत्रिका तपासताना, प्रत्येक ग्रह कोणत्या स्थानांत व राशीमध्ये आहे ते पहावे लागते. पुढील कोष्टकावरून त्या अनुषंगाने पत्रिकेचा दर्जा आणि फलादेश देण्यास मदत होते. ग्रह कोणत्या स्थानी आहेत आणि त्यांचे एकमेकांशी कसे शुभाशुभ योग होतात, तेही फलादेश निश्चित करताना अभ्यासावे लागते.

प्रथम, जन्मपत्रिकेच्या प्रत्येक स्थानाशी फलादेश पहाताना कोणत्या गोष्टी संबंधित असतात ते पाहू:

     :'पत्रिकेतील स्थानसंबंधित गोष्टी":

   स्थान-नाम     स्थानसंबंधित गोष्टी
  १. लग्न:   व्यक्तिमत्व शरिरसौष्ठव डोके
  २. धन:   संपत्ती कुटुंब घसा उजवा डोळा
  ३. पराक्रम: प्रवास, भावंडे उजवा कान हात  
  ४. सुख:  स्थावर मन माता बाहू फुफुसे
  ५. पंचम : संतती विद्या प्रेम पोट यक्रुत
  ६. षष्ठ:  शत्रु नोकरी रोग पोट मोठे आतडे
  ७. सप्तम: जोडीदार विवाहसुख जननेंद्रिये
  ८. अष्टम: म्रुत्यु नुकसान गर्भाशय
  ९. नवम: भाग्य परदेशगमन मांड्या
  १०. दशम: धंदा पिता ह्रदय गुढगे
  ११. एकादश: लाभ डावा कान पिंढर्या
  १२. व्यय: मोक्ष खर्च अध्यात्म पावले
  ------    ------    ------    ------    ------    -----
आता प्रत्यक्ष पत्रिकेचा सखोल अभ्यास करण्यासाठी, राशीनिहाय ग्रहस्थिती पाहू:

        :'राशीनिहाय ग्रहांची स्थिती':

     राशी     स्वामी     उच्चीचा    नीचीचा

  १. मेष       मंगळ       रवि         शनी
  २. व्रुषभ    शुक्र         चंद्र         ------
  ३. मिथून    बुध        ------        ------
  ४. कर्क      चंद्र          गुरू        मंगळ
  ५. सिंह      रवि        ------         ------
  ६. कन्या    बुध           बुध         शुक्र
  ७. तुळा     शुक्र          शनी        रवि
  ८. व्रुश्चिक  मंगळ       ------         चंद्र
  ९. धनु       गुरु         ------        ------
  १०. मकर   शनी          मंगळ      गुरू
  ११. कुंभ    शनी          ------       -----
  १२. मीन     गुरु           शुक्र        बुध
  ------    ------    ------    ------    ------    -----
ह्यानंतर पत्रिकेचे प्रत्येक स्थान त्यामध्ये उपस्थित ग्रह व ते कोणत्या राशीत आहेत ते तपासून त्यांची वरील कोष्टकानुसार काय स्थिती आहे ते पहावे. ह्याचबरोबर ग्रहांमधील योग कोणते आहेत ते पहावे:

'विविध ग्रहयोग':

स्वग्रुही: जर ग्रह स्वत:च्या राशीत असेल तर हा योग तो ज्या स्थानांत असेल त्याचे संबंधित शुभफळ देतो. जर ग्रह उच्च राशीत असेल तर तो विशेष शुभफळ देतो आणि ग्रह जर त्याच्या नीचराशीत असेल तर अशुभ मानला जातो.

युती: दोन किंवा अधिक ग्रह एकाच स्थानी वा एकाच राशीत.

केंद्रयोग: एकमेकांच्या पासून ९० अंशांत किंवा चौथ्या स्थानांतील ग्रह हा योग करतात.

त्रिकोण: एकमेकांपासून पाचव्या वा नवव्या स्थानी वा १२० अंशात, ग्रह हा नवपंचम शुभ योग करतात. पत्रिकेतील रवि व गुरुचा हा योग अत्यंत शुभ असतो.

लाभ: एकमेकांपासून तिसर्या वा अकराव्या स्थानांतील ग्रह हा योग करतात.

व्यय: एकमेकांच्या दुसर्या वा बाराव्या स्थानी जर ग्रह असतील तर हा योग होतो.

षडाष्टक: एकमेकांपासून सहाव्या वा आठव्या स्थानांतील ग्रह हा त्रासदायक योग करतात.

राजयोग:  पत्रिकेत एकुण चार चौकोनस्थाने तर आठ त्रिकोणस्थाने असतात. ह्या चार चौकोनापैकी एका स्थानाचा व पाचव्या अथवा नवव्या स्थानाचा स्वामी जर एकच ग्रह असेल तर अशा पत्रिकेत तो ग्रह राजयोग. हा विशेष शुभयोग करतो असे मानतात. सहाजिकच सखोल अभ्यास केला तर हे ध्यानात येईल की एकुण पुढील फक्त सहा  जन्मलग्नाच्या पत्रिका त्या त्या ग्रहाचा राजयोग करतात:
मकर व कुंभलग्न: शुक्राचा राजयोग
सिंह व कर्कलग्न: मंगळाचा राजयोग
व्रुषभ व तुळलग्न: शनीचा राजयोग.

हे ध्यानात येईल की चंद्र व रवि फक्त एकाच राशीचे मालक असल्याने, व बुध मिथुन व कन्या ह्या केंद्रयोगातील राशींचा स्वामी असल्याने त्या ग्रहांचे राजयोग नाहीत.

"ग्रहांची शुभस्थाने":

महत्त्वाचे सहा ग्रह एखाद्या स्थानापासून कोठे असले, तर शुभ मानले जातात त्याची माहीती:
रवि: ३ ६ १० व ११व्या स्थानी शुभ
मंगळ: ३, ६ ११वा चांगला
बुध: २ ४ ६ ८ १० ११ वा शुभ
गुरू: २ ५ ७ ९ ११ वा उत्तम
शुक्र: १ २ ३ ४ ५ ८ ९ ११ व १२वा चांगला
शनी: ३ ६ ११वा शुभ

ह्या बरोबरच पंचांगामध्ये प्रत्येक ग्रह इतरांबरोबर मित्र वा शत्रु अथवा सम असतो त्याचाही उपयोग पत्रिकेचा अभ्यास करताना होतो.

"ग्रहांच्या महादशा":

चंद्र ज्या राशीत किती अंश कला विकला, आहे ते अभ्यासून त्या व्यक्तीच्या जीवनात येणार्या ग्रहांच्या महादशांचा क्रम काढता येतो. अशा सर्वांगीण निरीक्षणांची अनुभवावरून चिकीत्सा करून ज्योतिषी फलादेश वर्तवतो.

सारांश,
ह्या लेखांत पत्रिका कशी पहायची ते विस्ताराने मांडले आहे. अनेकानेक पत्रिका तयार करुन त्यांचे विश्लेषण करत अनुभव मिळवता येतो. गणिताचे, तर्काचे ज्ञान अभ्यासू चिकीत्सक व्रुत्ती आणि काही अंशी अंतर्स्फुर्ती ह्या गुणांचा जोतिषासंबंधी सल्ला देताना उपयोग होत असतो.

ह्या प्रारंभिक लेखाच्या शेवटी,
You tube वरील माझ्या चँनेलची ओळख करून देतो:

You tube वर search मध्ये माझ्या चँनेलचे हे नांव लिहाः

moonsungrandson

तेथे आगामी वर्षाच्या संपूर्ण राशीभविष्याचे उपयुक्त विडीओज् पहा.
चँनेल subscribe करा..

माझ्या ब्लॉगची लिंक:
http//moonsungrandson.blogspot.com

शेअरही करा....

धन्यवाद.
सुधाकर नातू



गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

"रंगांची दुनिया-२": "शारदोत्सव-२": "मेनका" मासिक जाने'२०२०:रसास्वाद:


"रंगांची दुनिया-२":
"शारदोत्सव-२":
"मेनका" मासिक जाने२०: रसास्वाद:

सादर वंदन

सर्वसाधारण आठवड्यातून एकदा मी अशा तर्‍हेचे लेखन करत जाणार आहे, त्याप्रमाणे पहिला श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१९ चा रसास्वाद पाठवला होता.

आता वरील रसास्वाद पाठवत आहे. तो तुम्हाला आवडेल अशी आशा आहे आपण तो तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जरुर शेअर करावा.

तसेच वाचून झाल्यावर मला अभिप्राय कळवावा ही विनंती.

धन्यवाद
सुधाकर नातू
Mb 9820632655
--------------------------
"रंगांची दुनिया":
"शारदोत्सव-२":
"मेनका" मासिक जाने२०: रसास्वाद:

दररोज दुपारच्या वेळी वामकुक्षी करता-करता काहीना काही वाचायची माझी सवय आहे. अशाच एका दुपारी, मेनकाचा जानेवारी'२० चा अंक हातात होता. पाहता पाहता "कोलाज- थोडं जगून बघा" "शब्द जिवलग- श्री सरस्वती विद्यापीठाचे मंत्रमुग्ध करणारे कुलगुरु प्रा. राम शेवाळकर", "पट खटल्याचा- सायको कीलर अविनाश" आणि "शब्द कोडं", "दुनियादारी" अशी वाचनाची सजग सफर कधी पूर्ण झाली, ते कळलेच नाही!

या शब्दामालांच्या स्वप्नातून बाहेर आल्यावर, मला लक्षात आलं की अरे आपण आज झोपलोच नाही! त्यामुळे एक वेगळाच नवा जागर मनात उगवला. वाटलं जग किती वेगानं बदललाय, बदलत चाललंय आणि जे बदलत आहे ते खरोखर किती चांगलं आहे. हे अशाकरता की, मी देखील कोणे एकेकाळी-तीन साडेतीन दशकांपूर्वी, ह्याच मेनका व जत्रांमध्ये "रंगांची दुनिया" "टेलीरंजन" आणि व्यवस्थापन शास्त्रावर "प्रगतीची क्षितीजे" अशी काही ना काही नियमित सदरे लिहीत असे!

सहाजिकच ते मनोहारी दिवस आठवले. दिवाळी अंकांच्या जाहिरातींच्या निमित्ताने श्रीमती सुमनताई बेहेरे आमच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये यायच्या, ते दिवस आठवले किंवा विजयानगर कॉलनी मध्ये माझ्या पुणे मुक्कामी कधीमधी घडलेल्या, संपादकीय कक्षात प्रत्यक्ष बेहेरेसाहेबांच्या भेटी व त्यांचा पाहुणचार म्हणून घेतलेल्या चहाची चव जीभेवर आली, हिरव्या सुवाच्य अक्षरात त्यांनी मला लिहिलेली पोस्टकार्डस् नजरेसमोर आली.....

ह्या अंकात "कोलाज सदरात (ज्यामुळे मला अचानक हे असे मनचे, मनसे लिहावेसे वाटले!) लेखिकेने म्हटल्याप्रमाणे लक्षात आले की, बदल कसे घडतात आणि झालेले बदल स्वीकारायला हवेतच हवेत! जाणवले की किती आकर्षक व बदलत्या काळानुरूप अशा तर्‍हेचे आकर्षक मेनका माहेर अंक वाचकांच्या अभिरुचीनुरुप प्रसिद्ध होत आहेत. उत्तम कागदावर तशीच छान छपाई, अनोख्या, विविध विषयांवरची आकर्षक अशी नियमित येणारी सदरे, तसेच इतर कथा व साहित्य, त्याजोडीला मेनका प्रकाशनाच्या विविध अशा जाहिराती पेरलेल्या, यातील 'कथावली' ही अभिनव संकल्पना तर खरोखर कौतुकास्पदच. या साऱ्यांचा खरोखर मला खूप आनंद झाला.

काळाच्या ओघात मराठी मासिकं आताशा फारशी उरलेली नाहीत आणि त्यामध्ये मेनका माहेर सारखी मासिकं अजूनही तितक्याच, कदाचित पूर्वीपेक्षा जास्त उत्साहाने काढली जात आहेत, ही खरोखर प्रेरणादायी घडामोड आहे...

आता अंकाचा रसास्वाद देत आहे:

प्रथम लेखक/लेखिकेचे नांव,
नंतर त्यांच्या लेखाचा परामर्ष:

१.
शिल्पा चिटणीस जोशी

नुकताच मेनका जानेवारी'२० चा अंक वाचला व त्यामध्ये 'जागर' सदरामध्ये "मुलगी होऊ द्या हो" हा तुमचा, सद्यस्थितीतील वास्तवतेत, स्त्रीच्या एकंदर अगतिक अपरिहार्यतेचे विदारक चित्र उभे करणारा लेख खरोखर थरकाप करणारा तर आहेच, परंतु तो समयोचित देखील आहे.

आज इतकी प्रगती होऊन, स्त्री पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखवत असतानाही, जर समाजामध्ये "वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच" ही खूणगाठ बांधणारी संस्कृती जर तशीच द्रुढ असेल, तर ते आपले भवितव्य अंधकारमय करणारे ठरू शकेल, असे मनावर मनापासून बिंबविणारा हा एक आलेख आहे. ह्यामधील अभागी स्रीयांची विविध उदाहरणे वाचताना खरोखर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि आज अजूनही अशा तर्‍हेची दुःखे, मुक्या मनाने सहन करणाऱ्या स्त्रिया समाजात आहेत, हे समजून हृदय विदीर्ण झाल्याशिवाय रहात नाही.

शतका दीड शतकापूर्वी ज्या ज्या द्रष्ट्या,
समाजसेवकांनी विशिष्ट ध्येयाने, विरोध पत्करून प्रसंगी अवहेलना सहन करत, स्त्रीला उंबरठ्याबाहेर आणून शिक्षणाचा आणि इतर प्रगतीचा मार्ग दाखवला, त्या बिचार्‍या थोर मंडळींना "हेची फळ काय मम तपाला" असे स्वर्गात वाटल्याशिवाय राहणार नाही, अशी भयानक स्थिती आज आहे, हेच हा वेधक लेख आवर्जून सांगतो.

एका नितांत अत्यावश्यक अशा विषयाला वाचा फोडणारा लेख लिहिल्याबद्दल आपले अभिनंदन.

--------------------------
२.
प्रा. प्रवीण दवणे
सादर वंदन

नुकताच मेनका जानेवारी'२० चा अंक वाचला आणि त्यात 'शब्द जिवलग' ह्या सदरात "मंत्रमुग्ध करणारे कुलगुरू राम शेवाळकर" आणि तुमचे ऋणानुबंध कसकसे वेगवेगळ्या प्रसंगातून बहरत गेले, त्याचे तुमच्या नेहमीच्या रसाळ भाषेत आणि ओघवत्या शैलीतले वर्णन निश्चितच वाचनीय आहे.

एक यशस्वी गीतकार आणि संवादक म्हणून आपले कर्तृत्व खरोखर प्रेरणादायी आहे, यात शंकाच नाही आणि त्याबद्दल तुमचे कौतुक व अभिनंदन. मात्र ह्या लेखात केवळ आत्मप्रौढीचा भास वाटणारे, तुमच्याच कर्तृत्वाचे वेगवेगळे प्रसंग आवर्जून मांडलेले दिसतात, त्या तुलनेत लेख-नायकाचे म्हणजे अर्थातच राम शेवाळकर यांचे असामान्य शब्द प्रभुत्व आणि अमोघ वाक् चातुर्य सोदाहरण दाखविणारे व्यक्तिचित्र खरे म्हणजे अपेक्षित होते. परंतु इथे केवळ त्यांची सह्रदय गुणग्राहकता आणि वैदर्भीय आदरातिथ्यच फक्त प्रकर्षाने तुम्ही मांडलेले दिसते.

सहाजिकच "गाण्या मागच्या गोष्टी" ह्या आपल्या आधीच्या सदरात, जे विषयानुरुप विविधांगी अनुभव दर्शन घडले, तसे इथे अजून तितकेसे परिणामकारक वाटत नाही हे नमूद करतो.

ह्यावरील त्यांचा प्रतिसाद:

"नमस्कार! लेख वाचून आवर्जून इ पत्र लिहिलेत; आनंद झाला; पुढील लेखात मी निश्चितच काळजी घेईन! कृपया असेच स्पष्ट सांगत चला!
प्रवीण दवणे "

--------------------------
३.
संतोष गोगले,

इथे आपला "जिज्ञासा शमवणारी जिज्ञासा" हा जणु नावावरूनच कुतुहूल व जिज्ञासा वाढवणारा लेख वाचला.

पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही खूप वेळा जात येत असतो, परंतु तिथे कोथरूडला अशी ही वेगळ्या पद्धतीने विद्यादान करणारी संस्था आहे हे आम्हाला तुमच्या लेखामुळे कळले. बदलत्या स्पर्धेच्या जीवनात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर माणूस म्हणून सर्वांकष असा बदल विद्यार्थ्यांमध्ये झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर वेळ आली तर ते उभे राहू शकली पाहिजेत, अशा तर्‍हेची अभिनव शिक्षणपद्धती साकारणाऱ्या, या संस्थेचे व ती ओळख करून देणार्‍या तुमचे कौतुक करावे, तितके थोडेच! म्हणून अभिनंदन व शुभेच्छा.

–--------------------
४.
वसुंधरा पर्वते

इथे आरोग्यदायी जपानी खाद्यसंस्कृतीचा तुम्ही सोदाहरण विस्तृत परिचय करून दिला आहे.

मला खरोखर गंमत व कौतुक वाटते की, मूलभूत पदार्थ, तसेच कदाचित खाद्यपदार्थ बनविण्याची साधनेही, सगळ्यांसाठी सारखीच असतात, परंतु त्यातून, वेगवेगळ्या प्रदेशातील भिन्न आवडी निवडी असणारी माणसे, आपल्या पद्धतीनुसार त्यांना कसे कसे विशिष्ट प्रमाणात, एकत्र आणून चविष्ट असे अन्नपदार्थ करतात ह्याचे! "पसंद अपनी अपनी खयाल खयाल अपने" असंच म्हणायचं! स्वादिष्ट आणि रुचकर अशा या लेखाबद्दल आपले अभिनंदन व शुभेच्छा.

-------------------------
५.
श्रीनिवास शारंगपाणी

तुमची "माग" ही उत्कंठापूर्ण अशी कथा वाचली. इशिता सारखी तरुण मुलगी आपल्या जन्मदात्या वडिलांचा शोध मोठ्या जिद्दीने कशी घेते ते चित्तथरारक पद्धतीने उभी केलेली कहाणी आहे. सगळ्यात न विसरण्याजोगी गोष्ट म्हणजे तिचा केलेला धक्कादायक शेवट! अगदी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त परिणाम करणारी, ही कथा खरोखर कौतुकास्पद आहे, म्हणून तुमचे अभिनंदन व शुभेच्छा.

----------------------
६.
पल्लवी मुजुमदार

"तेजोमय" सदरामधील, मुलाखतीमधून ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विदुषी डॉक्टर रोहिणी गवाणकर यांचं जीवनचरित्र मनावर प्रेरणादायी ठसा उमटून गेले. ध्येयवादी देशसेवा, साहित्यसेवा, विद्यादान करणार्या आणि अंगभूत गुणांवर पीएचडी पर्यंतची मजल गाठणार्या ह्या विदुषीचे योगदान फार मोठे आहे, ही जाणीव झाली.

अशा तर्‍हेची स्वयंभू, self motivated माणसं समाजात असतात, म्हणूनच जग कितीही अडचणी आल्या, तरी पुढे जात असते, आपापला नवा मार्ग शोधू शकत असते, असेच म्हणावे लागेल. या समयोचित लेखाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा.

-----------------------
७.
कल्पिता राजोपाध्ये

पट खटल्याचा या सदरामध्ये "सायको किलर अविनाश" या वाट चुकलेल्या आणि दिशा भरकटलेल्या अशा अभागी तरुणाची चित्तथरारक कथा खरोखर डोळ्यात अंजन घालणारी आहे. परिस्थिती माणसाला कशी बदलू शकते आणि एक हुशार कर्तबगार असे जीवनाची त्यामुळे
गुन्हेगारी मार्गाला लागून कशी भयानक धूळधाण होऊ शकते, ते वाचताना खरोखर काळजाचा ठोकाच थांबतो.

--------------------------

सुधाकर नातू

शनिवार, १८ जानेवारी, २०२०

"रंगदर्शन-१": "अशी, कशी ही, रंगांची दुनिया?": "तरुण आहे रात्र अजुनी!":


 "रंगदर्शन-१":
"अशी, कशी ही, रंगांची दुनिया?":
" तरुण आहे रात्र अजुनी!":

योगायोगांची मला मोठी गंमत वाटते. वर्ष अखेर आणि वर्षारंभच्या आठवड्याच्या कालखंडात सेलिब्रेशन म्हणून, केवळ करमणूक भेटीसाठी व खेळ ह्यात आपण वेळ नेहमीच घालवत असतो. माझेही तसेच झाले, पण त्यामध्ये मनोरंजन प्राधान्याने होते. खरोखर विचार करण्याजोग्या, कोड्यात पाडणार्या अशा काही तीन कलाकृती बघायचा योग आला: दोन नाटकं व एक चित्रपट.

"तरुण आहे, रात्र अजुनी" हे आणि "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" अशी अगदी भिन्न प्रकृतीची दोन नाटकं, तर आधुनिक जगातील बदलत्या जीवनशैलीचा परिणाम असलेले आयव्हीएफ तंत्र खुबीने आणि अत्यंत मजेशीर रीतीने धक्के देत उभा केलेला Good News हा चित्रपट.

मराठी रंगभूमी ही खरोखर अविस्मरणीय व अद्वितीय अशीच आहे कारण ह्या रंगभूमीवर जी नाटकं चांगली वाटतात, तेथे तीन गुणांचा म्हणजे धंदा कला आणि नवा विचार नवी द्रुष्टी ह्यांचा त्रिवेणी संगम झालेला पहायला मिळतो.

समाजात जे घडते बदलत्या काळानुसार जशी माणसं बदलत जातात, तसे परस्परसंबंध देखील बदलत जातात आणि अगदी वेगळ्या अशा जीवनशैलीचे मिश्रण आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ही दोन्ही नाटके खरोखर अगदी परस्पर विरुद्ध अशा वास्तवतेचे चित्रण करत आहेत. त्यामुळे मला ती एकाच वेळेला पाहण्याच्या योगाची मोठी गंमत वाटते.

"तरुण आहे रात्र अजुनी":
श्रीमंती आणि त्यातून सामान्यांना नवश्रीमंती मिळाली की माणसं कशी बदलत जातात आणि स्त्री-पुरुष आपले आनंदाचे शारीरिक सुखाचे क्षण कसे अगदी वादग्रस्त पद्धतीने वेचत जातात, त्याचे वेधक भेदक असे चित्रण "तरुण आहे रात्र अजुनी" मध्ये उभे केलं आहे.

पूर्वी हिट अँड हॉट अशी नाटकं यायची आणि त्यामध्ये जे कदाचित सर्वसामान्य प्रेक्षकाला बघायला कठीण वाटेल लाज वाटेल अशा तऱ्हेचे काहीतरी असायचे. ते एक खरोखर धाडसच होते त्यावेळेला. अशा नाटकांची लाट आली अन् पहाता पहाता, ती ओसरूनही गेली.

परंतु "तरुण आहे रात्र अजुनी" नाटकाची झेप त्या तुलनेत शब्दांपलीकडची आहे, आपण विचारच करू शकणार नाही, असा मुद्दा येथे उलगडून दाखविला आहे. पुरुष आणि स्त्री यामध्ये आपापली शारीरिक भूक भागवण्याचे मार्ग नेहमीच विभिन्न राहिले आहेत. पुरुषाला एक सोय आहे, तो घरामध्ये आपल्याला जे मिळत नाही, ते शोधण्यासाठी बिनदिक्कत बाहेर जात आला आहे. परंतु स्त्रीच्या बाबतीत मात्र खूपच बंधने असल्यामुळे, तिच्या नशिबात जे काही भोग वाट्याला येतील ते सोसत, मन मारुन पतीशीच एकनिष्ठ राहिलेच पाहिजे अशी बिचारीवर सक्ती असते. त्याहून समस्या ही की, लग्न न होऊ शकणार्या प्रौढ तरुणी त्यांची ही भूक भागविण्यासाठी काय करणार?

नवश्रीमंती आली, लगेच अपरिहार्यपणे किटी पार्टी आल्या आणि त्या नवश्रीमंत स्त्रियांच्या क्लब मध्ये काय काय चालते याचे एक विदारक चित्र या नाटकांमध्ये आहे. नाटकात एक विवाहित स्त्री आपल्याला घरामध्ये जे सुख नवर्याकडून हवे आहे, ते मिळत नाही म्हणून, चक्क फोन करून एखादा पिझ्झा किंवा पास्ता मागवावा अशा तऱ्हेने एका गिगोलोला अर्थात् 'तसे' सुख देणाऱ्या पुरुष वेश्येला बोलावते. पुढे काय होते याचे
धक्क्या मागून धक्के देणारे असे नाट्यमय प्रसंग आपल्यापुढे येत राहतात.

नाटकाचा पहिला अंक सुरुवातीला आपली उत्सुकता, उत्कंठा खूपच जागी करतो. परंतु त्या प्रौढ स्त्रीने बोलावलेला तरुण रंगमंचावर आल्यावर, तो ज्या काही नको त्या गोष्टी तिला सांगत रहातो, त्यामुळे आपल्या मनात हे काय चाललंय असाच संभ्रम होतो. खरं म्हणजे त्याची इच्छा असते की ही अशा बाबतीतली "पहिलटकरीण!!?, न घाबरता आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी उमलावी, फुलावी म्हणून तो खास दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याच्या दोन्ही गोष्टी पूर्ण अप्रस्तुत असल्याने, रसभंग करतात आणि त्यामुळे उगाचच लांबलेला पहिला अंक आपल्या पदरी निराशाच पदरी टाकतो.

मात्र ह्याची सगळी भरपाई दुसर्‍या अंकात, रंगमंचावर हे दोघे एकांतात असताना अचानक
त्या बाईचा नवरा आल्यावर, जे जे काय घडत जाते, संवादांची जी काही जुगलबंदी होत रहाते ते चित्तथरारक असेच आहे. तीनही कलाकारांनी आपआपल्या भूमिका मात्र चोख केल्या आहेत.
जर पहिला अंक अधिक व्यवस्थित आणि काही योग्य त्या सुधारणा करून बसवला तर हे नाटक अधिक परिणामकारक ठरेल असे वाटते.

मात्र सद्यस्थितीत कुटुंबाने एकत्र जाऊन पहावे अशा तऱ्हेचे हे नाटक नाही, असेच म्हणावे लागते. त्यामुळे याचे यश कदाचित मर्यादितच राहू शकते. पण एक वास्तववादी अघोषित समस्या विलक्षण धीटाईने मांडण्याचे जे काही धाडस केले आहे, ते खरोखर रंगभूमीला वेगळीच दिशा दाखवणारे ठरू शकेल.

मराठी रंगभूमीवर व्यवसाय, कला आणि विचार जाग्रुती ह्यांचा त्रिवेणी संगम घडविणारी नाटके येत असतात, म्हणूनच अभिमानाने आपण म्हणतो, मराठी रंगभूमी श्रेष्ठ, अव्वल आहे. हाच प्रत्यय "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" नाटकांत तर अजुनही विलक्षण ताकदीचा भासला. त्याविषयी आता पुढच्या भागात......

सुधाकर नातू

शनिवार, ११ जानेवारी, २०२०

"शारदोत्सव": "क्षणा क्षणांतच रंग भरा"....


"शारदोत्सव !":
"क्षणा क्षणांतच रंग भरा...."

"पाय सलामत तो.....":
काल वाचनालयातून परत येताना, अचानक डावा पाय मुरगळला, डावा पाय टाकता येईना जमिनीवर. पाऊल टाकले रे टाकले की, तो भार सहन होत नव्हता, चालताना अक्षरशः असह्य कळा येऊ लागल्या. कसाबसा घरी आलो.

त्यानंतर घरात चालायचा प्रयत्न केला, तेव्हाही तीच गत! काय करावे सुचेना. हे असं ध्यानी मनी नसताना कसं, काय झालं? कळेना. कदाचित त्या वाचनालयाकडे जाणारा तो रस्ता, फेवर ब्लॉकचा असल्यामुळे वर खाली अशा उंच सखल पद्धतीची जमीन असल्यामुळे, डाव्या तळपायाची ही ( आग जणु मस्तकांत ) त्रासदायक स्थिती झाली असावी. वाचनालयापासून घरापर्यंत हे अंतर तसे फार नव्हते. परंतु तेही मला फार मोठी दूरची मजल असल्यासारखे वाटले.

घरी आल्यानंतर, उपाय म्हणून प्रथम गार पाण्याने पाय भरपूर धुतले, पण काही उपाय नाही. त्यानंतर काही वेळाने गरम पाण्याच्या बादलीत डावा पाय टाकून बराच वेळ बसलो, तरीही तीच स्थिती. कसनुसं व्हायला लागले. अखेर रात्री झोपताना डाव्या पायाला "मूव" मलम लावून चांगले माँलीश केले आणि देवाची प्रार्थना केली की, 'बाबा रे माझी या पीडेतून सुटका कर'.

हे सगळे होत असताना त्या काळात जाणवले की आपले सारे शरीर सहज सरळ सुलभ असते, तेव्हा खरोखर किती आपल्याला सुख आणि समाधान मिळत असते. परंतु जर कधी अशी बिघाडी झाली, तर आपले सारे जीवनच आणि मानसिक स्वास्थ पार बिघडून जाते. त्या काही तासात मला वाटले की, आता आपल्याला कधी चालता येणं कठीण आहे, घरातच पडून राहावे लागणार, प्रवास तर फार फार दूरची गोष्ट झाली. एक्स-रे प्लास्टर किंवा कदाचित काहीतरी ऑपरेशन आणि त्यानंतरचे परत फिजिओथेरपी वगैरे वगैरे हेही करायला लागणार की काय, अशी भीती निर्माण झाली. अशावेळेला वाटून गेले ते असे:

"When v hv, v don't value what v hv;
but when v lose it,
v feel the pinch of not having,
what v had earlier."

अखेर छान झोपेनंतर सकाळी नवलची वर्तले, प्रथम मुद्दाम डावा पायच जमिनीवर टाकला अन् कळले "All is Well"!

ह्या पार्श्वभूमीवर, मला नुकताच वाचलेल्या महाराष्ट्र टाइम्स मधील श्री. दीपक करंजीकर ह्यांच्या एका सुंदर विचारप्रवर्तक "जीवन आणि जगणे" ह्या विषयावरील लेखाची आठवण झाली. खरोखर एखाद्या तत्त्वज्ञ माणसासारखे, येथे त्यांनी या अविभाज्य दोन महत्त्वाच्या गोष्टींवर सोप्या भाषेत, कुणालाही समजण्यासारखे भाष्य केले आहे. अर्थ सोपा आहे:

"जीवन म्हणजे असणं-म्हणजे केवळ अस्तित्व, तर जगणे म्हणजे त्या असण्याला अर्थ आणणे, त्यात नवा अर्थ भरणे होय."

किती छान व्याख्या त्यांनी ह्या दोन वरवर एकच भासणार्या गोष्टींची केली आहे: मरण येत नाही, म्हणून केवळ असणं, म्हणजे जीवन. बरीचशी मंडळी जीवन आणि जगणं यांच्या काठावर आयुष्य काढत असतात.

"उघडा, दार मनाचे":
अचानक एक मन अंतर्मुख करणारे असे भावगीत ऐकले. त्याचे शब्द असे होते:

"उघडा दार मनाचे उघडा दार मनाचे,
करा काम पुण्याचे, करा काम पुण्याचे!"

जीवन कसे जगावे हे समजण्यासाठी, खरोखर विचार करायला लावणारे असेच हे बोल आहेत. मनाच दार उघडून आपण आपल्याच मनाशी संवाद साधला पाहिजे, तसे करताना आपण काय केले आणि ते कसे होते, चांगले की वाईट, हितकारक कि अहितकारक, असे तपासणे गरजेचे आहे, असेच हे बोल सांगतात.

शेवटी पुण्य पुण्य म्हणजे काय? तर केवळ देवाची आराधना किंवा देवळात जाणे नव्हे, तर दुसऱ्याला आनंद देईल, इतरांचेही भले साधेल असे काही ना काही करणे, म्हणजे पुण्य होय. तर पाप म्हणजे फक्त स्वार्थ साधणे. तर इतरांचे वाईट होईल, मत्सराने दुसऱ्यांचा दुःस्वास करणे आणि त्यांचे अहित कसे होईल याचा विचार करून कृती करणे म्हणजे पाप होय.

आज हे पुण्याचे भावगीत ऐकले, नंतर मला अचूकपणे समजला जीवन अन् जगणे ह्यातला खराखुरा फरक. जीवनातील जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी आपण प्रथम मनाचे दार उघडले पाहिजे हे उमजले.

तसे कराल, तर जगण्यातला 'किती जगलात ह्यापेक्षा कसे जगलात' ते महत्त्वाचे, हा मतितार्थ कळून जाईल. मग दररोजची सकाळ आपल्याला नवा उत्साह, नवी ऊर्जा घेऊन येत राहील आणि दिवस कसे सरतील ते कळणारच नाही. "प्रौढत्वी निज शैशवास जपणे हा बाणा कवीचा असे", हे जे म्हंटलं जातं, तेच जगणे, नव्हे कां!

केवळ वय झालं म्हणून, शरीर थकलंही असेल, परंतु जर मन मात्र, तसंच ताजं तवानं असेल- बालपणीसारखं, तर तुमच्या जगण्याला, तुमच्या जीवनाला अर्थ येऊ शकतो, त्यात तुम्ही अर्थ भरू शकता, आपल्या मर्जीने आणि आपल्या वेळेनुसार, आपल्याला भावेल असे जगता येईल.

ह्या संदर्भात टीव्हीवर एक बातमी बघितली होती, ती आठवली. यामध्ये ७३ वर्षाची युरोपियन स्त्री उत्साहाने रोज वीस किलोमीटर चालत वा धावत युरोप पासून अगदी थेट भारतापर्यंत पोहोचण्यासाठी, दरकूच दर मजल करतानाची द्रुष्ये त्यात दाखवली होती. स्वतःचे सामान एका छानशा बनवलेल्या हातगाडी सारख्या वाहनात घालून ती स्री, ते वाहन स्वतः धावत रोज नेत असणारे ते दृश्य होते. अक्षरशः अचंबा करावे असेच ते दृश्य आणि ती बातमी होती. म्हणजे इतके वय होऊनही, ती स्त्री उत्साहाने नवनव्या उमेदीने कशी आपल्या जीवनात अर्थ भरत आहे ते उमजले.

सारांश, ज्याने त्याने हाच विचार करायचा आहे की, आपण कुठे आहोत, केवळ "असण्या"त मशगुल रहाण्याचे जीवन स्वीकारतोय की, खरोखर त्यात आपल्याला हवा तसा आवडणारा अर्थ भरून अधिकाधिक समाधान मिळवणार आहोत! ह्या लेखाने असा वेगळा विचार करायला लावला आणि तो मी तुमच्या पर्यंत पोहोचला बघा घेता आला तर....

हा तुम्हाला नवी द्रुष्टी देईल, अशी आशा आहे.

जाता जाता सांगतो.....

"क्षणा क्षणांतच रंग भरा....
हितकर, रुचकर करण्याचा चंग धरा....
रुसण्या, रडण्याचा छंद ,व्यर्थ ना करा....
जीवन जगण्याचा हाच, अर्थ खरा!....
क्षणा क्षणांतच रंग भरा"....

धन्यवाद.
सुधाकर नातू

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

"रंगांची दुनिया-१": "शारदोत्सव-१": "श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१९ सखोल रसास्वाद"


 "रंगांची दुनिया-१:
"शारदोत्सव-१"
"श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१९
सखोल रसास्वाद"

प्रास्ताविक:
नुकताच मी सर्वांगसुंदर व परिपूर्ण असा
"श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१९" वाचला. त्याचा माझ्यावर इतका काही परिणाम झाला की, हा सविस्तर ह्रदयसंवाद लिहायला उद्युक्त झालो आहे.

अंकांच्या वाचनाने माझ्यावर काय गारुड केले ते प्रथम देतो:
-------------------------
"टीमो" पासून मुक्ती" !:

आज खरोखर नवलच घडले, कधी नव्हे असा एक खरोखर आश्चर्यकारक विक्रम मी करू शकलो !

दररोज सकाळी उठल्यापासून क्षणोक्षणी मोबाईल हाताळणाऱ्या मला, आज सकाळपासून चक्क
आत्तापर्यंत सायंकाळी ६ पर्यंत म्हणजे, जवळजवळ बारा तास मोबाईलला हातही लावावासा वाटला नाही, ना टीव्ही पहावासा वाटला, ना सोशल मीडियावर असे काही खरडावेसे वाटले !

अशा अनोख्या विक्रमाला, कारण ठरली एक वेगळीच गोष्ट ! रुपये ३५० अशी भरघोस किंमत असलेला, ३०० पानांहून अधिक असल्यामुळे वजनदार असलेला, परंतु सर्वांगीण सखोल अशा साहित्य खजिन्याने नटलेला, अर्थात् लौकिकार्थानेही वजनदार, "श्रीदीलक्ष्मी" चा दिवाळी अंक'१९ वाचायला मिळाला. प्रत्येक वाचनप्रेमी रसिकाने वाचावा, असाच हा एक उत्तम ऐवज आहे.

ह्या एकसंघ, एकाग्र वाचनामुळे टीव्ही आणि मोबाईल ह्या आजच्या युगातील अत्यावश्यक साधनांची मला जराही आठवण झाली नाही, हा सर्वात मोठा फायदा मिळाला. ही दोन्ही उपकरणे जेव्हा आपल्यासाठी अस्तित्वातही नव्हती, त्या जपून ठेवणार्या काळाची आपोआप उजळणी झाली.

ह्यापुढेही "टीमो" पासून अशीच मुक्ती मिळत जावी हीच इच्छा !"......
--------------------- ------
अशा ह्या संग्राह्य दिवाळी अंकात साहित्यकृतीचे योगदान असणे, ही देखील एक भूषणावह गोष्ट होय. त्यांच्यातील मला विशेष भावलेल्या काहींचा रसास्वाद तुम्हाला हा अप्रतिम अंक वाचायलाच लावेल, अशी मला आशा आहे. लेखकाचे नांव , साहित्यक्रुतीचे शीर्षक व नंतर रसास्वाद हा असा:

श्री. रविप्रकाश कुलकर्णी:
"अग्रगण्य घटनातज्ञ नानी पालखीवालांबद्दल":

ह्या थोर विधीज्ञासंबंधीत विविध प्रकारची वेधक वेचक माहिती व मोजके नाट्यमय प्रसंग प्रस्तुत लेखातून मांडले आहेत. खरोखर रंजक आणि विचार करण्याजोगा हा आठवणींचा ठेवा आहे.

या थोर माणसाने, असामान्य न्यायालयीन कामगिरी तर केलीच, पण आपल्या अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या वार्षिक बजेटबद्दल दिलेली मार्गदर्शक व परखड व्याख्याने, एका भल्यामोठ्या स्टेडियममध्ये वर्षानुवर्ष अलोट गर्दीत ऐकली जात ही खरोखरच अभिमिनास्पद गोष्ट होय. लेखकाचाही जवळून संपर्काचा योग ह्या उच्चविद्याविभूषित वकीलांशी कसा कोठे आला होता, हे वाचून थक्क व्हाल.
--------------------------

श्री. मनोज आचार्य:

"भारतातील पहिली फोटो जर्नालिस्ट":
होमाई व्यारावावला...

काही काही गोष्टी आपल्या मनात किंवा माहितीत नसतात मात्र त्यांचे नेहमीच कुतूहल वाटत असते. पत्रकारिता हा आज लोकमान्य व आवश्यक असा व्यवसाय बनला आहे. परंतु ज्यावेळी स्त्रिया नुकत्याच घराबाहेर पडून काही धडपड करायला लागल्या होत्या, अशा वेळेला होमाई व्यारावाला यासारखी एक स्त्री फोटो जर्नालिस्ट बनते, तिची कहाणी या लेखात अतिशय उत्कंठापूर्ण रितीने संग्राह्य निवडक फोटो देऊन मांडली आहे. त्यामुळे इतिहासाची तर उजळणी झालीच परंतु या स्त्रीच्या धडाडीचे आणि कौशल्याचे कौतुक वाटले.

मला आठवण झाली,अशाच तर्‍हेचे "पहिल्यात पहिले" कोण याचा मी विविध क्षेत्रातील शोध घेतला होता आणि त्याबद्दलचे माझे दोन लेख माझ्या ह्याच ब्लॉगवर लिहिले होते. आपण तो लेख जरुर वाचावा.
--------------------------

प्रा. अविनाश कोल्हे

"शह-काटशह":

एका भुरट्या चोरावर, दैवगतीने फसलेल्या चोरीच्या एका प्रयत्नानंतर पळून जाताना काय काय प्रसंग ओढवतात, त्याचा मदतगार मित्रही कसा त्याला दगा देतो आणि त्यामध्ये काहीही संबंध नसलेले असे, ट्रकड्रायव्हर आणि क्लिनर त्या भानगडीत कसे गुंतले जातात, हे अतिशय ओघवत्या भाषेत प्रसंगांचे यथातथ्य वर्णन या प्रकरणात मांडले आहे.

सभोवताली जे घडतंय याचे सूक्ष्म निरीक्षण आणि त्यातून गुन्हेगारी विश्वाचे मनोविश्व रेखाटणे, हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे. त्याकरता जातीवंत प्रतिभाच हवी आणि ती येथे प्रकर्षाने दिसते. त्यामुळे लेखकाची हे प्रकरण असलेली मूळ कादंबरी खरोखर वाचनीय असणार हयाची खात्री पटली.
-----------------------

डॉ श्रीकांत मुंदरगी

"बिनधास्त बिनधास्त बेफिकिर आणि बेदरकार राष्ट्राध्यक्ष" श्री. डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्तथरारक असे जीवन चरित्र ह्या लेखात रंजकतेने मांडले आहे. काळाच्या गरजेनुसार समानधर्मी नेतृत्व कसे उदयाला येते ते आपण विविध देशांमध्ये सध्याचे जे अग्रणी नेते आहेत त्यावरून समजू शकतो.

आजच्या खळबळजनक समयी, अमेरिकेसारख्या जगात महाबलाढ्य अशा श्रीमंत देशाचे समर्थ सारथ्य, करण्यासाठी असाच डोनाल्ड ट्रंम्प ह्यांच्यासारखा, परिणामांची पर्वा न करणारा, सत्तरी ओलांडूनही अशा धडाडीचा आणि धडपड्या माणूस हवा हेच खरे! तसेच त्याचे बरे वाईट परिणाम भावी काळात काय होतील ह्याची मात्र खात्री देणे कठीण ठरेल.

----------------------
श्री.अरुण पुराणिक

"चोप्रांचे महाभारत":
काळी महाभारत ही दूरदर्शन वरील विशाल मालिका बघण्यासाठी जवळ जवळ सारा भारत एक वाटला जायचा आणि रस्ते अक्षर च्या पोस्ट पडायचे अशा या लोकप्रिय मालिकेच्या जडणघडणीत कुतुहूल प्रत्येकाच्याच मनात असू शकते त्यासंबंधीची पडद्यामागची कहानी या लेखात आपल्याला वेगळीच दिशा आणि चित्र दाखवते.

महाभारत कथेचा भव्य नाट्यमय आणि रोमहर्षक असा पट छोट्या पडद्यावर मोठ्या खटपटीने प्रयत्नपूर्वक कसा मांडला त्याची कहाणी "चोप्रांचे महाभारत" या चटपटीत लेखात सांगितली आहे. ती खरोखर मनोरंजक आहे. पडद्यामागच्या विविध मजेशीर घटना त्यात नमूद केल्या आहेत त्याही आश्चर्यजनक म्हणून नोंद घ्यायला हवी.

--------------------

श्री. बाबू मोशाय,

"एक बंजारा गाता जाये":
हा गीतकार आनंद बक्षी ह्यांच्या हिंदी चित्रपट स्रुष्टीतील अविस्मरणीय योगदानाची चपखल दखल घेणारा, हा लेख खरोखर वाचनीय आहे.

एखाद्या कलावंताचे जीवन इतक्या जवळून उभे करणे खरोखर कठीण असते. त्यातून त्याच्या भावविश्वाचा, वैशिष्ट्यपूर्ण कारकीर्दीचा संपूर्ण लेखाजोखा मांडणे, हे खरोखर एखाद्या चिकित्सक अभ्यासकाचे काम असते.
आनंद बक्षी यांच्या 'एकसे बढकर एक' अशा सुमधुर अर्थपूर्ण गीतांचा जो पट व त्यांच्या निर्मिती मागची कहाणी येथे मांडली आहे, तो खरोखर एक ऐतिहासिक ठेवा मानला जावा.

अशा तर्‍हेचे इतके सखोल व्यक्तीचित्रण फारच दुर्मिळ झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर लेखकाच्या रसिक दृष्टीचा आणि गोष्टींच्या तळाशी जायच्या वृत्तीचा परिचय या लेखातून घडतो. पन्नास साठच्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळाची जणु उजळणी असावी अशीच आनंद बक्षींची योग्यता होती असे म्हणणे, हीच त्यांना सुयोग्य आदरांजली असेल.
----------------------------
श्री. संजीव पाध्ये,

"सम्राट आणि नवरत्ने":
ह्या अंकातील "सम्राट आणि नवरत्ने" हा लेख खरोखर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि इतिहासाची साद्यंत व निरपेक्ष माहिती देणारा असा आहे.

आत्तापर्यंत आम्हाला फक्त तानसेन बिरबल आणि कदाचित तोरडमल एवढीच तीन नवरत्ने माहिती होती, परंतु लेखकाच्या प्रयत्नांमुळे आम्हाला इतरही रत्नांची देखील जाणीव झाली. त्या गुणग्राहक सम्राटाचे आणि त्या नवरत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
----------------------------
श्रीमती शुभदा साने

"लेखन, आनंदी गोपालचे":
बरोबर एक वर्षापूर्वी "आनंदी गोपाळ" हा अविस्मरणीय चित्रपट मी पाहिला होता. तो पाहून मी इतका भारावून गेलो होतो की, ते शब्दात वर्णन करणे कठीण आहे.

एखादा विशिष्ट ध्येयाने झपाटलेला, गोपाळराव जोशींसारखा अवलिया, आपल्या पत्नीने भरपूर शिकावे, म्हणून त्या अत्यंत प्रतिकूल काळात काय काय धडपड करतो आणि त्याला त्याची पत्नी कशी यशस्वी, पण अखेरीस दुर्दैवी ठरलेली साथ देते, ते त्या चित्रपटात फारच प्रभावीपणे मांडलेले होते. लगेच मी माझ्या ब्लॉगवर रसास्वाद घेणारा एक लेखही लिहिला होता.

आज ती सारी आठवण "लेखन आनंदी गोपाळचे" हा रसभरीत लेख वाचून झाली
आणि गंमत गंमत अशी की, "आनंदी गोपाळ" चित्रपट ज्या कादंबरीवर आधारित आहे, त्या कादंबरीचे लेखक श्री. ज. जोशी यांच्या मुलीचाच तो लेख असावा ही.

एखादा सिद्धहस्त लेखक विशिष्ट असा विषय घेऊन किती धडपड करीत, ते ध्येय पूर्तीला नेतो ते लेखात सहजपणे दाखविले आहे. अशी ऐतिहासिक महत्व असलेली कलाकृती जेव्हा आकार घेते, तेव्हा त्यामागे काय काय मनाचे व्यापार घडत जातात, ते या लेखामुळे उमजले. एक वेगळाच अद्भुत आनंद या लेखाच्या वाचनाने मिळाला.
---*-*-*--*----------*-

डॉ नंदू मुलमुले

"मेनकेची तपश्चर्या":
हा एक अनोखे, परंतु विषयासंबंधी चपखल शीर्षक असलेला लेख, हेलन ह्या ख्यातनाम अभिनेत्री-नर्तिकेबद्दल अदभूतरम्य व चित्तथरारक माहिती देतो. ती साद्यंत वाचणं, हाच एक रोमहर्षक अनुभव होता.

एखाद्या व्यक्तिला किती किती प्रसंगांना तोंड द्यावे लागते, कसकशी संकटे भोगावी लागतात, याची कल्पना या लेखावरून येते. तीन-साडेतीन वर्षांची एक अजाण अभागी मुलगी बर्मा सोडून दिसेल ती वाट आईबरोबर, पायदळी तुडवत भारतात येते आणि त्यानंतर तिचे नाट्यमय जीवन कसे आकारास येते, याची खरोखर अभ्यासपूर्ण अशी माहिती ह्या लेखाद्वारे दिली आहे.

आपण रुपेरी पडद्यावर हेलनला जेव्हा जेव्हा बघतो, तेव्हा तिच्या नयनरम्य अदाकारीने हक्क होतो. परंतु त्यामागे किती कथा आणि व्यथा होत्या, याची जाणीव या अत्यंत वाचनीय लेखाने दिली.
------------------------

श्री. दा कृ सोमण

"कालगणना व भारतीय पंचांग":
कालगणना आणि त्याची शास्त्रीय नोंद ही आपल्या पूर्वसुरींनी कसकशी घेतली आणि त्यातून पंचांग कसे निर्माण झाले, हे या लेखात मांडले आहे. खरोखर अभिमान वाटावा अशीच आपल्या पूर्वजांची ही कामगिरी आहे.

पंचांगाची ओळख सर्वसामान्य वाचकाला सुलभतेने समजेल अशा भाषेमध्ये हा लेख आहे. तो खरोखर अत्यंत उपयुक्त असाच आहे. पंचांगाचा इतिहास आणि त्यामध्ये होत गेलेली प्रगती अगदी योग्य तऱ्हेने मांडली आहे. माझ्यासारख्या अभ्यासकाला सुद्धा हा लेख खरोखर मार्गदर्शक वाटला.

ह्या लेखाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, केवळ पंचांगातील विविध अशा अंगांची आपण नुसती ओळख करून दिली नाही, तर आगामी
कालखंडात महत्त्वाच्या दिवसांचे सखोल संशोधन करून अचूक नोंद केली आहे आणि ती खरोखर अत्यंत सर्वांनाच उपयोगी पडणारी आहे.
------------------------
श्री. विजयराज बोधनकर

"पद्मश्री गोरक्षकर आणि मानव धर्म:
मुंबईतील राणीचा बाग आणि म्युझियम ही शालेय जीवनातील सहलीचे प्रमुख ठिकाणे. त्यातील म्युझियमची अवाढव्य इमारत आणि तिथे असलेल्या अनेकानेक प्रकारच्या, भूतकाळातील विविध वस्तूसंचायांचा तो ठेवारुपी खजिना बघायला जाणे, ही एक कायम आवडीची गोष्ट. जिज्ञासू व्रुत्ती व कुतूहल जागते ठेवणारा तो अनुभव असतो.

मात्र वय वाढल्यावर तिकडे पावलं वळतातच असे नाही. परंतु माननीय गोरक्षकरांविषयींच्या आपुलकीपोटी, लेखकाने मनापासून लिहीलेल्या ह्या लेखामुळे पुन्हा एकदा त्या आठवणी चाळवल्या गेल्या. म्युझियम आपल्यापुढे दिसते ते उभे करण्यासाठी, किती माणसे कसकशी धडपडीतात आणि काय काय गोष्टी कारणीभूत होतात त्याची कल्पना अनाहूतपणे विचारात येते.

अशा ह्या अती विशाल संचयपटांची व्यवस्था पाहणे, हे येरागबाळ्याचे काम नव्हे. परंतु ते कठीण काम, विलक्षण जिद्दीने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे अव्याहत करणाऱ्या संचालक सदाशिव गोरक्षकरांचा जीवनपट थोडक्यात येथे मांडला आहे. हा मनस्वी माणूस ध्येयाने प्रेरित होऊन आपले चिरंतन खजिना निगुतीने जपण्याचे, त्याची वाढ करण्याचे काम कसे समर्थपणे यशस्वी करतो त्याचे हे मनोज्ञ चित्रण आहे. त्यातून योगायोगाने लेखकाला जणू गोरक्षकरांच्या कुटुंबाचाच भाग होण्याचे भाग्य लाभले, यामुळे हे सारे कथन जिव्हाळ्याची एक अमृतधाराच बनले आहे.

तर अशी आहे श्री. दीपलक्ष्मी दिवाळी अंकाची विलोभनीय दीपमाळ.

संपादक श्री. हेमंत रायकर ह्यांचे व अंकातील इतर सर्व साहित्यिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

जाता जाता एक आठवण जागी झाली मी जेव्हा बहुधा शाळेत होतो आणि माझे काही तरी छापून यावे असे मला वाटायचे. अशा वेळेला मी श्री. दीपलक्ष्मी मधील कुठल्याशा स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्या वेळेला माझे नांव त्या अंकात छापून आले होते. म्हणजे माझा पहिला साहित्य प्रवेश या श्री दीपलक्ष्मी अंकातून झाला होता, ह्याचा मला अभिमान वाटतो. या शुभारंभ यामुळेच कदाचित, मग माझ्या हातून हजारो शब्दांचे साहित्य पुढे प्रकाशित होत गेले असावे!

धन्यवाद. व नववर्षाच्या शुभेच्छा.
सुधाकर नातू
५/१/'१९