सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४
"नशीबवान माणसे व शुभग्रहयोग !":
"नशीबवान माणसे व शुभग्रहयोग !":
माणसाचे मन हे त्याच्या जीवनाचे सारथी असते. कारण त्याच्या प्रभावावर विचार कृती आणि अपेक्षा यांच्या घोडदौडी मधून तो आपल्या जीवनामधील आनंद सुख आणि समाधानाचा शोध घेेत आयुष्याची मार्गक्रमणा करत असतो. चंद्राचा आणि त्याच्या भ्रमणाचा माणसाच्या मनावर किती प्रभाव असतो, हे आपल्याला माहित आहे. साहजिकच भारतीय ज्योतिष, चंद्राच्या विविध अवस्थांवर अभ्यासपूर्ण असे आडाखे मांडण्याचा प्रयत्न करत असते.
ह्या पार्श्वभूमीवर नशीबवान माणसांच्या जन्मपत्रिकेमधील जन्मलग्न, लग्न स्वामी त्याचप्रमाणे जन्म चंद्रराशी आणि चंद्रराशी स्वामी यांचे महत्त्व अनन्य असेच आहे. ज्या पत्रिकांमध्ये लग्नस्वामी स्वगृही अथवा उच्चीचा, तसेच चंंद्रराशीस्वामी अथवा उच्चीचा असेल, तर अशा माणसांचे आयुष्य सर्वसाधारणपणे विशेष अडचणी न येता, विविध जीवनावस्थांमध्ये अपेक्षापूर्ती करत सर्वसाधारण समाधानाने जाते, असे आमचे निरीक्षण आहे
याच मुद्द्याचा उहापोह विविध उदाहरणांवरून या लेखांमध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी काही पत्रिका आणि त्याचे विश्लेषण येथे मांडत आहोत.
1 "यशस्वी समाधानकारक आयुष्य !":
या पत्रिकेतील पुरुषाचे सर्वसाधारण आयुष्य मनाजोगत्या गोष्टी घडत, व्यावसायिक सांसारीक उत्तम फळे मिळत चांगले सहस्त्रचंद्रदर्शन बघेपर्यंत गेले आणि मृत्यूही विशेष कुठलाही त्रास न होता झोपेतच झाला.
या माणसाच्या पत्रिकेमध्ये कन्या लग्न असून तेथेच उच्चीचा बुध आहे आणि लाभांमध्ये कर्क रास असून, राशी स्वामी चंद्र देखील स्वगृही आहे अशा या सुयोगांमुळे त्याचे आयुष्य योग्य तऱ्हेने गेले. मनाजोगती पत्नी मिळून, कर्तबगार मुला नातवंडांचा 57 वर्षांंचा बहरलेला संसार पाहायला मिळाला.
2 "हुशार तडफदार डॉक्टर !":
हा पन्नाशीतला डॉक्टर असून त्याची पत्नीही डॉक्टर आहे. त्याची आई उच्च अधिकारी होती व वडीलही स्वतंत्र व्यावसायिक असे लाभले. दीर्घायुष्यीआई-वडिलांबरोबर त्याचे व्यावसायिक जीवनही यशस्वीपणे पार पाडले जात आहे. मुलेही योग्य शिक्षणात पारंगत आहेत आणि आतापर्यंतचे त्याचे सर्व आयुष्य सुखा समाधानात आणि अपेक्षापूर्तीमध्ये गेलेले आहे.
या पत्रिकेमध्ये वृषभ लग्न असून स्वगृहीचा शुक्र आहे तर चतुर्थातील सिंह राशीचा स्वामी रवी उच्चीचा पत्रिकेमध्ये आहे. त्यामुळे त्याचे जीवन हात लावीन तिथे सोने अशा पद्धतीने जात राहिले आहे.
3 "होतकरू गुणवान तरुण !":
तिशी मधल्या या स्मार्ट तरुणाचे आई-वडील परदेशात स्थायिक झाल्या नंतर त्याचा जन्म झाला आणि उत्तरोत्तर त्यांची भरभराट होत गेली. दोघेही आपापल्या क्षेत्रात उच्च अधिकारावर तर याचेही पदवीपर्यंत शिक्षण, त्याचप्रमाणे कलाक्षेत्रात यशस्वी पदार्पण करत चांगल्या नोकरीमध्ये हा तरुण प्रगती करत आहे. आतापर्यंत त्याचे आयुष्य सरळ मार्गी आणि सुखवस्तू अवस्थेमध्ये गेले आहे. यापुढेही ते तसेच जाईन असे म्हणता येईल अशी याची पत्रिका आहे.
या पत्रिकेत देखील वृषभ लग्न असून तेथेच शुक्र आहे, तर पराक्रमातला चंद्र स्वगृही आहे. जोडीला उच्चीचा रवी मेष राशीत आणि स्वगृहीचा गुरु तूळ राशीत आणि राजयोगकारक शनी हा दशमात कुंभेत स्वगृही अशी याची सर्वांग प्रबळ पत्रिका आहे. उत्तरोत्तर त्याची अशीच प्रगती व भरभराट होत जाईल असे आपण या सगळ्या शुभ्र योगामुळे म्हणू शकतो.
4 "दीर्घायुषी उच्चशिक्षित नटश्रेष्ठ !":
मराठी रंगभूमीवर आपल्या नैसर्गिक अभिनयाने पन्नासाहून अधिक वर्षे गाजवणाऱ्या ह्या नट श्रेष्ठाचे हे उदाहरण आहे. या कलावंंताने आपले सारे आयुष्य रंगभूमीची सेवा करण्यात यशस्वीपणे घालवले आणि अनेक भूूषणावह कर्त्रुत्वांचे 'मैलाचे दगड'त्याने पार केले.
कृतार्थ आणि समर्थ जीवन लाभलेल्या या देखण्या माणसाची पत्रिका देखील आपल्या निरीक्षणाला पोषक अशीच आहे.
धनु लग्न असून स्वगृहीचा मीनेचा गुरु, तर अष्टमातील कर्केचा स्वगृहीचा चंद्र असल्याने स्वतःच्या विचारांशी ठाम आणि योग्य ते निर्णय योग्य वेळी घेण्याची कुवत असलेले त्याचे यशस्वी जीवन आहे.
5 "हौशी चतुरास्त्र गुणांची दीर्घायुषी स्त्री !":
अखेरचे उदाहरण देखील अभ्यास करण्याजोगे आहे. वरवर पाहिले तर राशी स्वामी चंद्र जरी स्वगृही पराक्रमात कर्केचा असला तरी, व्रुुषभलग्न स्वामी कोणत्या ताकदीचा आहे हे ताबडतोब कळतच नाही. परंतु सखोल अभ्यास केला तर ध्यानात येते की, लग्नेश शुक्र मेष राशीचा, तर मेष राशीचा स्वामी मंगळ मिथुनेत, तर मिथून राशीचा स्वामी बुध लग्नात. अशा तऱ्हेने स्थान बदलांचा मंगळ, शुक्र आणि बुध यांचा साखळी योग झाल्यामुळे ते जणू स्वगृही असल्यासारखी फळे देतात.
या स्त्रीचे आयुष्य देखील सरळ मार्गी आणि योग्य वेळी विवाह होऊन अनुरूप 36 गुण जमणाऱ्या कर्तबगार पुरुषाबरोबर जवळजवळ हीरक महोत्सवी सहजीवनाचा लाभ झालेले होते. शिवाय मुले नातवंडे यांचा कर्तबगार परिवार तिला लाभला.
वृद्धापकाळी पती निधनानंतर फक्त काही वर्षेच तिला काढावी लागली, हेच काय ते तिच्या आयुष्याला लागलेले गालबोट.
थोडक्यात लग्नस्थान म्हणजे पत्रिकेमधील सर्वात महत्त्वाचे आणि त्याचा राशी स्वामी स्वगृही असणे म्हणजे सुयोगच कारण त्यावरूनच त्या माणसाचे व्यक्तिमत्व शरीरावर योग्य आपल्याला उमजू शकते तीच गोष्ट चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीची आणि त्याच्या स्वामीवरून त्याच्या मनाची स्थिती आणि एकंदर आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला कळू शकते. साहजिकच लग्नस्वामी आणि राशी स्वामी स्वगृही अथवा उच्चीचे असले तर 'सोने पे सुहागा' आणि अशा माणसांचे जीवन समाधानी आणि कृतार्थ होणार असेच आपण म्हणायचे.
धन्यवाद
सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा