👍"दिवाळी अंकांची मांदियाळी -१":👌
दिवाळी म्हटली की फराळ जसा आठवतो, त्याचप्रमाणे मराठी माणसाला दिवाळी अंक हा एक ऋणानुबंधाचा भाग वाटतो. दरवर्षी कोरे करकरीत दिवाळी अंक वाचण्याची गंमत काही वेगळीच असते. गेल्या एक-दोन वर्षात ग्रंथाली आणि मॅजेस्टिक यांचे खास दिवाळी संच घेण्याचे आम्ही सुरू केले आणि त्याचा वर्षभर खूप फायदा झाला.
निवांतपणे एक एक दिवाळी अंक वाचत जाणे, ही एक मोठी आनंददायी गोष्ट असते. यावर्षीचेही दिवाळी अंक सगळे त्याप्रमाणे आलेले आहेत आणि एका मागोमाग एक असे दिवाळी अंक वाचनाला मी सुरुवात केली आहे. कुठलाही दिवाळी अंक म्हटला, की प्रथम मी संपादकीय नजरे खालून घालतो.
पुष्कळशी संपादकीय तितकीशी दखल घेण्याजोगी असतातच असं नाही. पण आज पहिलाच दिवाळी अंक "पद्मगंधा" घेतला आणि मला त्यातील संपादकीय खूपच उद्बोधक रोचक आणि प्रेरणादायी वाटले, म्हणून ही दखल.
सर्वसाधारणपणे संपादकीय त्या अंकामध्ये कोणत्या साहित्याचा ऐवज आहे याची यथासांग ओळख करून दिली जाते. खरं म्हणजे, मला नवल वाटलं की पद्मगंधा हा दिवाळी अंक निघाला याची. कारण संपादकीयातच म्हटल्याप्रमाणे मागच्या वर्षी त्याचे संस्थापक, संपादक अरुण जाखडे यांचे दुर्दैवाने आकस्मित निधन झाले. तरी देखील त्यांच्या साहित्य प्रेमाचा वारसा पुढे त्यांचे सुपुत्र श्री अभिषेक चालवत आहेत, ही एक खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.
संपादकीयातील सुरुवातीचेच वाक्य म्हणून आपल्या मनात रुजून जाते. अरुण जाखड्यांचे शब्द आहेत: "एखाद्याला कायम आपल्या सोबत ठेवायचे असेल, तर त्याचे कार्य पुढे घेऊन चला !" किती प्रेरणादायी वाक्य आहे हे ! साहजिकच संपादकीय पुढे आपोआपच वाचले गेले. 'वारसा आणि सलगता' हा विषय घेऊन यावेळचा पद्मगंधा दिवाळी अंक १७ वेगवेगळ्या विचारवंतांनी सजवलेला आहे हे त्यामध्ये नमूद केले गेले होते. तसेच इतर कथा कविता यांची योग्य ती ओळख संपादकीयमध्ये देण्यात आली होती आणि त्यामुळेच मला वाटले की हा अंक आपण प्रथम वाचलाच पाहिजे.
त्याप्रमाणे मी आता सुरुवात करणार आहे. त्यासाठी जशी सुरुवात अरुण जाखडेंच्या चटका लावणाऱ्या निधनाच्या बातमीने संपादकीय सुरुवात झाली, त्याचप्रमाणे पद्मगंधाचे लेखक कुमार नवाथे यांना "सी ऑफ कॉपीज" याच्या अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार झाला मिळाला ही आनंददायी घटना आहे परंतु ती ऐकायला आणि अनुभवायला कुमार नवाथे हे आपल्यात नाहीत ही दुःखद बाब आहे. हा मजकूर खरोखर चटका लावून देणार होता.
या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रख्यात कथाकार आणि आपल्या विशिष्ट अशा प्रकारच्या शैलीने एकमेवाद्वितीय असे ठरलेले, जीए कुलकर्णी या कथाकाराची आणि नुकतीच जन्मशताब्दी संपली त्या कवी शंकर रामाणी यांच्या कार्यकर्तृत्वाची साहित्यिक योगदान किती त्यांनी दिले याची दखल घेणारा वाचनीय मजकूर या अंकात आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नर्मदा प्रदक्षिणा नर्मदा आंदोलन फेम समाजसेविका श्री मेधा पाटकर यांच्या काव्यरचना.
जाता जाता, सगळ्यात महत्त्वाची आणि दखल घेण्याजोगी ह्रद्य बाब म्हणजे अंकाच्या सुरुवातीलाच श्री अभिषेक जाखडे यांनी, त्यांच्या वडिलांना-अरुण जाखडे यांना वाहिलेली शब्दरूप आदरांजली ! तिची सुरुवातच सगळ्यांनी मनामनात रुजवण्याजोगी आहे:
👍" प्रत्येक व्यक्तीने एक कला तरी जोपासावी आपली प्रतिभा त्यात आपापल्या परीने विकसित करण्यासाठी सतत कार्यरत राहावे आपले मन समृद्ध करण्यासाठी टवटवीत ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात उत्साह निर्माण करण्यासाठी याचा सर्वाधिक उपयोग होतो त्यातून करिअरच घडले पाहिजे असे नाही पण सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे.":👌
-अरूण जाखडे
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा