👍"दैनंदिनीतील पाऊलखुणा-१0 !":😊
दैनंदिनी लिहीणे, हा एक मोठा चांगला अनुभव असतो कारण त्यामधून आपल्याला स्वतःशीच स्वतःला संवाद साधता येतो. याचं कारण म्हणजे आपण त्या वेळेला एकांतात असतो आणि आपल्या समोरची रोजनिशी, आपण आणि आपले मन, मनातला आरसा त्यातून जाणीवांच्या दृष्टीने आपण सभोवतालचा घडलेल्या घटनांचा आणि आपल्या स्वतःच्या विचारांचा आढावा घेत असतो, त्याची नोंद करत असतो. साहजिकच अशा दैनंदिनी लिहिण्याच्या सवयीचा खूप फायदा होतो.
पुढे, मागे वळून पाहताना आपण काय केले कुठे बरोबर होतो, कुठे चुकलो, काय नवीन शिकलो हे देखील बघता येते. अशी सवय नेहमी पाळता येणं फार कठीण असतं. माझ्या वाचनाप्रमाणे किंवा ऐकल्याप्रमाणे मला आठवतंय की श्री सुधीर गाडगीळ सातत्याने अशा तऱ्हेची दैनंदिनी वर्षानुवर्ष लिहीत आले आहेत. परंतु माझे मात्र तसे काही झालेले नाही. मी फक्त कधी मधी कुठल्या ना कुठल्या वर्षी हे व्रत पाडू शकलोय. आता माझ्या २०१० सालातील रोजनिशीतील नोंदी, मी दैनंदिनी तेल पाऊलखुणा असं नाव देऊन त्यावर माझी ही लेखमालिका देखील ब्लॉगवर लिहीत आहे.
# आपल्या इच्छेप्रमाणे नेहमी सगळं घडतच असं नाही आणि तसं समजणं मोठं चुकीचं असतं, असा अनुभव अजून मधून येतो. याबाबतीत अपेक्षाभंगामुळे आपले नुकसान होते. प्रकृतीत विपरीत परिणाम होतो आणि ते महागात पडू शकते. दोन्ही बाबतीत शेवटी आपल्यालाच त्रास होतो. यावर उपाय शोधून सापडत नाही आणि 'कालाय तस्मै मः' ! व्यक्ति त्याच्या प्रकृती ( की विकृती) असे म्हणून गप्प बसणे आपल्या हातात असते.
# कोण कसा केव्हा वागेल सांगता येत नाही. त्यामुळे कठीण वाटणाऱ्या गोष्टींचा त्रास होतो. अर्थात त्यांचाही केव्हातरी अंत होतो आणि सर्वसाधारण सुसह्य असे वातावरण परिस्थिती केव्हातरी निर्माण होतेच होते. तिचा इंतजार करण्यासाठी धीर धरायला हवा, असेच अनुभवांती समजते.
# अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा, विचार करून त्या ठेवा. त्या न पूर्ण झाल्यास समजूतदारपणा हवा. कधी कधी आपल्या मनाप्रमाणे होत नाही. सगळेच आपल्याच मनाप्रमाणे होईल असा हट्ट कधीही नको. आपल्या उपेक्षेचे कारण आपल्या अपेक्षा असतात, म्हणून नेहमी योग्य अपेक्षा ठेवायला शिकायला हवं.
# नियमित आहार एकपट खाणे, दुप्पट पाणी पिणे तिप्पट चालणे आणि चौपट हसून आनंदी राहणे. शक्यतो शाकाहारी असणे, निर्व्यसनी असणे. दुसऱ्याचे भले करता नाही आले, तरी निदान दुसऱ्यांचे वाईट न चिंतणे, यामुळे मानसिक समाधान मिळते.
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा