सोमवार, ३१ मे, २०२१

"आजोबांचा बटवा-१" "मन मनास उमगत नाही !":

 "आजोबांचा बटवा-१" "मन मनास उमगत नाही !":


मी हल्ली save केलेले फोन आले तरच घेतो, नाहीतर अनोळखी नंबर असलेला फोन सहसा घेत नाही, तो लगेच डिस्कनेक्ट करतो. त्याला प्रमुख कारण म्हणजे हल्ली पुष्कळदा तुमची झोपमोड करायला अथवा तुमच्या कामात व्यत्यय आणायला मार्केटिंगवाले काही ना काही तरी स्क्रीम्स घेऊन फोन करायचा उद्योग करत असतात. आपल्याला त्यांच्या विविध योजना बद्दल कुठलेही देणेघेणे नसते, त्यामुळे "आय एम नॉट इंटरेस्टेड" हे उत्तर देऊन देऊन मी अक्षरशः थकलो. त्यामुळे तेव्हापासून अनोळखी क्रमांक आला तर तो घ्यायचा नाही असा माझा रिवाज आहे. त्यामुळे फक्त माझ्या संग्रही असणारे फोनच मला जर आले, (अर्थात ते सहसा कधी येतही नाहीत, हे वेगळे) तरच मी ते घेतो.

या पार्श्वभूमीवर मी एका घरगुती कार्यक्रमाला जात असताना प्रवासात वाटेतच एका अनोळखी क्रमांकावरून कोणीतरी "मी ### बोलत आहे" त्याला मी सौजन्याने उत्तर दिले की, "मी प्रवासात आहे नंतर फोन करा" प्रतिसाद आला "नंतर म्हणजे कधी"? मी सांगून बसलो "दुपारनंतर पाचच्या आसपास करा" मग नंतर घरगुती कार्यक्रमात मी हा मामला विसरुनच गेलो.

संध्याकाळी परत आल्यावर काही काम करत असताना पुन्हा एक फोन आला, तो बहुदा त्याच व्यक्तीचा होता. "मी अमुक अमुक बोलतोय" त्याला माझे उत्तर "कुठून बोलताय, कशाकरता बोलायचंय?" ह्या प्रश्नावर त्यांनी "आधी माझे ऐकून घ्या" मी देखील मग उद्विग्नपणे म्हटले "तुम्ही अनोळखी आहात, कुठून बोलता कशा करता बोलायचय? ते प्रथम सांगा, नाहीतर बोलण्यात अर्थ नाही." याप्रमाणे मी जसे तोडून टाकणारे बोललो, तसेच या गृहस्थाने देखील माझ्या साध्या प्रश्नांना उत्तरे न देताच फोन कट केला !

आता यामध्ये प्रत्येकाने एक प्रकारे अतिरेकी अशाच स्वभावाचं दर्शन घडवलं. मी म्हणतो तेच खरं, अशा पद्धतीने वागणं दोन्हीकडून झालं. यात नक्कीच आश्चर्य वाटू नये किंवा यात तथ्य आहे, फक्त माझे प्रश्न चुकीचे नव्हते, या गृहस्थाने आपण कोण कुठून आणि कशा करता बोलयचं आहे, हे आधी प्रास्ताविकात सांगुन मगच बोलायला हवे होते. पण त्याने तसे केले नाही, कां? ते त्याचे त्यालाच ठाऊक ! त्याचेच नुकसान त्यामुळे झाले.
त्यामुळे मला नंतर रुखरुख वाटली की आपण तुसडेपणाने बोललो हे तसं योग्य की अयोग्य असं काही काळ वाटत गेलं. म्हणूनच म्हणतो "मन मनास उमगत नाही !".

असाच एक अनुभव काही महिन्यांपूर्वी आला मला होता. माझा एक लेख एका लोकप्रिय साप्ताहिकात पाठवला होता. तो स्वीकारल्याचे आणि यथावकाश प्रसिद्ध करू. अशा तऱ्हेचा फोनवर संदेश मला आला होता. त्यामुळे माझा लेख कधी एकदा प्रसिद्ध होतो हे मला वाटत होते. शेवटी न राहवून मी त्या संपादक मंडळीना फोन केला. त्यापैकी हा जो सदराचा भाग होता तो बघणाऱ्या व्यक्तीने मला सांगितले की "तुमचा लेख कधी प्रसिद्ध होईल हे निश्चित आम्हाला सांगता येणार नाही." त्यावर मी म्हटले की "जेव्हा तो लेख प्रसिद्ध होईल, तेव्हा तुम्ही तो अंक पाठवा, म्हणजे मला कळेल." त्यावर त्या व्यक्तीने उत्तर दिले "Sorry, तशी आमच्याकडे पद्धत नाही. आम्ही लेखकांना प्रत पाठवत नाही. तुम्ही मार्केटमधून विकत घ्या आणि केव्हा प्रसिद्ध होतो ते पहा !" हे उत्तर ऐकल्यावर, मग मी देखील राग येऊन बोललो की "अशी तुमची लेखकांना हाताळण्याची पद्धत असेल, तर मला ती चुकीची वाटते." पुढे तिरीमिरीत मी बोलून गेलो "माझा लेख नाही तुम्ही प्रसिद्ध केलात तरी चालेल."

म्हणजे हा अनुभव देखील योग्य ते न बोलण्याचा होता. संपादकीय विभागातील त्या व्यक्तीने देखील जरा सौजन्याने बोलायला हवे होते. 'तुम्हाला वाटलं तर तुम्ही अंक घेत बसा व दरवेळेला ते शोधत बसा आपला लेख आला आहे की नाही', अशी ही पद्धत दिसत होती. त्यामुळे त्यांचे जसे चुकले, तसेच मी त्या उत्तरावर गप्प बसायला हवे होते आणि यथावकाश जसे मला जमेल तसे त्या साप्ताहिकाचे अंक मिळवण्याचा प्रयत्न करून माझा लेख आला आहे कां हे पाहायला हवे होते. माझ्याही बोलण्यातील बेपर्वाईमुळे, मला एक मोठी संधी मिळू शकली असती ती मी माझ्या बोलण्याने अशी घालवून बसलो. याबाबतीत साप्ताहिकाचे काहीही नुकसान झाले नाही, माझे मात्र झाले. थोडक्यात For short term gains, we overlook and lose long term benefits, असे झाले. दुसरे काय? थोडक्यात आपले मन कधी केव्हा थाऱ्यावर नसेल याचा थांगपत्ता लागत नाही. अचानक आपण योग्य तो प्रतिसाद देण्याऐवजी अचानक काही ना काही नको असा दूरूत्तराचा मारा करतो.

अजूनही अगदी लहानपणचा एक प्रसंग मला यासंदर्भात आठवतो आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी स्नेहसंमेलन व्हायचे आणि त्या संमेलनात विविध अशा विभागात जनरल नॉलेज किंवा सामान्यज्ञानाची एक स्पर्धा घेतली जायची. अशात एका स्पर्धेत लहान मुलांच्या गटाला अतिशय कठीण असे प्रसिद्ध प्रश्न विचारले होते.

माझ्या शेजारचा छोटा बाळू त्या गटात होता. अशा वेळेला त्या स्पर्धेचे संचालक होते, ज्यांनी प्रश्न काढले होते, ते गृहस्थ शेजारी आले होते.
फार कठीण प्रश्न विचारले होते त्यामुळे इतर मुलांप्रमाणेच बाळूलाही त्यांची उत्तरे देता आली नाहीत. तो मनातून उद्विग्न झाला होता. सर्वसाधारणपणे त्याला सामान्यज्ञान स्पर्धेत नेहमी पहिले बक्षीस मिळायचे. त्यामुळे ते ग्रहस्थ उंबरठ्यामध्ये उभे असतानाच तो बेदरकारपणे त्यांना बोलला "तुम्हाला काही अक्कल नाही, यूसलेस, किती कठीण प्रश्न तुम्ही आजच्या स्पर्धेत काढलेत, बरोबर नाही केलंत." हे बोलणं ऐकून ते ग्रहस्थ चकीत झाले. मात्र गृहस्थांची थोरवी अशी की या दुखवणाऱ्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि शांतपणे आंत जाऊन गप्पा मारू लागले.

आज त्या प्रसंगाची आठवण झाली की खरंच हसावं की रडावं ते कळत नाही अचानक असं काय झालं की बाळूने असा अतिरेकी अविचारीपणा केला. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली, तर माणूस चिडतो, संतापतो. या भरात तो काहीही कसा वागून जातो, त्याचं हे उदाहरण. कुणाचं मन कधी कसं वागेल हे कळत नाही, तुम्ही लहान असा अथवा मोठे असा ! ह्याचसाठी म्हणायचे "मन मनास उमगत नाही."

आणि शेवटचा अनुभव जर कधी आठवला तरी कुणालाही लाज वाटण्यासारखं होईल. आपण एखाद्या नियमाला किती चिकटून राहायचं याला काही मर्यादा असते. ते ग्रुहस्थ ज्योतिष सल्ला देत असत. ते ग्रुहस्थ एककल्ली व त्यांचा स्वभाव विक्षिप्त होता. शक्यतोवर भेट घेण्यापूर्वी वेळ मुक्रर आधी करावी आणि नंतरच पुढचे काम ते करत.

एकदा एक वयोव्रुद्ध गृहस्थ, असेच दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे आले, त्यांनी ह्या ज्योतिषाचार्यांच्या घराची जबेल दाबली. दरवाजा उघडला गेला. नंतरचा संवाद असा:

"कोण आपण, कशाला ह्या अवेळी आलात?
ही वेळ माझ्या वामकुक्षीची असते."

"मी माझी मुलाची पत्रिका दाखवायला आलो आहे"

"आपण माझी अपॉइंटमेंट घेतली आहे कां? तर नाही, असा अगांतूक कुणालाही मी भेटत नाही."

तो थकलेला ग्रहस्थ बिचारा अजिजीने विनंती करु लागला,
"अहो मला अत्यंत गरज आहे हो, खूप प्रयत्न करूनही माझ्या मुलीचे लग्न जमत नाहीये. त्यामुळे मला तुम्हाला तिची पत्रिका दाखवायची आहे. मी फक्त पाहिजे तर आता जन्मतारीख वगैरे माहिती देतो. नंतर तुमची अपॉईंमेंट घेतो."

त्यावर उत्तर "त्याप्रमाणे तुम्ही पत्र पाठवा. मी काही आत्ता ते डिटेल्स लिहून घेणार नाही. कारण मी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय कुठलंच काम करत नाही."

" मग निदान भेटीची वेळ ठरविण्यासाठी तरी तुमचा फोन नंबर आत्ता द्या."

ह्यावर त्या ज्योतिषाचार्यांचे उत्तर तर संतापजनक होते:
"Sorry, पत्र पाठवा, त्यात तुमचा फोन नंबर द्या. मी whatsapp ने माझा फोन नंबर कळवेन."


त्या दिवशीच्या रणरणत्या दुपारी, बिचार्‍याला हात हलवित परत जायला लागलं. आधीच तो वयस्क माणूस पत्ता शोधत शोधत खूप लांबवरून देखील आला होता. पण ह्या विक्षिप्त (की माजखोर? ) ज्योतिषमार्तंडांनी साधे सौजन्यही त्याला दाखवले नाही. उलट हा अनुभव मला नंतर आमच्या भेटीत, त्यांनी 'आपण तत्व कशी काटेकोरपणे पाळतो' अशी फुशारकी मारत आवर्जून सविस्तर सांगितला !
आहे की नाही कमाल !

अचानक मन असे तिरपकड्या सारखे, सारासार विचार न करता,कां वागते ते नंतर आपल्याला कळत नाही. माझ्या ह्या ज्योतिषाचार्य मित्राची निश्चितच फार मोठी चूक झाली होती यात शंकाच नाही. "मन मनास उमगत नाही" हा मुद्दा मला जो सांगायचा आहे तो याचकरता की, कोणत्या क्षणी कोणत्या प्रसंगात आपण कसे वागू हे आपलेच आपल्याला कळतच नाही.

तुम्हाला देखील कदाचित असेच अनुभव येत असतील, वा येऊ शकतील. तेव्हा सावध रहा. शक्यतोवर इतरांच्या भावनांची कदर करा. त्यांना लागेल असे शक्यतोवर काही बोलू नका, तारतम्याने वागून नेहमी सौजन्य ठेवा. अर्थातच "जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवणे गरजेचे आहे" हे प्रसिद्ध वाक्य पुन्हा पुन्हा आठवत राहा.

धन्यवाद
सुधाकर नातू

असेच अनेक विचारप्रवर्तक लेख वाचण्यासाठी 
माझ्या ब्लॉगची ही लिंक उघडा.....

http//moonsungrandson.blogspot.com

लेख आवडले तर लिंक शेअरही करा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा