शनिवार, ८ मे, २०२१

"नशिबाचा हा खेळच न्यारा !":


"नशिबाचा हा खेळच न्यारा !":
प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. कुणाला व्यावहारिक जीवनात यश मिळते, तर कोणाला सांसारिक आयुष्यात. कोणाच्या वाट्याला कसे फासे पडतील नशिबाचे, हे काही केल्या सांगता येत नाही.

प्रत्येकाच्या जीवनाचा अर्थ, प्रयोजन आणि अखेर पदरी पडलेले फळ व म्रुत्युनंतर काय होते, ह्याचा कितीही शो़ध घेतला तरी ते गुढ, आजतागायत ना कुणाला उलगडले वा कधी ते कुणाला उमजेल !

"सुखदुःख्खांचा लपंडाव":
हा गृहस्थ हुशार, चतुर व्यावहारिक जीवनात स्वतःच्या हिमतीवर आणि करामतीवर अत्युच्च पदावर पोहोचला. मानमरातब पैसाअडका सगळ्या प्रकारचं सौख्य त्याला लाभलं. ही झाली व्यावहारिक जीवनाची बाजू. पण संसारिक बाबतीत काय झालं तर, आई वडिलांच्या मनाविरुद्ध अशा तरुणीशी लग्न केल्यामुळे आई वडिलांशी त्यांच कधीही पटलं नाही. वडीलां मागोमाग सासू आणि सुनेचे कायमचे भांडणे-तंटे होत राहिले. त्यामुळे मुलांवर देखील परिणाम झाला आणि ती कुढी आणि अबोल बनली. म्हातारी आई गेल्यानंतर तरी ह्या ग्रहस्थाच्या संसाराला चांगलं वळण लागेल असं म्हणावं, तर मोठ्या मुलीने प्रेमविवाहात नको त्या तरुणाशी पळून जाऊन विवाह केला खरा, पण ती त्यांत सपशेल फसली आणि हाल हाल सहन न झाल्याने, तिच्या घटस्फोटाची फरफट ह्या माणसाला करायला लागून ती परत आली. त्यानंतरच्या दोन मुलांचाही विवाह होणे कठीण बनून गेले. तिशी पस्तीशी उलटली तरी ही तीनही मुलं घरात आणि हा माणूस बिचारा सत्तरीला आलेला. खडतर नशीब ह्याच्या सांसारिक जीवनात, कधीही सुख समाधान शांती न लाभणे ह्याला काय म्हणायचे?

"दैव जाणिले कुणी?":
ही दोन बहिणींची कहाणी. दोन बहिणी आपापल्या मार्गाने विवाह करून संसारात मग्न होत्या. मोठी आणि छोटी, त्या दोघींची परिस्थिती तशी साधारण समानच होती. पण नंतर झालं काय, तर धाकट्या बहिणीच्या नवऱ्याने कुठेतरी एका बिल्डरकडे पैसे गुंतवले, जी काय पुंजी होती, गांवचं अमुक-तमुक सारं विकून चांगली मोठी प्रॉपर्टी किंवा फ्लॅट घेण्यासाठी पैसे गुंतवले. मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने मात्र हा कितीही मागे लागत असला तरी, हे टाळलं.

मग झालं काय, तर त्या बिल्डरने दगा दिला आणि त्या माणसाची होती नव्हती तेवढी पूंजी तर नष्ट झालीच आणि परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली. पुढे अशी वेळ आली की मोठ्या बहिणीचे नशीब उत्तरेकडे भरारी, तर हया धाकट्या बहिणीचे दक्षिणेकडे घसरगुंडी, अशी दोघांच्या नशिबाची फडफड झाली. त्यामुळे मोठ्या बहिणीचा संसार चांगला सुखसमृद्धीचा झाला, तर धाकट्या बहिणीच्या संसारात फरफट, मुलांना शिक्षणाची पण वानवा. हे असं कां व्हावं? दोन्ही बहिणी सख्या, फक्त वेगवेगळ्या वेळी जन्माला आलेल्या त्याच्या आई-वडिलांच्या पोटी, पण दोघांची आयुष्ये मात्र वेगळी, असं कां होतं, आहे उत्तर ?

"मनमनास उमगत नाही !":
आता ही दोन उदाहरणे बघा. हा माणूस अतिशय हुशार कर्तबगार आणि लोकांमध्ये मिळून मिसळून आनंदाने राहणारा, तसा जीवनात यशस्वी इतरांनाही कायम आनंदी ठेवणारा. परंतु पुढे काय झालं कुणास ठाऊक, त्याच्या आयुष्यात असं काय झालं की त्याने सार काही यश समृद्धी संसार चांगला असूनही त्याने कुणाच्याही ध्यानी मनी नसताना आत्महत्या केली ! खरंच, कुणास ठाऊक, काय काय एकेकाचं नशीब असतं, ते कधी कळत नाही, हेच खरे ! अक्षरशः विश्वास बसू नये अशीच कहाणी होती ह्या हरहुन्नरी माणसाची.

दुसरी कहाणी एका स्त्रीची. तिचा संसार तिला अनुरूप अशा माणसाचे साथीने सुरू झाला. दोन मुलगेही जन्माला आले, पण दोन्ही मुलगे वेगवेगळ्या प्रकारचे निघाले. धाकटा अतिशय हुशार आणि नोकरी-व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती करत जाणारा, तर मोठा परीक्षांमध्ये नापास, वाईट संगत आणि कायम काही ना काही तरी भानगडी करून आई-वडिलांना व्याप देणारा. पन्नाशी आली तरी त्याच्यात काही सुधारणा नाही. या वृद्ध आई-बाबांना मात्र कायम काहींना काही काळजी. जवळ होती नव्हती ती पुंजी या मुलाच्या भानगडी निस्तरण्यात गेली आणि अखेर धाकट्या मुलाकडे हात पसरायची वेळ आली. खरंच असं का व्हावं? याला उत्तर नाही.

प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं, एवढं म्हणून गप्प राहायचं, दुसरं काय ! खरंच जीवन म्हणजे एक गुढ कोडेच आहे. माणूस आपल्या करणीने आपलं भविष्य घडवत जातो, हे खरं आहे. परंतु फुकट जाणारी आयुष्य अशी काय होतात की ती माणसे, नको त्या गोष्टी, नको त्या वेळी करून आपले आयुष्य वाया घालवतात ?

"दुर्दैवाचे खडेच खडे !":
अखेरीस या बाईची कहाणी बघा. या बाईचा नवरा कधी घरात काही मदत करायचा नाही, कुठल्याही व्यवसायात नीट लक्ष घालायचा नाही. मध्येच संसारातून मुक्त होऊन कुठे तरी निघून जायचा, पुन्हा यायचा. असा ऊन पावसाचा खेळ करत त्या बाईचा संसार रुठू खुटू चालला होता. अखेर नवरा छोट्या आजाराने मरण पावला आणि त्याच्या मागे या बाईने आपल्या संसाराचा गाडा, मसाले लोणची पापड अशाच काही गोष्टी विकून पुढे नेला. दोन मुलींचे विवाह योग्य ठिकाणी करून दिले, पण नशीब बघा मोठा करता सावरता मुलगा देखील त्याच्या वडिलांसारखाच निघाला ! हरी हरी करत, मध्येच कुठे यात्रेला जायचा व अचानक परथ यायचा. आईला मदत राहिली दूरच, वापस आला की तिच्या डोक्यावर ह्याचा भार. त्यामुळे त्याच्यावर काही तिची भिस्त नव्हती. धाकटा मुलगा मात्र गुणी, आपल्या हुशारीने मॅट्रिक होऊन कुठेतरी नोकरीला लागला. आतातरी बाईला चांगले दिवस येतील, असं वाटतं न वाटतं तोच ह्या मुलाला काय अवदसा आठवली देवच जाणे. ऑफिस मधल्याच कुठल्यातरी मुलीशी त्याचं प्रेम जुळले आणि आईला न विचारता परस्पर विवाह करून देखील तो आला. त्याला अगदी विजोड अशी ती मुलगी होती आणि ह्या अभागी बाईची सारी स्वप्न धुळीला मिळाली होती. पण हाय, इथेच नशिबाची कहाणी संपत नाही. विवाह झाल्यावर कंपनी मध्ये संपन्न झाला त्याची आणि त्याच्या पत्नीची नोकरी गेली आणि घरामध्ये केवळ
भांडणं वाद विवाद अशीच होत राहिली. या सार्या फुटक्या नशिबाची अखेर, तो मुलगा कंपनीमधून घरी येत असताना अपघात झाला आणि त्यात मरण पावला. पसंत नसलेल्या विधवा झालेल्या सुनेबरोबर, या बाईला दिवस काढायची वेळ आली आणि अखेर शेवटी व्हायचं तेच झालं. ह्या म्हातारी झालेल्या बाईने देखील शेवटी आयुष्याला कंटाळून आत्महत्या केली ! आहे की नाही दर्दभरी करूण नशिबाची कहाणी?
हे असं का होतं आहे उत्तर?

सुधाकर नातू

ता.क.
असेच उत्तमोत्तम अंतर्मुख करणारे......
अनेक लेख वाचण्यासाठी..........
ही लिंक उघडा.......

https://moonsungrandson.blogspot.com

लेख आवडले.......
तर लिंक संग्रही ठेवा...... शेअरही करा.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा