सोमवार, २४ मे, २०२१

"वाचा, फुला आणि फुलवा-८: दीड दमडी, गद्धे पंचविशी आणि शब्दकोडे !":":


"वाचा, फुला आणि फुलवा-८":

वाचनासारखा आनंद नाही. त्यातून सध्याच्या कोरोनाच्या महामारीमध्ये lockdown मुळे एकांतवास सहन करायला लागत असताना तर वाचन हाच एक अत्यंत महत्त्वाचा विरंगुळा ठरला आहे. वाचनासाठी आपल्याला आता सध्या वर्तमानपत्रांवरच जास्त अवलंबून राहावे लागत आहे, कारण वाचनालयातून मासिके पुस्तके आणणे अशक्य झाले आहे. अशा वेळेला शनिवार रविवार चे वर्तमानपत्रांचे अंक व त्यामधील पुरवण्या, ही एक आवडीची बाब आपल्याला उपलब्ध असते. अशा लेखांमध्ये वर्तमानपत्रातील मला भावलेल्या काही लेखांचे अथवा विषयांचे- "दीड दमडी" "गद्धेपंचविशी" आणि शब्दकोडे ह्यांचे
परामर्श मी येथे घेतले आहेत.

ते तुम्हाला सद्य परिस्थितीतील विविधता दाखवत, मनोरंजक तर वाटतीलच, परंतु अंतर्मुख करून स्वतंत्र विचार करायला लावतील अशी आशा आहे.

1
"शब्दकोडे आणि आयुष्यांतील कोडी !":
वर्तमानपत्रातील कोडी, विशेषतः शब्दकोडे सोडवणं, हे एक बुद्धीला चांगलं खाद्य असते. आपले भाषाज्ञान किती चांगले वा कसे आहे, ते यावरून समजते. त्याचप्रमाणे आपल्या स्मरणशक्तीलाही हा एक व्यायाम असतो. त्यामुळे वर्तमानपत्रात येणारे शब्दकोडे मी दररोज सोडवायचा प्रयत्न करतो. पुष्कळ वेळा मात्र दिवस अखेरीपर्यंत कोडं सुटत नाही आणि मग मात्र मनाला जरा अस्वस्थता येते.

माझा अनुभव असा आहे की, झोपेमध्ये विशेषतः पहाटे जाग आली की, मला अशा न सुटलेल्या शब्दकोड्याची आठवण होते आणि मी बुद्धीला चालना देत, वेगवेगळे अडलेल्या शब्दांचे उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो. न सुटलेले सारे कोडे मला अशाच साखरझोपेच्या वेळी, पहाटे पहाटे पुष्कळदा सुटते आणि खूप आनंद होतो.

त्या दिवशीचं उदाहरण सांगता येईल, चार-पाच शब्द मला अडले होते. आडवे असलेले-तकलादू वा अशक्त, अल्पवयस्क,
नीतिमान, तर उभे शब्द कन्या, वरवर वाचणे, समीक्षक, सचोटी आणि व्यवसाय असे. काही केलं तरी एकमेकात अडकलेली ही शब्दांची साखळी, सुटतच नव्हती.

पण अचानक मला तकलादू वा अशक्त ह्यासाठी, लेचापेचा असा शब्द सुचला आणि पाहता पाहता प्रत्येक उभ्या शब्दांचे कन्या साठी लेक, तर वरवर वाचणे साठी चाळणे त्याच प्रमाणे नंतर सचोटी साठी नेकी आणि चौथा जो उभा शब्द होता तो व्यवसाय ह्याकरता, पेशा, समीक्षक
साठी परीक्षक अशी उत्तरे मिळून गेली. मला खूप आनंद झाला आणि समाधान वाटले. खरंच कोडे कधी कसे सुटेल काही सांगता येत नाही. ते सुटेपर्यंत आपला पिच्छा पुरवत असते. त्यातून कदाचित झोप झाल्यानंतर पहाटेच्या वेळी आपली बुद्धी व स्मरणशक्ती तल्लख होत असावी आणि न सुटलेली शब्द कोड्यांची ही जाळी, आपण योग्य तऱ्हेने मार्गी लावू शकतो, हे अनुभवावरून मला समजले.

ह्या साध्या अनुभवावरून, माझ्या लक्षात आले की, आपले आयुष्य हे देखील एक कोडे आहे, न सुटणारे आणि कायम आपल्या भोवती फिरत राहणारे ! परंतु शब्दकोडे, शब्दकोडे जसे असे अचानक अलगदपणे सुटून जाते, त्याचप्रमाणे आयुष्यातली कोडी, अर्थात आपल्या आयुष्यात येणाऱ्या चित्रविचित्र माणसांचे तसेच आगळेवेगळे अनुभव, त्यांचे स्वभाव, त्यांच्या बरोबरचे आपले परस्पर संबंध, जे अगदी कधी कसे येतील ह्याचा पत्ता नसणे, अशा तऱ्हेच्या आडव्या-उभ्या शब्दांच्या कोड्याप्रमाणे, अनेक साखळ्या आपल्या आयुष्यात सारख्या आपल्याभोवती फेर धरत असतात. आपला चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यूही कधी कधी होतो.

कोणतेही कोडे जर सोडवायचे असेल, तर आपल्याला थोडा विचार करावा लागतो, स्मरणशक्तीला ताण द्यावा लागतो. हे असेच आयुष्याच्या बाबतीत जर वापरायचे झाले, तर त्याला उत्तर म्हणजे, आपण ज्या ज्या माणसांच्या मग ते निकटचे वा दूरचे असो किंवा कुणाशीही आपला संबंध येतो ती माणसे, आपल्याला चांगली वाचता यायला पाहिजेत. कोण कोणत्या परिस्थितीत कसा वागेल याचा आडाखा आपल्याला बांधता आला, तर आपण आयुष्या पुढील कोड्यांचे चोख उत्तर मिळतेच, आपण आयुष्यही अधिक आनंदी व समाधानी करू शकतो. एक साधे शब्द कोडे सोडवणे, पण त्यावरून आयुष्याचे कोडे असे सुटले की, आहे की नाही गंमत !

####################
2
"दीड दमडी":
रविवारच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये आज एक वेगळेच स्फूट वाचले-'दीडदमडी' ह्या सदरामध्ये तंबी दुराई नेहमी उपरोधिक अशा पद्धतीचे लेखन करत, सांप्रतच्या एकंदर व्यवस्था व परिस्थितीवर प्रकाश टाकत असतात. या अशा छोट्याशा लेखांमधून म्हणून मटामधली पुरवणी हातात घेतली की, पहिल्यांदी मी हे 'दीड दमडी' वाचतो.

ह्यावेळी 'दीड दमडी'तील "देह वाहत राहिले" हे आगळेवेगळे स्फुट वाचायला मोठी उत्सुकता होती. त्यामध्ये अकाली कोरोनामुळे मृत्यू पावलेले दोन देह गंगेमधून वाहत चालले आहेत आणि एकमेकांच्या जवळ आल्यामुळे एकमेकांच्या सहवासात गप्पा मारत चालले आहेत असा प्रसंग ह्या दीड दमडी मध्ये वर्णिलेला आहे.

त्या दर्दभर्या संवादातून कोरोना सारख्या महामारी मध्ये ती हाताळताना आपल्या सगळ्यांचेच विशेषतः राजकारणी नेतृत्वाच्या धोरणांचे अक्षरशः पीतळ उघडे केले आहे. दुसऱ्या लाटेमधील अक्षम्य दुर्लक्ष व हलगर्जीपणा, त्याच प्रमाणे , सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती भयानक कमकुवत आणि तीचा बोजवारा उडालेला, त्यामध्ये सुधारणा करण्याऐवजी इतर नको त्या बाबींवर कसे प्राधान्य दिले गेले ते नकळत ऐरणीवर येते. लसीकरणा सारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या बाबतीतही धोरण पूर्णपणे कसे अदूरदर्शी व चुकीचे ठरले यावर प्रकाश टाकला आहे. ते वाचून मन विषण्ण होते.

कोरोनाची महामारी हाताळण्यात खरोखर सगळ्यांनी विशेषता राजकीय धुरीणांनी व धोरणकर्यांनी जी काही हलगर्जी व बेपर्वाई दाखवली त्यावर मनापासून विचार करून सुधारणा करायला हवी आहे, ही बाब या लेखातून पुढे आली.

सहाजिकच संपूर्ण कारभार यंत्रणेच्या व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर असलेल्या माणसांचे कर्तव्य आणि उत्तरदायित्व यासंबंधी गांभीर्याने विचार करायला हवा आणि विहीत कर्तव्य बजावण्यात अथवा उत्तरदायित्व पूर्ण करण्यात अपयश आले, तर त्या प्रमादा बद्दल काही ना काही तरी योग्य ही दंडात्मक शिक्षा असायला हवी हाही विचार या 'दीडदमडी'ने ने दिला.

ह्या विचारधारेला पुरक असा एक लेख माझ्या वाचनात आला:
"लस का लांबली?"

'दीड दमडी' या मटा मधील सदराचा असा परामर्श घेऊन झाल्यावर, अचानक बुधवार दिनांक २५ मे चा महाराष्ट्र टाईम्स वाचनात आला. आपल्या देशात "लस का लांबली?" हा मटा मधील प्राध्यापक सुधीर पानसे यांचा लेख, कोरोना महामारीला तोंड देताना, आपण कोणत्या अक्षम्य चुका केल्या, त्यामधील लसीकरणाचा विषय येथे विस्ताराने मांडला आहे.

सारे देश जेव्हा लाखो डॉलर्स गुंतवून करोनाच्या लशींची खूप आगाऊ मागणी नोंदवत होते, तेव्हा आपण नुसते बसून होतो. यामागे नुसती दिरंगाई नाही तर तज्ञ आणि वैज्ञानिकांबद्दल व त्यांच्या सल्ल्यांबद्दल जी अनास्थेची भावना सत्ताधाऱ्यांमध्ये होती, त्याचीच आपल्याला आता भयावह अशी किंमत मोजावी लागते आहे, अशा तऱ्हेचा घोषवारा, लेखकाने गेल्या वर्षातील इतिहासांतील घडामोडींचा पट मांडत आपण किती दुर्लक्ष दिरंगाई आणि हलगर्जीपणा तसेच दूरदृष्टीचा अभाव दाखवला, त्याचा हा लेख निदर्शक आहे.

शेवटी संकटांचा मुकाबला हा विद्वानांचा योग्य तो आदर त्यांच्या मताला योग्य ती किंमत देऊनच करता येतो हे आपण मानले नाही. त्याउलट आपलं म्हणणं तेच खरं, यामागे समर्थकांचा तांडाही असतो, त्यामुळे जे योग्य आहे, बरोबर आहे आणि संयुक्तिक आहे, त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते असे एकंदर आपल्याला म्हणता येईल.

##############

3
गद्धे पंचविशी !":

From: सुधाकर नातू
To
डॉ. रविन थत्ते
नमस्कार.

तसा दररोज आमच्याकडे महाराष्ट्र टाइम्स तो सुरू झाल्यापासून दररोज येतो. हल्ली मात्र मी दर शनिवारी लोकसत्ता घेतो, कारण त्यातील चतुरंग पुरवणी आणि त्या चतुरंग पुरवणीमधील गद्धे पंचविशी हे सदर मी प्रथम नेहमी वाचत असतो.

परवाच्या शनिवारी, सहज असाच सकाळी नाष्टा झाल्यावर पहुडलो असताना लोकसत्ता चतुरंग पुरवणींत आपण लिहिलेल्या गद्धेपंचविशी लेख वाचला व त्याला अलौकिक, अविस्मरणीय की दिलखुलास काय म्हणू कळत नाही. हा लेख एका दमात वाचला आणि मी अक्षरशः भारावून गेलो, आपण पाहता-पाहता गद्धेपंचविशी बद्दल जे भाष्य केलं आहे त्या संदर्भात माझी ही दाद त्याला देत आहे.

गद्धेपंचविशी हा आयुष्यातला सगळ्यात रोमांचक आणि वळण देणारा कलाटणी देणारा असा कालखंड. या वयामध्ये तारुण्य सळसळते, उत्साह उतू जात असतो आणि काहीना काहीतरी नवनवीन करावे असे वाटत असते. म्हणजेच नाविन्याची ओढ, धोका पत्करण्याची तयारी आणि काही तरी कसेही करून आपल्याला स्वतःला सिद्ध करणे, ह्या इर्षेचा तो रोमहर्षक पंचविशीचा काळ असतो. आपण म्हटल्याप्रमाणे तुमची ही गद्धे पंचविशी सातत्याने पुढे तशीच अक्षरशः उतू जावी अशीच होत राहिली आहे, ह्याचे आश्चर्य मिश्रीत कौतुक वाटते.

आपली गद्धेपंचविशी केवळ त्या काळापुरतीच मर्यादित न राहता, आज ८२ व्या वर्षापर्यंतही अबाधित राहिली आहे, ते अनेक 'उचापतीं'मधून, आपल्या यशस्वी वाटचाली वरून सिद्ध केले आहे त्याबद्दल अभिनंदन. माझे काही चुकत नसेल तर "ग्रंथाली" च्या नोबेलनगरीची नवलकथा अर्थात नोबेल पुरस्कार मिळविणार्यां विषयीचे आपले लेखन ह्या लेखात कसे नाही, हे जाणवलं.
आपल्या लेखामधील काही काही वाक्यांतून, तर खरोखर शाश्‍वत, सनातन, चिरकाल टिकणारी अशी सत्येच आपण मांडली आहेत असे जाणवले, ती अशी:

* झालेली चूक कबूल करणे, यात थोडा त्रास होतो, मात्र नंतर खूप शांतता मिळते.
* तुम्हाला झोप येवो अगर न येवो काळ पुढे चालतच राहतो, तेव्हा झोपमोड करण्यात काहीच हशील नसतो.
* अमेरिकेला चलाख लोक हवे असतात, शहाणे नव्हे.
* गोष्टी घडत जातात, त्या कोणी करत नाही, त्यावर काळाची छाया असते, असे म्हणतात ते खोटे नाही.
* कर्माचे काहीना काही फळ मिळतेच, परंतु अध्यात्म दुष्कर आहे.

आपली ही गद्धे पंचविशी अशीच यापुढेही अविरत नवनवे योगदान देत राहो, ही मनःपूर्वक सदिच्छा.

आपला
सुधाकर नातू
माहीम, मुंबई १६
Mb 9820632655

ता.क.
माझीही शहात्तराव्या वयात बहरत असलेली गद्धे पंचविशी:
"माझा सोशल मिडीयावरील 'संसार'! ":
माझा ब्लॉग:
एकसे बढकर एक अडीचशेहून अधिक वैविध्यपूर्ण लेख जरूर वाचा........
ही लिंक उघडा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

ह्या शिवाय.....
I have you tube channel:

moonsun grandson

With over 75 interesting videos uploaded so far........
To see them.........
pl. Open this link.........

https://www.youtube.com/user/SDNatu.

And if you like the Videos.......
Pl. Do share the link.........

ह्याला आलेला प्रतिसाद:
"प्रिय सुधाकर मनःपूर्वक आभार. मी लिहिलेल्या विधानांमध्ये तत्त्वद्न्यान दडलेले होते हा आपल्या शोधामुळे माझे मन हरखले . शेवटी प्रत्येक माणूस लेखक आणि तत्त्ववेत्ता असतो हेच खरे. नोबेल वर लिहिणारा सुधीर माझा आडनाव बंधू आहे आणि मित्रही परंतु तो मी नव्हेच. तो माझ्या इतका खट्याळ नाही सज्जन आहे. .सवड मिळताच तुमचे लिखाण वाचण्याचा प्रयत्न करीनच 

तुमचा रवीन थत्ते"

#####################

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा