"उडदामाजी काळे गोरे !":
१."सत्तेचे गुलाम":
सत्तेचं राजकारण पहाता पहाता, काँर्पोरेट कल्चर अनुसरताना दिसत आहे. जसे कोणत्याही कंपनीत आपले भवितव्य तितकेसे समाधानकारक नाही, म्हणून महत्वाकांक्षी माणसे, ह्या कंपनीतून त्या कंपनीत, अशा उड्या मारत अल्पावधींत अधिक सत्ता, अधिकार आणि संपत्ती प्राप्त करतात, तसेच धोरणी व मुरब्बी राजकारणी आयाराम, गयारामचा खेळ खेळताना दिसतात.
काँर्पोरेटमध्ये, निदान उघड, उघड वैयक्तिक विकास व प्रगती अन् भरभराट हा हेतू असतो; मात्र राजकारणांत तसे न दर्शविता, ह्या इथून तिथे अशा उड्या, आपण केवळ जनतेचे हित व अधिक गतिमान विकास व्हावा, म्हणून मारत आहोत, असा आव आणला जातो.
विशिष्ट ध्येये, तत्त्वे आणि प्रामाणिक निष्ठा, ह्या सत्तेसाठीच्या पक्षीय राजकारणांतून पार हद्दपार झालेल्या त्यामुळेच दिसतात. मात्र दुर्देव एवढेच नाही, तर ह्या सार्या विधीनिषेधशून्य व स्वार्थाने बरबटलेल्या खेळांचे कुणालाच-ना तो करणार्यांना काही वाटत नाही अथवा बहुदा, तो उघड्या डोळ्यांनी पहाणार्या सर्वसामान्य जनतेलाही त्याचे काहीच वाटत नाही, समजा चुकून खंत वाटली, तरी काहीही फरक पडत नाही हे!
उत्तरोत्तर हा आयाराम गयारामचा तमाशा अधिक वेगाने व बिनदिक्कतपणे वाढत जाणार आहे आणि सत्तेसाठीचे राजकारण हे राजकारण न रहाता, फक्त फायदे व तोटे बघणारा व्यावसायिक व्यापार-उद्द्योग बनणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि सर्वांसाठीचे हित व विकास हे शब्द इतिहासजमा होणेही, आता कदाचित् फार दूर नाही.
२.
"जाणीवांची श्रीमंती !":
माणसांची श्रीमंती पैसाअडका, सोनेनाणे, जमीनजुमला व इतर स्थावर, इत्यादींवर सर्वसाधारणपणे मोजली जाते, समजली जाते. पण खरं म्हणजे तोच माणूस खरा श्रीमंत, ज्याच्या जाणिवांचा भवताल अतिविशाल असतो तो.
माणसाला जाणिवा अर्थात विविध प्रकारची माहिती ज्ञान अवगत असले तर तो जो माणूस बहुश्रुत तोच खरा श्रीमंत असं मानायला हवं. कारण माणूस माणूस म्हणून इतर सजीवां पेक्षा वेगळेपण जर कोणतं माणसात असेल, तर ते म्हणजे सभोवतालच्या एकंदर परिस्थितीचे आकलन जाणिवांचा रूपात होते ते करून घेण्याची त्याची अमोघ शक्ती, जी प्रत्येकाची वेगळी असते. ती वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेऊन वाचन करून प्रवास करून अनुभव घेऊन वाढत जाते.
मात्र तशी ती वाढायला हवी ही ईर्षा इच्छा मात्र माणसाजवळ हवी. मला तरी असं वाटतं की, कायम माणसाने नवनवीन शिकत जावे, माहिती, विविधांगी ज्ञान गोळा करत राहावे आणि आपल्या जाणिवांचे क्षेत्र अधिकाधिक विस्तीर्ण करत जावे. नाही तरी कोणीतरी म्हटलंय की, ज्ञान हे महासागरासारखं आहे आणि आपल्याला जे काही ज्ञात असतं, ते एक जलबिंदू इतके पण नाही. म्हणून आता एकांतात आता घरात बसलेले असताना, आपण हेच केलं पाहिजे की आपलं एकंदर ज्ञान माहिती वाचन वेगवेगळ्या प्रकारे वाढवून आपल्या जाणीवांचा भवताल सातत्याने विस्तारत राहीले पाहिजे.
तीच आपली खरी श्रीमंती !
३.
"जग ही एक रंगभूमी आहे !":
माणूस लहानाचा मोठा होताना, त्या त्या वेळेला जसे वागतो, ते कदाचित बरोबर अथवा चूक असू शकते. मात्र ते ठरवायला त्याचा पुढचा काळ जावा लागतो आणि बऱ्याच वेळेला मागे वळून पाहतांना, बहुतेकांना कळून चुकतं की, आपण त्या त्या वेळेला जे वागलो हे चुकीचंच होतं. हे असं याकरता की, अगदी बरोबर तंतोतंत योग्य असे, योग्य वेळी वागणारे थोडेच असतात आणि तेच कदाचित पुढे आयुष्यात यशस्वी झालेले दिसतात.
ज्या अर्था, तसे यशस्वी झालेल्या, प्रसिद्धी मिळवणार्या, नांव कमावलेल्या व्यक्तींचं प्रमाण बहुतांश नगण्य असते, हे जर गृहीत धरलं तर बरीच माणसं, नको ते नको त्यावेळी वागत जातात आणि म्हणून आयुष्यात कायम धडपडत किंवा अयशस्वी असलेले दिसतात. हे जरी खरं असलं तरी प्रत्येकाला त्याच्या कुवतीप्रमाणे काही ना काही तरी मिळतच मिळतं आणि हे मिळताना अनेक अचानक संधी आणि अदृश्य हात त्याला सहाय्य करत असतात हेही आपल्याला ध्यानात येईल.
शेवटी ही जीवन हे एक न सुटलेले कोडे आहे आणि प्रत्येक जण जर ठरावीक चाकोरीबद्ध वागत गेला, तर मग आयुष्यातली जी गंमत आहे ती निघून जाईल. एकेक आयुष्य हे म्हणजे जणू एक रोमांचक कादंबरी अथवा नाटक असतं. अखेर खरंच आहे की, शेक्सपीयरने म्हटल्याप्रमाणे "जग ही एक रंगभूमी आहे" हेच खरे !
४.👍👍👍
# "नवनिर्मितीची किमया":
परफॉर्मिंग आर्ट अर्थात नवनिर्मितीचा आविष्कार हा नृत्य नाट्य चित्रपट वा चित्र, संगीत लेखन कुठल्याही स्वरूपात असो, ते व्यक्त करणारा, एक अभिजात प्रतिभावंत असतो आणि त्याला ती निर्मिती करताना विलक्षण आनंद होत असतो. परंतु ती नवनिर्मिती जेव्हा इतरांपर्यंत पोहोचवली जाते, आणि रसिकांची त्याला दाद मिळते, तेव्हाच त्या निर्मितीची एकंदर पूर्तता, सार्थकता होत असते.........
# "Accept, Adopt & Adjust":
सध्याच्या कसोटी पहाणार्या काळात लक्षात ठेवा, प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेणे, अत्यावश्यक आहे. काळ हा सतत बदलत असतो, हेही दिवस संपणार आहेत ही खात्री मनाशी बाळगा....
५.
"शहाणपण देगा, देवा !":
कधी कधी, एखादी व्यक्ती मनाविरुद्ध वागली किंवा तिच्या चुकीमुळे नुकसान झाले, तर आपले ताणतणाव असह्य होतील इतके वाढत जातात. परस्पर संबंधांतही कटूता येते. भांडण तंटे, वितुष्ट शत्रुत्व ह्या त्या नंतरच्या अनिष्ट गोष्टी असतात. अपेक्षा भिन्नता, स्वभावां प्रव्रुत्तींमधले फरक ह्या सार्याच्या मुळाशी असतात..........
व्यक्तिगत, व्यावसायिक जीवनांत हे तर पुष्कळदा असेच घडत असते, घडत रहाते आणि राहील. सामंजस्य, परस्पर सहकार ह्यांची नितांत गरज आहे, हेच खरे. हा महत्वाचा शहाणपणा कसा असतो, ते ज्याचे त्याने स्वानुभवातून शिकायचे असते. "पुढच्यास ठेच, मागचा शहाणा", हे नेहमी ध्यानात असूं द्या......
अखेर,
सोशल मीडियावर दररोज आपल्याला खूप खूप काही मिळू शकतं, फक्त त्याकरता दृष्टी हवी, विचारांची दिशा हवी आणि मोकळे मन हवे, तरच तुमच्याही असं काही ना काही पदरात पडू शकते, हे लक्षात ठेवा......
तसेच,
"सुखवणारी गोष्ट सांगितल्याने द्विगुणीत होते, तर दुःख उलगडण्याने निम्मे होते.....
ह्या मनीचे, त्या मनी देणे अन् घेणे, ही शांती, समाधान देणारी किमयाच......
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच उत्तमोत्तम अंतर्मुख करणारे......
अनेक लेख वाचण्यासाठी..........
ही लिंक उघडा.......
https://moonsungrandson.blogspot.com
लेख आवडले.......
तर लिंक संग्रही ठेवा...... शेअरही करा.........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा