"शतपावली",वाचायला भावली!:
व्यक्तिचित्र किंवा आत्मचरित्र वाचायला मला खूप खूप आवडतात. विविध माणसांचा तितक्याच विविध काळांतील वावर, 'व्यक्ती तितक्या प्रक्रुती' हे पटविणारी, पारदर्शक स्वभाववैशिष्ट्ये, गतकाळातील स्वयंभू माहोल आणि हेही पुरे नाही म्हणून की काय, शोभादर्शकातील क्षणोक्षणी बदलणार्या रंगबिरंगी नक्षीकामासारखे अनेकानेक प्रसंग तसेच अनुभव अशा वाचनातून आपल्यापुढे जीवंत होत जातात. त्यातील व्यक्तिचित्रे लिहावीत आणि आपण ती वाचावीत, तर ती रविंद्र पिंगे ह्यांचीच! साध्या सोप्या मायाळू भाषेतील जिव्हाळ्याने उलगडत गेलेली ती अनुपम, पिंग्याच्या शब्दांत नक्षत्रलख्ख जीवनचित्रे आपल्या सजग मनाशी सहजतेने ह्रदयसंवाद साधतात, असा माझा त्रुप्तीचा अनुभव आहे.
मला आठवते की, मी रविंद्र पिंग्यांचे त्याच जातकुळीतले 'शतपावली' हे विभिन्न क्षेत्रातील बारा नामवंत व्यक्तिंचे आलेखन, एका बैठकीत वाचून काढले होते. ह्या त्या बारा जीवनदिशा:
१ कुमार गंधर्व: सूरमाधुर्याची खाण
२ दुर्गाबाई भागवत: विद्याव्रती
३ वि.स. खांडेकर: साहित्यातील अम्रुतवेल
४ डी.जी. तेंडूलकर: अवलिया चरित्रकार
५ झाबवाला: तपस्वी कामगार नेता
६ हंसा वाडकर: अनोखी जीवनकहाणी
७ अ.का.प्रियोळकर: रुषितुल्य संशोधक
८ केशवराव दाते: ऱंगभूमीचे भीष्माचार्य
९ कुसुमाग्रज: कीर्तिवंत भाषाप्रभु
१० प्रभाकर कोल्हटकर-श्रीपाद क्रुष्ण कोल्हटकरांचा मुलगा: दिव्याखालचा अंधार
११ दीनानाथ दलाल: रसिक रंगचित्रकार
१२ ना.ह. आपटे: विपरीत भाग्यचक्र
"शतपावली" मधील बारा व्यक्तींच्या जीवनरेखा अवलोकिताना जे जाणवले त्याचे मर्म व सार हे असे आहे:
प्रत्येकाची जीवनगाथा ही एक अद्भूत, कल्पना करता येणार नाही, अशी स्वतंत्र कादंबरीच जणु असते. अनेक चढ उतार, सुख दु:खे आणि आव्हाने, पेचप्रसंग ह्यानी प्रत्येकाचे भावविश्व वेगवेगळी आंदोलने स्विकारत मार्गक्रमण करत असते. असे असले तरी एकाची कहाणी, कधीही कोणत्याच दुसर्यासारखी नसते. धन, मान सन्मान, प्रसिद्धी आणि लोकप्रियता लोकमान्यता तर फारच थोड्यांच्याच वाट्याला येते. सगळ्यांनाच सुदैव व संधी प्राप्त होतातच असे नाही. काही अभाग्यांच्या जीवनांत फासे विपरीत पडून भरकटत जाणार्या जहाजासारखे काही बाही होत रहाते.
आयुष्यात स्वत:ची अचूक ओळख जेव्हा होते आणि आपण काय उत्तम करू शकतो, आपल्याला काय केल्यामुळे आंतरिक समाधान मिळते, त्याच बरोबर आपल्या मर्यादा कशा व कोणत्या आहेत ह्याची जाण ज्याना होते, ते आपला जीवनमार्ग योग्य त्या दिशेला वळवत, योग्य निर्णय योग्य वेळी घेत त्याबरहुकूम जे अहर्निश प्रयत्न करतात, त्याना यशश्री माळ घालते हे चिरंतन सत्यही 'शतपावली'चे वाचन आपल्याला करून देते.
ह्या बारा जणांपैकी झाबवाला व ना.ह. आपटे ह्याना त्यांच्या गुणवत्तेनुसार व कष्टांच्या तुलनेत खूपच कमी नांव व मान लाभला. थोर कर्तबगार बापाच्या पदरी जन्म घेऊनही प्रभाकरपंत कोल्हटकर जीवनात सर्वथैव अपयशी ठरले. 'सांगत्ये ऐका' सारखे प्रक्षोभक पण प्रांजल आत्मव्रुत्त लिहीणार्या हंसा वाडकरांची जीवनकहाणी तर कोणाच्याही डोळ्यात अश्रु आणणारी आहे. बाकीचे आठ दिग्गज आपआपल्या क्षेत्रातील उच्च श्रेणीची कामगिरी करते झाले आणि त्यांना त्यानुसार क्रुतार्थ जीवन जगण्याची बक्षिशीही मिळाली.
सारांश, काळाची पावले ओळखून अंगभूत प्रतिभा व गुणवत्ता, निर्णयशक्ती व प्रयत्नांची सातत्यता ह्यांची यथातथ्य सांगड जे घालू शकतात, त्यांच्या आयुष्याचा जमाखर्च बेरजेचा रहातो. त्या उलट निर्णय व क्रुतीचा हिशोब ज्यांचा चुकतो, त्यांच्या वाट्याला अपयशाची वजाबाकी येते. आता काही माणसेच अचूक वेळचे अचूक निर्णय व प्रयत्न कोणत्या अद्रुष्य प्रेरणेने करू शकतात, ह्या प्रश्नाला खरोखरच उत्तर नाही! नशिब दैव वा प्रारब्ध म्हणून जे काही असते, ते बहुदा ही चांगली वा वाईट प्रेरणाच असावी, असे म्हणणे भाग आहे.
जाता जाता, दोन वैयक्तिक नोंदी:
मला मुंबईत रूईया महाविद्यालयातील जिमखान्याच्या प्रांगणात एका कार्यक्रमाचे वेळी, कुमार गंधर्वानी त्यांची जन्मतारीख वेळ व स्थळ शिवपुत्र कोमकळी ह्या नांवासकट स्वत:च्या अक्षरात लिहून दिली होती आणि तो सुयोग माझी ज्योतिष अभ्यासाची कळकळ व अंगभूत धीटाईमुळे आला होता.
लेखक रविंद्र पिंग्यांचाही स्नेह मला प्रत्यक्ष काही काळ लाभला होता. चतुरंग प्रतिष्ठानच्या रंगसंमेलनात जीवनगौरव पुरस्कार मिळविणार्यांना द्यावयाचे मानपत्र सातत्याने पिंगेसाहेब शब्दबद्ध करत असत, ही आठवणही ह्या "शतपावली" ने जागी केली. त्यांच्या लेखनाला मी वेळोवळी नेहमीच दाद देत आलो खरा, पण इतक्या विलंबाने मी त्यांचे "शतपावली" हे पुस्तक वाचल्यामुळे, माझा हा असा दाद देणारा प्रतिसाद वाचायला, आता रविंद्र पिंगे आपल्यात नाहीत, ही खंत मात्र मला बाळगावी लागत आहे, हे माझे दुर्भाग्य.
सुधाकर नातू.
खूप सुंदर.मी जरूर वाचेन. आपला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि वाचन संस्कृतीला चालना देणारा आहे.
उत्तर द्याहटवा