मंगळवार, १२ मार्च, २०१९

"दाद, प्रतिसाद व संवाद!"

"दाद, प्रतिसाद व संवाद!": "कवडसे सोनेरी अंतरीचे" पुस्तक: श्री. विश्वास देशपांडे, मी जे जे काय वाचतो, बघतो, वा ऐकतो, त्यातून जर मला काही मनापासून भावले, तर त्याची पोचपावती, जमेल तशी देण्याची माझी पद्धत आहे, नव्हे तो माझा छंद आहे, असेच म्हणा ना! हा माझा अनाहूत संदेश त्याचाच एक भाग आहे. " आपले"सुखी माणसाचा सदरा जणू घालणारे ग़जाननराव कुलकर्णी काय, किंवा घराच्या गच्चीत चक्क आपल्या कल्पनेतले विमान प्रत्यक्ष बनवणारा हा जिद्दी अमोल यादव काय, अथवा अपंग असूनही, स्वकष्टाने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर अनेक कुटुंबांची पोशिंदी होत विस्मयकारी योगदान देणारी, आधारवड मीनाक्षी निकम काय, अथवा मोबाईल शाप की वरदान? या प्रश्नाचे उत्तर आपल्या आपणच शोधायला हवे, हे वाचकांच्या गळी उतरवण्याची तुमची सहजसुंदर सोप्या भाषेतील शैली काय, किंवा आत्मविश्वास असेल तर काय काय होऊ शकते आणि सुरवंटाचे पहाता पहाता फुलपाखरू होऊन माणूस, असामान्य कर्तृत्व गाजवत आकाशभरारी कसा घेऊ शकतो, ते सांगणं काय, हे सारं तुमचे "कवडसे सोनेरी अंतरीचे" हे पुस्तक हातात आल्यावर, त्यातील सहज म्हणून ५/६ धडे, होय धडेच म्हणतो, कारण प्रत्येक लेख हा आपल्याला काही ना काही तरी शिकवून जातो. आपल्याला नवी दृष्टी देऊन जातो. म्हणून तर मी म्हणतो, शितावरून भाताची परीक्षा करावी, त्याप्रमाणे जर हे चार-पाच लेखच मला जाणिवेचे असे मोठे अद्भुत विश्व समोर निर्माण करून गेले, तर संपूर्ण पुस्तक वाचल्यावर तर अर्जुनाला, श्री भगवंताचे जसे विश्वरूप दर्शन झाले, त्याचप्रमाणे माझे काहीसे होईल, असे मला मनापासून वाटते. ज्या वाचनालयाचा मी सभासद आहे तिथे गेल्यावर पुस्तके शोधता-शोधता सहज हे पुस्तक हातात आले आणि तेच घेऊन मी घरी आलो. त्यामध्ये एवढे काही अनुभव भांडार असेल, असे काही वाटले नव्हते. पण सारं काही वेगळंच झालं. धडे वाचायला फार तर अर्धा-पाऊण तास लागला असेल, पण त्या वाचनातून मला खूप खूप भरून पावलं. And my day was made! आपल्या पुस्तकाने मला जो आनंद दिला आणि नव्या विचारांची दिशा, द्रुष्टी दिली, त्याबद्दल आपले आभार अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. सुधाकर नातू माहीम मुंबई १६ २. म.टा. मधील लेख: "पत्रिका जुळलेली व न जुळलेली" श्री. अशोक कोठावळे, मँजेस्टिक प्रकाशन, सादर वंदन. आजच्या 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये तुमचा "पत्रिका जुळलेली व न जुळलेली" हा स्वानुभव सांगणारा लेख, मी वाचला. तो आवडला. विवाह ही एक अत्यंत महत्त्वाची घटना, जीवनामध्ये घडत असते. प्रत्येकाचा विवाह जुळतो, तो नाट्यमय रीतीने. तुमच्याही विवाहाची कथा, आपण अतिशय प्रांजळपणे सहजसुंदर भाषेमध्ये, वाचकांशी संवाद साधत ,सांगितली आहे. तुमचे अभिनंदन व शुभेच्छा. ह्याच संदर्भातील "जन्म गाठीचे रहस्य" या माझ्या चॅनेल वरील व्हिडीओची लिंक सोबत पाठवत आहे. ती उघडून जरुर पहावी. त्यावरून तुम्हाला विवाह कसे गमतीशीर रीतीने जुळतात, त्याची कल्पना यावी. धन्यवाद सुधाकर नातू माहीम मुंबई १६ ३. "कालनिर्णय मोठे पंचांग" श्री. जयराज साळगांवकर, सादर वंदन. एक हौशी ज्योतिषी म्हणून मी नेहमी आतापर्यंत दाते पंचांग वापरत आलो आहे. मात्र आज दादरला आयडियल बुक डेपोमध्ये गेलो असताना, ते पंचांग संपल्याचे समजले आणि त्यामुळे मी आपले "कालनिर्णय मोठे पंचांग" विकत घेतले. घरी आल्यावर, ते नीट चाळून बघितले आणि मला लक्षात आले की अतिशय आकर्षक पद्धतीने आपण अत्यंत उपयुक्त माहिती मांडली आहे. अशा तर्हेची इतकी विस्तृत व नित्योपयोगी माहिती मला वाटते, खचितच कुठल्या पंचांगामध्ये असेल. माझ्यासारख्याने सखोल अभ्यास करावा असेच हे पंचांग आहे. मला आता यापुढे आपल्याच पंचांगाचा नेहमी उपयोग करावा असे वाटत आहे. पुढील पाच वर्षाचे ग्रहबदल, हा माझ्यासारख्या वार्षिक राशीभविष्य अनुकूल गुण पद्धतीने लिहीणार्या लेखकासाठी जणू वरदान आहे. ह्या उत्तम पंचांगनिर्मीतीसाठी तुमचे मनापासून आपले आभार आणि अभिनंदन, तसेच शुभेच्छा. सुधाकर नातू माहीम मुंबई१६ ३. "भाग्यनिर्णय" दिवाळी अंक१८": श्री. शशिकांत पात्रुडकर, सादर वंदन. "भाग्यवान कोण?" या शीर्षकातील आपल्या खास दिवाळी अंकाच्या प्रश्नांचे उत्तर, मला तुमच्या अतिशय सहज सुंदर शैलीत, सोप्या भाषेत लिहिलेल्या "सहवास भाग्यवंतांचा" ह्या लेखामुळे मिळाले. आपल्याला फोटो ग्राफी चा छंद आहे आणि त्या छंदात तुम्ही अनेक नामवंतांचे फोटो काढू शकलात, हे त्यामुळे समजले. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व "पुल", प्रा.वसंत बापट आणि शांताबाई शेळके अशा दिग्गजांच्या भेटीचे अतिशय हृद्य वर्णन आपण आपल्या लेखात केले आहे. त्यामुळे तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच हे उत्तर मिळाले. कर्तृत्ववान माणसांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी हेही सहाजिक आहे. परंतु अशा कीर्तिमान व्यक्तींच्या सहवासात येणे, यासारखे भाग्य दुसरे नाही आणि ते तुम्हाला लाभले, ह्याचा मनापासून आनंद झाला आपले अभिनंदन व शुभेच्छा.
सुधाकर नातू, माहीम मुंबई१६ 4. "लोकसत्ता-चतुरंग पुरवणी": हेमलता अंतरकर सादर वंदन. आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणींत "वसा स्वायत्ततेचा" हा कै. अनंतराव अंतरकरांच्या व्यक्तीगत व साहित्यिक संपादकीय कारकीर्दीची, वैशिष्ट्ये उलगडून दाखविणारा, आपला लेख मी वाचला. मोहिनी, हंस व नवल अशी प्रत्येकी स्वतंत्र विविधा जोपासणारी मासिके त्यांनीत निर्माण करून, मराठी वाचकांची वर्षानुवर्षे जी बौद्धिक व भावनिक भूक भागवली, त्याला तोड नाही. ह्या त्रिमूर्तींच्या साठ वर्षांच्या वाटचालीपैकी, निदान तीन दशकांचा मी वाचक म्हणून एक साक्षीदार आहे. हे असे एकसंध, आपआपली गुणवैशिष्ट्ये संभाळणार्या मासिकांमागे, संपादकाचाच सिंहाचा वाटा कसा असतो ते तुमच्या लेखामुळे समजले. अभिंनंदन व शुभेच्छा. जवळ जवळ अशाच तर्हेचे योगदान मेनका, माहेर व जत्राचे संपादक कै. पु.वि.बेहेरे ह्यांनीही दिले होते, त्याचे त्यांतील एक सदर लेखक म्हणून मला स्मरण झाले. तो'जादूभरा आणि आज स्वप्नवत वाटणारा काळ अन् कल्पनाविश्वात वाचकांना गुंतवून टाकणारा तो माहोल आणि त्याचे चोखंदळ आस्वादक आज इतिहासजमा झाले आहेत. कालाय तस्मै नम:, दुसरं काय! सुधाकर नातू, माहीम मुंबई-१६ ह्याला आलेले उत्तर: "तुमचा अभिप्राय वाचून लेखाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. तुम्ही जुने, जाणते वाचक आणि लेखक. त्या काळाबद्दल नव्या पिढीसाठी काहीतरी लिहून ठेवलं पाहिजे तुम्ही. धन्यवाद. कधीतरी भेटू." -हेमलता ५. "श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१८" संपादक, श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१८ सादर वंदन. मराठीतील दिवाळी अंक ही चोखंदळ वाचकांसाठी एक पर्वणीच असते. वर्षातून एकदाच येणारा हा साहित्यशारदेचा सोहळा, आज अनेक दशके टिकून आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे. आत्ताच आपला दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१८ वाचला. त्यातील रंगसम्राट श्री रघुवीर मुळगावकर ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास सादर केलेला विभाग तर एका बैठकीत वाचून काढला. खरोखरच इतका तो सुरस रंजक आणि माहितीपूर्ण आहे की, त्यामुळेच मला आपणास हे अनाहूत खुशीपत्र पाठविण्याची प्रेरणा मिळाली. बाकीचा अंक चाळला आणि लक्षात आले की नेहमीच्या परंपरेप्रमाणे दीपलक्ष्मी दर्जेदार साहित्य देण्यात यशस्वी झाली आहे. पुल, गदिमा, गुलाम मोहमद, शैलेंद्र, मुमताज, कलकत्ता इ.इ. वैविध्यपूर्ण विषय इतक्या अभ्यासपूर्ण रीतीने सादर करणारा हा अंक खरोखर दुर्मिळच गणला जावा. चक्क तीनशे पृष्ठांचा रंगबिरंगी व खुसखुशीत साहित्याची मेजवानी देणारा हा अंक निर्माण केल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. ह्या निमित्ताने माझ्या मनांत अचानक दोन आठवणी जाग्या झाल्या. पहिली म्हणजे, माझे छापील असे नाव, कोणत्या तरी स्पर्धेच्या निमित्ताने, प्रथम आपल्याच दीपलक्ष्मीच्या मासिक अंकात कित्येक दशकांपूर्वी आले होते ही आठवण. त्यामुळे नंतर पुढे चार दशके मी जी काही लेखन सेवा केली, त्याची मुहूर्तमेढ दीपलक्ष्मींतून झाली, ह्या योगायोगाचे मला खरोखर नवल वाटले. दुसरी आठवण म्हणजे, तुम्ही आणि श्री.अनिल कोठावळे ही जोडगोळी एकोणिसशे ऐशींच्या दशकांत दिवाळी अंकांच्या मोसमात मला भेटायला, गप्पा मारायला आमच्या ऑफिसमध्ये यायची ती. काही अंशी मिश्कील बटूमूर्ती वाटावी अशी आपली प्रतिमा, माझ्या मनावर तेव्हा जी पडली, ती अजूनही कायम आहे. अर्थात् आपण आता श्री.दीपलक्ष्मी सारख्या अनेक दशकांची परंपरा असलेल्या दर्जेदार नियतकालिकाचे संपादक जसे आहात, तसेच जयहिंद प्रकाशनसारख्या यशस्वी संस्थेचे चालकही आहात. त्यामुळे तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असो. यानिमित्ताने मी आपल्या दिवाळी अंकाचा सखोल रसास्वाद यथावकाश घेईनच. धन्यवाद आपला सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा