मंगळवार, २ एप्रिल, २०१९

"वाचाल, तर टिकाल!":

"वाचाल, तर टिकाल!": "रुचि" मासिकाचा फेब्रुवारी'१८ हा अंक वाचकविशेषांक आहे. त्यामधील श्री. किरण येले ह्यांचा "गोचीः वाचन आणि वाचकांची" हा लेख, मी मनापासून शब्दन् शब्द वाचला. त्यामध्ये एकंदरच वाचन संस्कृतीचा सध्या जो ऱ्हास झाला आहे, त्याची "बर्डस् आय व्ह्यू" घ्यावा अशा पद्धतीने सर्वंकष तपासणी करून, आपली निरीक्षणे मांडली आहेत. त्या लेखामधील एक अत्यंत महत्त्वाचे असे वाक्य मला मनाला भावून गेले आणि ते खरोखरच वाचन कां अत्यावश्यक आहे आणि "वाचाल तर वाचाल" हे किती सत्य आहे, ते सांगून जाते. ते वाक्य असे आहे: "कपडे आणि दागिने यामुळे शरीर उजळून निघतो आणि पुस्तकांमुळे विचार उजळून निघतात. कपडे, दागिने शरीरावरून उतरवले की, आपण पुन्हा होतो तसे दिसू लागतो. परंतु पुस्तक वाचून संपल्यावर आपण अधिक सुंदर दिसू लागतो." वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दुसरं कोणतही उदाहरण दाखवता येणार नाही, असे हे सारे शब्द आहेत. त्यापुढे जाऊन मला वाटतं की, जेव्हा कोणी लेखन करतो तेव्हा काय होतं तर, ते एखाद्या टीपकागदासारखे घडत असतं! प्रत्येकाच्या जीवन अनुभवाच्या भवसागरातून योग्य असे टिपकागदाप्रमाणे टिपलेले सारे सार, तो लेखक आपल्या समोर त्याच्या शब्दात मांडत असतो. त्यामुळे जणू काही नवनवीन अनुभवांचा अनुभूतींचा अर्कच आपल्यासमोर उलगडत जात असतो. आणि वाचनामुळे हे फक्त आपण आपल्यापुरते अनुभवत असतो. जितकं जास्त वाचन होईल, तेवढं सहाजिकच आपलं जाणीवांचे आणि अनुभवांचे भावविश्व अधिकाधिक प्रगल्भ आणि आनंददायी होईल यात वाद नाही. परंतु सध्याची परिस्थिती अगदी उलट आहे वाचायला कुणाला वेळ नाही. एखाद्याला जर प्रश्न विचारला की, तुला काय आवडतं किंवा तू कसा टाईमपास करतोस? तर असं सांगितलं जातं की मी सिनेमा वा नाटक पहातो किंवा पत्ते वा इतर काही खेळ खेळतो, अथवा एखाद्या कार्यक्रमाला जातो किंवा मित्रमंडळींत जाऊन गप्पा टप्पा करतो किंवा एखादा दुसरा कुठला तरी छंद आहे असे सांगतो. स्वतःहून वरील प्रश्नाला मी नेहमी वाचनात वेळ घालवतो असे उत्तर मिळणे, खरोखर दुर्मिळच होत चालले आहे. हेच मोठे दुर्देव नव्हे कां? अभ्यासपूर्ण व दिशादर्शक असा हा लेख आवर्जून वाचावा, असाच आहे. ---------------------------- शब्दकळा: १. "निखळ वास्तवाची जाणीव करून देणारं, अचूक उत्तर मिळविण्यासाठी, अचूक प्रश्न विचारता येण्याची कला आवश्यक असते." २. "वाचा आणि विचार करा": दररोज सकाळी किंवा रात्री न चुकता, सातत्याने "गुड मॉर्निंग" वा "गुड नाईट"अशा तऱ्हेचे संदेश, सचित्र पाठवण्याची खरोखर काही गरज असते कां, ह्याचा विचार करणे गरजेचे आहे. हा वेळेचा डेटाचा आणि इतरांच्या खाजगी "स्पेस"चा नाहक अपव्ययच नाही कां? ३. "तुम्हीच, तुम्हाच्या जीवनाचे शिल्पकार, हेच खरे आहे कां?": विशिष्ट काळात विशिष्ट निर्णय व क्रुती होते आणि त्यातून तुमचे भवितव्य घडते. ह्या सगळ्यामागे तुमच्या मनाची त्या त्या वेळी असलेली स्थिती जबाबदार असते. सातत्याने गतीमान असलेल्या सूर्यमालेतील ग्रहस्थितीनुसार ती तशी मनस्थिती प्रभावित होते कां, ह्यावर सुरवातीच्या प्रश्नाच्या उत्तराची सत्यासत्यता अवलंबून आहे. ४. जीवन अन् म्रुत्यू, फक्त एका क्षणाचं अंतर, म्हणून पदरी पडणारे, क्षण अन् क्षण जपावे, सत्कारणी लावावेत. ५. "मतभिन्नता": एखाद्या व्यक्तीबद्दल अथवा घटनेबद्दल आपले जे मत असेल, तसेच दुसर्‍या कुणाचे असेलच असे नाही. त्याचे मत अगदी आपल्या विरुद्ध असू शकते. आपले मतच बरोबर आहे, हे दुसऱ्याला त्यामुळे पटवून देणे कर्म कठीण असते, कारण "पिंडे पिंडे मतीर्भिन:!" दुसऱ्याच्या नजरेतून बघण्याचा चश्मा सहसा कुणाकडे नसतो. बहुतेक वाद-विवादांचे, मतभिन्नतेचे मूळ हेच असते. ६. "मुखवटे आणि चेहेरे"!: विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये, एकवाक्यता ठेवणे, सगळ्यांना जमतेच असं नाही. ते जमण्यासाठी प्रामाणिकपणा, निष्ठा आणि निस्पृहता असे मूल्याधिष्ठित गुण अंगी असावे लागतात. चंगळवाद आणि "अर्थ हाच सर्वार्थ" मानणाऱ्या आजच्या युगात, सहाजिकच हे सारे गुण दुर्मिळ होत चालले आहेत. सहाजिकच आपल्याला सभोवताली दिसतात, वावरतात, ते मुखवटे आणि चेहेरे, चित्रविचित्र अन् विश्वास न ठेवण्या जोगे! "कालाय तस्मै नमः" दुसरं काय?! ७. "वेळेवर नाही, नांदी": मराठी नाटक कधीही वेळेवर सुरू होत नाही. त्या पायी किती समुह-वेळ व उत्पादकता विनाकारण वाया जात असते, त्याची कुणाला काय पर्वा! एकप्रकारे राष्ट्रीय संपत्तीचा र्हासच नव्हे कां? एकट्या ललितकलादर्शचा आदर्श किती दिवस मिरवणार आणि विसरून जाणार? ८. भवतालातील घडामोडी आणि नित्य बदल यांचे निरीक्षण, संचितातील अनुभवांचा मतितार्थ, माणसामाणसांतील संवाद विसंवादाचे विश्लेषण ह्या सगळ्यांचे चिंतन आणि मनन करून, मी विचार करतो आणि काही शाश्वत तत्वे-'कन्सेप्टस्' मांडण्याचा माझ्या संदेशातून प्रयत्न करत असतो. उत्तरोत्तर त्यामधून आवडल्याचे प्रतिसाद मिळत आले आहेत आणि आता लवकरच सुमारे ११ हजार पसंतीचे मोहरे माझ्या पदरात पडणार आहेत पण त्यामुळे संतुष्ट होणे हे योग्य ठरणार नाही असे मला वाटते कारण जोपर्यंत माझे संदेश कधी येतात आपल्याला कधी वाचायला मिळतात याची उत्सुकता जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत मला माझे प्रयत्न अविरत चालूच ठेवावे लागतील ती स्थिती जेव्हा निर्माण होईल त्यावेळेला कदाचित माझी निर्मिती क्षमता सिद्ध होईल तोपर्यंत हा शब्दांचा खेळ असाच चालू राहायलाच राहील. ९. पुराणांतील वांगी, पुराणांतच शोभतात.' आपला उज्ज्वल इतिहास किती उगाळणार आणि तो, तसा उगाळून काय साधणार? वर्तमान काय आहे कसा आहे, खरोखर किती भूषणावह आहे, ह्याचा आधी गांभीर्याने विचार केला, तरच भविष्यकाळाची काही आशा धरता येईल! उत्साहाचा अतिरेक झाला, की पुष्कळदा हंसेच होते! १०. To support my Hobby of Reading, I happened to collect data of some interesting books from different sources. I am sharing it here, for the like minded souls: 'Pracharya' by Milind Joshi; 'Aisi Kalavlyachi Jati' by Milind Joshi; also by na dho mahanor; 'Vastupurush' by Shradchandra Chirmule; 'antaryami sur gavasale' by Sriniwas Khale.'pannashicha bhojja' by ravi abhyankar; 'char nagaratale maze vishva' by jayant naralikar; 'Samartha Chintan' by Suresh Jakhade;'Ganaryache Por' by Raghavendra Bhimsen Joshi; 'Manatali Manase' by Narendra Chapalgaonkar; 'Muk-Sanvad' By Ramdas Phutane; 'Mandalecha Rajbandi' By Arvind V Gokhale'; 'Unhat Bandhaleli Ghare' By Sandhya Deorukhkar; please do read them. सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा