"ठेवा, डोके गहाण!":
"साथ दे तू मला" या मालिकेमध्ये, ज्या मुलीचे अगदी अनुरूप मुलाशी नुकतेच लग्न ठरते आहे, अशी कोणती तरुण मुलगी, संपूर्ण अनोळखी असलेल्या, "लव गुरु" सो काँल्ड सल्लागार तरूणाशी, वेळ काळाचे भान न ठेवता, सदान् कदा बोलत बसेल, आणि तेही कां अन् कशाकरता?
दुसरे असे की, कोणत्या होतकरू मुलीचा बाप, आपल्या भावी विहीणीला अवेळी मध्यरात्री आगांतुकासारखा फोन करून, आपल्या इतर दोन विवाहीत मुलींबद्दल आणि जावयांच्या नको त्या प्रतापांबद्दल, नको ती माहिती पुरवेल?
सारे काही अतर्क्य आणि विचित्रच!
इथे "सबकुछ चलता है"!:
"कलर्स" वाहिनीवर तर मालिकांमध्ये "आजी" आपले केस काळेभोर करण्यासाठी वाहिनीच्या नावाप्रमाणे कलर लावून घेतात, हे नवलच आहे! उदाहरणार्थ "घाडगे आणि सून" "सुखांच्या सरींनी हे मन बावरे" या मधल्या, तरूण दिसण्याचा नाहक हट्ट धरणार्या दोन आज्या! हा पोरखेळ कां व कशासाठी?
इथे "सबकुछ चलता है"!:
"सुखांच्या सरींनी हे मन बावरे" या मालिकेमध्ये एका सात वर्षे विधवा असलेल्या आणि मुल गमावलेल्या सर्वसाधारण कुटुंबातील आपल्यहून वयाने मोठ्या मुलीच्या प्रेमात, कोणता उद्योगपती श्रीमंत घराण्यातील देखणा तरुण मुलगा पडेल? हे मुळी पटण्याजोगे नाही. तेवढे तर तेवढेच, पण त्याच्या आजी-आजोबांना देखील ही अशी मुलगी आवडावी, आपल्या तरुण तडफदार नातवासाठी जोडीदार म्हणून योग्य वाटावी आणि त्यांनी आपल्या कर्तबगार सुनेला चुकीचे ठरवत कायम तिच्याशी पंगा घ्यावा, हेही अचंबा वाटण्याजोगे! तरुण मैत्रीण नेहा तर ह्या दोघांचा विवाह कधी होईल ह्याची प्रतिक्षा जणु देव पाण्यात ठेवत करत आहे. ह्या तिघांनी आपली डोकी गहाण ठेवण्याजोगेच नव्हे कां?
विधवा विवाह दाखवणे तसे चूक नाही परंतु त्यासाठी इतके अशक्यप्राय विरोधाभास दाखवणे गरजेचे जसे नाही तसेच ते तर्काला धरून नाही.
ह्या विधवा अनुश्रीला आपल्या नवर्याच्या आठवणीत रमावेसे वाटतेय आणि रंगांचा तिला जर कमालीचा इतका तिटकारा आहे, तर अशी मुलगी रंगपंचमीला सगळ्यांना जेवायला बोलावते, हे मुळीच पटण्याजोगे नाही. एवढी ऐपतही त्यांची दिसत नाही. तर मग हा अट्टाहास कां? रंगपंचमी असल्यामुळे रंगांची उधळण होऊ शकणार याची कल्पना असूनही हा असा आग्रह कां व कशासाठी!
ह्या सगळ्या ड्रामेबाजी आधी, सिद्धार्थने आपली ओळख खोटीच दाखवल्यामुळे व ती उघडकीला येऊन अपमानास्पद तमाशा होऊनही ज्याचे नांव नको दर्शन नको त्याच्याशीच पुन्हा मैत्री करत जवळीक साधणे कशासाठी? त्या वेड्याने नको तितका जीवघेणा आग्रह करतो म्हणून?
अनुश्रीबद्दल एवढी चीड असल्यामुळे दुर्गाबाईंनी आपल्या अधिकारात पोलीस बोलवून तिला धडा शिकवायचे ठरवणे आणि त्याप्रमाणे पोलिसांनी कुठल्याही कायद्याला धरून नाही तरीही येणे हा तर एक अपराधच नव्हे कां? सिनेमँटिक लिबर्टी किती व कशी घ्यायची ह्याचे तारतम्य नको कां!
"सबकुछ चलता है" हेच खरे!
मालिकांमधली पात्रे, त्यांना जेव्हा हवे असेल, तेव्हा ती अंतर्धान पावतात. हा अनुभव "राधा प्रेम रंगी रंगली" मधील माधव निंबाळकर यांच्या बाबतीत तर नेहमीच घेतला होता. आज पण आता मालिकांमधील आयांवर ही वेळ आली आहे. राधाची आई घरी एवढा हलकल्लोळ, गडबड गोंधळ सुरू असतानाही कुठे गेली कोण जाणे! "सुखांच्या सरींनी... मध्ये अनुश्रीची आई अशीच गायब आहे. घाडगे अँड सून मध्ये तर कहरच! अमृता चे आई वडील काका जे केव्हांचेच गायब झाले वा कुठे परग्रहावर गेले देव जाणे!
"घाटगे अँड सून" मध्ये नायक अक्षय, अमृता व टीयरा यांच्याबरोबर जो तळ्यात मळ्यात खेळ मालिका सुरू झाल्यापासून करतोय, तो काही केल्या संपायला तयार नाही! घटस्फोट घेऊनही हटवादी आजी माईंच्या दुराग्रहापोटी, अक्षयची पहिली बायको अमृताला त्याच घरात वास्तव्याला ठेवली जाणे हेही बिलकूल न पटण्याजोगे! एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावा अक्षयच्या बाबतीत आणि मालिका संपवा असं सांगून सगळे कंटाळले, पण हा पोरखेळ काही केल्या संपतच नाही याला काय म्हणायचे? "सबकुछ चलता है" दुसरं काय!
बहुतेक सर्व मालिकांची अशीच कहाणी आहे. एखाद्या नवीन पात्र मध्येच आणायचे व कथेला काहीतरी वेगळे वळण द्यायचे आणि मालिका पुढे नेत राहायची. बुद्धीला जे पटणार नाही असेच काही ना काही दाखवत राहायचं, चांगुलपणाचा अतिरेक प्रेक्षकांना अगदी नको वाटून, संताप येईपर्यंत "झी युवा" वरच्या "सूर राहू दे" मधल्या आरोही सारखा दाखवत रहायचा, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. त्यामुळे मालिका मर्यादित षटकांच्या ठराविक कालमर्यादेत च्या असाव्यात हा आग्रह धरला गेला पाहिजे.
जाहिरातदार हे बहुदा मराठी भाषिक नसल्यामुळे, त्यांना मालिका कशी चालू आहे त्यात कसे पाणी घातले जात आहे, ह्याची त्यांना कल्पना नसते. सहाजिकच मालिकांना जाहिराती मिळत राहतात. अशा रीतीने प्रेक्षकांच्या बरोबरच जाहिरातदारांचे ही एक प्रकारे नुकसान होत असते. हे सारे केव्हा ना केव्हा थांबायला हवे.
टाईमपास म्हणून मालिका बघायच्या असतात, हे मान्य आहे. पण त्यासाठी काहीतरी सर्वसामान्य विचार बुद्धीला पटेल रुचेल असे न दाखवता अशक्यप्राय अशाच गोष्टी दाखवण्याची हौस अखेरीस या मालिकांच्या मुळावर येईल यात वाद नाही. खरं म्हणजे अशा तऱ्हेने भरकटत जाणाऱ्या मालिकांची, कोणतीही दखलच घेण्याची गरज नाही. पण हे प्रभावी माध्यम अधिक चांगल्या तऱ्हेने वापरता येऊ शकते अशी तळमळ असल्यामुळे, हा सारा अट्टाहास.
पण लक्षात कोण घेतो?
सारांश, ठराविक कालमर्यादा असणाऱ्या मालिका हव्यात आणि त्यांच्यावर प्रदर्शनपूर्व सेन्साँर किंवा निरीक्षण मंडळ हवे असा साऱ्याच प्रेक्षकांनी आग्रह धरायला हवा. अथवा इडियट बॉक्सवर पूर्ण बहिष्कार टाकून वाट चुकलेल्या मंडळींना
योग्य त्या मार्गावर परत आणायला हवे.
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा