मंगळवार, १९ मार्च, २०१९
"जन्मगांठीचं रहस्य!":
"जन्मगांठीचं रहस्य!":
जीवनात कधी कधी असे अनुभव येतात की, काही विवाह एखादा धक्का देऊन जमलेले दिसतात व तेव्हा आपल्याला जन्मगांठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात, यावर विश्वास बसतो.
बहुधा, प्रत्येकाचा विवाह हा कादंबरीपेक्षा चमत्कृतीपूर्ण घटनांनी, तुम्हाला कल्पनाही येणार नाही अशा रितीने जमतो. बहुतांश विवाह जमण्यात, कोणता तरी एकमेकांशी संबधीत व्यक्ती किंवा घटना अथवा जागा ह्यांचा अतर्क्य असा गूढ संबध असतो किंवा त्यामागे काहीतरी पूर्वाश्रमीची इच्छा असू शकते. असा निष्कर्ष मी कसा व कां काढला असावा?
तर त्याचे असे झाले की ह्या विषयावर एका ज्योतिषी मित्राबरोबर गप्पा मारत असताना, तो मला म्हणाला की, त्याच्या मुलाचा विवाह कुणालाही नवल वाटेल अशा तर्हेने जुळून आला. होता. आमच्या गप्पांत, माझ्या मित्राने त्या चमत्क्रुतीपूर्ण जन्मगांठीची सांगितलेली गोष्ट उदाहरण म्हणून, मी त्याच्याच शब्दात थोडक्यात येथे सांगतो :
"जन्मगांठीचं रहस्य!":
"तेव्हा माझा मुलगा उत्तम शिक्षण पार करून चांगल्या नोकरीत सेटल झाला होता. सहाजिकच त्याचा विवाह जुळविण्याच्या प्रयत्नात आम्ही होतो. आमच्या घरी अशाच एका संध्याकाळी, एक ग्रहस्थ अचानकच आले. आमच्याकडे येण्याची काहीही पूर्वसूचना त्यांनी दिली नव्हती व एखाद्या आंगतूकासारखे ते आले होते. तेव्हा आम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतो. तो शनीवारचा दिवस होता आणि माझ्या मुलीचा विवाह नुकताच झालेला असल्यामुळे आणि ती दोघं, महाबळेश्वरला जाणार असल्यामुळे आम्ही गडबडीत होतो.
येता येताच, मी नको नको म्हणत असताना, त्या ग्रहस्थांनी माझ्या हातात त्यांच्या मुलीच्या पत्रिकेचा कागद टेकवला. नंतर मी आतल्या खोलीत बसलेल्या माझ्या मुलाला तो दाखवला. पण त्यावरील माहीती पाहून तो मला म्हणाला "त्यांना आत्ता नको असे कळवा व काही करून जायला सांगा".
आम्ही गडबडीत असूनही हा माणूस आमचे काही ऐकत नाही आणि आमच्या हातात मुलीची पत्रिका बळेबळेच टेकवितो, याचा मलाही तसा रागच आला होता. त्यामुळे बाहेर येऊन मी कशीबशी त्या माणसाची बोळवण केली. नंतर मुलाशी गप्पा मारताना लक्षात आले की, तो जिथे कामाला होता, तेथे एक मित्र होता त्याच्या बरोबर काम करणारा, त्याचीच ही मुलगी चुलत मेहुणी होती. त्यामुळे उद्या आपण जर ह्या मुलीला कदाचित नकार दिला, तर मित्राबरोबरचे आपले संबंध बिघडू शकतील असे वाटल्याने, तो त्या गृहस्थांना नको सांगून, बाहेर पाठवा असे म्हणाला होता.
दुसरा दिवस रविवार होता. सकाळी मी सहज म्हणून त्या मुलीची पत्रिका हातात घेतली अन् नजर टाकताच मला स्वग्रहीचा गुरु लग्नस्थानी असलेला दिसला. हा एक अत्यंत शुभयोग असल्याने मी प्रभावित झालो व लगेच वेळ न दवडता, ती पत्रिका माझ्या मुलाच्या पत्रिकेशी जुळते कां ते अभ्यासिले. आता आश्चर्य करण्याची पाळी माझी होती! त्या दोन्ही पत्रिका उत्तम जुळत होत्या.
अचानक मला वाटू लागले की, काही झालं तरी ह्या मुलीला पहाण्यासाठी आम्ही जायलाच हवे. अनायसे तो रविवार होता, आणि त्या दिवशी दुसरी कोणतीच एंगेजमेंट आमची नव्हती. मी वेळेचा आपण नेहमी अचूक उपयोग करावा असे व्यवस्थापन मॅनेजमेंटची आवड असल्यामुळे वाटणारा माणूस, त्यामुळे मी ठरविले की why waste this Sunday, आपण आजच सायंकाळी त्या मुलीला पहायला सगळ्यांनी जाऊ या!
मी लगेच फोन उचलला आणि त्या गृहस्थांना सांगितले:"काल तुम्ही आम्हाला, जी पत्रिका दिली ती तुमच्या मुलीची पत्रिका, माझ्या मुलाच्या पत्रिके बरोबर जुळते. त्यामुळे आज संध्याकाळी आम्ही तुमच्याकडे मुलगी बघायला येऊ कां?" आता, गंमत बघा, काल नको नको म्हणत नकार दिला आणि ज्यांची बोळवण केली, त्यांनाच आज मी सांगत होतो की आम्ही तुमच्याकडे येतो! कोणता मुलीचा बाप असा प्रश्न विचारल्यावर, तुम्ही येऊ नका म्हणून सांगेल? सहाजिकच त्यांनी आम्हाला जरूर या असे सांगितले.
आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्याकडे मुलगी बघायला गेलो. मुलाने मुलगी पाहणे वगैरे प्रोग्राम झाला आणि गंमत अशी की मुलाला मुलगी पसंत पडली! यथावकाश त्या दोघांचा विवाहही झाला. जन्मगांठीचं रहस्य खरोखर गुढ असतं हे जे मी म्हणतो ते यामुळेच! जी पत्रिका नको म्हणून नाकारत होतो आणि जे गृहस्थ कधी एकदा बाहेर जातात असे आम्हाला वाटत होतं, त्यांच्याच मुलीशी माझ्या मुलाचं लग्न ठरलं गेलं!
होत्याच नव्हतं होतं, तसंच नव्हत्याचं होतं, सुद्धा अशा योगायोगाने होऊ शकतं, हा अनुभव ह्या विवाहजुळणीच्या कहाणी वरून मला ध्यानांत आला.
ह्या घटनेपायी, सहाजिकच मला नवल वाटलं की, असं का व्हावं? मी विचार करू लागलो. नंतर काही दिवसांनी मला ध्यानात आलं की, माझे वडील आणि आम्ही सगळे कुटुंबीय ज्या बरॅक्स मध्ये रहात होतो, त्या तोडून तिथे एखादी सहकारी सोसायटी बनवून इमारत बांधायचा यशस्वी प्रयत्न केला गेला होता. आपल्या आयुष्याची सारी पुंजी, आपल्या स्वतःच्या सदनिकेत माझ्या वडिलांनी घातली होती. त्या इमारतीसाठी जो प्लॉट या सोसायटीला मिळाला तो ह्या मुलीच्या आजोबांचा होता! गंमत बघा ज्या आजोबांच्या प्लॉटवरील इमारतीत ज्यांची सदनिका होती, त्यांच्याच नातवाशी त्यांच्या नातीचा पुढे विवाह जुळला. विवाहानंतर माझ्या मुलाची उत्तरोत्तर खूप भरभराट झाली आणि आता त्याचे चौकोनी कुटुंब युरोपमध्ये चांगले स्थायिक झाले आहे!"
ह्या रंजक कहाणीवरुन आपली खात्री होऊ शकते की, "जन्मगांठी स्वर्गात जुळतात"हे काही उगाच म्हंटले जात नसावे. आपल्या संस्कृतीमध्ये सात जन्म हाच नवरा मिळू दे अशी जी प्रार्थना केली जाते आणि तसंच होतं अशी समजूत आहे, ती सुद्धा कदाचित खरी असावी. मुलाकडचे किंवा मुलीकडचे कुठल्या ना कुठल्या प्रकारे जागेमुळे म्हणा किंवा माणसांमधल्या संबंधांमुळे म्हणा, काहीना काहीतरी पूर्वी ऋणानुबंध जुळलेले असतात अन् पुन्हा पुन्हा जन्मोजन्मी अशाच प्रकारे जन्मगांठी जुळून येतात, असंच म्हणायचं कां या कथेवरून?
तुम्ही स्वत: विचार करा आणि बघा, वेगवेगळे विवाह कसे जमले ते. त्यामध्ये एकमेकांशी अशा तऱ्हेचे ऋणानुबंध पूर्वी होते कां याचा अभ्यास करा. मला खात्री आहे की, त्यांत काहीतरी तथ्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर असे आहे जन्म गाठीचे रहस्य!
ह्या लेख मालिकेमध्ये, मी म्हणूनच अशा तर्हेच्या रंजक आणि चमत्कृतीपूर्ण विविध विवाहजुळणीच्या कहाण्या तुम्हाला सांगणार आहे.
धन्यवाद.
सुधाकर नातू.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा