बुधवार, ३० जानेवारी, २०१९

"अबीर गुलाल'-संस्मरणीय अनुभव.":



"अबीर गुलाल"

कुठल्याशा एका दिवाळी अंकात श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्यावरील विविध लेख माझ्या वाचनात आले. आता त्या दिवाळी अंकाचं नाव आठवत नाही, पण मधु मंगेश कर्णिक यांनी जे साहित्य निर्माण केले त्याची नोंद मात्र मी तेव्हां घेतली होती.


मला व्यक्तिचित्रात्मक पुस्तक वाचायला खूप
आवडतात आणि त्यामुळे मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबऱ्यांपेक्षा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकांबद्दल मला कुतूहल आणि आकर्षण निर्माण होते. त्यातील "लागेबांधे" आणि "अबीर गुलाल" गुलाल ह्या दोन पुस्तकांची नांवे मी लक्षात ठेवली होती. योगायोगाने लायब्ररीत गेलो असताना, तिथे "अबीर गुलाल" हे पुस्तक मिळाले. ताबडतोब घरी येऊन ते वाचायला सुरुवात केली आणि अक्षरशः दोन दिवसात ते वाचून संपवले पण!


हे पुस्तक म्हणजे विविध प्रकारच्या आणि प्रवृत्तीच्या माणसांचा एक शोभादर्शक आहे. येथे, त्यांच्या सान्निध्यात आलेल्या निवडक व्यक्तींची श्री. मधु मंगेश कर्णिक ह्यांनी त्यांच्या मनावर उमटलेली भावचित्रे रेखाटली आहेत. त्यात त्यांचे शाळेतील साळवी मास्तर, मॅजेस्टिक प्रकाशन आपल्या कर्त्रुत्वाने नावारूपाला आणणारे केशवराव कोठावळे, आपल्या रंगतदार गोष्टींनी त्या काळात सर्व समाजाला मोहवून टाकणारे कशेळीसारख्या आडगांवात चार दशके रहाणारे एकमार्गी वि. सी. गुर्जर, तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि कर्णिकांचे जवळचे आप्त क्रांतिकारक भास्कर कर्णिक ह्यांची ह्या पुस्तकात मर्मस्पर्शी ओळख होते.


त्याचबरोबर एकला चालो रे असे जीवन जगणारे गांधीवादी अप्पा पटवर्धन, मराठी कवितेला, साहित्याला नक्षत्रांचे देणे अर्पिणारा, चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु ह्यांचेही नाट्यमय जीवनविशेष आपल्याला ह्या पुस्तकात अनुभवता येतात. गोव्याच्या भूमीत लहानाचे मोठे झालेले गोव्यावर मन:पूत प्रेम करणारे दोन सुपुत्र, कवीराज बा. . बोरकर आणि व्यक्तीत्वाला चपखल असे नांव असलेले दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर ह्यांची अगदी जवळून पुस्तकात ओळख होते. एक वेगळी अशी बाब म्हणून, माझ्या आठवणींप्रमाणे, कोणे एके काळी सायनच्या शाळेमध्ये शिक्षिका असलेल्या सुमतीबाई देवस्थळे ह्यांचे अत्यंत हृदयस्पर्शी असे दर्शन एका छोटेखानी लेखात होते. ही इतर व्यक्तीचित्रे म्हणजे स्वतंत्र कादंबर्या शोभतील अशी जीवनचित्रे आहेत. तो तो काळ, ती ती माणसे तेव्हांचा समाज आपल्यापुढे पुनश्च जीवंत होतो आणि आपले भावविश्व अधिकच सम्रुद्ध होते. ही किमया मधुभाईंच्या सिद्धहस्त लेखणीची आहे.


खरोखर कर्णिकांचे सूक्ष्म निरीक्षण, मनाचा निखळ ठाव घेणारी, माणसे जोडणारी आपुलकी त्यांच्या मायाळू भाषेतील जिव्हाळ्यातून प्रकट होते. त्यामुळे हे पुस्तक वाचणे हा एक खरोखर आनंददायी अनुभव भासला. ज्यांनी कोणी हे पुस्तक अजून वाचले नसेल त्यांनी जरूर वाचावे. माझ्या वाचनात तसं म्हटलं तर हे पुस्तक खूपच उशिराने आले हेही खरे!


मला भावलेल्या पुस्तकांची अशीच ओळख आपणास नियमितपणे करून देण्याच्या नववर्षाच्या माझ्या संकल्पाची ही सुरुवात आहे.



सुधाकर नातू, माहीम मुंबई १६
Mb 9820632655

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा