"तिला काही सांगायचय"-एक गंभीर संशयकल्लोळ!:
"तिला काही सांगायचयं":एक गंभीर संशयकल्लोळ!:
एका तसबिरी वरून सुखवस्तू अशा एका दांपत्यामध्ये संशयाचे बीज कसे रोवले गेले आणि त्यातून हलकेफुलके संगीतमय असे नाट्य "संशय कल्लोळ" ह्या गाजलेल्या नाटकामुळे आपल्या परिचयाचे झाले आहे. परंतु तिथे केवळ दोन पात्रेच नव्हती तर इतरही अनेक पात्रांचा त्या नाटकात समावेश होता. परंतु हे नवे कोरे श्री. हेमंत एदलाबादकर लिखीत व दिग्दर्शित"तिला काही सांगायचय्" नाटक केवळ दोन तरुण व्यक्तींचे आहे. सहाजिकच केवळ नावावरूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेले हे नाट्य उत्तरोत्तर रंगत जाते.
"तिला काही सांगायचंय" हे नाटक
"झी मराठी" तर्फे सादर केलेले आहे. तर निर्मिती श्री. चिंतामणी थिएटर्सची आहे. "चारचौघी" सारखी चाकोरीबाहेरची नाट्ये सादर करणार्या ह्या नामवंत नाट्यसंस्थेची, नेहमीच विचार प्रवर्तक आणि सामाजिक कौटुंबिक समस्या ऐरणीवर आणणाऱ्या नाटकांची परंपरा आहे. रसिक त्यांचे उत्तम स्वागतही करतात. त्यातून "झी मराठी" सारख्या मीडियातील अग्रगण्य संस्थेचे पाठबळ मिळाल्यामुळे या नाटकाची जाहिरात अतिशय उत्कंठापूर्ण व अनोखे रहस्य प्रकट करणारी होती. सहाजिकच हे नाटक पहाणे क्रमप्राप्त होते.
लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच जाणार्या ह्या कलाक्रुतीमध्ये केवळ नायक व नायिका अशी दोनच पात्रे दिसतात. अर्थात् फक्त दोन पात्रे असलेली नाटके मराठी रंगभूमीला नवीन नाहीत. "आरोप" हे त्यातले एक प्रमुख रहस्यप्रधान नाटक. तर दुसरे "संकेत मिलनाचा" असे कुतूहल जाग्रुत करणारे. दरवर्षी एका ठराविक दिवशी विभिन्न जोडीदार असलेल्या विवाहित स्री व पुरुषाने पंचवीस वर्षे, एकत्र एकाच ठिकाणी भेटून हितगूज करायचे, अशा त्यावेळच्या काळाच्या पुढच्या, अद्भुत संकल्पनेवर बेतलेले हे नाटक पूर्वी विलक्षण गाजले होते. तर त्याच धर्तीवर त्या नाटकाची जागा एका वेगळ्या पद्धतीने घेणार्या नवविवाहित जोडप्याचे असलेले "तिला काही सांगायचय" हे नाटक रसिकांनी पाहण्यासारखे आहे.
"ती" आणि "तो" ह्यांच्या विवाहाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच्या रात्री, त्यांचा एकमेकांमधला रंगत जाणारा व रहस्य निर्माण करत रहाणारा संवाद, असे या नाटकाचे थोडक्यात स्वरूप आहे. पण प्रसंग आणि संवाद अशा खुबीने रंगवत नेले आहेत की, त्यामधून दोघांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीची प्रेक्षकांना हळूहळू कल्पना येत जाते आणि तिथेच नाटकाचे यश आहे.
कोणत्याही नवपरिणीत जोडप्यांचे एकमेकांतील भावबंध हे परस्परांना नीट समजून उमजून घेऊन त्यांच्या गुणदोषांसकट जेव्हा स्वीकार होतो तेव्हाच ते अधिक चांगले बनतात. पण संशयाचे भूत आणि त्यातून आपला जोडीदार दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नादी लागून आपल्याला फसवतो आहे असे काही ढग जर निर्माण झाले तर त्यातून प्रक्षोभ भांडण वितंडवाद, प्रसंगी फारकत हा वास्तव परिणाम असतो.
एकमेकांतील खेळकर संवादातून हे जोडपे रंगमंचावर, संशयाच्या पुलावरून पहाता पहाता प्रेमाकडून विद्वेषाकडे, सुसंवादाकडून विसंवादाकडू कसे वहावत जाते ते पहाणे, हा एक ह्रदयाची धडधड वाढविणारा जीवंत अनुभव आहे. एकमेकांच्या वागणुकीबद्दल संशय घेत ते अशा बिंदूला येऊन पोहोचते की वर्षाचा विवाह चा वाढदिवस साजरा होतो की नाही अशीच शंका निर्माण व्हावी. "ती"ची भूमिका समर्थपणे पेलली आहे तेजश्री प्रधान (अर्थात "होणार सून मी ह्या घरची" मधली जान्हवी) आणि" "तो" झाला आहे, तिला सडेतोड उत्तरे देणारा आणि प्रसंगी अभिनयाच्या क्षेत्रात उजवा वाटणारा आस्ताद काळे (अर्थात सरस्वती मालिकेतील मोठे मालक!)
एकमेकांच्या चारित्र्यावरून घेतलेल्या संशयाचे भूत परमोच्च बिंदूला, ती जेव्हा बोलू लागते आणि रहस्यामागून रहस्ये उलगडतात तेव्हा धक्क्यावर धक्के बसत जातात. पुढे काय होते, सत्य काय असते अन् शेवट काय कसा होतो हे पहाण्यासाठी नाटकच प्रत्यक्ष पहायला हवे.
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा