शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

'ऋतुरंग' दिवाळी अंक"१८: "आशावादी बहुढंगी, बहुआयामी इंद्रधनुष्य!::


ऋतुरंग' दिवाळी अंक"१८: "आशावादी बहुढंगी, बहुआयामी इंद्रधनुष्य!:: 

"काय काय सांगू, कसं बरं सांगू"!

तुम्हाला काय सांगू आणि काय नाही असं मला होऊन गेलेले आहे. काही दिवस असे उगवतात की, एखाद्या मिडास राजाला जसं हात लावीन तिथं सोनं व्हायचं, तसं मला नाटक सिनेमा आणि वाचन ह्यात जे काही समोर येईल ते अत्यंत उत्कृष्ट अविस्मरणीय असते. ह्या आनंदयात्रेची रूजूवात "परफेक्ट मर्डर" या नाटकाने झाली. त्यानंतर "तिला काही सांगायचंय!", ह्या नाटकाने तिच्यावर कडी केली. पुन्हा हे पूर्ण नाही म्हणून की काय त्यानंतर पाहिलेला "भाई" हा चित्रपट आम्हाला दोघांना खूप खूप आवडला.

हे त्यासाठी मी म्हणतो की माझी पत्नी नेहमी नाटक किंवा सिनेमा ला गेली की पुष्कळदा बराच वेळ झोपून जाते. मात्र हा असा पहिला चित्रपट कदाचित खूप दिवसांनी असेल की, ज्यात ती क्षणभरही झोपी गेली नाही व खरोखर तिला इतका आवडला की त्याचा पुढचा भाग कधी येतो याकडे आम्हा दोघांचे लक्ष लागले.

बरं एवढं झाल्यावर नंतर, वाचनाच्या बाबतीत सुद्धा दोन अशा काही गोष्टी समोर आल्या की त्यामुळे माझ्या आनंदाला, समाधानाला पारावार उरला नाही. Just out of the World, अशा अदभूत अवस्थेचा मला अनुभव आला. पहिलं वाचनासाठीचं पंचपक्वान्न "The Week Anniversary Double isdue" च्या रूपात आले! तर त्याच्यावर कळस "ऋतुरंग" दिवाळी अंक'१८ ने चढविला.

हा खरोखर कमालीचा असा दुग्ध शर्करा योग होता म्हणूनच मी म्हणतो की मला काय सांगायचं आणि काय काय तुमच्यापुढे मांडायचं असं होऊन गेलं आहे. इतक्या लांबलेल्या नमनानंतर, मी ऋतुरंग ह्या अंकाविषयी माझ्या मनात जे काही तरंग उमटले ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आपणही न विसरता वरील दोन्ही अंक मिळवावे आणि जरूर वाचावे असे मला प्रारंभीच सांगावेसे वाटते.
"ऋतुरंग हा दिवाळी अंक"१८:
"आशावादी प्रेरणादायी जीवनरंगांचे
बहुढंगी, बहुआयामी इंद्रधनुष्य!:

मुळातच "ऋतुरंग" हा दिवाळी अंक नेहमीच इतरांपेक्षा वेगळा असतो. त्याचे संपादक श्री.अरुण शेवते हे खरोखर अत्यंत कल्पक ग्रहस्थ आहेत. दर वर्षी एखादी नवीन संकल्पना मांडून त्यावर अनेक संबंधित दिग्गजांचे लेखन ते आपल्या दिवाळी अंकातून गेली पंचवीस वर्षे प्रसिद्ध करत आहेत. त्यानंतर त्याचे पुस्तकरूपाने जतन करण्याचाही त्यांचा शिरस्ता अनुकरणीय आहे. "नापासांची शाळा" अशासारखे नामवंतांचे नापास होण्याचे अनुभव हे अशाच एका दिवाळी अंकाचे पुस्तकांतले रुप हे वानगीदाखल दिलेले उदाहरण. ह्या वेळेस अंकासाठी त्यांनी जी संकल्पना घेतली आहे ती खरोखर लोकविलक्षण आणि चित्तथरारक अशीच आहे.

"बीज अंकुरे अंकुरे" ही ती संकल्पना आहे, तिचा मतितार्थ, नवनिर्मिती कशी केव्हां निर्माण होते, तिच्याकरीता बीज निर्माण होणं आणि त्याचं फळ लाभणं ह्या मध्ये पुष्कळ काळही जाऊ शकतो हे आपल्या सगळ्यांनाच आपआपल्या जन्मावरून अनुभवाचे आहे. साधे विचार आणि कल्पना ह्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आपल्या मनात अनेक प्रकारची स्पंदने निर्माण होत असतात, आपण अनेक प्रकारचे अनुभव घेत असतो, त्यातून आपल्या मनात विचार निर्माण होतात, परंतु त्या विचारांना नीट आकार देऊन काहीतरी मूर्त स्वरूपात जगापुढे आणणं, मांडणं म्हणजे कल्पना होय. थोडे विषयांतर म्हणून सांगतो-नाट्यदर्पणच्या कल्पना एक आविष्कार अनेक ह्या गाजलेल्या एकांकिका स्पर्धेची आठवण होते. टबमध्ये स्नान करणार्या आर्कीमिडीजला, अचानक सुचलेल्या तरंगणार्या वस्तुंविषयीचा जगप्रसिद्ध सिद्धांताची गोष्ट आठवा, म्हणजे नवनिर्मिती व तिचे बीज कसे काय अद्भुतरम्य रीतीने अवतरते, ते समजू शकेल।

ह्या वाचनीय अंकामध्ये अनेक मंडळींनी त्यांचे कल्पना ते प्रत्यक्ष आविष्कार ह्या चित्तथरारक प्रवासाचे अनुभव दिलेले आहेत. ते इतके विविध आहेत, की आपल्या भावविश्वापुढे जणू काही भगवंत श्रीकृष्णाच्या विश्वरूपदर्शनासारखे काहीतरी निर्माण होते. प्रत्येकाचा बीजनिर्मितीचा आणि त्यातून उत्कर्ष होणाऱ्या कलाकृतीचा अविष्कार वाचत असताना आपल्याला जो आनंद समाधान आणि तृप्ती लाभते ती शब्दातीत आहे, असे मला तरी अनुभवास आले. मी अक्षरशः भारावून गेलो. अधिक पाल्हाळ न लावता, आता थोडक्यात दिवाळी अंक ऋतुरंग नावाला अगदी चपखल असे निसर्गाचे सहाही ऋतूंचे जणू व्यावहारिक जीवनातील अद्भुत भावतरंग आपल्याला कसे मांडलेले दिसतात ते संक्षिप्त रूपात सांगतो.

आपल्याला जे जमतं,जे करायला आवडतं, ज्यातून आपल्याला खरोखर आंतरिक समाधान मिळतं, असं जेव्हा माणसाकडून सातत्याने घडत जातं तेव्हा अतिशय सुंदर निर्मिती होऊन जाते. पण आपल्याला खरोखर हे असं काय आवडतं ते शोधण्याच्या धडपडीतूनच त्या निर्मिती साठीचे बीज उत्पन होते, हेच मुलभूत तत्व येथे ज्याने त्याने उभे केले आहे. त्यायोगे विविध क्षेत्रांतील बारकावे तपशील अडचणी व आव्हाने आपल्यासमोर उलगडत जातात.

"रेषामैत्री":
डॉक्टर आनंद नाडकर्णी हे विख्यात मानसरोगतज्ञ डॉक्टर, पण त्यांची रेषामैत्री अर्थात रेखाचित्रे काढण्याची आवड कशी केव्हा जोपासली गेली आणि त्यातून त्यांना कसकसा आनंद मिळत गेला ते वाचणे, त्यांची रेखाचित्रे पहाणे, खरोखर मोलाचे आहे आणि नवलाचे आहे.

"पूर्णब्रह्म":
एका विमान प्रवासात ह्या लेकुरवाळीला शाकाहारी भोजन न मिळाल्यामुळे जवळजवळच २४ तास उपाशीपोटी राहायला लागते आणि त्या अपमानास्पद अनुभवातून तिच्या मनात, अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांचे "पूर्णब्रह्म" असे अनुरूप नांव असलेले हॉटेल निर्माण करण्याची उर्मी आकाराला येते. त्याकरता किती कष्ट, कुणाकुणाची साथ आणि काय काय करायला लागते, ते "आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना" ह्या लेखात जयश्री कंठाळे ह्यांचे मनोगत मानसी होळेहुन्नुर ह्यांनी सहजसुंदर शैलीत मांडले आहे.

"पिस्तुल्या":
आज "सैराट" चित्रपटा द्वारे घरोघरी पोहोचलेला आणि सर्वाधिक उत्पन्न निर्माण करणाऱ्या चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक म्हणून नांवारूपाला आलेल्या नागराज मंजुळेचे, चित्रपट क्षेत्रातील बीजरोपण "पिस्तुल्या" ह्या त्यांच्या लघुपटाने कसे झाले ते शब्दांकित केले आहे, सविता दामले ह्यांनी. त्याकरता शब्दांकन केलेले, नागराज यांना किती उपद्व्याप व आटापिटा करायला लागला आणि अत्यंत अपुऱ्या साधनांद्वारे त्यांनी पहिल्याच पदार्पणात "पिस्तुल्या" सारखा तळागाळात शिक्षणप्रसार करणारा सर्वोत्तम ठरलेला राष्ट्रीय पारितोषक पुरस्कर विजेता लघुपट कसा निर्माण केला, ते अनुभवणे प्रेरणादायी आहे. असामान्य कलाकार किंवा कलावंत कसा घडत जातो, हे आपल्याला ह्या जिद्दीच्या अनुभवावरून समजते.

"झिपर्या":
आज दूरदर्शन वर उत्तम टीआरपी मिळवून लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या "माझ्या नवऱ्याची बायको" ह्या मालिकेचा दिग्दर्शक केदार वैद्य याची "२४" वर्षानंतर ही कहाणी खरोखर विचार करायला लावणारी आहे अरुण साधूंच्या कादंबरीवर झिपऱ्या हा चित्रपट केदारला २४ वर्षापूर्वी सुचला होता, पण तो प्रत्यक्षात यायला मधला धडपडीचा आणि स्वतःला मनोरंजन क्षेत्रात प्रस्थापित करण्याचा काळ कसा जावा लागला आणि नंतर हा चित्रपट त्याने कसा निर्माण केला ही कहाणी या सविता दामलेंनी शब्दांकीत केलेल्या लेखात आहे.

"इदं न मम":
सगळीकडे ताणतणाव महाराष्ट्र आणि त्यापोटी प्रसंगी आत्महत्या असे चित्र असताना एक माणूस त्याच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी प्रत काय ठरवतो आणि ते प्रत्यक्षात कसे आणतो ते डॉक्टर अविनाश सावजी यांच्या माणसे घडविणाऱ्या उभे करणाऱ्या शेताच्या मशागती वरून श्री दिनेश गुणे यांनी मांडले आहे. अडचणींना संकटांना प्रसंगी रंगांना सोंग मध्ये जगण्याची उर्मी निर्माण करणाऱ्या या अवलियाचे प्रेरणादायी कर्तृत्व खरोखर कुठेही न सापडणारे आहे. प्रत्येक दिवस काहीना काहीतरी समाजासाठी उत्तम योगदान घडवणारा घालवायचा असे पन्नासाव्या वर्षी ठरवणार्‍या अविनाश सावजींच्या "सेवांकुर" "प्रयास" आणि "लिटल चँम्पस्" ह्या तीन संस्थांना सलाम!

"आदर्श कायापालट":
"माझे दत्तक गाव मोरया चिंचोरे" ह्या लेखातून "यशवंत सामाजिक प्रतिष्ठान" नेवासा येथील प्रशांत गडाख-श्री. यशवंतराव गडाख ह्यांचे सुपुत्र- त्यांनी एका छोट्याशा खेड्यात परिपूर्ण असे तंटामुक्त, स्वयंपूर्ण आणि नितीमत्तेला प्राधान्य देणारे प्रमाण मानणारे आदर्श गाव कसे उभे केले हे या लेखातून आपल्या समोर येते. ही अशीच आमुलाग्र बदलाची लाट जर देशात खेडोपाडी आली तर आपला देश खरोखर सुजलाम सुफलाम आणि जगामध्ये सगळ्यांचे नेतृत्व करणारा होईल यात वाद नाही.

"काळोखातून प्रकाशाकडे":
रॉबर्ट फ्रॉस्ट या जगविख्यात अमेरिकन कवीचे तितकेच जगन माननीय काव्य आणि त्या काव्यनिर्मिती ची कहाणी आपल्यापुढे विजय पाडळकर पाडळकर यांनी "काळोखातून प्रकाशाकडे" या लेखातून मांडली आहे:
त्या जगप्रसिद्ध काव्याचा शेवट:
"-But I have Promises to keep,
-And miles to go before I sleep,
-And miles to go before I sleep.
प्रत्यक्ष जीवनातील एका विचित्र अनुभवातून जी वेदना निर्माण होते, तिचे चक्क १७ वर्षानंतर अशा प्रेरणादायी काव्यात रूपांतर कसे होते ते ह्या लेखातून अनुभवणे खरोखर अविस्मरणीय. त्या काव्यात दुर्दम्य आशावाद निर्माण करण्याची ताकद आहे.

"वाचाल, तरच वाचाल":
शुभम साहित्य-( राजेंद्र ओंबासे), अक्षरधारा-(रमेश राठिवडेकर), आणि उत्कर्ष प्रकाशन( सु.वा.जोशी) ह्यांच्यासारख्या विचारांची जीवनानुभवांची ज्ञानगंगा महाराष्ट्रातील घरोघरी पुस्तक प्रदर्शनातून पोचविणाऱ्या प्रकाशन संस्थांचे हे तीनही मालक कोणे एके काळी अतिसामान्य असे जीवन कसे जगत होते, वेळप्रसंगी हमाली वा पडेल ते काम करून ह्या माणसांनी, प्रतिकूल परिस्थितीत संकटांमधून मार्ग काढत शून्यातून विश्व उभे करत, आज नांवारूपाला आलेल्या आपआपल्या प्रकाशन संस्था कशा निर्माण केल्या, त्याचे वर्णन प्रत्येकाने, आपल्या स्वानुभवावरून पारदर्शक रीतीने आणि प्रांजळपणे मांडले आहे. ही अशी माणसे जर "नाही रे" मधून असे सोन्यासारखे यश मिळवतात तर आपल्यासारख्या सर्व गोष्टी अनुकूल असताना आपण खरंच काय करतो, काय साधतो, असा यक्षप्रश्न आपल्या मनात घर करून जातो. त्यामुळे खरोखर आपलीच आपल्याला लाज वाटू शकते.

"मुळ्येकाकांचे संमेलन":
कायम पांढऱ्याशुभ्र विषयात असलेले नाट्यवर्तुळात चोख व्यवस्थापक म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. अशोक मुळे कसे जगावेगळे अवलीया आहेत ते आणि त्यांना जे वाटते जसे वाटते ते स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर वेगवेगळ्या संकल्पना प्रत्यक्षात आणून त्या आगळ्या वेगळ्या संमेलनांद्वारे कसे सिद्ध करतात त्याचे प्रत्यक्ष दर्शन एका लेखात आपल्याला इथे घडते. "माझा पुरस्कार", "कलाकारांच गुढीपाडवा" "एकत्र कुटूंब-सुखी कुटुंब", ज्येष्ठ कलाकारांचे "भेटीलागी जीवा", "असेही एक साहित्य संमेलन"-ज्यामध्ये मुळ्येकाकांनी "ऋतुरंग"चे संपादक श्री.अरुण शेवते ह्यांना समेलनाध्यक्ष म्हणून बोलविण्याचे औचित्य दाखवले होते. असे निर्लेप मनाचे गुणवंतांना शोधून त्यांना यथोचित दाद देण्याचे औदार्य व सौहार्द दाखविणारे आणि तितक्याच पारदर्शी परखड वाणीचे श्री. अशोक मुळ्ये आणि त्यांची ही संमेलने होत असतात, म्हणून तर आपल्या जीवनांत क्रुतक्रत्यतेचे रंग भरले जातात.
माझा वैयक्तिक बालपणीचा असा अनुभव ह्या अवलिया माणसाचा आहे. तेव्हा माझ्या जवळच्या नातेवाईकांकडे पाच-सहा दशकापूर्वी मी गोरेगावकर बिल्डींग गिरगाव येथे नातेवाईकांकडे जात असे. तिथेच शेजारी रहाणारा, हा किडकिडीत असा अशोक त्यावेळेला मी पाहिला आहे. तेव्हांपासून माझ्या मनातून तो कधीही गेला नाही आणि आज त्यालाच हे असे अद्वितीय यश आणि त्याच्या कार्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून मला थक्क व्हायला होते.

"नाथा घरची उलटी खुण":
जुई कुलकर्णी यांनी "नाथा घरची उलटी खुण" ह्या लेखाद्वारे वेगवेगळ्या नामवंतांच्या विविध प्रकारच्या निर्मिती क्षणांचा आणि त्यासाठी अंकुरलेल्या बीजांचा वेध आपल्या लेखात घेतला आहे.

"पत्रकारीतेचा श्रीगणेशा":
दहावीनंतर एका उद्योजकाकडे पायपीट करायला लागणारी कुरियर बाँयसारखी अत्यल्प पगाराच्या नोकरीला मालकाशी मतभेद झाल्यामुळे लाथ मारणारा नितीन चव्हाण हा तरूण पुढे यशस्वी पत्रकार कसा झाला ते सांगणारी कहाणी इथे आहे.

"त्याने पंख दिले":
पाचव्या वेतन आयोगामुळे मिळणारी पगारवाढ स्वखुशीने नाकारणारे जगावेगळे शिक्षक श्री.हेरंब कुलकर्णी नाही रे वाल्या वर्गाच्या चळवळीत कसे पडले त्याची ही ह्रदयस्पर्शी कथा कोणाही सह्रदय माणसाला हलवून स़ोडेल.

ही सारी उदाहरणे केवळ वानगीदाखल दिली. ह्या अंकातील इतर लेखांमध्ये गुलजार आणि त्यांची कन्या मेघना गुलजार यांच्या निर्मिती अनुभवाबरोबरच, श्री. गिरीश कुबेरांचे "तेल त्रिवेणीचा उगम" ही त्यांच्या अभ्यासू व्रुत्तीची प्रेरक कथा इथे आपल्याला वेगळ्यच जगात नेते. दीपिका पडुकोण ह्यांच्या "लिव्ह लव अँड लाफ" प्रतिष्ठानच्या निर्मितीमागचे रहस्यही ह्या भरगच्च संग्राह्य अंकात आहे. त्याशिवाय असलेले, इतर अनेक विषयांवरचे बीजनिर्मिती ते प्रत्यक्ष फळ ह्यांचे चित्र खरोखर वाचनीय असेच आहे. प्रत्येकाने वाचावा आणि त्यातील वेगवेगळ्या अनुभवातून काहीतरी धडा घ्यावा असाच हा सारा खजिन्यांतला ऐवज आहे.

माणूस आणि पशु यांच्यामध्ये जो फरक आहे तो हा की, विचार करणे, कल्पना रंगवणे आणि ती प्रत्यक्षात आणणे याबरोबरच भावना आणि भावनांचा अविष्कार करता येणे हा आहे. त्याचे आपण प्रत्येकाने भान ठेवून, आपल्याला काय आवडते, आपण काय उत्तम करू शकतो आणि आपल्याबरोबर इतरांना आनंद देणारे उपयोगी असणारे काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करावा असे बोधाम्रुत पाजणारी ही साहित्यिक मेजवानीच जणु आहे.

तर असे आहे, "ऋतुरंग" दिवाळी अंक'१८चे, आशावादी प्रेरणादायी जीवनरंगांचे बहुढंगी, बहुआयामी इंद्रधनुष्य! एकमेवाद्वितीय अशा "ऋतुरंग" दिवाळी अंकाद्वारे श्री अरुण शेवते ह्यांनी आपल्यापुढे चितारले आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व त्यांना शुभेच्छा.
आपण प्रत्येकाने त्याचा आस्वाद घ्यावा असेच माझे सांगणे आहे.

सुधाकर नातू, माहीम मुंबई१६
Mb 9820632655

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा