सोमवार, २१ जानेवारी, २०१९

"आरण्यक"-एक अंतर्मुख करणारे तत्वज्ञान":



"नाद, हा खुळा!":
एखादी गोष्ट जेव्हा आवडते आणि तीच तीच करावीशी वाटते त्याला कुणी नाद असे म्हणतात. ह्याला नाद लागला, तर कोणी खूळ लागलं असं म्हणतात! नाद न म्हणता, मी तर ह्याला खूळ असंच म्हणतो आणि मलाही असंच एक खुळ, तरुणपणापासूनच लागलेलं आहे. ते म्हणजे चांगलं वाचायचं, नाटक सिनेमा बघायचं!

हे माझं खुळ, चांगलं का वाईट ते ज्याचे त्याने ठरवावे, पण त्याचा एक फायदा मात्र मला आता निवृत्तीनंतर खूप खूप होतो आहे. वेळ जायला तर ते खूळ हे साधन होतं, परंतु त्याचबरोबर विचारांना चालना देत, मेंदू ताजातवाना राहतो. काय घडतयं, कुठे काय होतंय, त्याचीही जाणीव त्यामुळे होते व कुणाचं आयुष्य कसं काय काय भोगत गेलं तेही उमजतं. त्यामुळे माझं हे खूळ असंच चालू राहणार आहे.

पण गोष्ट इथेच थांबत नाही, याच्यापुढे अजून एक खूळ लागले आहे. ते म्हणजे कधी काही चांगलं वाचलं, तसं पुस्तक मिळालं, विचार करावा असं नाटक किंवा सिनेमा बघायला संधी मिळाली तर, त्यानंतर जे काही मनात उपजेल, ते एखाद्या टीपकागदासारखे शब्दात पकडून (कागदावर पूर्वी), पण आता मोबाईलवर उतरवायचं खूळ मला लागले आहे.

तशी माझी लिखाणाची सवय होतीच. पूर्वी कागदावरचं होतं आणि अनेक मासिकांमध्ये माझे लेखही छापून यायचे. पण आता जे समाधान मिळते, ते तसं पूर्वी मिळत होतं असं नाही, कारण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मला व्हाट्सअप वर किंवा फेसबुकवर हे खूळ हजारो लोकांबरोबरही शेअर करता येतं! तेही एका क्लिकने, क्षणार्धात!

आणि हे असंच चालू राहणार आहे. ह्या पूर्वी,
"ऋतुरंग" दिवाळी अंक"१८: ची रसास्वादवजा ओळख मी तुम्हाला करून दिली होती. आता एक नाटक नुकतच बघितलं व त्या अनुभवांचं, माझ्या मनावर उमटलेले चित्र पुढे पाठवत आहे. ते गोड मानून घ्या:

"आरण्यक"-अंतर्मुख करणारे तत्वज्ञान":

दादरच्या यशवंत नाट्यमंदिरात काल "आरण्यक" नाटक बघितले. खूप दिवस ह्या नाटकाच्या मुंबईतील प्रयोगाची प्रतीक्षा करत होतो. महाभारतातील शेवटच्या पर्वाची ही एक ह्रदयस्पर्शी कहाणी आहे. हे नाटक सुमारे तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर होऊन चांगले नाव मिळवून गेले होते याचीही कल्पना होती. त्यामुळे मुद्दामून ज्या दिवशी तिकीट विक्री सुरू होत होती, तेव्हाच जाऊन तिकीट काढले त्यामुळे जागाही हॉलमध्ये अतिशय चांगली मिळाली.

ह्या नाटकामध्ये रंगभूमीची आयुष्यभर ज्यांनी अहर्निश तपस्या केली आहे, अशा आदरणीय व्यक्तींचा सक्रिय सहभाग आहे. स्वतः लेखक दिग्दर्शक श्री. रत्नाकर मतकरी, चिमणराव म्हणून उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले चतुरस्त्र आणि अष्टपैलू कलावंत श्री. दिलीप प्रभावळकर( विदूर) आणि ज्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि भरदार आवाजामुळे तसेच विलक्षण आत्मविश्वासामुळे येईल ते काम चोख करणारे रवी पटवर्धन( ध्रुतराष्ट्र), ह्यांच्याच बरोबर श्रीमती प्रतिभा मतकरी (गांधारी) आणि श्रीमती मीनल परांजपे (कुंती) असे रंगभूमीवरचे जानेमाने कलाकार पुनश्च ह्या नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. हा एक मोठा दुग्ध शर्करा योगच म्हणायला हवा. जोडीला नव्या पिढीतले श्नी. नकुल घाणेकर (धर्मराज) आणि श्री. विक्रम गायकवाड(सुत्रधाराप्रमाणे असलेला प्रतिहारी) आदी कलावंत. अशा समूहाचे महाभारतासारख्या पुराणातल्या कथेवर नाटक बसवायचे, म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. अनुरुप असा रंगमंच आणि त्यावरचे देखणे अनुरूप नेपथ्यदृश्य, दोन प्रकारचे आणि दोन खंडात आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते. 

पहिल्या खंडात राजाचा महाल, तर दुसऱ्या खंडात वटवृक्षाच्या छायेत असलेला अरण्याचा माहोल ह्या पार्श्वभूमीवर, सव्वा दोन तास जे अद्भुतरम्य नाट्य रंगमंचावर उलगडत गेले, ते रसिक प्रेक्षकांनी अगदी श्वास रोखून पाहिले.
समानमानसी रसिकजनांच्या समूहामध्ये बसून अशा तऱ्हेचे जीवननाट्य, ज्यामध्ये महाभारताची ओझरती अशी शोभादर्शकासारखी कहाणी नजरेसमोर आपोआप उलगडत जाणे हे अनुभवणे खरोखर जगावेगळे आणि आनंददायी असते.  हा संस्मरणीय अनुभव या नाटकाने आम्हाला दिला आणि पाचशे रुपये असा तिकिटाचा चढा दर असूनही तो जास्त आहे असे म्हणूनच बिलकुल वाटले नाही. आणि आपल्याला पुरेपूर मिळाले, असे समाधान वाटण्याइतके हे नाटक उच्च दर्जाचे होते. प्रत्येक पात्राचा सहभाग, चपखल हालचाली आणि कठीण असलेले पद्यमय संवाद स्मरणात ठेवून म्हणणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. तसेच ह्या सगळ्या समूहाकडून योग्य प्रकारे समन्वय साधून नाटकाचे हे सबंध प्रारूप सिद्ध करणे हे तर महाकर्म कठीण.

महाभारतातला अती भेसूर नरसंहार झाल्यावर महाभारतातलं महायुद्ध संपले आहे. सारे शंभर कौरव धारातीर्थी पडलेले आहेत एकटा एकशे एकावा कौरव युयुत्सु भ्रमिष्ट होउन जखमांनी विव्हळत आहे आणि धर्मराजाचे राज्य सुरू झाले आहे, अशा कालखंडात हे नाटक सुरू होते. जे धारातीर्थी आपले बंधू गतप्राण झाले त्यांच्या आत्म्याला शांती म्हणून धर्मराजा करवी योग्य ते संस्कार विधी, दानधर्म पार पडल्यानंतर विदुर धृतराष्ट्र गांधारी व कुंती ह्यांनी सर्वसंग परित्याग करून अरण्याची वाट धरली आहे आणि अरण्यातच त्यांचा अंत होतो असे चित्र रंगवणारे हे नाटक आहे.

इथे माणसाच्या जीवनातील कडू गोड रंग,  नात्यांमधले गुंते आणि जीवनातील विविध प्रकारची परस्परविरोधी मुल्ये ह्यांचे द्वंद्व अशांचा ऊहापोह होत असलेला आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येकाचे आयुष्य हे खरोखर चमत्कृतीपूर्ण अशी कादंबरीच असते. कुणी पहाता पहाता रावाचा रंक होतो तर कधी रंकांचा रावही होऊन जातो असे वास्तववादी अशाश्वतेचे जीवन चित्र आपल्यासमोर उभे राहते. महाभारतातील लोकविलक्षण अशा परिस्थितीचा आणि सद्यस्थितीचा एकमेकांमधील संबंध आणि मतितार्थ आपोआपच मनात वादळ निर्माण करत राहतो. त्या दृष्टीने एक संपूर्ण वेगळे रंगतदार आणि जीवनाकडे पाहण्याची निर्लेप बुद्धी देणारे हे नाटक जे ह्या समूहातर्फे मोठ्या दिमाखात सादर झाले आहे.

जाता जाता अगोदर ज्ञात नसलेल्या अशा काही गोष्टी मला या नाटकात आढळल्या. पहिली म्हणजे, आपण आत्तापर्यंत शंभरच कौरव आहेत असेच समजत होतो, पण एकशे कावा युयुत्सु होता ही गोष्ट. ज्या गांधारीने विवाह होताक्षणी आपला पती आंधळा आहे हे समजताच, पतिव्रता ह्या न्यायाने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून घेतली,  ती पट्टी, अरण्यवासात काढून टाकते, ही दुसरी गोष्ट आणि तिसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे दूर पश्चिमेला समुद्रकाठी द्वारका स्थापन करून यादवांचे राज्य निर्माण करणारा भगवंत श्रीकृष्ण तिकडे हस्तिनापूरच्या जवळपासच्या जंगलात येऊन एका व्याधा तर्फे मारला जातो ही तिसरी गोष्ट. ह्या तीन घटना अथवा गोष्टींची सत्य स्थिती जाणणे हे काम आपण इतिहास संशोधकांवर सोडून देऊ शकतो. अथवा कदाचित ज्याला आपण क्रिएटिव्ह लिबर्टी म्हणतो ती येथे घेतली गेली, असे समजून तिच्याकडे दुर्लक्षही करू शकतो.

ह्या कलाक्रुतीचे आज गावोगावी रसिकांसमोर धुमधडाक्यात प्रयोग होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. ह्या नाटकातील बरेचसे प्रमुख कलाकार वयोवृद्ध तपोवृद्ध असूनही ज्या जिद्दीने आणि तन्मयतेने आपल्या भूमिकेशी एकरूप होऊन नाटक सादर करतात, हे पाहून त्यांच्या रंगभूमीवरील निष्ठेची आपल्याला कल्पना येते आणि आपण खरोखर त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. संपूर्ण टीमला मन:पूर्वक शुभेच्छा. अनेक दिवसांनतर एक अंतर्मुख करणारा जातीवंत नाट्यप्रयोग बघायला मिळाला याचे समाधान लाभले, हे आमचे अहोभाग्य!

सुधाकर नातू, माहीम मुंबई १६
Mb 9820632655



माझ्या सॅमसंग गेलेक्सी स्‍मार्टफोन वरून पाठवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा