'आयडियाच्या कल्पना':
प्रत्येक मालिकांचे 'सुगी'चे दिवस केव्हां ना केव्हांतरी संपायला येतातच. नंतर सुरू होते, त्यांत येन केन प्रकारेण 'पाणी' घालत ती लांबवत नेणे. असे 'पाणी' घालत रहाण्याने मालिका पचपचीत होऊन, प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहिली जाते. सर्वांनाच हे 'पाणी' चतुराईने घालणे जमतेच असे नाही. म्हणून आम्ही येथे तशा अवस्थांना पोहोचलेल्या काही मालिकांना 'आयडियाच्या कल्पना' सुचवायचे उपद्व्याप करत आहोत:
'राणा, अंजलीबाई आणि "तो':
झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मध्ये अडाणी राणादा व मास्तरीणबाई अंजलीची अतिशय सुंदर रितीने रंगत गेलेली हवी हवीशी प्रेमकहाणी आता नायिकेच्या परदेशगमनामुळे, पाणी घालायच्या वळणावर आली आहे. अंजलीला सतत पाण्यात पहाणार्या धाकट्या नंदिनीचे खलनायिकी कारनामे खरं म्हणजे आता चावून चोथा झाले आहेत. त्यामुळे एकट्या पडलेल्या राणादाला पिडण्याचे खेळ नक्कीच दाखवले जातील. पण त्यापेक्षा लै भारी आयडिया आम्ही मांडतो. अंजली तिकडे फाँरीनला रमलेली आणि तिच्या बरोबर प्रशिक्षणाला आलेल्या एका सहकार्यांत नकळत गुंतत चाललेली व त्यापायी राणादाला विसरत चाललेली दाखवावी. आधीच वहिनीसाहेबांच्या निरनिराळ्या हरकतींमुळे गांजलेला राणा अखेर कुस्तीत हरतो आणि अंजलीबाईंना वचन दिल्याप्रमाणे ती गदा मिळवू शकत नाही. निराश हताश राणा एकीकडे, दुसरीकडे अजून पर्यंत अडाणी राणाकडून 'लग्नाचे प्रेम' न मिळालेली अंजली अफेअरमध्ये गुरफटत चाललेली दाखवावी. मालिका पहाता पहाता लांबत जाईल आणि रंगतही जाईल!
'माझ्या नवर्याची बायको':
नवरा गुरुनाथने शनायाच्या नादी लागून, राधिकाची तिच्यादेखत, दुसर्यांदा चक्क फसवणूक करूनही ती त्याचा झट्की, पट्, बदला न घेता जो फारच स्लो मोशन बदला घेते. हा खटाटोप एकदाचा कधी संपतो ह्याचीच आता, प्रेक्षक वाट पहात आहेत. कहानीमे जबरदस्त ट्विस्ट देण्याची वेळ आली आहे. तेव्हा आयडियाच्या कल्पना दोन: सध्या सिंगल असलेल्या गुप्तेचे व रेवतीचे सूत जुळलेले दाखवावे आणि रेवतीचा, तिला सोडून गेलेला नवरा राधिकाची मदत घेत, तीला परत मिळवायची धडपड करताना दाखवावा. आँप्शन दोन म्हणजे, राधिकाबद्दल आधीच साँफ्ट काँर्नर असलेल्या कपूरसाहेबांनी राधिकाला मोठे काँट्रॅक्ट देता देता तिच्यांत गुंतावे. स्वत:च्या डोळ्यासमोर आपल्या बाँसचे राधिकाबरोबरचे प्रेमाचे चाळे, नाईलाजास्तव गुरुनाथला पहावे लागावे. हा त्याला, त्याच्या बाहेरख्याली व्रुत्तीबद्दल, दैववशात मिळालेला न्याय ठरेल!
मालिकांची महाराणी’:‘लेक माझी लाडकी’:
एखादी मालिका 'पाणी' न घालता, लांबवावी कशी, ते ‘स्टार प्रवाह’ वरील, ‘लेक माझी लाडकी’च्या सादरकर्त्यांकडून शिकावे. एखादे रहस्य निर्माण करून, त्या भोवती कथानक व घडामोडी उत्कंठावर्धक रितीने फिरवत मालिका पुढे न्यायची, असा मंत्र त्यांनी यशस्वीरीत्या प्रत्यक्षात आणला आहे. अनाथ म्हणून वाढत असलेल्या मीराचे आई व बाप कोण आहेत, हे कोडे प्रथम गुंफले. ते एकदाचे सुटल्यावर आता मालिका संपणार असे वाटत असताना विवाहित साकेत, जणु ‘डर’ चित्रपटातील ‘शहारूख’सारखा झपाटून, मीरावर एकतर्फी प्रेम काय करु लागतो आणि कथेला ट्विस्ट देण्यासाठी रूषिकेषची नाट्यमय एंट्री! मीराचे व रूषिकेषची उत्कट प्रेमकहाणी आणि ती फसावी म्हणून साकेतचा आटापिटा, त्याला शह म्हणून सानिकाची खलनायिकागिरी, हे सारे फिरव, फिरव फिरवले जात आहे. नंतर हाच सिलसिला असाच अजून 'पाणी घालत' पुढे न्यायचा असेल तर एक अफलातून आयडिया सुचवितो: आता रूषिकेषची आई वत्सलाबाई व आदित्य सामंतचे अफेअर रंगवावे, म्हणजे त्याला उरलेल्या सर्वांचा प्रखर विरोध झालेलाही खुप दिवस दाखवता येईल!
'प्रतिभावान लेखकांचा दुष्काळ':
कलर्स वाहिनीवरील, 'अस्सं सासर सुरेख बाई' मालिका कशीही लांबवत नेण्याचा खटाटोप पाहून, हसावे की रडावे, तेच कळत नाही. नायक यशचा म्रुत्यु, नंतर नायिका जुईची भूमिका, नव्याच अभिनेत्रीकडे दिली जाणे; एवढेही पुरे नाही म्हणून यशची भूमिका करणार्या कलाकाराची नायकाच्या रुपात पुन्हा एंट्री, हे म्हणजे मालिका वाटेल तशी भरकटत कशी न्यावी, ज्याचं अनुकरण बिल्कूल करु नये, असं उदाहरण ठरावे. तसाच प्रकार 'स्टार प्रवाह' वरील, इतके दिवस तग धरून असलेल्या 'दुहेरी' मालिकेचा! मैथिली व सोनिया ह्यांचा गोल गोल फेरा प्रेक्षकांना कंटाळा येईतोपर्यंत मारला जातोय आणि बळवंत बल्लाळ व जेके दांपत्यातील हाडवैर काही केल्या संपतच नाहीये! अगदी काही दिवसापूर्वीच 'स्टार प्रवाह' वरील वर्षांनु वर्षे चाललेली 'पुढचं पाऊल' मालिका लगेच पुन:च्य कां वाहिनीवर अवतरली आहे न कळे! 'कलर्स' वरील 'तुकारामाची गाथा' प्रेक्षकांच्या सांगाती रहाणे काही केल्या सोडत नाही. नव्या मालिकांचा तुटवडा असावा, बहुदा; म्हणूनच ह्याच वाहिनीवर रात्री ९वाजता, काँमेडीची आदळ आपट सुरू असते. प्रतिभावान व कल्पक लेखकांचा दुष्काळ असल्याचेच हे लक्षण नव्हे कां?
सुधाकर नातू माहिम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा