मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४
" छाप(पड)लेले शब्द-E1 to 5 !":
👍"छाप (पड)लेले शब्द-E1 !":👌
💐"ह्रदयप्रत्यारोपण-'अश्रूंची झाली फुले !":💐
👍"एकीकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे खेडोपाडीचे तुम्हालाही लाज वाटावी असे चित्र समोर असताना मुंबईच्या KEM इस्पितळातील हृदय प्रत्यारोपणासारखी विक्रमी करामत जेव्हा होते, तेव्हा
'अश्रूंची झाली फुले !' असेच म्हणावेसे वाटते.
गेल्या 50/60 वर्षांमध्ये आरोग्यविषयक आणि तंत्रज्ञानविषयक जी गरुडभरारी घेतली जात आहे आणि संशोधनात्मक अनेकानेक किमया साध्य केल्या जात आहेत, त्यामुळे माणसांचे आयुर्मान जे केवळ 40 च्या आत घरात होते, ते आता 70 पर्यंत जाऊन पोहोचले आहे ही खरोखर भूषणावर गोष्ट आहे ! नवनवीन अशी मशीनस् आणि त्यांच्या वापराचे असामान्य कौशल्य प्राप्त करणारी डॉक्टर मंडळी, यामुळे विविध प्रकारची ऑपरेशन्स ही कोणालाही एकेकाळी बुचकळ्यात पाडू शकतील अशी होत आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे हे हृदयप्रत्यारोपण होय.
अवयवदानाचा सिलसिला मात्र अजून म्हणावा तितका वेग घेताना दिसत नाही, हेच या सोबतच्या वृत्तावरून मात्र समजते. कोणी एकेकाळी केवळ आय बँक म्हंणजे नेत्रदान हेच फक्त माहीत होते. त्या प्रकारे अनेक जण नेत्रदान करतही असत आणि अंधांना दृष्टी मिळत असे. पण आता एकेक ऐकावे असे नवलच घडत आहे, किडनी ट्रान्सप्लांट हा त्यातील एक अत्यंत वाढीला जाणारा असा प्रकार, त्या पाठोपाठ लंगड्या माणसांना कृत्रिम पाय जयपूर फुटाच्या रूपाने प्राप्त झाल्यामुळे लंगडेपण दूर झाले आहे. तसेच गोष्ट हात वा हाताची बोट वगैरे अशा प्रकारचे प्रत्यारोपण घडत आहे. एवढेच काय पण यकृताचेही प्रत्यारोपण करणे आता शक्य झाले आहे. पण माणसाचे हृदय म्हणजे त्याला जीव की प्राण असे वाटू शकणारा अवयव. ह्या हृदयप्रत्यारोपणामध्ये साहजिकच ज्या व्यक्तीचे ह्रदय, मृतावस्थेनंतर दिले, त्याचे नातेवाईक कौतुकास प्राप्त आहेत. ज्यांना मिळाले हे हृदय त्या व्यक्तीला तर नवीन जीवनदान मिळाले, हीच तर 'अश्रूंची झाली फुले' ची कहाणी आहे. अंधाऱ्या काळोखाच्या बोगद्या नंतर प्रकाशाला वाव आहे हेच या आधुनिक 'दधीची'ने दाखवून दिले आहे.
वैद्दकीय क्षेत्रात उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहणार आहे आणि एकीकडे माणसांचे आयुष्य वाढत जाऊन, त्यांना सर्व प्रकारचे कृत्रिम अवयव कदाचित बाजारात मिळू शकतील अशी कल्पना आपण करू शकतो. जसे आपण टीव्ही माॅडेल बदलतो, प्रेशर कुकर नवीन आणतो, पंखे बदलतो त्याप्रमाणे माणसं आपल्याला हवा तो अवयव बाजारातून कदाचित घेऊ शकतील ! तो बसवण्याचे तंत्रज्ञान कौशल्य उपलब्धही होईल, अशी आपण आशा करू शकतो, हेच ह्या वृत्ताचे फलित म्हणावे लागेल. विश्वामित्राने जशी प्रतिसृष्टी निर्माण केली, त्याप्रमाणे आता माणूस कदाचित ते साध्य करू शकेल.
KEM मधील डॉक्टर आणि त्यांच्या समूहाला ह्या यशस्वी हृदयप्रत्यारोपणाच्या कामगिरीबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद तर द्यायला हवेत व त्यांचे शतशः अभिनंदन देखील करायला हवे !":👌
####@####@
👍"छाप (पड)लेले शब्द-2 E !":👌
💐" मुंबईतील 'नावलौकिक' मिळवणाऱ्या 'पाऊलखुणा' !":💐
👍" मुंबई शहर हे आज जसे आहे, तसे पूर्वी नव्हते. ते म्हणजे सात बेटांचे समूह असलेले होते. प्रथम पोर्तुगीजांचे असलेले हे शहर नंतर ब्रिटिशांना आंदण म्हणून राजपुत्राच्या विवाहानिमित्त मिळाले.
मुंबईच्या रस्त्यांना जो इतिहास आहे, त्यामधील 'नावलौकिक' मिळवलेल्या 'पाऊल'खुणांचा मनोरंजक आणि माहितीपूर्ण असा लेखाजोखा महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीमध्ये नियमाने घेतला जातो, तो निश्चितच वाचनीय असतो.
अशाच काही निवडक 'पाऊल'खुणांचे दर्शन आणि ते रस्ते ज्यांच्या नावाने प्रसिद्ध आहेत त्या कर्तृत्ववान माणसांच्या, मुंबईसाठीच्या योगदानाबद्दल विस्ताराने माहिती, सोबतच्या वृत्तांमध्ये दिली आहे. आमच्या सारख्या मुंबईमध्ये सारे आयुष्य गेलेल्या व्यक्तींसाठी, तर ही माहिती पुन्हा प्रत्ययाचा आनंद देणारी अशीच आहे.
हा असा स्तुत्य उपक्रम सादर करणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स'चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे !":👌
######
👍"छाप (पड)लेले शब्द-3E !":👍
💐" सेवाभावी चांगुलपणाची परिसीमा !":💐
👍"स्वार्थ हाच परमार्थ आणि आपल्या आणि आपल्या कुटुंबाचेच भले कसे होईल यामध्ये रममाण असणारा सध्याचा एकंदर माहोल ! माणुसकीचे वाळवंट करणाऱ्या
या वैराण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोबतच्या कहाणीमध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये आश्चर्यजनक असे चढ-उतार येऊनही एका विशिष्ट ध्येयाने स्वतःचे, पत्नीचे शिक्षण अनेक अडचणी येऊनही हे जोडपे ऐहिक उन्नती करते व स्वतःपलीकडे जाऊन सातत्याने समाजासाठी जे असामान्य सेवाभावी योगदान देते बघितले की मन थक्क होते.
'महा-अनुभव' जुलै24 मासिकातील श्रीमती वृषाली जोगळेकर यांनी डॉक्टर नितीन नायक आणि त्यांच्या पत्नी यांच्या विषयी, ही सोबतची कहाणी सादर केली आहे. कृतिशील आणि सेवाभावी अशा या दाम्पत्याचे जेवढे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
सगळीकडे निराशाजनक वातावरण असताना, ओअँसीस सारखी ही कहाणी संपूर्ण वाचल्यानंतर आपल्याला धन्य धन्य करणार यात नवल नाही !":👍
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
#######
"छाप (पड)लेले शब्द E-4 !"
" कोंडमारा करणारी रस्ते वाहतूक !"
मुंबईसारख्या शहरांमध्ये रस्त्याने प्रवास करणे हे किती दयनीय आणि त्रासदायक झाले आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मडगार्ड टू मडगार्ड अशा तऱ्हेने गाड्या एकमेकांना भिडलेल्या, त्यात टू व्हीलर, थ्री व्हीलर यांची भाऊगर्दी आणि बेशिस्तीने चालणारे पादचारी, अशा अवस्थेत कोणत्याही चालकाने गाडी कशी चालवायची, हा एक खरोखर गहन प्रश्न आहे.
रस्त्यात पडलेले खड्डे, कुठल्याही गल्लीबोळात दोन्ही बाजूला पार्किंग केलेली वाहने आणि कुठेही कुठल्याही दिशेने मनमानीपणे वेळ पडली तर सिग्नल तोडून जाणारे दुचाकीस्वार, त्याशिवाय 'हीट & रन' च्या वाढत्या केसेस यामुळे सगळ्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडला आहे हे सत्य आहे. दुर्दैवाने कोणत्याही प्रकारची ठोस कृती केली जात नाही आणि 'जाने दो चालसे कल्चर' वर्षानुवर्षे चालू आहे.
पूर्वी ज्या प्रवासाला पंधरा मिनिटे लागायची, त्याला आता रस्त्याने जी काही कोंडी होते त्यामुळे कधी कधी पाऊण तास एक तास ही लागू शकतो. गंभीर आजारी माणूस असला, तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेताना काय ताण-तणाव निर्माण होत असतील, याची कल्पनाच केलेली बरी.
सोबतच्या वृत्तामध्ये वाहने वाढली आणि एकंदर धोरण कोलमडले याचे वृत्त आहे. जी मुंबई शहराची अवस्था त्याहून कदाचित अधिक त्रासदायक इतर शहरांच्याही रस्ते वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा ! याला विकास म्हणायचे? याला नियोजन म्हणायचे ? दुर्दैव असे की कुणालाच त्याचे काहीही वाटत नाही.
जिथे फूटपाथ वर फेरीवाले नाहीत, तिथेही फुटपाथवरून न चालता रस्त्यावरून चालणारे नागरिक, तसेच सिग्नल जिथे आहे तिथेच खरं म्हणजे रस्ता क्रॉस करणे अत्यावश्यक आहे. परंतु आपल्या इथे कोणीही कुठेही केव्हाही रस्ता क्रॉस करतो. त्यामुळे वाहन चालकाची त्रेधातिरपीट न झाली तरच नवल ! प्रगत देशात किती काटेखोरपणे सारे कायदे पाळले जातात आणि नागरीकही शिस्तीने वागून त्यांना साथ कशी देतात ते आता वेगळी सांगायची गरज नाही.
सुरुवात प्रथम नागरिकांपासून सुरू झाली पाहिजे, त्याचप्रमाणे टू व्हीलर चालवणारे यांनी अधिक जबाबदारीने आणि शिस्त पाळून प्रवास केला पाहिजे. चार चाकीवाला कुठे चुकला, सिग्नल मोडला व इतर काही, तर त्याला जशी दंडाची शिक्षा होते, त्याचप्रमाणे शिस्त न पाळणाऱ्या पादचार्यांवरही आणि टू व्हीलर वाल्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे.
नागरिकशास्त्र फक्त शाळेत विकून नंतर विसरले जाते हे देखील एक दुर्दैवच. साहजिकच घरातून बाहेर पडलेला सुखरूप घरी येईल की नाही याची चिंता सर्वांनाच होत असते. ही परिस्थिती खरोखर आणीबाणीची आहे. वेळीच त्यावर काही ना काहीतरी ठोस कृती केलीच पाहिजे. वेळ पडल्यास जसे 'घरगुती गॅस' वर
पुरवठ्याबद्दल नियंत्रण आहे, त्याचप्रमाणे नव्या वाहनांची परवानगी देतानाही नियंत्रण ठेवले गेले तरच काही सुधारणा होण्याची आशा आहे.
#######
👍"छाप (पड)लेले शब्द-5E !":👌
👍"कालाय तस्मै नमः !
"कथा कुणाची व्यथा कुणा!":👌
कोणे काळी मुंबईमध्ये सकाळी प्रत्येक घरोघरी जवळच्या 'आरे दूध केंद्रां-वर जाण्याची लगबग असे, प्रत्येकाजवळ त्यासाठी एक धातूचा बिल्ला तो म्हणजे जणू त्याचे दुधासाठीचे रेशन कार्ड असे. हे कार्ड दाखवून सीलबंद दुधाच्या बाटल्या असलेल्या घेऊन प्रत्येकजण घरी जात असतात. ह्या बाटल्या सीलबंद असल्यामुळे भेसळी ची शक्यताही नसे आणि शुद्ध दुधाचा पुरवठा 'होल' आणि 'टोंड' अशी नांवे असलेला केला जात असे. बाटल्यांचा अजून एक उपयोग असा असेल की त्यामध्ये सत्यनारायणाच्या वेळी केळीचे खांब सुलभतेने ठेवता येत असत.
अर्थात तेव्हाही पूर्व व पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणच्या गुरांच्या गोठ्यां/तबेल्यांमधून खाजगीरीत्या दूध पुरवठा करणारेही होते. पण लवकरच white revolution ची क्रांती दुधाचा पुरवठा जणू महासागरासारखा करणारे गुजरात मधील 'अमूल' रुपी प्रकल्प उभे राहिले, तसेच महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावर विविध जिल्ह्यांमध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आदी ठिकाणी दूध पुरवठा करणाऱ्या 'वारणा' 'गोकुळ' 'चितळे' इत्यादी संस्था निर्माण झाल्या. पाहता पाहता मुंबईच्या आरे कॉलनीमधून दूध पुरवठा करण्याला ओहोटी लागली आणि आता तर जवळजवळ ती बंद झाल्यासारखी जमा आहे.
काळ कसा बदलतो त्याचे हे चित्र आहे. या साऱ्याचा परिणाम गुरांचे गोठे अथवा तबेले असणाऱ्यांवर अर्थातच कसा झाला ते उलगडून दाखवणारे सोबतचे वृत्त आहे. सारा आर्थिक दृष्ट्या व्यवहारच आंतबट्ट्याचा होऊ लागल्यामुळे हे तबेले जवळजवळ बंद झाले आहेत किंवा त्यांना मुंबई बाहेर नेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शेवटी स्वच्छता, जमिनीच्या गगनभेदी किंमती, पर्यावरणावरील परिणाम आणि आर्थिक गणित या साऱ्याच्या दुष्परिणामांची ही दुर्दैवी कहाणी आहे.
शेवटी,
'कालाय तस्मै म:' आणि
'कथा कोणाची व्यथा कुणा !'
असेच म्हणावयाचे दुसरे काय ?
धन्यवाद
श्री सुधाकर नातू
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा