रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३

दिवाळी अंकांची मांदियाळी !": 'ज्योतिष विषयक अंक-ग्रहसंकेत !":

 "दिवाळी अंकांची मांदियाळी !":

'ज्योतिष विषयक अंक-ग्रहसंकेत !":

"आजच्या समस्या कधी दूर होणार, याचबरोबर उद्या आपले भवितव्य काय असणार, याचे कुतूहल प्रत्येकालाच असते. साहजिकच दिवाळी अंकांपैकी ज्योतिष विषयक अंक आवर्जून वाचले जातात. त्यामध्ये 'ग्रहांकित' 'गृहसंकेत' आणि 'ज्योतिष ज्ञान' हे तीन दिवाळी अंक माझ्या वाचनात आले.

'ग्रहसंकेेत' यामधे, नेहमीप्रमाणे तंतोतंत पडणारे वार्षिक राशिभविष्य श्री सुबय्या यांचे आहे. 17 जानेवारीला शनी मकरेतून कुंभेत जात असल्यामुळे, त्याविषयी 'शनी बदल आणि आपण' या विषयावर तीन खास लेख असून, त्यामध्ये साडेसाती आणि इतर मनोरंजक माहिती देण्यात आली आहे. जीवनाचे रहस्य काय याविषयी 'रहस्य जीवनाचे' हा विचार प्रवर्तक लेखही येथे आहे. जसं, प्रत्येकाला सौख्य आपल्याला हवे असे वाटत असते, त्यासंबंधी नामवंत ज्योतिषी श्रीराम भट यांनी पुढील पाच वर्षात 'सौख्याची दिशा' काय असेल याचा उहापोह केलेला आहे.

चमत्कारांवर विश्वास ठेवावा की नाही याचं ज्याचं त्याचं मत वेगळं असू शकतं. परंतु 'चमत्कार चिंतामणी' या मूळ संस्कृत ग्रंथाचा कल्पिता राजोपाध्ये यांनी केलेला समश्लोकी अनुवाद ज्योतिष अभ्यासाकांना संदर्भ म्हणून चांगला आहे. 'लक्ष्मीपूजन' सर्वत्र सगळेजण करतात. परंतु त्या मागचा हेतू काय असतो, याचा रंजक वेध घेणारा लेख प्रणव गोखले यांनी लिहिलेला आहे. साधना करावी असे प्रत्येकाच्या मनात येते, परंतु 'साधना सुफळ' करण्यासाठी आपल्याला काय करावे लागते, त्यावर मार्गदर्शन मंत्रशास्त्र जाणकार अभ्यासक श्री जयंत झरेकर यांनी समर्पकपणे केले आहे. सद्गुरु आपल्याला मार्ग दाखवतो आणि आपल्याला 'शक्ती जागरणा'तील अद्भुत अशी कुंडलिनी व प्राणशक्ती जागृत करण्याचा अनुभव येऊ शकतो. त्याविषयी दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे विषयी निगडित अनुभवाचा डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी घेतलेला आढावा देखील या अंकात आहे. शिवाा, अगदी वेगळा असा लेख येथे आहे. डलहौसी हे छोटेसे गाव आणि तेथे विमला ठकार या वर्षातील काही महिने रहात. साधकांना स्वतःच्या अनुभव त्यांनी 'डलहौसीची जीवनशाळा' या लेखांमध्ये मांडलेला आहे. तो प्रेरक दस्तावेज वाचावा असाच आहे.
याशिवाय इतरही काही विविध विषयावरचे लेख या अंकात आहेत 'तुमच्या मित्राची रास' 'राशींचे भावरंग', 'धातू आणि रत्ने' 'नात्यांचे गृहगणित' इत्यादी इत्यादी.
थोडक्यात वैविध्यपूर्ण असा हा 'ग्रहसंकेत दिवाळी अंक' अभ्यासकांनी जरूर वाचावा असाच आहे.

धन्यवाद
सुधाकर नातू
Mb 9820632655

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा