सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

"दिवाळी अंकांची मांदियाळी !": 'ज्योतिष विषयक अंक-ग्रहांकित'23 !":

"दिवाळी अंकांची मांदियाळी !":

'ज्योतिष विषयक अंक-ग्रहांकित'23 !":

"आजच्या समस्या कधी दूर होणार, याच बरोबर उद्या आपले भवितव्य काय असणार, याचे कुतूहल प्रत्येकालाच असते. साहजिकच दिवाळी अंकांपैकी ज्योतिष विषयक अंक आवर्जून वाचले जातात. त्यामध्ये 'ग्रहांकित' 'गृहसंकेत' आणि 'ज्योतिष ज्ञान' हे तीन दिवाळी अंक माझ्या वाचनात आले.

'ग्रहांकित दिवाळी अंक'23 यामधे, भरगच्च असे अभ्यासपूर्ण साहित्य आहे. सुरुवातच एका कुतुहूल वाढवणाऱ्या विषयाने केलेली असून, काही महिन्यांपूर्वी झालेल्या सत्ता बदलाच्या पार्श्वभूमीवर आसाम मधील 'कामाख्या' देवी संबंधी विस्तृत अशी मनोरंजक माहिती श्री आनंद साने, त्याचप्रमाणे हिना ओझा आणि राजेश ,वशिष्ठ यांनी दिलेली आहे. ज्योतिषाचार्य म्हणता येतील असे पंडित रूपचंद जोशी यांनी ज्योतिष विश्वाला दिलेली 'लाल किताब' ही विसाव्या शतकातील अमूल्य देणगी आणि त्यांच्याविषयी, तसेच त्या पुस्तकाविषयी उद्बोधक अशी माहिती डॉक्टर चंद्रकला जोशी आणि रमलतज्ञ 'ग्रहांकित'चे  संपादक श्री चंद्रकांत शेवाळे यांनी दिलेली आहे.
इंग्रजी महिन्यांची नावे आपल्याला नेहमी विचार करायला लावतात. प्रत्येक महिन्यामागे ग्रीक किंवा रोमन संस्कृतीचा कसा इतिहास दडला होता, त्याचे वैशिष्ट्य तसेच प्रत्येक महिन्याचा शेवटचा किंवा पहिला दिवस कसा पुन्हा येतो, याचेही उदाहरणासकट येथे विश्लेषण श्री विश्वास पटवर्धन यांनी करून दिले आहे. पूर्वी मार्चपासून कॅलेंडर वर्ष सुरू होत असे. योगायोगाने हल्लीचे फायनान्शियल वर्ष देखील मार्चपासून सुरू होते. कॅॅलेंडर जानेवारीपासून कसे बदलले गेले, याचीही माहिती या लेखांमध्ये आहे. पत्त्यांचा खेळ कुणाला माहिती नाही ? 52 पत्ते आणि त्यावरून भविष्य याविषयीचा एक आगळावेगळा लेख दिलीप गायकवाड यांनी दिलेला आहे. रत्नांची माहिती आणि त्या अद्भुत दुनियेची ओळख सौ गौरी कैलास केंजळे यांच्या लेखात आहे.

प्रयत्न आणि अपेक्षा यांचे गणित मांडून अनुकूल गुणांच्या सहाय्याने आपण आपले स्वतःचे भवितव्य कसे घडवू शकतो, हे राशीनिहाय अनुकूल गुणांवर आधारित 'वार्षिक भविष्य' माझ्या लेखामध्ये या अंकात आहे. ते आपण जरूर वाचावे आणि 'तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार' कसे ते जाणून घ्यावे.

नेपच्यून प्लुटो आणि हर्षल या ग्रहांना ज्योतिष सांगताना पुष्कळदा दुर्लक्षित केले जाते. परंतु त्यांचे महत्त्व आणि ज्योतिषा विषयी उद्बोधक माहितीपूर्ण विचार येथे लेखांत आहेत. 'नवमांंश वर्ग कुंडली' सुबोध पाटणकर, 'कुंडलीतील ग्रहवैभव' डॉक्टर जयश्री बेलसरे, तसेच नक्षत्रांविषयीची आगळीवेगळी माहिती डॉक्टर  मिस्त्री,  'खगोल आणि ज्योतिष'  श्री मधुकर लेले यांच्या लेखात आहे.

विवाहपूर्व गुणमेलन पत्रिका बघून, मंगळ दोष पाहून नेहमीच केले जाते. पण त्यापलीकडे जाऊन, समुपदेशाची किती आवश्यकता आहे, याचे मार्गदर्शक विचार पंडित विजय श्रीकृष्ण जकातदार यांच्या लेखात आहे. तरुण वर्गाला हुरहुर लावणारा 'विवाह योग कधी' आहे याची माहिती जयश्री देशपांडे यांच्या लेखात आहे.

याशिवाय व्यक्तिविशेष असे तीन लेख येथे आहेत भारतीय ज्योतिषाचा चमकता तारा शंकर बाळकृष्ण दीक्षित यांच्या व्यक्तिमत्त्वाची व कार्याची माहिती रमेश वायगावकर यांनी दिली आहे. तर 'जिओ हजारो साल' या लेखांमध्ये 'किंग चार्लस् जॉर्ज' त्याचप्रमाणे इतर राजकीय नेत्यांच्या पत्रिकांचा अभ्यासपूर्ण विचार विशाल अष्टेकर यांच्या लेखात आहे. अगदी आगळावेगळा आणि एखाद्या क्राईम थ्री व्हीलर सारखा लेख 'लॉर्ड ऑर्थर सेल्फी क्राईम' हा श्री धनंजय गोळे यांनी सादर केलेला लेख, ज्योतिष आणि क्राईम थ्रिलर स्टोरी यांची सांगड घालणार आहे. याशिवाय नेहमीप्रमाणे वार्षिक राशिभविष्य, 'मार्केट मधली तेजी मंदी' डॉक्टर सौ सविता महाडिक यांनी मांडली आहे. याशिवाय हस्तसामुद्रिक, वास्तुविशेष, 'देवी उपासना आणि समस्या निवारण' याविषयीचे अनेक लेख या अंकात आहेत.

अतिशय उत्तम असा ग्रहांकित अंक हा अत्यंत लोकप्रिय असून तो सर्वांनी वाचावा असाच आहे. त्याबद्दल संपादक श्री चंद्रकांत शेवाळे यांचे कार्य कर्तृत्व खरोखर प्रेरणादायी आहे,  असेच म्हणावे लागते.

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा