रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

☺️"जीवाची होतीया काहिली !"😊


☺️"जीवाची होतीया काहिली !"😊

हलकं फुलकं सहज सुचलं म्हणून सांगितलं असा साधा अनुभव आहे कालचा तो मला तुम्हाला येथे सांगायचाय. एशिया कप चालू आहे, कितीही वय झालं, तरी क्रिकेटची आवड काही जात नाही आणि काल तर पाकिस्तान आणि भारताची मॅच होती. 

तेव्हा आपल्याकडे टीव्हीवर कुठला चॅनेल आहे वा नाही याची आपल्याला कल्पना नसते ही गोष्ट पहिली, दुसरी गोष्ट म्हणजे कुठला चॅनेल नंबर मॅच दाखवतो हेही मला माहित नाही हे लक्षण आले. तो चँनेल क्रमांक शोधायला आपल्याला कुणाला तरी विचारायला लागतं ते विचारून अखेर समजलं. त्याप्रमाणे टीव्हीवर तो नंबर क्लिक केल्यावर तो आपल्या पँकमध्ये नाही हे कळले. चॅनेल कसा मिळवावा हे समजूनही गेलं. त्याप्रमाणे व्हाट्सअप आणि एसएमएस करायचा असतो. एसएमएस केला तर सध्या ही सर्विस बंद आहे असा मेसेज आला. मॅच तर काही करून बघायचीच होती, म्हणून लगेच व्हाट्सअप केला आणि बघता बघता चॅनेल मिळून पण गेला. 

पण गंमत पुढचीच आहे. चॅनेल जेव्हा घेतला तेव्हा लक्षात आलं तिथे एकोणीस रुपये दर दाखवलाय. संभ्रम पडला की 19 रुपये रोजचा का महिन्याचा? म्हणून व्हाट्सअप ला त्याप्रमाणे विचारलं, काही उत्तर नाही. मग व्हाट्सअप वर इतर मित्रमंडळींना मेसेजेस टाकले की हा दर महिन्याचा आहे की, दररोजचा आहे आणि एखादा चॅनेल नको असेल तर कसा घालवायचा हे. तर त्याची कुठे माहिती चॅनेलवाले tv वर देतच नाहीत. ऑर्डर बुकिंग ठेवायला मात्र तिथे त्या चॅनेलवर माहिती असते पण तो जो दर आहे तो परडे का परमंथ हे त्यांनी तिथे दाखवायला हवं.

19 रुपये रोजचा असेल तर खूपच झालं, कारण मला तो फक्त भारताच्या मॅच बघण्यात इंटरेस्ट होता. म्हणून जीव खाली वर झाला ! माझ्या मित्रांकडून उत्तर काही लगेच कोणाचे विशेष आले नाही. कारण कदाचित जो तो बहुतेक मॅच बघत असेल. अखेर एकाने सांगितलं की एकदा चॅनेल घेतलास की सहा महिने तुम्हाला डिलीट करता येत नाही ! आणखीन दुःख झालं ! त्याच्यानंतर एकाने सांगितलं की बाबारे हा दर महिन्याचा आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळाला. पण निश्चित अशी बातमी काही मिळाली नाही.

ह्या उलघालीत मी आपला मॅच बघू लागलो. सुरुवातीला चांगला वाटलं. पाकिस्तानच्या विकेटस् जात होत्या, शंभरापर्यंत जवळजवळ अर्ध्याहुन अधिक लोक पाकिस्तानचे आऊट झाले. परंतु नंतर त्यांनी बघता बघता 147 पर्यंत मजल गांठली मात्र, जीव माझा खालीवर व्हायला लागला, जणु 'जीवाची होतीया काहिली' ! ह्याचं कारण काय असतं तर, माझ्या सारखा, जो तो आपला संघ जिंकावा आणि त्यातून पाकिस्तान बरोबर मॅच असली तर भारतच जिंकावा असंच वाटत राहतं. 

आपला डाव सुरू झाला, मी जागरण करून पुढे मॅच बघू लागलो. कोहली आणि रोहित चांगले खेळत होते. पण काय झालं त्यांना कुणास ठाऊक, दोघांनी कोलून जसे कॅच द्यावे तशा त्यांच्या विकेटस् गेल्या आणि मग नंतर मात्र हळूहळू जीव अक्षरशः कासावीस झाला. कारण जेवढा स्कोअर पाहिजे आणि त्यासाठी जेवढा रन रेट पाहिजे तो वाढतच चालला होता. कसाबसा अकरा सव्वा अकरा पर्यंत पंधरा ओवरस् पर्यंत मॅच बघितली. 90 रनस् झालेल्या, म्हणजे अजून पन्नास ते साठ रन्स हव्या आहेत आणि पाचच फक्त ओव्हरस् राहिल्यात. 

त्यामुळे मला वाटू लागलं की कुठून आपण चॅनेल घेतला ! आत्तापर्यंत मी सहसा क्रिकेट मँचेस गेली काही वर्ष बघतही नव्हतो. काय स्कोर असेल तो नंतर कळतो म्हणून गप्प बसायचो. सहाजिकच अशी अपेक्षापूर्तीचा लपंडावा पासून मी मुक्त, निवांत असे. पण काल कुठून मला बुद्धी झाली आणि हा चॅनेल घेतला. तो पँकमधून केव्हा कसा बाहेर काढता येतो तेही कळले नव्हते. म्हणून धड झोपायलाही जाता येईना, कारण मॅचचे पुढे काय होणार ही हुरहुर आणि न बघावी झोपायला जावं तर काय झालं असेल ही कुशंका बरोबर ! कुठून आपण आज चॅनेल घेतला ही व्यथा बाळगत असं करत मी अखेर झोपी गेलो.

ता.क.

एवढे सगळे लिहीपर्यंत सकाळी मला आपल्या मॅच चे काय झाले हे समजले नव्हते नंतर जेव्हा मी मोबाईलवर सरपंच केले तेव्हा आश्चर्याने अक्षरशा मी उडालो कारण नवल घडले होते 148 धावा करून भारताने विजय की हो मिळवला होता ! मग त्यामुळे आता उरलेला दिवस, काल रात्री आपण कां बरे जागून मॅच पुढे बघितली नाही, ही हुरहुर बाळगत मला काढायचा आहे.

"धीर धरी रे धीरा पोटी, असती फळे रसाळ गोमटी !" हे मात्र आता उमजले !

धन्यवाद

सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा