मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

☺️"दैनंदिनीतील पाऊलखुणा ३ !":😊

 ☺️"दैनंदिनीतील पाऊलखुणा ३ !":😊


@ 16 जानेवारी
-------------------
💐दिनविशेष:
1901 न्यायमूर्ती महादेव रानडे यांचे निधन
1920 घटना तज्ञ नाणी पालखीवालांचा जन्म 1954 चित्रपट निर्माते बाबुराव पेंटर यांचा मृत्यू

👍विशेष नोंद:
-----------------
कालपासून आज दीड दिवसात "तें दिवस" हे विजय तेंडुलकरांचे आत्मवृत्तात्मक पुस्तक वाचून संपवले. गरिबी, आई-वडिलांना आपल्या वागण्यापायी दिलेला मनस्ताप, शाळा बुडवून चित्रपट पाहणे व अखेर शाळा अर्धवट सोडून देऊन, घरीच काहीही न करता, "खायला कहार भूईला होईल भार" अशा स्थितीतले तारुण्य तेंडुलकरांनी अनुभवले. हा असा तरुण पुढे इतका मोठा प्रतिभावान लेखक होईल, असे कुणालाच वाटले नसेल.

जीवनाची पहिली दोन दशके अशी दिशाहीन
कष्टदायी जशी गेली, तसेच शेवटचे दशक कौटुंबिक संकटांमुळे- मुलगा, मुलगी व पत्नीचा वियोग यामुळे अत्यंत क्लेशकारक गेले. एक वादळी आयुष्य जगणाऱ्या, या संवेदनक्षम माणसाचे जीवन खरोखर चित्तथरारकच होय. मानवी जीवन कल्पनेपेक्षाही अद्भुत असते हेच ह्या पुस्तकाच्या वाचनाने समजले.
###########################

@17 जानेवारी
------------------
💐दिनविशेष
1706 बेंजामिन फ्रँकलिनचा जन्म
1906 कुटुंब नियोजन पुरस्कर्त्या शकुंतला परांजपे यांचा जन्म
2000 गायब सुरेश हळदणकर यांचे निधन
###########################

@18 जानेवारी
------------------
💐दिनविशेष
1842 न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म
1889 नाट्यछताकार दिवाकर उर्फ शंकर गर्गे यांचा जन्म
1895 रविकिरण मंडळातील कवी वि द घाटेंचा जन्म
1944 भारतीय ज्ञानपीठाची स्थापना
1947 गायक नट कुंदनलाल सैगल यांचा मृत्यू 1971 बॅरिस्टर नाथ पैंचे निधन
1983 बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्थापनेचे प्रेरक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक आ रा भट यांचे निधन
2003 कवी श्रेष्ठ हरिवंश राय बच्चन यांचे निधन
##########################

@ 19 जानेवारी
-------------------
💐दिनविशेष
1736 वाफेच्या इंजिनचा जनक जेम्स वॅटचा जन्म 1892 विनोदी लेखक चिं वि जोशींचा जन्म
1910 चित्रपट निर्माते मास्टर विनायक यांचा जन्म 1886 गायक सवाई गंधर्वांचा जन्म
1949 पुणे महानगरपालिकेची स्थापना
1970 तारापूर अणुवीज केंद्राचे उद्घाटन
1990 आचार्य रजनीश उर्फ ओशो यांचे निधन

👍विशेष नोंद
-----------------
👍एका अनुभवः दोन पॅन्टचे फाटलेले सर्वच खिसे दुरुस्तीला टाकले, 210 रुपये सात खिशांसाठी खर्च. एका नवीन पॅन्टचा कापड, शिलाईचा खर्च जमेस धरता, हा खर्च किंवा फी खूपच नगण्य. कारण केवळ 210 रुपये घालून दोन नवीन पॅन्ट्स पुन्हा वापरण्यालायक होऊ शकतात.
खिसे नीट करण्यासाठी पॅंट प्रथम उसवावी लागते व नंतर खिसा शिवावा लागतो, हे समजता हा खर्च योग्यच.
👍वर्तमानातला क्षणच मानवाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा. जे काम कार्य हाती घेतले आहे, ते निष्ठेने सर्वस्व ओतून करत राहणे, म्हणजेच वर्तमानात क्षण जगणे होय. झेन गुरुची "दोन किलो वादळ म्हणजे जीवन" रूपककथा याचं तत्वाचे रहस्य समजावून सांगणारी,डॉ उल्हास कोल्हटकर यांचा हा लेख वाचून ते उमजले.
👍कोणतेही काम करताना, त्याबद्दलची नीट माहिती गरजा व करावी लागणारी कृती यापैकी कशातही त्रुटी राहता कामा नये. न पेक्षा ते काम अर्धवटच राहते.
##########################

संग्राहकः सुधाकर नातू

रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

☺️"जीवाची होतीया काहिली !"😊


☺️"जीवाची होतीया काहिली !"😊

हलकं फुलकं सहज सुचलं म्हणून सांगितलं असा साधा अनुभव आहे कालचा तो मला तुम्हाला येथे सांगायचाय. एशिया कप चालू आहे, कितीही वय झालं, तरी क्रिकेटची आवड काही जात नाही आणि काल तर पाकिस्तान आणि भारताची मॅच होती. 

तेव्हा आपल्याकडे टीव्हीवर कुठला चॅनेल आहे वा नाही याची आपल्याला कल्पना नसते ही गोष्ट पहिली, दुसरी गोष्ट म्हणजे कुठला चॅनेल नंबर मॅच दाखवतो हेही मला माहित नाही हे लक्षण आले. तो चँनेल क्रमांक शोधायला आपल्याला कुणाला तरी विचारायला लागतं ते विचारून अखेर समजलं. त्याप्रमाणे टीव्हीवर तो नंबर क्लिक केल्यावर तो आपल्या पँकमध्ये नाही हे कळले. चॅनेल कसा मिळवावा हे समजूनही गेलं. त्याप्रमाणे व्हाट्सअप आणि एसएमएस करायचा असतो. एसएमएस केला तर सध्या ही सर्विस बंद आहे असा मेसेज आला. मॅच तर काही करून बघायचीच होती, म्हणून लगेच व्हाट्सअप केला आणि बघता बघता चॅनेल मिळून पण गेला. 

पण गंमत पुढचीच आहे. चॅनेल जेव्हा घेतला तेव्हा लक्षात आलं तिथे एकोणीस रुपये दर दाखवलाय. संभ्रम पडला की 19 रुपये रोजचा का महिन्याचा? म्हणून व्हाट्सअप ला त्याप्रमाणे विचारलं, काही उत्तर नाही. मग व्हाट्सअप वर इतर मित्रमंडळींना मेसेजेस टाकले की हा दर महिन्याचा आहे की, दररोजचा आहे आणि एखादा चॅनेल नको असेल तर कसा घालवायचा हे. तर त्याची कुठे माहिती चॅनेलवाले tv वर देतच नाहीत. ऑर्डर बुकिंग ठेवायला मात्र तिथे त्या चॅनेलवर माहिती असते पण तो जो दर आहे तो परडे का परमंथ हे त्यांनी तिथे दाखवायला हवं.

19 रुपये रोजचा असेल तर खूपच झालं, कारण मला तो फक्त भारताच्या मॅच बघण्यात इंटरेस्ट होता. म्हणून जीव खाली वर झाला ! माझ्या मित्रांकडून उत्तर काही लगेच कोणाचे विशेष आले नाही. कारण कदाचित जो तो बहुतेक मॅच बघत असेल. अखेर एकाने सांगितलं की एकदा चॅनेल घेतलास की सहा महिने तुम्हाला डिलीट करता येत नाही ! आणखीन दुःख झालं ! त्याच्यानंतर एकाने सांगितलं की बाबारे हा दर महिन्याचा आहे, त्यामुळे थोडा दिलासा मिळाला. पण निश्चित अशी बातमी काही मिळाली नाही.

ह्या उलघालीत मी आपला मॅच बघू लागलो. सुरुवातीला चांगला वाटलं. पाकिस्तानच्या विकेटस् जात होत्या, शंभरापर्यंत जवळजवळ अर्ध्याहुन अधिक लोक पाकिस्तानचे आऊट झाले. परंतु नंतर त्यांनी बघता बघता 147 पर्यंत मजल गांठली मात्र, जीव माझा खालीवर व्हायला लागला, जणु 'जीवाची होतीया काहिली' ! ह्याचं कारण काय असतं तर, माझ्या सारखा, जो तो आपला संघ जिंकावा आणि त्यातून पाकिस्तान बरोबर मॅच असली तर भारतच जिंकावा असंच वाटत राहतं. 

आपला डाव सुरू झाला, मी जागरण करून पुढे मॅच बघू लागलो. कोहली आणि रोहित चांगले खेळत होते. पण काय झालं त्यांना कुणास ठाऊक, दोघांनी कोलून जसे कॅच द्यावे तशा त्यांच्या विकेटस् गेल्या आणि मग नंतर मात्र हळूहळू जीव अक्षरशः कासावीस झाला. कारण जेवढा स्कोअर पाहिजे आणि त्यासाठी जेवढा रन रेट पाहिजे तो वाढतच चालला होता. कसाबसा अकरा सव्वा अकरा पर्यंत पंधरा ओवरस् पर्यंत मॅच बघितली. 90 रनस् झालेल्या, म्हणजे अजून पन्नास ते साठ रन्स हव्या आहेत आणि पाचच फक्त ओव्हरस् राहिल्यात. 

त्यामुळे मला वाटू लागलं की कुठून आपण चॅनेल घेतला ! आत्तापर्यंत मी सहसा क्रिकेट मँचेस गेली काही वर्ष बघतही नव्हतो. काय स्कोर असेल तो नंतर कळतो म्हणून गप्प बसायचो. सहाजिकच अशी अपेक्षापूर्तीचा लपंडावा पासून मी मुक्त, निवांत असे. पण काल कुठून मला बुद्धी झाली आणि हा चॅनेल घेतला. तो पँकमधून केव्हा कसा बाहेर काढता येतो तेही कळले नव्हते. म्हणून धड झोपायलाही जाता येईना, कारण मॅचचे पुढे काय होणार ही हुरहुर आणि न बघावी झोपायला जावं तर काय झालं असेल ही कुशंका बरोबर ! कुठून आपण आज चॅनेल घेतला ही व्यथा बाळगत असं करत मी अखेर झोपी गेलो.

ता.क.

एवढे सगळे लिहीपर्यंत सकाळी मला आपल्या मॅच चे काय झाले हे समजले नव्हते नंतर जेव्हा मी मोबाईलवर सरपंच केले तेव्हा आश्चर्याने अक्षरशा मी उडालो कारण नवल घडले होते 148 धावा करून भारताने विजय की हो मिळवला होता ! मग त्यामुळे आता उरलेला दिवस, काल रात्री आपण कां बरे जागून मॅच पुढे बघितली नाही, ही हुरहुर बाळगत मला काढायचा आहे.

"धीर धरी रे धीरा पोटी, असती फळे रसाळ गोमटी !" हे मात्र आता उमजले !

धन्यवाद

सुधाकर नातू

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

☺️"मुक्तसंवाद-विचारांचे अम्रुतमंथन !":😊

 ☺️"मुक्तसंवाद-विचारांचे अम्रुतमंथन !":😊


#👍"कोड़े: कधीही न सुटणारे !":😢
-----------------------
"माणूस मरतो, तेव्हाच कां मरतो? कुणी जन्मत:च, तर कुणी बालपणी वा कुणी एेन तारूण्यात, तर काही प्रौढपणी, तर काही वृद्धापकाली हे जग सोडून जातात. प्रत्येकाचे मरतेवेळी वय भिन्न असते, असे कां?

आगगाडीतील प्रवास करताना, जसा जो तो आपले स्थानक आले की उतरून जातो, तसाच हा सारा प्रकार असतो ! पण आपले 'तिकीट कुठपर्यंतचे आहे, ते कुणालाच माहीत नसते. आयुष्य हे क्षणभंगूर आहे हयाची जाणीव, कुणी मरण पावल्याची बातमी कानी येते, तेंव्हाच होते.

हया जगांत प्रत्येकाचे काही विशिष्ट प्रयोजन असावे, तेव्हढे झाले की, त्याला 'राम' म्हणावा लागतो ! पुष्कल वेळी सारीच कामे वा आकांक्षा पूर्ण न करता, माणसाला येथून निरोप घ्यावाही लागतो. थोडक्यात, जीवन आणि मरण हे
कधीही न सुटणारे कोडे आहे ! "💐

#👍"उत्सव म्हणजे उन्माद नव्हे !":👌
☺️"संस्कृतीचा अर्थ संमजस, सुसंस्कृत समाज निर्माण होण्यासाठी केलेली संघटीत संयमी कृती होय. हा मूळ गाभा आणि प्रयोजन आनंदाने वेचण्यासाठी सणांची योजना केली गेली. हे सारे दुर्लक्षून, बेताल तंत्राने, ईषॅेने स्पर्धा करत, कर्णकर्कष्य संगीतासह, ऊन्मादाने नाचगाण्यात बेभान होणे, कोणत्याहीही सणाचा हेतू असूच शकत नाही. अशा वेळी आपण होवून आवश्यक बंधने न पालणे, हे संस्कृतीचे रक्षण कसे बरे मानता येईल?

उत्साहाचा जेंंव्हा अतिरेक होतो, तेंव्हा उन्माद निर्माण होतो आणि त्याचाच परिणाम प्रमादांत होवून नुक़सान होते, ह्याचे भान नेहमी ठेवायलाच हवे !"😊

#👍👍
दाद देण्यासाठी जशी नीरक्षीर विवेकबुद्धी गरजेची तसाच दिलदारपणाही हवाच हवा. त्यातून योग्य त्या व्यक्तीला अनुरुप योगदानासाठी दाद देण्यासाठी सूक्ष्म काकद्रुष्टीही आवश्यक.

सध्याच्या मनस्वी, वेगवान स्पर्धेच्या माहोलांत अहम् भावाला कमालीचे प्राधान्य असताना अशी अचूक "दाद(दा)गिरी जवळजवळ दुर्मिळच!👌👌

#👍"जादू"?":😊
-------
काही दिवसांपूर्वी, एक संदेश येथे वाचायला मिळाला, हा माणूस लिहीतो:

'मी कधीही छोटया पडद्यावरच्या मालिकाच बघत नाही, परवा,थोडया वेळासाठी केवळ अर्धा एपिसोड कसाबसा पाहिला आणि टीवी बंद केला'
हे वाचून मी मात्र, अक्षरश: आश्चर्यचकीत झालो, कारण हया मालिकाच, माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांचा दररोजचा अत्यावश्यक असा खुराक आहेत. सायंकाली ७ ते १० जणु रात्रपाळी असल्यासारखा मी टीवी समोर मालिकाच पहा़त असतो. मालिकांचा आणि माझा संबंध 'तुंझे माझे जमेना आंणि तुझ्यावाचून करमेना' असा आहे!

व्यसनी माणसाला उमजत असते की, आपण जे करतो, ते योग्य नाही, हानिकारक आहे, पण तो जसा तरीही व्यसन काही केल्या सोडू शकत नाही, तसेच माझे मालिका पहाण्याच हे वेड मला सोडता येत नाही !

' कॅथार्सिस' मध्ये जसा वेदनेतून आनंद मिळतो, तसाच काही तरी अनुभव मला मालिका पहाताना होतो. मालिका उगाचच लांबलचक केल्या जातात, त्यात 'पाणी' घातले जाते, त्यातील पुष्कळ गोष्टी निरर्थक असतात::::वगैरे वगैरे. तरीही माझ्यासारखे अनेक दुषणे लावत, लावत न चुकता परत मालिका पहातच रहातात. कुठे तो मालिकाच न बघणारा वरील संदेश पाठवणारा किंवा घरी बिलकुल टीवीच न घेणारा आमचा एक दोस्त आणि कुठे रोज़ रोज़ रतीब घातल्यासारखा मालिका पहाणारा मी ! असा वेळ वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ, दुसर्या एखाद्या विधायक कामात घालवावा, हे पटूनही, काही केल्या वळत नाही, ही माझी खंत आहे ! कोणी सागेल कां हया ईडीयट बाॅक्समधे अशी कोणती जादू आहे?"

👍ह्या अनमोल अनुभवातून मी अंतर्मुख होऊन पुढील नवा मार्ग आता अवलंबत आहे:

😊"Making Day, more meaningful":👌
"For me, everyday, a particular time is now very precious because, instead of wasting it on seeing meaninglessly dragged serials, I use it for purposeful reading and introspection. That's how my Treasure Book, came about.

I Hope you too,
would follow this option !"👌

# 👍"एक सच्चा रयतसेवक !":👌
'अंतर्नाद'आॅगस्ट'१६ मधील 'एक सच्चा रयतसेवक' हा कै.कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांच्यावरील हृदयस्पर्शी लेख वाचून मन भरून आले. त्यातील त्यांनी घेतलेलया दोन शपथांची आठवण, ह्या पहाडाएवढ़या अद्भुत माणसाचे थोरपण दाखवून गेली.

पहिली शपथ, महात्मा गांधीजींपासून प्रेरणा घेऊन जीवनभर, उंची कपड्यांचा त्याग व अनवाणी चालण्याची शपथ आणि दुसरी, एका ग़रीब, अगतिक महिलेच्या तळतलाटामुळे,जीवनभर बाहेर कधीही दूध न मागण़याची शपथ ! हयातभर, हया महान कर्मवीराने शिक्षणाची गंगा तळागाळापयँत पोहोचावी, ह्या हेतूने रयत शिक्षण संस्थेचा सर्वदूरवरचा पसारा ज़िद्दीने उभा केला. कुठे त्या वेळचे समर्पित भावनेने शिकविणारे शिक्षक व साधे सरलमार्गी विद्यार्थी आणि कुठे आताचा शिक्षणसम्राटांचा विद्यादानाचा बाजार !

जाता जाता, मला अचानक आठवले-ह्याच सच्च्या रयतसेवका़च्या नांवे दिला जाणारा शैक्षणिक विभागांतील सर्वोत्तम पुस्तकाचा माझ्या एकमेव पुस्तकाला-'प्रगतिची क्षितीजे'ला मिळालेला, काही वर्षांपूवीॅचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार !
ह्या लेखामुळे माझेही काही ऋणानुबंध, वंदनीय कर्मवीरांशी जोडले गेल्याचे समाधान मला मिळाले.

धन्यवाद
सुधाकर नातू

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

👍" वाचलेले रुचलेले अन् भावलेले !":👌💐

 👍" वाचलेले रुचलेले अन् भावलेले !":👌💐

☺️"अंतर्नाद" दिवाळी अंक'२०२०":👌💐

आज सकाळी, एक नवीन कल्पना मनामध्ये आली आणि अशा कल्पना मला रोजच सुचत असतात. सहज आज माझी सध्याची रोजनिशी किंवा डायरी उघडून चहाच्या वेळेला ती वाचत होतो, शेवटचे पान उलगडले. तेव्हा तिथे काही नोंदी आढळल्या, त्या खरोखर अगदी वेगळ्या प्रकारच्या नोंदी होत्या. मी वाचलं काही भावलं की, त्याच्यातलं जे काय आवडलं, ते थोडक्यात लेखाचं शीर्षक, लेखकाचं नांव असं नोंदवून ठेवत असे. हे लक्षात आलं.

त्यामध्ये 'अंतर्नाद' मासिक व त्याचा लक्षणीय दिवाळी अंक दरवर्षी गेली 25 वर्ष काढला जायचा. त्याचे संपादक श्री भानु काळे ह्यांनी कोरोना काळात, मोठ्या मेहनतीने 2020 सालचा दिवाळी अंक काढला होता. त्यांत गेल्या 25 वर्षात जी काही उत्तमोत्तम अशी साहित्य निर्मिती त्यांच्या आतापर्यंतच्या अंकांमध्ये झाली, त्यातील अगदी वेचक वेधक निवडक लेखांचा असा तो ऐवज, खरोखर मला वाचायला मिळणं ही एक मोठी सुवर्णसंधी होती. ते सर्व वाचायला मला उशीर झाला होता हे खरंच, पण वाचलं, जे नोंदवलं ते काय ते तुम्हाला ह्या ध्वनीफितींत, सांगतो.

मला खात्री आहे हा ऐवज व्हा ऐकल्यावर ज्यांना वाचनाची खूप आवड आहे ते हा अंतर्नादचा 2020 चा अंक लायब्ररीत जाऊन जरूर शोधतील आणि वाचतील......👌💐💐

त्यासाठी.....ही लिंक उघडा....ऐका.....

https://drive.google.com/file/d/1iSIcpLI5RZ36m_2XQ3fBGKdyVHk8cGLt/view?usp=drivesdk

हा संदेश व लिंक शेअरही करा......

थोडक्यात त्यमधील काही निवडक लेखांची वैशिष्ट्ये:

१ "ज्याचा त्याचा बोधिवृक्ष":
हा लेख लक्ष्मण लोंढे ह्यांचा (आता दिवंगत)
ऐन दुपारी माथेरानला माळरानावर झाडाखाली निजल्यावर, त्यांना आलेले अनुभव आणि त्यातून त्यांनी निर्माण केलेले कल्पनाविश्व अजूनही माझ्या मनात ठसले. त्यामध्ये हेच मांडलं होतं की, माणसाने केव्हा तरी एकांत शोधावा, आपला आणि निसर्गाचा असा संवाद साधावा.

२ दुसरा जो लेख वाचला तो "रीडर्स डायजेस्ट साठी लिहिताना" हा. कादंबरीकार उत्तम बंडू तुपे यांच्यावर रीडर्स डायजेस्टसाठी खास लेख लिहिण्याचा जो योग आला, तो प्रेम वैद्य यांनी अगदी रसाळपणे त्यामध्ये उलगडून दाखवला. कुठलाही लेख स्वीकारताना 'रीडर्स डायजेस्ट' )सारखे नियतकालिक जे जगप्रसिद्ध आहे, ते किती किती श्रम घेऊन एक साधा लेख पण त्याच्यासाठी अगदी एक दोन वर्ष गेली तरी कशी चालतात, हे त्यातून प्रवाहीपणे उलगडले आहे. यामुळे आपल्याला कळतं, उगाच नाही "रिडर्स डायजेस्ट"सारखे मासिक हे जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय कां आहे ते !

३ तिसरा लेख "एक करपलेला झंझावात" हा स्वतः प्रा राम शेवाळकर (आता दिवंगत );यांनी लिहिलेला आहे. सुरेश भट व ते, दोघेही विदर्भाचे आणि साहित्यशारदेमधले दिग्गज. त्यामुळे सुरेश भटांबद्दल अगदी जिव्हाळ्याने चोखंदळपणे जे निरीक्षण त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे, तसेच जीवनचरित्राचे केले आहे, ते खरोखर हृदयंगम असेच आहे. आतून बाहेरून सुरेश भटांसारखा महाकवी कसा होता, ते त्यातून उमजले.

४ एक वेगळाच लेख वाचायला मिळाला निळू दामले यांनी लिहिलेला कल्पना करणारा असा. तो "आज 2001 मध्ये जयप्रकाश नारायण असते तर !" काय झालं असतं, त्यांना काय वाटलं असतं, ते मांडणारा.

५ त्याच्यानंतर जो लेख वाचला तो तर एखाद्या माणसाचं जीवन किती नाट्यमय मनस्वी असू शकतं ते सांगणारा. त्र्यं व्यं सरदेशमुखांविषयीचे जीवंत व्यक्तिचित्र होते ते आणि नांवही त्याला मोठे विलक्षण होते होतेः "एका राजाचे निर्गमन".

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

👍"टेलिरंजन-ह्यांची संगत नको रे बाप्पा !":😢

 👍"टेलिरंजन-ह्यांची संगत नको रे बाप्पा !":😢

"रंगांचे दुनिया"मधील 'टेलीरंजन' अर्थात टीव्हीवरील कार्यक्रमांचा आढावा घेणारे लेख किंवा व्हिडिओ बऱ्याच दिवसात बनविणे मनातच काही केल्या आलेच नाही. त्याला कारणही तसेच, कशाही भरकटत जाणाऱ्या मालिका, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तर्कशास्त्राला पटेल, बुद्धीला मान्य होईल असे काहीही नसणे, म्हणजे डोक्याला शॉट लावून घेणे, असाच प्रकार होता. बातम्या अथवा समूह कार्यक्रम देखील तसेच रटाळ वाटले, त्याच त्याच प्रकाराचे, काही अपवाद वगळता असल्यामुळे उगाचच आपला वेळ घालवणे, ह्यावर विचार करावा असे काही वाटलेच नाही. म्हणून खूप दिवसांनी मालिकांसंबंधी किंवा टेलिव्हिजन कार्यक्रमासंबंधी मनावर जे पडसाद पडले आहेत, ते थोडक्यात व्यक्त करण्याचा या लेखामध्ये प्रयत्न आहे.

👍"लक्ष्मीनारायणाची जोडी !":👌
'कलर्स' वाहिनीवरील बहुतेक मालिका आम्ही बघणे टाळत आलो आहे आणि आम्हाला त्यांच्यामध्ये कां कोणास ठाऊक रस वाटलेला नाही. 'जीव माझा गुंतला' ही एकमेव मालिका या वाहिनीवरून बघत आलो आहोत. सुरुवातीला मनोरंजक आणि नाट्यमय असणारी ही मालिका दोन बहिणी आणि त्यांचे मल्हारला पटकावणे, हा लपंडाव मोठ्या मजेशीरपणे आणि उत्कंठावर्धक रीतीने सादर केला गेला, तोपर्यंत ही मालिका पहायची वाटली. परंतु त्यानंतर मल्हारचे काका सुधाकर आणि त्याची पत्नी चित्रा यांचे कारनामे आणि त्याला मल्हार आणि अंतराने उत्तरे देणे सामना करणे, हा सगळा क्राईम थ्रिलर टाईप प्रकार असल्यामुळे तो कसाही खेचला जात होता. म्हणून ही मालिका आता केवळ इतर मालिकांमध्ये जाहिराती असल्या तर पाहिली जात आहे. एक गोष्ट निश्चित छोट्या पडद्यावर ज्या काही अनुरूप जोड्या आपल्याला दिसतात, त्यामध्ये अंतरा आणि मल्हार यांची जोडी योग्य निवडीमुळे चांगली लक्ष्मीनारायणासारखी वाटते.

😊 "आई, आता कशाला काय, काय करते !":😢
काना मागून आली आणि तिखट झाली अशा प्रकारचा प्रकार, वाहिन्यांच्या बाबतीत 'स्टार प्रवाह'ने दाखवून दिला आणि पाहता पाहता "झी मराठी"ची मक्तेदारी मोडून अधिकाधिक लोकप्रिय आणि मनोरंजक वाहिन्या येथे सादर करू लागल्या, हे खरे आहे. त्यातीलच "आई कुठे काय करते" ही मालिका अगदी पहिल्यापासून अगदी आत्तापर्यंत न चुकता पहावी अशीच होती. परंतु आशुतोष त्याची आई व नितीन यांची एन्ट्री, अरुंधतीचं देशमुखांचे घर सोडून गेल्यावरही परत त्या घरातच वावर, हा प्रकार सुरू झाल्यापासून ही मालिका कशीही, कुठेही बहकत चाललेली आहे.

त्यामुळे 'जीव माझा गुंतला' सारखीच या मालिकेवर देखील कधी दुसरीकडच्या ब्रेकमध्ये काही दिसलं तर बघावी, अशी अवस्था आलेली आहे. एकदाच ज्या कुणाची लग्न करून द्यायची असेल, म्हणजे यश गौरीचे आणि आशुतोष अरुंधतीचे, ती एकदाची करून टाका. अरुंधती आणि आशुतोष यांच्यामधले नाते उगाचच इतके लांबवत जाऊ देऊ नका आणि मालिका लवकरात लवकर बंद करा असाच विचार मनात येतो.

☺️"अशी, नकोशी लग्नाची बेडी !":😊
जी गोष्ट "आई कुठे काय करते"ची तीच 'लग्नाची बेडी'ची ! ही दुपारी एक वाजता प्रारंभ करणाऱ्या नव्या प्रकाराची बहुदा पहिली मालिका. सिंधू, तिचे वडील आप्पा हे पोलीस अधिकारी आणि आत्या या त्रिकुटासमोर तिच्या मागे लागणारा मवाली, यामध्ये एन्ट्री घेणारा राघव हा पोलीस अधिकारी आणि त्यानंतर एनकाउंटरचे वेळी, आप्पांचे मरण. त्यावेळेला कर्तव्य म्हणून राघवने सिंधू बरोबर केलेला विवाह, इथपर्यंत ही मालिका न चुकता बघावी अशीच होती.

परंतु राघव आणि सिंधूची रत्नपारखींच्या घरात एन्ट्री झाल्यावर, नेहमी उभे राहून घरातील स्त्रिया आणि मोजकेच पुरुष यांच्यामध्ये बेदरकारपणे कशीही वागणारी सिंधू आणि त्यातून निर्माण होत जाणारे, न पटणारे, मनाला चीड आणणारे असे प्रसंग यामुळे ही मालिका देखील नकोशी होत आहे. त्यामध्ये आता योगेशचा विवाह, थोडासा मसालेदार भाग आणून कशीबशी ही मालिका रंजक केली जात आहे. पण जी मुलगी अनाथ एक प्रकारे आहे, नवीन मोठ्या घरात आली आहे तिथे सिंधूसारखे बेलगाम वागणे हे खरोखर कोणालाही कधीही न पटण्याजोगे. त्यामुळे रागच येतो आणि लेखकाची कीव करावीशी वाटते.
जे होणं शक्यच नाही, ते जेव्हा मालिकांमध्ये अट्टाहासाने दाखवलं जातं, तेव्हा हळूहळू मालिका प्रेक्षकांच्या मनातून उतरत जातात. हाच फक्त धडा या तीन मालिकांच्या रसास्वादातून घ्यायचा दुसरं काय !

सध्या मला वाटतं एवढेच पुरे, कारण खरोखर उत्तमोत्तम मालिका, नवीन एंट्री झालेल्या 'सन' मराठी वाहिनीने एकापेक्षा एक अशा 'कन्यादान', 'सुंदरी', 'जाऊ नकोस दूर बाबा' अशा मालिकांमधून प्रेक्षकांचे मनात घर केले आहे. त्या मालिकांबद्दल पुढील 'टेलिरंजन' मध्ये विचार व्यक्त करणे योग्य ठरेल असं वाटतं. असाच अपवाद 'सोनी' मराठी वाहिनीवरील 'हास्य जत्रा' (अर्थात हाही विनोदी कार्यक्रम दररोज इतक्या वेळा दाखवला जातो की त्याचाही उबग येऊ शकतो.) 'बॉस माझी लाडाची' ही मालिका न चुकता दररोज पाहावी असे वाटणारी आहे. त्यामुळे या सगळ्यांबद्दल पुढील 'टेलिरंजन'ची वाट पहावी.

जे वाटले, जे रुचले, जे मनामध्ये उमटले, ते येथे व्यक्त केले आहे. वैयक्तिक मत असू शकते आणि कोणती मालिका, कुणाला आवडेल याबद्दलही मतभेद असू शकतात. पण "पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने" या उक्तीप्रमाणे हा लेख पहावा आणि वाचावा. आवडला तर शेअर करावा.

धन्यवाद
सुधाकर नातू

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

👍"शब्दांच्या पलिकडले !":👌💐🎂

 👍"शब्दांच्या पलिकडले !":👌💐🎂

☺️"मनाचे कोडे !":😊
👍"आपले मन खरोखर कुठे असते, कसे असते, दिसते, माहीत नाही. पण मनांत काय असते, ते मात्र फक्त आपल्यालाच उमजत रहाते. X-ray, MRI CT scan वा सोनोग्राफी मुळे आपल्या शरीरात काय काय घडामोडी चालू आहेत ते दिसते, आपल्याला व इतरांनाही.

पण मनांतले असे इतरांना समजू, उमजू देणारे यंत्र निदान आजपर्यंत तरी अस्तित्वात नाही. ही जगातील, सर्वात महान क्रुपाच आहे. असे अद्भुतरम्य यंत्र जेव्हा केव्हा निघेल, तेव्हा काय हलकल्लोळ होईल, त्याची कल्पनाच करवत नाही.

शेवटी मन हे कोडे आहे आणि ते तसेच, कोडेच राहू दे !👌💐

☺️"चंचल लक्ष्मी !":😊
👍"लक्ष्मी चंचल असते, तिची देवाण घेवाण सतत चालू असते. हे चक्र न थांबणारे असते. लक्ष्मी नेहमी स्वकष्टांतून, प्रामाणिक मार्गाने यावी. ग़ैर मार्गाने कष्टांशिवाय आलेली लक्ष्मी कधीही चांगली नाही; अशी लक्ष्मी सुख शांती देत नाही. हाच निसर्ग नियम आहे, जो Newton चा पहिल्या नियमानुसार आहे.

सध्याची अशांतता, ताणतणाव, हिंसा विध्वंसक वातावरण हा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या मार्गांनी येत असलेल्या लक्ष्मीचा परिणाम तर नाही ? कारण अशा व्यवहारांत एका बाजूला कर्तव्याचा विसर, फ़क्त हाव असते, तर दुसर्या बाजूला अगतिकता असते. कोण, कसा केव्हा थांबवणार भ्रष्टाचाराचा हा विदारक भस्मासूर ?😢

😊" समीक्षेची समीक्षा !"👌
☺️ "समीक्षा करताना समीक्षक ते काम केवळ आपल्यापुर्ते करत नसतो, तर तो प्रेक्षंकांचा दिशादर्शक असतो. सहाजिकच त्याला सर्वसाधारण प्रेक्षंकांची आवडनिवड माहित असणे गरजेचे असते. जो हे नीट जाणून आपले परीक्षण लिहितो, त्याच्यावर सहसा टीका होत नाही. समीक्षक जसा निर्मात्याचा भाट नसावा, तसाच तो प्रेक्षंकांचा शत्रुही नसावा, तर हितचिंतक असावा. प्रेक्षंकांची नस ज्यांना जाणता येत नाही अशांनी परीक्षणे न लिहीणेच चांगले !

'What 'classes' like, more often than not, masses reject And vice versa' appears unfortunately to be a reality !😊

# ☺️"जागते रहो !-आजही ध्यानात ठेवावे असे":😊

☺️ "टोकदार अस्मितांचे आव्हान" हा आजच्या मुंबई म. टा. मधील श्री. दिनकर गांगल ह्यांचा लेख वाचनीय असून तो चिंताजनक सद्दस्थिती पुराव्यानिशी संयतपणे मांडतो. एकीकडे नित्य वाढत्या अपेक्षा, दुसरीकडे संधींचा दुष्काळ आणि त्यांत भर म्हणून मतलबी स्वार्थी राजकारण, हेही पुरेसे नाही म्हणून की काय, अनियंत्रित नोकरशाही, ढासळती प्रशासकीय गुणवत्ता अशा चक्रव्यूहात शास्वत विकास पुरता अडकला आहे. जो पर्यंत सर्वच क्षेत्रात, समस्त स्थरांवर विहीत कर्तव्ये आणि त्यासाठीचे प्रत्येकाचे उत्तरदायित्व समाधानकारकरित्या पूर्ण करण्याची ईर्षा निर्माण होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर भवितव्य अंध:कारमय होणार हे निश्चित.👌
👍(माझा ४ वर्षापूर्वीचा फेसबुकवरील संदेश.)💐

धन्यवाद
सुधाकर नातू

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२

👍"जुने ते सोने-3 !":👌"नियतीच्या भेटीसाठी":💐

 

👍"नियतीच्या भेटीगाठी !":💐

☺️ "माणसाचा जीवन मृत्यू हे एक न सुटलेले कोडे आहे जो जन्मला तो केव्हा ना केव्हा तरी संपला हा जगाचा न्याय आहे परंतु कोण कुठे कधी कसा मृत्यू पावेल, याचे काही सांगता येत नाही. नियतीचा हा खेळ किती विचित्र आहे ते करमणूक क्षेत्रातील विविध नामवंतांच्या अंतकाळावरून या लेखात उलगडेल. म्हणूनच नियतीच्या भेटीगाठी अतर्क्य असतात असेच म्हणावयाचे !😢







"जुने ते सोने-2 !":👌


 

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२

👍💐"शारदोत्सव !":👌💐 👍"दैनंंदिनीतील पाऊलखुणा !:👌

 👍💐"शारदोत्सव !":👌💐

👍"दैनंंदिनीतील पाऊलखुणा !:👌
दैनंदिनीमध्ये रोजचे अनुभव मी लिहित आलो आहे. त्या अनुषंगाने 'दैनंदिनीतील पाऊलखुणा' या माझ्या लेखमालेतील हा पुढचा लेख आहे. यामध्ये अशाच एका डायरीमधील काही नोंदी मांडत आहे. त्या तुम्हाला वेगळे अनुभव आणि अंतर्मुख करणारे विचार देतील अशी आशा आहे.

12/5/'15
"बरोबर महिन्यापूर्वीच्याच अनुभवाची पुनश्च पुनरावृत्ती काल पुण्याहून येताना आली. अखेरीस चार वाजताची दुपारची नेहमीची गाडी स्लीपर कोच 5 वाजता आली आणि आम्ही बराच वेळ आधी वाट बघितल्यामुळे कंटाळून तिच्यातच बसलो. आम्हाला सांगितले गेले की हिंजेवाडीला जा तिथे सीटवाल्या बसमधून पुढे मुंबईला जा. असा अचानक सल्ला दिल्याने माझ्या संतापाचा उद्रेक झाला.

कारण आम्ही खूप आधीपासून तिकीट रिझर्व्ह- अडीच किंवा तीषन वाजण्याच्या गाडीचे केले होते. ती काही आलीच नाही आणि ही भलतीच गाडी आली. तिच्यामध्ये सीटवर बसता येणं कठीण होतं, कारण ती स्लीपर कोच होती. कसाबसा मान वाकवून बसलो आणि अर्ध्या तासाचा तो स्लीपर कोचचा प्रवास अक्षरशः हाडे खिळखिळी करणारा होता. त्यामुळे मला काही विशिष्ट आरोग्याच्या अडचणीमुळे कमी बोलायचे असूनसुद्धा, आवाज खराब करत बसलो. माझा राग मोठमोठ्या आवाजात व्यक्त करत राहिलो. "कधीही रिऍक्ट न करता रिस्पॉन्स करावे, शांतपणे घ्यावे" हे केवळ वाचता येते, पण प्रत्यक्षात येत नाही, याचाच हा अनुभव होता. आपण बदलू शकतो नव्हे बदलायला हवे, हे खरं म्हणजे समजायला हवं.

कारण त्याच गाडीतील दुसरे काही प्रवासी अजून दूरवरून आले होते. त्यांनाही असाच त्रास झाला होता. पण ते निमुटपणे तो सगळा त्रास दगदग सहन करत होते. हे बघितलं आणि मला माझीच लाज वाटायला लागली. त्यातल्या एका आजीचे तर गुडघे दुखत होते, त्यामुळे बसणे कठीण असूनही त्या मंडळींना असाच अनुभव येऊनही, ती म्हातारी बाई सारे सहन करत होती. हे खरोखर कौतुकास्पद होते. माझी पत्नी तर हिंजेवाडी येईपर्यंत चक्क झोपूनही गेली होती. माझी मलाच लाज वाटली. हिंजेवाडीला आम्ही दोघे उतरलो. दुसर्या गाडीची प्रतीक्षा करत बसलो. पण आपण योग्य वागलो नाही हे मला पटून गेले..

प्रसंग जसा येईल तसं आपण आपल्याला बदलायला हवं. होईल तो त्रास सहन करायला हवा. हे त्या आजींच्या एकंदर सहनशीलतेत्मुळे मला समजून आले !

15/5/'15
नुकतेच आम्ही "शेवग्याच्या शेंगा" हे नाटक बघितले. तसे ते लांबत जाणारे कंटाळवाणे नाटक होते, परंतु त्या नाटकामधून जो विचारप्रवाह वर्तवला होता, तो
मनामध्ये रुजून गेला. तो असा:

"वेळ जशी आयुष्यात बदलत जाते, तसे आपले जीवनातले ध्येय वा पर्पज व अपेक्षाही कालानुरूप परिस्थितीनुरूप बदलत गेल्याच पाहिजेत, याचे भान ठेवून वागणे हे शहाणपणाचे होय."
हा एक अमूल्य संदेश सर्व वयोगटाला लागू होतो. तेच नाटकातील तीन भिन्न पिढ्यांमधील उदाहरणांवरून दाखवले आहे. "श्री चिंतामणी"ची सर्वच नाटके दिशादर्शक असतात, त्याचाच प्रत्यय या नाटकाने आला एवढे मात्र खरे !

25/5/'15
"केवळ नाटके सिनेमे पाहणे व एन्जॉय करणे, हॉटेलिंग करणे म्हणजेच सुख मिळविण्याचा एकमेव अत्यावश्यक व सर्वोत्तम मार्ग नव्हे. मात्र हेच हल्ली कुणालाच समजेनाचे झाले आहे. कारण या पैसे घालवणाऱ्या मार्गांशिवाय, अनेक सुलभ सोपे बिनखर्ची मार्ग असू शकतात. त्याकडे कोणाचेही ध्यान जात नाही. परत प्रकृतीलाही ते मार्ग अधिक सुख समाधान देऊ शकतात. याची जाण विशेषतः जेष्ठ नागरिकांनी ठेवावीः
"वाचन करणे, घरात सुरेल संगीत ऐकणे, टीव्ही पाहणे, शांतपणे काहीच न करता आपल्यातच मग्न राहणे किंवा जवळच्या बागेत समुद्रकिनारी जाऊन निसर्गाचा आस्वाद घेणे अथवा जवळपासच्या आपल्या सुह्रुदांच्या भेटीगाठी घेऊन, त्यांच्याबरोबर सुखदुःखाच्या अनुभवांच्या गप्पा मारणे" असे अनेक मार्ग आपल्यासमोर असू शकतात. मात्र तिथेही व कुठेही अतिरेक नको, हे मर्म लक्षात ठेवायला हवे !

धन्यवाद
सुधाकर नातू