मंगळवार, ८ मार्च, २०२२

# "काळ अन् वेळेचा जमाखर्च!":

 "काळ अन् वेळेचा जमाखर्च!":

कुणालाही न सांगता काळ हा जातच असतो पुढे पुढे. त्याला मागे वळणे माहीत नाही, तो अव्याहत पुढेच जात रहाणार असतो. मागे गेलेला काळ आणि वेळ फुकट गेली की, चांगल्या समाधानकारक अशा गोष्टींसाठी वापरली गेली, ह्याची आपल्याला कायमच रुखरुख लागली पाहिजे. कारण उपलब्ध वेळ तुम्ही कसा वापरता, कशा करता वापरता, ह्यावर आणि फक्त ह्यावरच तुमचे समाधान, यश अवलंबून असते. ध्यानात ठेवा, आयुष्य हा लिमिटेड ओव्हर्सचा सामना असतो आणि ज्याचा "रन रेट" अधिक तोच जिंकणार! थांबला, तो संपला!

पण दुर्दैवाने, आपल्याला वेळेचे भान राहत नाही, आपण नको त्या गोष्टीत वेळ घालवत राहतो, आणि नंतर फक्त पश्चाताप करायची पाळी येऊ शकते. कायम सजग राहून आपण वेळ कसा घालवला, वा कसा अधिक चांगल्या प्रकारे घालवता येईल किंवा घालवण्यापेक्षा वापरता येईल, ह्याचाच सातत्याने विचार केला पाहिजे.

त्यासाठी दररोज सकाळी, कालचा दिवस समाधानकारक आणि कोणत्या उपयुक्त योगदानांमध्ये गेला, ह्याची नोंद ठेवणे उपयुक्त ठरू शकते. 

हे अंतिम सत्य आहे की, काळ, वेळ ही सगळ्यांना सारखी असते. कदाचित मृत्यु आणि वेळ ह्या, दोनच गोष्टी अशा आहेत की, जिथे कुठलीही भेदभावाची सुतराम शक्यता नाही. ते लक्षात ठेवून, समोर आलेला प्रत्येक क्षण अधिकाधिक उपयुक्त गोष्टींसाठी, स्वतःला किंवा इतरांना समाधान देण्यासाठी वापरता आला तर आपला दिवस चांगला गेला असे म्हणता येईल.

धन्यवाद

सूधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा