गुरुवार, ४ मार्च, २०२१

"आजोबांचा बटवा-१/२/'२१": "जुने ते सोने":

"आजोबांचा बटवा-१/२/'२१": "जुने ते सोने":

व्यक्ती तितक्या प्रकृती हे कुणी म्हटलय ते खोटं नाही. प्रत्येक माणूस हा स्वतंत्र बुद्धीचा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वभावाचा असतो. प्रत्येकाची जडण-घडण ही वेगळ्या प्रकारे होत असते, शिवाय अनुवंशिक असे पिढ्यान्पिढ्या अंगी उतरलेले गुण देखील प्रत्येक व्यक्तीचे वैशिष्ट्य ठरवत असतात. मित्रमंडळी, शिक्षण आई-वडील नातेवाईक समाज अशा अनेक बाबींमधून तुमचे व्यक्तिमत्त्व घडत असते. यामध्ये माणूस ज्या वातावरणात लहानाचा मोठा झाला ती वर्षै अत्यंत महत्त्वाची असतात. सभोवतालचे सांस्कृतिक-सामाजिक आणि इतर वातावरण कशा तऱ्हेचे आहे, यावरही त्या माणसाची एकंदर प्रगती अथवा आवडनिवड तसेच जीवनशैलीचे मार्ग, विचारांची दिशा ठरत असते.

हे सारे आज आठवायला कारण आज अचानक मी माझ्या जुन्या लेखांचं एक बायडींग करून पुस्तक तयार केलं होतं, ते नुसतच वर्षानुवर्षे पडून होतं. कोरोनाच्या या काळात घरामध्ये कायम बसलो असताना आज त्या मोठ्या जुन्या बाडाकडे माझे लक्ष गेले आणि त्यातील पहिलेच पान उघडल्यावर, तेथे मला आश्चर्याचा धक्का बसला. आम्ही सायनला ज्या सोसायटी व आसपासच्या माहोलात लहानाचे मोठे झालो, त्या सांस्कृतिक वातावरणाचे अप्रतिम वर्णन करणारा एक इंग्रजी लेख त्यावेळच्या हौसिंग टाईम्स मध्ये चक्क छापून आला होता हे ध्यानात आले.

२६ जानेवारीला दरवर्षी आमच्या सोसायटी आणि आजूबाजूच्या सोसायट्यांचा मिळून एक दोन दिवसांचा मोठा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होत असे. त्याची २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच्या वर्षातील खास कार्यक्रमाचे वर्णन त्या लेखात होते. तो १९८२ सालचा हाऊसिंग टाईम्सचा अंक होता आणि त्यातील त्या लेखाचे पान माझ्या त्या संग्राह्य बुकात आढळले. ते तिथे कधी कसे आले ते मला आता आठवतही नाही. आज ते इथे पुनश्च उलगडताना मला खूप आनंद होत आहे.

इंग्रजीमध्ये असलेला हा लेख, ज्या मध्ये माझाही एक फोटो आणि माझा कार्यभाग, तसेच माझ्या इतर मित्रमंडळींचा त्या स्नेहसंमेलनाला लागलेला हातभार, प्रतिष्ठित विजय मर्चंट आणि दया डोंगरे यांची आमच्या सोसायटीला त्या निमित्ताने भेट, अशा तऱ्हेचे बहारदार ओघवते वर्णन या लेखात आलेले आहे. तेव्हा त्या लेखाची फोटो कॉपी इथे  देताना आज मला पुनःप्रत्ययाचा सुखद अनुभव येत आहे. आजोबांचा बटवा ह्या लेखमालेत हा लेख शोभून दिसेल असे वाटल्याने, मी तो येथे मुद्दाम देत आहे. आपल्यालाही तो वाचून एक प्रकारची वेगळीच सुखद अनुभूती होईल, अशी आशा आहेःः



अशा तर्हेचे सामुहिक सामंजस्य, सौहार्दाचे परस्पर संबंध व कौतुकास्पद सांस्कृतिक वातावरण हल्ली अभावानेच दिसते. आज जे काही आम्ही आहोत व जे आम्ही साध्य केले आहे, त्यामागे  ह्या स्नेह महोत्सवांचा सिंहाचा वाटा आहे. मला स्वतःला म्हणूनच ह्या ह्रद्य संस्कारशाळेत लहानाचा मोठे झाल्याचा मनापासून अभिमान व समाधान वाटते. हा जुने ते सोने अनुभव आपल्याला कसा वाटला ते प्रतिसादात आपण जरूर मांडावा.

धन्यवाद
सुधाकर नातू


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा