सोमवार, १५ मार्च, २०२१

"टेलिरंजन-१०": "लेखाजोखा मालिकांचा":

 "टेलिरंजन-१०": "लेखाजोखा मालिकांचा":


करमणूक क्षेत्र हे खरोखर बेभरवशाचं आहे. येथे प्रेक्षकांची नस अथवा आवडनिवड अचूक जाणणं, फार फार कठीण असतं. कधी कधी हा हा म्हणता, एखादी मालिका डोक्यावर घेतली जाते, तर बघता बघता दुसरी मालिका अचानक बंद करायची वेळ येते. चित्रपट असो, नाटक असो, अथवा दूरदर्शन मालिका असो, ह्या करमणूक क्षेत्रात निश्चित यश कुणाला, कधी, कसे मिळेल, ते आजतागायत कोणाला सांगता आलेले नाही. याचं कारण काय, तेही शोधणं मोठं कठीण असतं.

आता हल्लीचच उदाहरण बघा ना, "अ" वाहिनी ही खरं म्हणजे सध्या जुनी वाहिनी आणि घरोघरी तिच्यावरील मालिका नेहमी आवडीनं बघितल्या जात. पण नवनवीन दोन वाहिन्या आल्या व स्पर्धा सुरू झाल्यावर आणि आता तर आणखीन चौथी वाहिनी सुध्दा करमणूक करायला सज्ज झालेली आहे. अशा वेळेला मालिकांबरोबर ह्या वाहिन्यांमध्ये लोकप्रियते विषयी, चढ-उतार होताना आपल्याला होताना दिसतात.

हल्ली तर "अ" वाहिनीवरील मालिका नको इतक्या कंटाळवाण्या आणि लांबण लावणाऱ्या झाल्या आहेत आणि कदाचित ही इतर वाहिन्यांच्या तुलनेत तळाला जाते की काय, अशी शक्यता आहे. ही सारी ही गंमत खरोखर विचार करण्याजोगी आहे. हे कां व्हावे, त्याचे निश्चित असे उत्तर कोणाजवळ नाही. ज्याप्रमाणे घोड्यांच्या रेसमध्ये, कुठला घोडा पहिला येईल, हे कळत नाही आणि भलताच कोणीतरी बाजी मारून जातो, तसा प्रकार आपल्याला पुष्कळदा इथेही पाहायला मिळतो.

आजच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जीवनात आता करमणूक क्षेत्राला खूप महत्त्व आले आहे. त्यामुळे रोजगारासाठी सुध्दा हे क्षेत्र एक अत्यंत महत्त्वाची बाब बनले आहे. ज्याच्या हातात काही ना काहीतरी कला आहे, तो या क्षेत्रात काहीतरी उत्तम करून दाखवू शकतो, त्याला कुठे ना कुठे तरी संधी मिळतेच मिळते, अशी सध्याची परिस्थिती सुदैवाने आहे. परंतु अशा वेळेला योग्य तो सखोल संशोधनात्मक अभ्यास, प्रेक्षकांची अचूक आवड निवड शोधण्यासाठी झाला पाहिजे. ग्रामीण-शहरी आणि अशाच तऱ्हेने वेगवेगळे अनेक गट प्रेक्षकांचे पाडून, त्यामधून कोणाला काय कसे कां आवडते याचे शास्त्रीय सर्वेक्षण जर झाले तर ते प्रेक्षकांना जसे जसे फायद्याचे, तसेच जाहिरातदारांना सुद्धा. कारण हल्ली प्रेक्षकांचा जसा भ्रमनिरास होतो, तसा जाहिरातदारांना सुद्धा आपण जिथे पैसे टाकले, ते फायदेशीर होतात कां हे बघणे गरजेचे आहे. नुसते कलाकारांच्या वा निर्मिती संस्थेच्या नांवांवर जाऊन जर जाहिराती दिल्या जात असल्या, तर शेवटी ते जसे जाहिरातदार यांचे नुकसान तसेच त्या प्रॉडक्ट व सेवेच्या ग्राहकांचेही एक प्रकारे नुकसानच.

तेव्हां या साऱ्या क्षेत्रांत, जे हवेहवेसे व रूचेल असे वाटते ते व तितकेच प्रेक्षकांना कसे देता येईल ह्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. वाचकमान्य व प्रिय साहित्य क्रुतींची त्यासाठी निवड करावी. निर्मिती पूर्वीच संपूर्ण कथावस्तुची कल्पना चिकित्सा करून तयार झाल्यावरच मालिका निर्माण करावी. कुठल्याही इवल्याशा कथाबीजावर मालिका बेतून ती प्रेक्षकांच्या माथी मारत नंतर ती लांबवण्यासाठी कशीही पाणी घालून भरकटवणे आता तरी बंद करावे. थोडक्यात T20 अथवा ODI सामन्यांप्रमाणे आखिव, बंदिस्त निश्चित कालमर्यादा संभाळणारी असावी.

ह्या महत्वाच्या विषयावर समाजमंथन होणे आवश्यक आहे, इतकेच सध्या म्हणतो.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel
moonsun grandson

विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........

moonsun grandson Channel link:

https://www.youtube.com/user/SDNatu

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा