"अंधेर नगरी, चौपट राजा":
माणसे म्रुत्युमुखी पडायला,रस्ते रेल्वे अपघात कमी होते म्हणून की काय, सध्या कोणत्याच गोष्टी योग्य तर्हेने घडत नाहीत. कुठे धरण फुटते, पूल कोसळतात, कुठे संरक्षक भिंती कोसळतात कुठे विद्यार्थी कोचिंग क्लास मध्ये आग लागल्यामुळे उड्या मारतात व प्राण गमावतात, कुठे रस्त्यात खड्डे पडल्यामुळे अपघात होतात आणि अनेक निष्पाप जीव जातात. तर कुठे गटारांमध्ये मुल पडून नाहक बळी जाते.
माणसाचाच आता काही भरवसा राहिला नाही. माणसांच जीवन म्हणजे किड्यामुंगीसारखे झाले आहे. सुस्त भ्रष्टाचारी यंत्रणा, हलगर्जीपणा दिरंगाई बेफिकीर करण्यात मग्न आहे. कुठे काही जीवघेणे संकट आले की चौकशी लावली, जे दोषी असतील त्यांना कडक शिक्षा होईल अशी टेप लावत, काही लाख अनुकंपा दान फेकले की आपली जबाबदारी संपली असे मानणारी मग्रूर कारभारी मंडळी वाट्याला आली. एकमेकांना दोषी ठरविण्यात आनंद मानू लागली. आपल्या विहीत उत्तरदायित्वाला विसरून लाज सोडून सत्ता उपभोगत राहिली की अनागोंदी अराजक दूर रहात नाही.
विकासाची स्वप्ने व गप्पा मारत, चलता है कल्चर चालत आहे. यंत्रणा राबवणारे जसे आपल्या उत्तरदायित्वाला विसरत आहेत तसेच ज्यांच्यासाठी यंत्रणा आहे, तेही आपल्या जबाबदारीची जाणीव नसणारे होत आहेत. म्हणूनच अनेक मानवनिर्मित अघटीत घटना घडत जात आहेत.
आमच्यासारख्या ज्येष्ठांना ह्या सार्या चिंता करायची तशी काही गरज नाही. परंतु रुखरूख हीच वाटते हे असेच चालू राहिले तर, उद्याच्या पिढी समोर अंध:काराशिवाय काहीही उरलेले नाही. ही जाणीव कुणीतरी कुणाला तरी करून द्यायला हवी. म्हणून पोटतिडकीने जे वाटले ते लिहिले. त्याचा काही उपयोग नाही, हेही दुर्दैवाने खरेच आहे.
अखेरीस प्रार्थना हीच:
"ज्याला त्याला, त्याने त्याची जबाबदारी तंतोतंत पाळण्यात खराखुरा आत्मानंद मिळत असतो, ही उमज जर मनापासूनआली व तसे त्याचे कायम वर्तन राहिले, तर समस्यांना पूर्णविराम मिळू शकेल............"
"कलियुग है भाई, कलियुग!":
विचारसरणी व धोरणे न पटल्याने पक्ष बदलण्याचे दिवस आता इतिहासजमा! आता आमिषे कारण असतील, तर ज्यांनी निवडून दिले त्यांच्याशी ही गद्दारीच नव्हे काय?
हा सत्तेसाठीचा खेळच निराळा!
"सध्याचा वाढता आयाराम-गयाराम हा खेळ बघता, एकदा निवडून आल्यानंतर तो पक्ष पुढील निवडणुकीपर्यंत कुणालाही सोडता येऊ नये असा कायदा करणे आवश्यक नाही कां?
तसेच विधी सभागृहाचा सभासद असल्याशिवाय कुणालाही मंत्री बनविता येणार नाही, असाही कायदा सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक नाही कां?"
"उघडा डोळे व बघा नीट":
अनैतिकपणे व्यवहार बिनधास्तपणे करून स्वत:चा स्वार्थ आणि तुंबडी भरणारी विविध उदाहरणे आजच्या भ्रष्ट आणि आत्मकेंद्री वातावरणांत ठायी ठायी घडताना दिसतात.
'सय' ह्या श्रीमती सई परांजपे लिखीत पुस्तकात ह्याला छेद देणारी, त्यांच्या मातोश्री शकुंतलाबाई परांजपे ह्यांची एक अनुकरणीय आठवण दिली आहे. राज्यसभेच्या खासदार असताना, दिल्लीवरून विमानप्रवास करताना शकुंतलाबाईनी, सोबत असलेल्या दोन वर्षे नुकतेच पूर्ण केलेल्या आपल्या मुलीचे, काऊंटर वरील माणूस नको नको म्हणत असूनही, चक्क त्याच्या खनपटीस बसून पैसे भरून तिकीट काढले होते.
दुर्दैवाने अशी माणसे आता दुर्मिळ झाली आहेत. जो समाज कायदा व नैतिकता मानत नाही, त्याचा भविष्यकाळ अंध:कारमय राहील हेच खरे.....
अखेरीस..
सध्या दिवसामाजी जे जे इथे तिथे मानवनिर्मित अघटीत घडते आहे, त्यापायी वाटते
" श्री पांडूरंगा आता तरी धांव रे,
आता तरी पाव रे,
आमचे डोळे उघड रे!"
सुधाकर नातू
१२/७/'१९
Good article
उत्तर द्याहटवाOne observation, we as general public are also not discharging our duties but just find solace in blaming politicians eg we make so much hue n cry about street vendors n inconvenience caused by them, we shop at them only in the name of convenience, cheapness....
When we blame top schools charging exorbitant fees, we want our children to be admitted in those schools only