रविवार, ७ जुलै, २०१९

"निरीक्षणे व परीक्षणे!":


'असाही एक अनुभव':

'Beauty, lies in the eyes of the beholder':

एका नांवाजलेल्या लेखकाचे, तितकेच प्रसिद्ध पुस्तक, मोठ्या हौसेने मी घेतले आणि वाचायला लागलो, तेव्हाच माझ्या ध्यानात आले की, त्यांतील मजकूर खूपच लहान फाँट वापरून छापला आहे. हळुहळू ते पुस्तक चाळताना, मला उमगलं, की त्यामधील विषय आणि मुद्देही आता कालबाह्य झाले आहेत. शेवटी तर, समजून चुकले की, जुन्या काळी गाजलेले, केवळ त्याच्या नांवावरून हातात घेतलेले, हे पुस्तक मी नेट लावून जिद्दीने जर वाचले, तर माझे डोळे निश्चितच बिघडतील. म्हणून, नाईलाजाने मी पुस्तक वाचणे बंद केले आणि शांतपणे डोळे मिटून पडलो.

माझी निवड चुकली, ह्याचा विषाद आणि मनस्ताप व्हायला लागला. पण, अचानक मनात वीज चमकली आणि मला साक्षात्कार झाला की, आपली ही चूक क्लेशकारक तर खरीच, पण आपल्याला ती, अशी चटकन् ध्यानात येणे, हे तर किती तरी फायद्याचेच नव्हे कां?

तथ्यांश हा की, 'नांव' होणे' हे शेवटी कालसापेक्ष असते; कोणतीही निवड वा निर्णय साधक बाधक विचार करूनच घ्यावा; आणि सर्वांत महत्वाचे हे की, काहीही घडले, तरीसुध्दा अंतिमत: ते आपल्या हिताचेच असते, फक्त त्यासाठी आपली द्रुष्टि यथार्थपणे बदलायला हवी!
---------------------------
"विचार मालिका":

# "स्वतंत्र कल्पना करणे, ती अर्थपूर्ण योगदान देणार्या मूर्त
स्वरुपांत प्रत्यक्षात आणणे,
हयापरती नितांत आत्मानंद देणारी चिज नाही."

# "सध्याच्या राजकीय घडामोडी व वळणे पहाता, एकपक्षीय हुकूमशाहीकडे आता वाटचाल चालली आहे, असे म्हणता येईल कां?"

# "जागते रहो":

चंगळवाद बोकाळत गेला की, दुसरं काही होणं अशक्य असतं. भौतिक प्रगती होता होता नैतिक अधोगती कधी होत जाते, ते कळतंच नाही.

अशा समयी, जेव्हां पैसा हे केवळ साधन न रहाता, सर्वार्थाने एकमेव साध्य रहाते, तेव्हा नैतिक मूल्ये आणि समाजापुढचे आदर्श ढासळत जातात आणि पहाता पहाता माणूसपण तर हरवतेच अन् ते एकदा कां हरवले की भवितव्य अंध:कारमय होणे दूर रहात नाही.

आपल्या विहीत कर्तव्याचे उत्तरदायित्व मनापासून मानण्याच्या आणि अधिकाधिक सर्वोत्तम दर्जाचे काम नेहमी करण्याच्या, प्रत्येक नागरिकांच्या प्रव्रुत्तीमुळे, प्रगत देश आपले भूषणावह स्थान जगात टिकवून आहेत.

कंत्राटदार निक्रुष्ट काम करतो तेव्हा तो त्याच्या विहीत कर्तव्याशी प्रतारणा करतो. अशी कार्यसंस्क्रुती असल्यावर अधोगती अपरिहार्य असते.

इथे नितीमत्तेचा विषय नसून, कार्यसंस्क्रुतीचा संबंध आहे. जी ज्याची जबाबदारी ती उत्तम तर्हेने जर आपल्या इथे पाळली गेली असती, तर आज संपूर्ण चित्र वेगळे असते.

आणि आपण? कुठे आहोत व कसे आहोत?

वास्तव परिस्थिती स्विकारून आपल्या चुका व आपल्यातील कमतरता खुल्या दिलाने मान्य करण्यात हयगय करून काहीच साध्य होत नाही. आपल्या पिछेहाटीला आपणच कारणीभूत होत असतो, हे कटू सत्य आहे.

# "श्रेय घ्यायला नेहमी, पुढे येणार्यांनी,
वेळीच
आपली जबाबदारी मान्य करुन,
झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत असे वर्तन ठेवावे."

# "तुपारे" मालिकेतील ईशा आता गरोदर झालेली दाखवत आहेत.
पण प्रश्न हा की, हे बहुधा, विक्रांत हा गजा पाटील आहे हे ईशाला समजण्यापूर्वी तर झालेले दिसत नाही; मग ते जर नंतर असेल तर कां व कशासाठी?"

# "केव्हा जागे होणार आपण?":
"पुरे झाला हा जीवघेणा खेळ":

मुंबईची तुंबई उघड्या डोळ्यांनी पहाणारे, गेंड्याच्या कातडीचे कारभारी, मालाड सारखी अनेकांचे प्राण घेणारी दुर्घटना, "मरे"ची अमानुष गर्दीचा आगडोंब पहाता, भ्रष्ट यंत्रणांमुळे मुंबईकरांना कोणीही वाली उरला नाही, असेच दिसते.

अजून किती दिवस बिचार्या नागरिकांनी हे सारे जीवघेणे हाल सहन कां व कशासाठी सहन करावयाचे? म्हणूनच लष्कराच्या ताब्यात मुंबईची सर्व नागरी सेवासुविधा देण्याचा प्रयोग कां करू नये?

मानवनिर्मित दुर्घटना ज्यांच्या बेपर्वाई व चुकांमुळे होतात, त्यांना जर स्वत:च्या नाकर्तेपणाबद्दल काहीच लाज वाटत नाही आणि अशांना त्यांच्या क्रुत्याबद्दल वेळीच कठोर शिक्षा होत नाही, त़ो पर्यंत अशी संकटे निर्माणच होत रहाणार."

# "धरिला हा छंद":
कुणाला चित्रे काढण्याचा, तर कुणी फिरायला जाण्यात रमतो, कुणी स्टँपस्, जुनी नाणी वा वर्तमानपत्रातली कात्रणे जमवण्यात आनंद मानतो, तर आणखी कुणाला वाचनाचा छंद असतो. काही ना काही छंद असण्याची गरज निव्रुत्तीचे दिवस आले की प्रकर्षाने भासते. ज्यांना कुणाला कोणताच छंद नसतो, त्यांची स्थिती अशा वेळीच नव्हे तर जीवनातील कोणत्याही अवस्थेत कठीण होते.

अखेर छंद म्हणजे काय, तर जी गोष्ट आपल्याला आपल्या द्रुष्टिने चांगली जमते, जी पुन्हा पुन्हा कराविशी वाटते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जी केल्याने आपल्याला तर आनंद होतोच, समाधानही मिळते, पण जिच्यामुळे आपले व इतरांचे नुकसानही होत नसते, ती गोष्ट किंवा क्रिया ही आपला छंद होय. सुदैवाने मला वाचनाचा, बहुधा त्याही पेक्षा लिहीण्याचा छंद खरोखरच अधिक प्रिय आहे. मी माझा स्मार्ट फोन प्रामुख्याने दिसामाजी काही ना काही, जेव्हा जसे सुचेल तसे लिहीण्यासाठीच वापरतो. त्याचेच फळ आता मला मिळते आहे. माझा ब्लॉग सुरू केल्यापासून आजपर्यंत विविध विषयांवर १०० हून अधिक स्वतंत्र लेख लिहू शकलो आहे!

तुमचाही वेळ असाच, सत्कारणी लावण्यासाठी..........

माझ्या ब्लॉगवरील लेख वाचा: लिंक:

http//moonsungrandson.blogspot.com

सुधाकर नातू
७/७/'१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा