बुधवार, १७ जुलै, २०१९

"चिंतनिका":


"लेखन आणि वाचन":

"लेखन फक्त दोन प्रकारचे असतं. एक सहज, सरळ सोपं वाचलं की, सगळ्यांना समजूं शकतं असं, तर दुसरं केवळ काही मूठभरांना बुद्धीचा कस लावला तरच उमजतं असं!

कुणी कसं लिहायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं, असं की तसं! पण वाचकाला मात्र सोपं तेच हवं असतं. कठीण, दुर्बोध ते अडगळीतच जातं.

वाचक वर्ग कमी झाला आहे, असा जो ओरडा होतो त्याच्या मागे कदाचित सोपं सरळ, दुर्मिळ तर दुर्बोध मात्र विपुल, हेच असावं. वाचनालयात जेव्हा आपण जातो तेव्हा अनेक पुस्तकं तिथे कपाटात हारीने मांडून ठेवलेली असतात. पण त्यातून निवडक असं उचलणं आणि मिळणं मोठी कठीण असतं. बहुतेक पुस्तकं बिचारी आपल्याला कोण उचलतं त्याचीच वाट पहात बसलेली असतात."
---------------------------
"उघडा डोळे व बघा नीट":

अनैतिकपणे व्यवहार बिनधास्तपणे करून स्वत:चा स्वार्थ आणि तुंबडी भरणारी विविध उदाहरणे आजच्या भ्रष्ट आणि आत्मकेंद्री वातावरणांत ठायी ठायी घडताना दिसतात.

'सय' ह्या श्रीमती सई परांजपे लिखीत पुस्तकात ह्याला छेद देणारी, त्यांच्या मातोश्री शकुंतलाबाई परांजपे ह्यांची एक अनुकरणीय आठवण दिली आहे. राज्यसभेच्या खासदार असताना, दिल्लीवरून विमानप्रवास करताना शकुंतलाबाईनी, सोबत असलेल्या दोन वर्षे नुकतेच पूर्ण केलेल्या आपल्या मुलीचे, काऊंटर वरील माणूस नको नको म्हणत असूनही, चक्क त्याच्या खनपटीस बसून पैसे भरून तिकीट काढले होते.

दुर्दैवाने अशी माणसे आता दुर्मिळ झाली आहेत. जो समाज कायदा व नैतिकता मानत नाही, त्याचा भविष्यकाळ अंध:कारमय राहील हेच खरे.
---------------------------
"चिंतनिका":

"'जमिनी'वरील यंत्रणेची परिस्थिती हाताळताना नाकी नऊ येत असताना, चांद्रयानासारखी स्वप्ने पहाणं, हे प्राधान्य चुकत तर नाही?"

"विकासाच्या संकल्पनांचा आणि सद्यस्थितीतील प्राधान्यांचा सर्वंकष आढावा घेण्याची कधी नव्हे इतकी आज गरज आहे कां?"

ठेविले अनंते तैसेची रहावे"!:
जेव्हापासून चलन चलनात आले तेव्हापासून नव्या नव्या चिंतांचा जन्म झाला.

"अंगभूत गुणवत्ता, दूरद्रुष्टी आणि ईप्सित ध्येयासक्ती ह्या जोडीला जिद्द आणि प्रामाणिक अहर्निश कष्ट घेणारी व्यक्ती, सामान्यातून असामान्यत्व मिळवते. समाजाचे आणि देशाचे पुनरूत्थान ही अशी महान दिग्गजांची मांदियाळी करत असते........"
---------------------------
"जाणा तुमच्यातील 'महागुरु'":

आज गुरुपौर्णिमा. माझा नमस्कार.

जीवनामध्ये जन्मापासून प्रथम आई आणि नंतर विद्यभ्यासांत गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण जगाचे एकंदर रंगरूप कसे आहे, कोणती आव्हाने आहेत ह्यांची कल्पना घेऊन पुढे जात असतो. मार्ग शोधतो.

ह्या सर्वांना मनापासून वंदन करताना मला प्रामाणिकपणे, असे वाटते की हे तर खरोखर सर्व श्रेष्ठगुरु यात वादच नाही. परंतु जीवनामध्ये जर खरोखरीच कुणी आपल्याला सर्वोत्तम गुरु भेटत असेल, तर तो म्हणजे आपण स्वतः आणि आपला अनुभव!

दुर्दैवाने आपल्यातील ह्या महागुरू कडे आपण किती लक्ष देतो? जर आपण एकदा दररोज आपणच आपल्या स्वतःशी दहा मिनीटे संवाद केला आणि आपल्या अनुभवांच्या आरशात डोकावून पाहिले, तर आपल्याला खरोखर सर्वोत्तम असे शिकायला मिळेल, दश दिशा गवसतील.

आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मीच माझ्या मनामध्ये डोकावून पाहिले आणि हे सुचले अन् लिहिले!
--------------------------
"विश्वकपाचे म्रुगजळ":

साखळी सामन्यात पहिला क्रमांक मिळविणार्या टीम इंडियाचा, चौथा क्रमांक मिळविणार्या न्यूझीँंलंड टीमकडून उपांत्य सामन्यात पराभव झाल्यामुळे विश्वकपांतील आपले आव्हान अखेर संपूष्टात आले आहे. ह्याला अनेक कारणे आहेत:

१. फलंदाजी गोलंदाजी व क्षेत्ररक्षण ह्या तीनही बाबतीत न्यूझीलंडची कामगिरी आपल्यापेक्षा कितीतरी सरस होती. विशेषत: आपल्या गलथान क्षेत्ररक्षणामुळे ज्या धांवा आपण दिल्या, त्या वाचवता न आल्याने आपला पराभव झाला.
२. संघ निवडीत तीन यष्टिरक्षक-पंत कार्तिक व धोणी ही निवड चुकीची व अनावश्यक होती. धोणीबरोबर उरलेल्या दोघांऐवजी शमी व केदार जाधवला घ्यायला हवे होते.
३. ह्या सामन्यात भोपळा फोडायला कार्तिकने १९/२० चेंडू घेतले आणि अननुभवी पंतने भान न ठेवता, अवेळी, बेदरकार चेंडू फटकावून आपली विकेट जवळ जवळ फेकली.
४. आधीचे सामने जिंकू देण्यात ज्या तीन आघाडीच्या फलंदाजांचा सिंहाचा वाटा होता, ते तिघेही ह्या सामन्यात दारुण अपयशी ठरले.
५. सर्वात चिंताजनक बाब ही की, धोणीच्या संथ फलंदाजीमुळे आपले सोपे लक्ष्य, अवघड झाले.

अर्थात पराभवानंतर अशी जर तरची भाषा व्यर्थच होय. कारण
Ultimately the Better team wins the game हेच खरे!
----------------------------
"ह्याला जीवन ऐसे नांव!":

जीवन एक कोडे आहे, यात शंका नाही. सभोवताली पहा. कुणाच्या नशिबात काय काय लिहिले असते ते! आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे माझ्या पाहण्यात अशीच काही उदाहरणे आली की, ज्यामध्ये खरोखर त्या त्या व्यक्तींच्या नशिबात असं कां म्हणून ठेवलं गेलं, याचं कोडंच पडते.

हे दांपत्य चांगले, हुशार दोघंही उत्तम अशा सुस्थितीतल्या नोकरीमध्ये. अशा वेळेला त्यांना दोन मुली झाल्या आणि त्या हुशारही निघाल्या. पण अचानक, ह्या दांपत्याच्या जीवनात एक मोठा आघात झाला. नवरा-बायको कुठेतरी फिरायला म्हणून गेलेले असताना, नवऱ्याने रस्ता क्रॉस केला. पण, हाय तोच रस्ता बायको क्रॉस करून येताना, भीषण अपघातात त्याच्या ती समोर मरण पावली. याला काय म्हणायचे? हे कुठलं कमनशीब!

परंतु, इथे ही गोष्ट थांबत नाही. त्या दोन मुली ह्या ग्रहस्थाने चांगल्या प्रकारे एकट्याने वाढवल्या. मोठी मुलगी तर उत्तम शिक्षण घेऊन परदेशातल्या चांगल्या नावाजलेल्या कुटुंबात सून म्हणून गेली. पण धाकटी अत्यंत सुस्वरूप गोड मुलगी तिच्या नशिबात काय ठेवलं होतं देव जाणे कॉलेजमध्ये असताना कुठे कोणाच्या प्रेमात पडली आणि आपल्या सगळ्या आयुष्याचाच राखरांगोळी करून गेली तिला बिलकूल शोभणार नाही असा मुलगा तिच्या प्रेमाचा साथी झाला वडिलांना तीच एकंदर प्रताप बघून संताप तर होता पण तिचे प्रेम इतक्या पराकोटीचे की ती लग्न करा याच मुलाची असं म्हणून हट्ट धरून बसली शिक्षण झालेलं नाही अशा आड वयात १८/१८ व्या वर्षी तिचं लग्न त्यांना बिचार्‍यांना करून द्यावे लागलं आणि पुढेच संबंध तिच्या आयुष्याची दशा झाली नवरा रिक्षावाला निघाला धड काही शिकलेला नाही आणि एकंदर संस्कारही चांगले नाही जुगार दारू पिणार अशा त्याच्या सवयी त्यामुळे त्या मुलीच्या संसाराची तर वाताहत झालीच पण त्यामुळे तिच्या वडिलांना फारच मला स्वीकारायला लागला मोठी मुलगी चांगल्या परदेशात संसार करत होती आणि इकडे ही कशी फरफटत जात होती.

खरोखर म्हणूनच म्हणतो एकाच आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या अपत्यांच्या नशिबी असे वेगवेगळे प्रारब्ध कां बरे यावे?
आहे उत्तर?
---------------------------

सुधाकर नातू
१७/७/'१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा