गुरुवार, ९ मे, २०१९

"असेही, तसेही व काहीही!:


"असेही, तसेही व काहीही!:
"जन्मगांठीचं रहस्य-२!":

मानवी जीवनात विवाहाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्म मृत्यू या दोन गोष्टी जशा माणसाच्या हातात नसतात, तद्वतच जीवनाला नवीन कलाटणी दिशा देणारी, विवाह जुळणी सारखी महत्वपूर्ण घटना, ही माणसाच्या हातात नसावी असे वाटण्याजोगे अनुभव येतच असतात.

कुणा स्त्रीचे कुणाशी लग्न व्हावे हे खरोखर गुढ व अनाकलनीय कोडे! कुणाचा प्रेमविवाह होऊनही, नंतर बेबनाव होतो, तर कुणाचे एकमेकांना न बघताही, परस्पर ठरविलेले विवाह कमालीचे यशस्वी होतात.

ही जन्मगाठ जणू सात जन्मांसाठी कुणीतरी अज्ञात शक्ती बांधत असावी असे वाटण्याजोगे क्षणही येत राहतात. कळपाने राहणाऱ्या मानव समाजात जेव्हा तेव्हा विवाहाच्या बंधनाची सुरुवात झाली, तो क्षण मानवी इतिहासात क्रांतिकारक मानावा लागेल. त्यामुळेच मानवी जीवनाला स्थैर्य आले, एक योग्य ती सामाजिक संस्कृती अशी दिशा लाभली.

पुष्कळदा विवाह जुळविताना घाई होते, अनेक महत्वाच्या गोष्टिंकडे अनवधानाने दुर्लक्ष होऊन जातं. नंतर आपली फसगत झाली असे ध्यानात येते. पण दुर्दैवाने वेळ निघून गेलेली असते. दोन्ही बाजूंना Win/Win असा अनुभव अपवादानेच येतो. असे माझे निरीक्षण आहे.

"जन्मगाठ ही जणू ब्रह्मदेवच बांधतो" असे समजून ज्याला त्याला समाधान मानावे लागते!

ह्यावर आलेला दाते अरुण ह्यांचा
एक विचारप्रवर्तक प्रतिसाद:

"लग्नगाठ ही प्रत्येक जिवाच्या पुर्वजन्मातील देण्याघेण्याचा व्यवहार पुर्ण करण्यासाठी असावी. ज्या क्षणी हा देण्याघेण्याचा व्यवहार संपतो त्या क्षणी जोडी संपुष्टात येते मग ती कोणा एकाच्या मृत्युने असु शकते किंवा दोन्ही जिवंत असले तरी फ़ारकतीने असु शकते किंवा दोघे एका छपराखाली असुन फ़ारकत घेतल्या समान रहातात, फ़ारकत झाल्यावर काही वेळा जोडीतील दोघेही पुन्हा लग्न करतात, काही वेळा एक लग्न करतो एक तसाच रहातो, काही वेळा तारुण्यात जोडी फ़ुटली तर मागे राहिलेला गेलेल्याची जबाबदारी मरे पर्यंत पार पाडतो. अशा अनेक शक्यतांपैकी काहीही घडु शकते किंवा जोडीतील एक मरे पर्यंत अभेद्य राहु शकते.

तेव्हा जोडी मरेपर्यंत अभेद्य राहील यासाठी उभयपक्षी प्रयत्न जरुर जरुर करावा परंतु जोडी मरेपर्यंत अभेद्य राहिलीच पाहिजे असा अट्टाहास कधीच धरु नये.

माझ्या माहितीत एक उदाहरण आहे जोडीतील दोघेही छान जिवन जगत आहेत पण गम्मत अशी की तारुण्यात यांचे एकमेकांवर अबोल प्रेम होते त्यामुळे विवाह झाला नाही. मुलाचे एकीकडे लग्न झाले, मुलीचे दुसरीकडे लग्न झाले, दोघांचे संसार मुले मोठी होई पर्यंत उत्तम झाले पुढे दोघांनीही आपले जोडीदार गमावले, तेव्हा आता तरी धीर करुन बोलावे असे ठरवुन बोलणे झाले आता ते धर्माने नवरा बायको म्हणुन जिवन व्यतीत करीत आहेत दोघांची मुले त्यांची उत्तम देखभाल करीत आहेत.

आता बोला काय बोलणार अशा वेळी."
-----------------------
"वाचनाची सप्तपदी":

१. एखादं पुस्तक जर अथपासून इतिपर्यंत वाचलं गेलं, तर ते आवडलं, भावलं म्हणायचं.
२. पण जर ते जागा भरल्यासारखं पान उलटून अधून मधून वाचल्यासारखे झालं, तर ते नावडतं म्हणायचं.
३. शेवटी कुणाला कुठल्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात, हे "पसंद अपनी अपनी खयाल अपने अपने" सारखंच असतं.
४. त्यामुळे कुणी कुणाला प्रमाणाबाहेर, वंदू नये किंवा कुणी कुणाला निंदू नये.
५. कुणी काही तरी का होईना वाचतोय आणि वाचत राहणार आहे, तोपर्यंत समाज सजग राहू शकणार आहे.
६. ते समाधान जर कधी संपलच, तर माणसांतलं माणूसपण कदाचित संपलेलं असेल.
७. कारण तेव्हा विचार करणारे आणि विचार समजून घेणारेही संपलेले असतील.

---------------

"कालाय, तस्मै नमः!":

आपल्या पिढीने काही जवळ असण्याचा जसा अभिमान बाळगला नाही, तसंच काही नसण्याचं दुःख केलं नाही किंवा त्यासाठी त्रागा केला नाही.

"असून नसण्याचं आणि नसून असण्याचं" अशी जी किमया आहे, ती आपल्या पिढीला साधली. म्हणूनच कितीतरी ताण-तणावापासून आपण मुक्त झालो.

तंत्रज्ञानाचा विकास, हा भावी जीवन असे भकास, उदास करेल, असे कदाचित ते तंत्रज्ञान शोधणार्‍यांना वाटलेही नसेल.

सारी सुख एका बोटावर असूनही आपण आज, समाधानी आहोत.

"गती गती, अतीगती आणि शेवटी दुर्गती!", याचा अनुभव आता आपण सारेच घेत आहोत.

"कालाय तस्मै नमः!" दुसरं काय ?

----------------

"पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना-१!":

"तुला पाहते रे" मालिकेतील प्रेक्षकांची उत्कंठा पराकोटीला ताणून अखेरीस अवतरलेली, "राजनंदिनी" तितकासा प्रभाव पाडू शकलेली नाही. कारण कदाचित ह्या पात्रासाठी निवड करताना, अभिनेत्रीचे वय व तत्सम व्यक्तिमत्व लक्षात घेतलेले दिसत नाही.

कदाचित राजनंदिनीच्या वयाला शोभेल अशी तरुण अभिनेत्री, जर राजनंदिनी म्हणून अवतरली असती, तर ती त्या भूमिकेला अनुरुप वाटली असती. प्राजक्ता माळी किंवा प्रिया बापट राजनंदिनी म्हणून विक्रांतबरोबर आपला प्रभाव अधिक पाडू शकल्या असत्या.

इतक्या दिवसांच्या चातकासारख्या प्रतिक्षेचा अखेर काहीसा हिरमोड झाला. हे बरोबर की चूक, ते ज्याचे त्याने ठरवावे.

"पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने"
हेच खरे!

-------------------

"पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना-२!":

"तुला पाहते रे" मालिकेतील प्रेक्षकांची उत्कंठा पराकोटीला ताणून अखेरीस अवतरलेली, "राजनंदिनी", त्यासाठी अभिनेत्रीचे वय व तत्सम व्यक्तिमत्व लक्षात न घेतल्याने तितकासा प्रभाव पाडू शकलेली नाही.

कदाचित तेच, २० वर्षांंपूर्वीची कहाणी उभी करताना, जसा नवा छोकरा जयदीप उभा केला गेला, तसंच त्या वेळेच्या विक्रांतसाठी, तरुण व्यक्तिमत्वाच्या अभिनेत्याचा विचार करणे जरुर होते. अनिकेत विश्वासराव अथवा, उमेश कामत त्याकरता यथार्थ ठरले असते.

इतक्या दिवसांच्या चातकासारख्या प्रतिक्षेचा अखेर काहीसा हिरमोड झाला आणि दुर्दैवाने आतापर्यंत, जी कलात्मक, नाट्यमय उंची "तुपारे" ने गांठली ती नाहक घसरताना पहावी लागत आहे. हे बरोबर की चूक, ते ज्याचे त्याने ठरवावे.

"पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने"
हेच खरे!

-----------------
"सारेच मुसळ केरात"!:

संधी, ही प्रगती भरभराट व कीर्ती व्रुद्धिंगत करू शकणारी, एक गुरू किल्ली असते. संधी मिळणं, हा जीवनाला चांगली कलाटणी देणारा सांधा असतो. अवगत झालेल्या संधीचं सोनं करणं सर्वांना जमतच अस नाही. उलट संधीमुळे मिळणार्या फायद्यपायी नको इतके हुरळून जाऊन, प्रसंगी अहंकार व गर्वाने फुलून जाऊन, आवश्यक प्रयत्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणं अखेर महागांत पडतं. संधी पूर्ण वाया जाऊन, सारंच मुसळ केरात जातं. नंतर, हळहळ अन् पश्चात्ताप निरर्थक ठरतो.

हे सुचले ते कसे, ते सांगतो:
आज मागे वळून पहाताना, मला पोस्ट ग्रँज्युएशननंतर व्यवस्थापन शास्त्रातील पी.एचडी. करण्याची संधी मी अशाच तर्हेने वाया घालवली, त्या आठवणीमुळे!

"जीव झाला वेडापिसा"!

परस्पर विरोधी, चांगल्या आणि वाईट मानवी स्वभावांचा व प्रवृत्तींचा, ग्रामीण राजकारणाच्या पार्श्वभूमीवर, विलक्षण नाट्यमय संघर्ष दाखविणारी कलर्सवरील, मालिका बघून, तिचे नांव सार्थ करत, खरोखरच
"जीव झाला वेडापिसा"!

सुधाकर नातू


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा