"ह्रदयीची स्पंदनं!"
"आपणच आपल्या भवितव्याचे शिल्पकार":
बदलत्या परिस्थितीची भेदक वास्तवता व आव्हाने, खुल्या मनाने न स्वीकारता, सारे काही आलबेल आहे, असे उसने अवसान कितीही आणले तरी, शेवटी जे होणार असते, ते कधीही कुणालाही चुकवता येत नाही.
कारण बदललेली कसोटी पहाणारी परिस्थिती, ही शेवटी आपल्याच कर्माची फलनिष्पत्ती असते!
--------------
"अति तेथे माती!"
आपण आपल्याच मस्तीत, आपलेच गुणगान ऐकायला मिळावे, ह्या लालसेपोटी एखाद्या प्रवाहपतितासारखे केव्हां कसे वाहवत जातो, ते आपले आपल्यालाच कळत नाही........
कुठे थांबायचे, कसे व कां, तेच आपल्याला कळत नाही, आणि त्यातून गर्व, अहंकार इतका काही फुलतो की, अखेर आत्मनाश होणे, किती जवळ आले, ते आपल्या खिजगणतीतही नसते.......
प्रत्येकाला मर्यादा असतात. आपण आपल्याज मर्यादा न ओळखता, असा अट्टाहास जर केला, तर तो सहन केला जात नाही आणि अखेरीस नकारघंटा सगळीकडून केव्हा वाजायला लागतात, ते समजतही नाही........
म्हणून जागे व्हा, जागे रहा.
लक्षात असूं द्या:
"अति तेथे माती"!
-----------------
"नळी फुंकली सोनारे....":
अनेक सुविचार, तसेच ओघवत्या भाषेतील, तर्काला पटेल अशा शब्दातील सोदाहरण विवेचने, आपल्या वाचनात येत असतात. ती वाचून आपल्याला तात्पुरती कां होईना, विलक्षण स्फूर्ति येते आणि ते मार्गदर्शन ताबडतोब अनुसरून, आपल्यात प्रगतीपर बदल करावासा वाटतो.
सर्वसाधारण अनुभव हा तेरड्याचा रंग तीन दिवस ठरतो! ह्यास्तव कालातीत खंत अशी की, ही मार्गदर्शक प्रवचने, सुविचार व्यवहारात प्रत्यक्ष आणणे जवळ जवळ अशक्य ठरत असतात. म्हणूनच बहुधा "आयकॉनस्" दुर्मिळातले दुर्मिळ निर्माण होतात. अखेरीस असे सारे मौल्यवान विचारधन हे,
"नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे" असेच होऊन जाते.
-------------
"फसत चाललेला खेळ":
वर्तमानांत पायाखाली काय जळतंय ते पहायचं सोडून आणि जमिनीवरील विस्कटत चाललेली घडी नीट करण्याचे सोडून, कधीही प्रत्यक्षांत न येणारी स्वप्नांची गायब झाल्यामुळे, मुलभूत प्रश्न वार्यावर सोडून, कसाही भरकटणार्या प्रचाराचा खेळ करणारे, हे विसरताहेत की:
'You can fool some people for all the time or all the people, for sometimes, but you just can't fool all the people for all the time.'
-- -------------
सामान्य वकुबाची माणसे, अधिकारपदांवर असली की, धोरणे व नियोजनांत हलगर्जी आणि अंमलबजावणींत सावळा गोंधळ तर होणारच! अशा वेळी, तहान लागली, की विहीर खणावयाची, दुसरे काय करणार?
--------------
"ह्याला जीवन ऐसे नांव!":
जीवनाच्या रँट रेसमध्ये, माणसाला हवी हवीशी असलेली गोष्ट मिळणे, जेवढे दुरापास्त असते त्याहीपेक्षा ती गोष्ट, जेव्हा हवी त्याच वेळी मिळणे, हे महाकर्म कठीण असते.
म्हणूनच समाधानी माणसांपेक्षा, असमाधानी माणसांचेच जास्त प्राबल्य जगामध्ये असते.
---------------
"एक अनुभव":
"केवळ छापील पुस्तकेच कां?:
"पुस्तक प्रेमी" हा समूह प्रामुख्याने वाचनाची ज्यांना आवड आहे आणि नवनवीन तर्हेचे वाचन करायला मिळावे हा हेतू असलेला समूह असावा असा माझा समज होता आणि आहे.
एकदा वाचन हा समुहाचा मूळ गाभा मानला की, केवळ छापील पुस्तक हेच वाचनाचे माध्यम असे मान्य करणे, बदलत्या तंत्रयुगाच्या काळात कितपत योग्य, असे मला वाटते. त्यामुळे डिजिटल असे काही जर निर्माण होत असेल, लेखन निर्माण होत असेल,तर त्याचीही दखल समुहाने घेतली जाणे आवश्यक ठरावे अशी माझी धारणा होती.
त्या हेतूने मी माझ्या विविध लेख प्रयत्नांचा संच ह्या दृष्टीने "रंगांची दुनिया" संदर्भात अधिक माहिती व्हावी आणि वाचक निर्माण व्हावे ह्या हेतूने संदेश लिहिला होता. तो आपण काढून टाकला.
हा तुमचा हक्कच आहे यात वाद नाही, परंतु नाण्याची दुसरी बाजू देखील समुहातर्फे विचारात घेतली जावी, या हेतूने मी हा संदेश लिहित आहे.
केवळ छापील पुस्तकांसाठी जर हा समूह असेल तर मला तसे कळवावे, मी हा समाज सोडून जाऊ शकेन.
धन्यवाद.
--------------
"सत्तेचे गुलाम":
सत्तेचं राजकारण पहाता पहाता, काँर्पोरेट कल्चर अनुसरताना दिसत आहे. जसे कोणत्याही कंपनीत आपले भवितव्य तितकेसे समाधानकारक नाही, म्हणून महत्वाकांक्षी माणसे, ह्या कंपनीतून त्या कंपनीत, अशा उड्या मारत अल्पावधींत अधिक सत्ता, अधिकार आणि संपत्ती प्राप्त करतात, तसेच धोरणी व मुरब्बी राजकारणी आयाराम, गयारामचा खेळ खेळताना दिसतात.
काँर्पोरेटमध्ये, निदान उघड, उघड वैयक्तिक विकास व प्रगती अन् भरभराट हा हेतू असतो; मात्र राजकारणांत तसे न दर्शविता, ह्या इथून तिथे अशा उड्या, आपण केवळ जनतेचे हित व अधिक गतिमान विकास व्हावा, म्हणून मारत आहोत, असा आव आणला जातो.
विशिष्ट ध्येये, तत्त्वे आणि प्रामाणिक निष्ठा, ह्या सत्तेसाठीच्या पक्षीय राजकारणांतून पार हद्दपार झालेल्या त्यामुळेच दिसतात. मात्र दुर्देव एवढेच नाही, तर ह्या सार्या विधीनिषेधशून्य व स्वार्थाने बरबटलेल्या खेळांचे कुणालाच-ना तो करणार्यांना काही वाटत नाही अथवा बहुदा, तो उघड्या डोळ्यांनी पहाणार्या सर्वसामान्य जनतेलाही त्याचे काहीच वाटत नाही, समजा चुकून खंत वाटली, तरी काहीही फरक पडत नाही हे!
उत्तरोत्तर हा आयाराम गयारामचा तमाशा अधिक वेगाने व बिनदिक्कतपणे वाढत जाणार आहे आणि सत्तेसाठीचे राजकारण हे राजकारण न रहाता, फक्त फायदे व तोटे बघणारा व्यावसायिक व्यापार-उद्द्योग बनणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि सर्वांसाठीचे हित व विकास हे शब्द इतिहासजमा होणेही, आता कदाचित् फार दूर नाही.
---------------
"व्यावसायिक आणि समांतर सिनेमा°:
जो पहात असताना, विचार करायला न लागता, कुणालाही समजू शकतो, तो व्यावसायिक सिनेमा; तर, जो पाहूनही फक्त विचार करूनच, काही मोजक्यांनाच समजू शकतो, तो समांतर सिनेमा, अशी म़ाझी तरी माझ्यापुरती समजूत आहे. समांतर रेषा जशा जगाच्या अंतापर्यंत एकमेकींना मिळत नाहीत, तद्वतच समांतर सिनेमा आणि सामान्य प्रेक्षक, ह्यांचे एकमेकांशी जुळत नाही.....
-------------
"जागते रहो":
काळाच्या ओघात गेल्या शेकडो वर्षात बदललेल्या वास्तवाकडे काणाडोळा करुन, इतिहासाचे चक्र उलटे फिरविण्याचा अट्टाहास अखेरीस सर्वनाशास कारणीभूत ठरेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
"जगा आणि जगू द्या" अशी आस धरू पहाणार्या भवतालासाठी, असे एकांगी एककल्ली विचार घातक आहेत ही जाणीव ठेवली तर तो शहाणपणा ठरेल.
"वारसा, खालसा!":
नामवंत घराण्याचा मूळ पुरुष जितका धोरणी, कर्तबगार व नेत्रुत्वगुण, दूरद्रुष्टि असणारा असतो, तेवढे व तसे कार्यक्षम त्याचे नंतरचे वारसदार अभावानेच निपजतात.
राणा भीमदेवी थाटाने अशा वारसदारांनी कितीही वल्गना केल्या, तरी केव्हा ना केव्हातरी त्यांचे पितळ उघडे पडतेच.
कुठल्याही क्षेत्रातील नावाजलेल्या घराण्यांची घसरगुंडी, जरी लगेच दुसर्याच पिढीत झाली नाही, तरी तिसर्या वा चौथ्या पिढीनंतर र्हास सुरु होतो, ह्याला इतिहास साक्ष आहे.
--------------
"हे" असे,
तर "ते",तसे,
सांगा,
"आम"चे व्हायचे कसे?
"असे, की, तसे?
की, असेतसेच!"
----------------
"आहे, कां काही वेगळा उपाय?":
मोबाईलचे अनंत उपयोग आहेत, ह्यांत वाद नाही.
पूर्वी बरं होतं आपण टेलिफोन डायरी ठेवायचो. त्यामुळे आपल्याला जर काही काम असेल, तर ते नंबर आपल्याला शोधून सहज सापडायचे. परंतु मोबाईलमध्ये संग्रहातील नंबर आपण कोणत्या नावाने तो संग्रही ठेवला, हे लक्षात ठेवले जातेच असे नाही.
विशेषत: ज्या वेळेला ग्रुहोपयोगी उपकरणांचा काही त्रास होतो आणि त्यासंबंधीची तक्रार आपल्याला करायची असते, किंवा त्या तक्रारीचा पाठपुरावा करायचा असतो, तेव्हा तो संग्रही असलेला नंबर आपल्याला जर अचूक कोणत्या नांवाने तो नंबर आपण संग्रहात ठेवला होता, हे जर आठवले नाही, तर आपली खूप पंचाईत होते. काही केल्या आपल्याला तो नंबर मिळत नाही आणि आपली समस्या जिथे असते तिथेच राहते. मला हे असे अनुभव अधूनमधून सोसायला लागलेले आहेत.
मोबाईलचा वापरताना ही जी त्रुटी आहे, तिच्यावर काय उपाय?:
ह्यावर मला सुचलेली कल्पना ही, की आपण कोणताही नंबर संग्रही ठेवल्यावर, लगेच त्यावर एक missed call करावा. त्यामुळे नंतर केव्हाही तो नंबर आपल्याला, शोधणे सोपे होईल.
--------------
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा