मंगळवार, २८ मे, २०१९

"सबके साथ, जीवन भकास":


 "सबके साथ, जीवन भकास":

येथे मला, एका गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधायचे आहे. सध्या कुणा विशीतल्या तरुणाला अचानक हार्ट फेल होऊन म्रुत्यु येतो, तर कुणी खेळाडू असाच मैदानावर खेळता खेळता राम म्हणतो. चाळीशींत कोणे एके काळी लागणारा चष्मा पहिली दुसरीतल्या मुलांना लागतो. पन्नाशी साठीनंतर येणारे उच्च रक्तदाब वा मधुमेहासारखे आजार आता वयाच्या पंचविशी वा तिशीत शिरकाव करताना दिसत आहेत. कँन्सर सारखा भयावह जीवघेणा रोग कुणाला केव्हा जडेल ह्याचाही काही नेम राहिला नाही. विविध प्रकारच्या जीवघेण्या अपघातांमुळे तर माणसे दररोज किड्यामुंगीसारखी मरताना दिसत आहेत.

एकी कडे शरीर विज्ञान व मेडीकल संशोधन अचंबित करणारे पराक्रम करत असताना, अनारोग्याची ही वयातीत अनिश्चितता भयावह आहे. जीवनातील स्पर्धा विकोपाला गेली आहे, अपेक्षा उंचावत असताना प्रयत्न अपुरे पडत आहेत आणि ताणतणाव असह्य मर्यादा गांठत आहेत. दुसर्या बाजूला सार्वजनिक आरोग्यसेवेलाच अव्यवस्थेमुळे आयसीयुमध्ये घालण्याची वेळ आलेली दिसत आहे. खाजगी आरोग्यसेवा उत्तरोत्तर महागडी व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची झाली आहे. गरीब श्रीमंतामधली विविध आर्थिक स्तरांवरील दरी भयानक रूंदावत चाललेली आहे, ते वेगळेच!

हे असे कसे कां व कुणामुळे झाले त्याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. ऐहीक प्रगती व श्रीमंती म्हणजेच जीवनातील यश असे मानण्याच्या नवसंस्क्रुतीने जो तो अक्षरश: सुसाट धावत सुटला आहे. अशा तर्हेच्या जीवन तत्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर,
तंत्रज्ञानाच्या अचाट प्रगतीमुळे जीवनशैलीत आमुलाग्र बदल होऊन माणूसामाणसातील आपुलकीचे नाते भंग पावताना दिसत आहे. माणसे एखाद्या रोबोटचा अवतार बनण्याचा व त्यांची बेटे बनण्याचा धोका आ वासून उभा आहे.

"सबका साथ, सबका विकास" ऐवजी
"सबके साथ जीवन भकास" असे म्हणायला लागण्याची वेळ आता खरोखर दूर नाही. जीवनविषयक आणि सार्वजनिक विकासविषयक मूलभूत संकल्पनांचाच गांभीर्याने पुन्हा सर्वांनीच विचार करणे ऐरणीवर येणे गरजेचे आहे.

---------------------------

प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. ज्याच्या त्याच्या निवडीचा आदर करणे गरजेचे आहे. आपल्या नजरेतून इतरांच्या निवडीबद्दल प्रतिकूल मत व्यक्त करणे, योग्य नसते. जे जे निवडतो, त्यातून इतरांना कुठलाही त्रास न होता, निवडींतून आनंद व समाधान मिळाले तर सारे भरून पावले.

----------------------------
आता पेट्रोलचा, लिटरला शंभर रुपये दर कधी होतो ते पहाण्याविना गत्यंतर नाही. ह्यालाच कँथार्सिस म्हणजे वेदनेतला आनंद म्हणतात. सोप्या भाषेत जाणून बुजून केलेला छळ. चुकलेल्या वा फसलेल्या धोरणांपायी, कदाचित इतर उत्पन्नाचे स्रोत आटल्यामुळे इंधन तेलाचा असा सहारा घेण्याविना गत्यंतर नसावे, त्यामुळेच बहुदा अशी टोलवा टोलवी.
----------------------------

"महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्ताराचे गाजर आतापर्यंत महिनोंमहिने पिकले नाही. बहुधा लौकरच त्या गाजराचा हलवा खिलवणार!"

----------------------------

"वाळवंटातील ओयासिस":

आजच्या-२६मे'१९ महाराष्ट्र टाईम्स मध्ये "आक्का" हा श्री. अशोक राणे यांचा लेख वाचला. ह्या आक्का म्हणजे प्रसिद्ध डॉक्युमेंट्री फिल्मस् मधील महर्षी शोभाव्यात, अशा श्रीमती विजया मुळ्ये!

ह्या सहजसुंदर भाषेतील लेखामध्ये आक्कांचे ९८ वर्षांच्या जीवनातील, प्रदीर्घ कार्य पाहून अक्षरष: मी भारावून गेलो. समाज प्रबोधनासाठी डॉक्युमेंट्री फिल्म सारख्या माध्यमातून जागतिक कीर्तीचे योगदान देणार्या ह्या विदुषीचे म्हणूनच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

एक व्यक्ती आपल्या आयुष्यात काय काय आणि किती किती विविधस्पर्शी उपयुक्त काम, समाजासाठी करू शकते आणि अंगीकृत ध्येयामागे निष्ठेने रहात, आपले सारे जीवन वेचू शकते, हे ह्या लेखावरून जाणवले आणि मी मनापासून नतमस्तक झालो.

अशा असामान्य व्यक्ती आपल्याला, आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात, पुन्हा उमेदीने उभे राहण्यासाठी प्रेरणा देत असतात आणि असे क्वचितच नजरेत येणारे लेख, जणू वाळवंटातल्या एखाद्या ओयासिस सारखे आपल्याला तृप्त, धन्य करून जातात!

--------------------

"कामात अधून मधून बदल,
हा एक विरंगुळा."

"The Eternal Icons":

मला कधीही वेळ मिळाला की, मी माझ्या जुन्या डायऱ्या काढून, त्या चाळत असतो.

परवा सहज अशीच एक डायरी चाळत असताना, तिच्या शेवटच्या पानांवर अतिशय उत्तम आणि उपयुक्त व प्रेरणादायी नोंदी आढळल्या.

ती यादी मी केली होती Eternal Icons ची! म्हणजे आपापल्या क्षेत्रात अद्वितीय path breaking असे योगदान देणार्या माणसांची यादी!

ही यादी मी केव्हा लिहिली, याची नोंद नाही. बहुदा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला ही नोंद घेतली असावी. सहाजिकच त्यामध्ये अनेक आधीच्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश केल्याशिवाय ती परिपूर्ण होणार नाही याची मला जाणीव आहे.

मला ती यादी येथे तुमच्याबरोबर शेअर करण्यात अतिशय आनंद होत आहे:

१. अटल बिहारी बाजपेयी: राजकारण
२. फील्ड मार्शल सँम माणेकशा: मिलिटरी
३. लता मंगेशकर: संगीत- चित्रपट गायन
४. डॉ. अमर्त्य सेन: इकॉनॉमिक्स
५. डॉक्टर नारायण मूर्ती: उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान
६. पंडित रविशंकर: संगीत सितार
७. ज्योती बसू: राजकारण आणि आयडिऑलॉजी ८. एम एफ हुसेन: पेंटिंग
९. बिस्मिल्ला खान: संगीत सनई
१०. अमिताभ बच्चन: अभिनय
११. डॉक्टर कुरियन वर्गीस: रूरल डेव्हलपमेंट
१२/१३. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर: क्रिकेट
१४. श्याम बेनेगल चित्रपट: दिग्दर्शन
१५. ई श्रीधरन्: कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो इंजिनिअरिंग
१६. बिरजू महाराज: कथक
१७. बाबा आमटे: समाज सेवा
१८. नौशाद: चित्रपट संगीत दिग्दर्शन
१९. बी आर चोप्रा: चित्रपट निर्मिती
२०. मिल्खा सिंग: खेळ धावणे
२१. दिलीप कुमार: अभिनय
२२. रतन टाटा: उद्योग
२४. डॉ. खुशवंतसिंग: लेखक संपादक
२५. भीमसेन जोशी: शास्त्रीय संगीत
२६. इब्राहिम अल्काझी: नाटक आणि दिग्दर्शन २७. आर के लक्ष्मण: व्यंगचित्र
२८. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम: अंतरिक्ष तंत्रज्ञान
२९. विंदा करंदीकर: काव्य
३०. डॉक्टर मनमोहनसिंग: अर्थशास्त्र
३१. बिल गेट्स: माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग.

आणि.......
आज आता, अजून एक नांव समाविष्ट करावेच लागेल.....
ते म्हणजे
३२. श्री. नरेंद्र मोदी: राजकारण व नेत्रदीपक यश!

----------------------------

सुधाकर नातू
२८/५/'१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा