"शारदोत्सव":
"शब्द व्हावे सारथी":श्रीमती विजया वाड ह्यांचा "श्रेयस प्रेयस" ह्या विभागात दि.२२सप्टे१८ च्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीत, "शब्द व्हावे सारथी" असे आगळे वेगळे शीर्षक असलेला लेख वाचला.
आरंभाच्याच "लंगडीच राह्यचंय कां तुला?" अशा प्रश्नाने कुतूहल जाग्रुत झाले, कोणाबद्दल हे काय लिहीते आहे ही लेखिका, असे मनात आले आणि लौकरच हा तुमच्याच सार्थ व क्रुतार्थ जीवनपटाचा हा शब्दवेध आहे, हे ध्यानात आले आणि अथ पासून इतिपर्यंत लेख पहाता पहाता वाचूनही झाला.
एक स्री आपल्या बुद्धिमत्तेच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर व्यावहारिक जीवनातले विविध स्तरांवरचे असामान्य योगदानांचे मैलाचे दगड पार करत रहाते हे उमजून मन भरून आले. खरोखर कोणालाही भूषणावह वाटावा असा त्यांच्या आयुष्याचा चपखल शब्दातील आणि रसाळ भाषेतील हा दस्तावेज स्फूर्तिदायक आहे. अत्यंत वाचनीय असा हा लेख आहे. तो जरूर वाचा.
"पित्रुत्वाच्या प्रसववेदना":
२२सप्टेंबरचा तो रविवार खरोखर शारदोत्सवाचाच मला म्हणावा लागेल. कारण त्या दिवशी श्रीमती मंगला सामंत, ह्यांचा लोकसत्ता चतुरंग पुरवणीतच "पित्रुत्वाच्या प्रसववेदना" असे आगळे वेगळे शीर्षक असलेला लेख वाचायला मिळाला. त्यावरील त्यांना मी दिलेल्या हा संक्षिप्त प्रतिसाद:
"रानटी युग ते आधुनिक युग ह्या प्रदीर्घ मानवेतिहासाची सामाजिक उत्क्रांती कशी होत गेली आणि बंधुप्रधान ते पित्रुप्रधान असे संक्रमण पुरुषांच्या बाबतीत कसे कां घडत गेले त्याचा संशोधनात्मक व अभ्यासपूर्ण अशा ह्या दस्तावेजाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा."
चोखंदळ वाचकांनी संग्रही ठेवावा असा हा लेख आहे.
आजची "रजनी":
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील, "नकळत सारे घडले" ह्या मालिकेत नायिकेच्या आईची ठसकेबाज भूमिका करणार्या अभिनेत्री
अनुराधा राजाध्यक्षांनी पाठवलेल्या यु ट्युब वरील लिंक पाहून मी त्यांना दिलेला हा प्रतिसाद:
"लिंक पहायला तसा उशीरच झाला आहे. ती संपूर्ण मन लावून ऐकावी अशीच आहे. प्रथम अभिनंदन व शुभेच्छा. अभिनेत्री असूनही तुम्ही व्यावहारिक जीवनातले योग्य व अयोग्य ह्यांच्यावर प्रिया तेंडूलकर रजनीच्या रुपात जे उभे करायची तसेच काहीसे योगदान ह्या लिंकमधील अनुभवावरून जाणवले.
रक्षक हे भक्षक होत चाललेले असताना, त्यांच्यामधील कर्तव्यदक्ष मंडळींपैकी एका कर्तव्यदक्ष पोलीसाचे हे उदाहरण खूप काही सांगून जाते. भ्रष्टाचार आणि त्याच्या विळख्यामुळे, प्रामाणिकांवर येणारा ताण व त्यांची अगतिकता, ह्या निवेदनांत कुणालाही अंतर्मुख व्हायला लावेल. जर प्रत्येक नागरिकाने त्याचे विहीत कर्तव्य, मग ते व्यावसायिक वा कौटुंबिक इ.इ. काहीही असो ते उत्तमपणे पार पाडले तर आपल्या पुष्कळच समस्या दूर होतील, ही जाण ह्या उत्तम निवेदनकौशल्यावरुन आली.
होतंय काय, जिथे तिथे वाईट अप्रस्तुतच विविध माध्यमातून समाजापुढे सातत्याने येत आहे. ह्या पार्श्वभूमीवर तुमच्यासारख्या मान्यवरांनी जे चांगले सुभग श्रेयस हितकारक घडतंय ते असे प्रदर्शित करणे हा एक दाद देण्याजोगा उपक्रम आहे.
शेवटी हेच म्हणतो, अंगभूत अभिनय, वाक् चातुर्याचा समाजाच्या भल्यासाठी विनियोग करणार्या तुम्हाला सलाम. आगे बढते रहो."
अनुराधाताई यु ट्युब वर व्यावहारिक जीवनातील तळमळीच्या मुद्द्यांवर नेहमी एक स्वत: सादर केलेला निवेदनाचा विडीओ अपलोड करतात. म्हणूनच त्यांना आजची "रजनी" असेच म्हणावेसे वाटते.
सर्वगुणसंपन्न कोणीही नसतो अगदी खरे यश मिळविणे, आपल्या हातात असते. ते टिकते की नाही ते आपल्या कर्तृत्वावर व प्रयत्नांवर अवलंबून असते. पण प्रसिद्धी किंवा कुप्रसिद्धी ह्या त्या यशात किंवा अपयशात हातात हात घालून चालतात. म्हणूनच जे सातत्याने यशाची शिखरे पार करतात ते आपल्या चुकांमधून धडा घेऊन वेळोवेळी आपले पवित्रे बदलतात. शेवटी वाऱ्याची दिशा ही पाहावीच लागते. सुनिल गावसकर सारख्या असामान्य फलंदाजाने आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत वयपरत्वे व खेळाच्या वेळेच्या परिस्थिती नुसार आपल्या पवित्र्यात व शैलीत किती बदल केले ते आपल्याला ज्ञात आहे का ? आपण फक्त त्याच्या यशाकडे व प्रसिद्धीकडे पहातो व त्याने केलेल्या अथक प्रयत्नांकडे दुर्लक्ष करतो. तेच सर्व क्षेत्रात प्रत्येकाच्या बाबतीत घडते.
जीवनशैलीची आव्हाने:
जुने ते सोने, हे "सोमि"वर फिरणार्या एका संदेशात छानपणे मांडलं आहे. चार पाच दशकांपूर्वी आतासारखी विविध संसाधाने नव्हती. त्यामुळे तेव्हांच्या शारीरिक श्रमांच्या अपहार्यतेमुळे स्विकाराव्या लागलेल्या जीवनशैलीचे गोडवे त्या संदेशात गायिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्पर्धात्मक घाई गर्दीचे दोष अप्रत्यक्ष मांडले आहेत.
परंतु झालेल्या व नित्य होणाऱ्या प्रगतीचे लाभ नजरेआड करता येणार नाहीत. आयुर्मयादेत कितीतरी वाढ झाली आहे. विरंगुळ्याची करमणुकीच्या साधन सेवांची उपलब्धता विविध आहे. बदलत्या काळाच्या बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यातही वेगळा अनुभव आहे. असे भूतकाळात रममाण होऊन काहीच साधले जात नसते, कारण प्रगतीचे कालचक्र उलटे फिरवणे शक्यही नसते आणि त्यांत धन्यता मानणे म्हणजे स्वत:ची फसवणूकच होय.
टीका करणे ही देखील उपयुक्त निर्मितीच नव्हे कां कारण टीका करताना साधक बाधक दोन्हीचा विचार करून वास्तवतेचे पारदर्शी चित्र उभे केले जाते. जशी गरज, ही शोधाची अर्थात नवनिर्मितीची जननी, त्याचप्रमाणे टीका ही प्रगतीच्या बदलाची जननी असते. टीका खुल्या दिलाने स्विकारणारेच सुधारणेचे नवनवे मार्ग खुले करू शकतात. दुर्दैवाने टीका पचविणारे दुर्मिळ असतात. म्हणूनच जैसे थे अथवा पिछेहाट अपरिहार्य असते. उगाच नाही, संत तुकाराम म्हणतात "निंदकाचे घर असावे शेजारी"!
"बोल-अबोल":
बोलता येतं, म्हणून माणसं आयुष्यभर नको इतकं बोल बोल बोलतात. सहाजिकच, जग त्यांना बोल लावल्याशिवाय रहात नाही. आपल्याच करणीनं, अशी माणसं कमावलेलं गमावूनही जातात.
गरजेचं, जरूरीचं असेल, तेव्हांच व तेवढंच बोलायचं, हे ज्यांंना समजतं, अशी माणसं मात्र दुर्दैवाने शोधावी लागतात. बोलण्याचं महत्व, बोलती बंद झाल्याशिवाय कळत नाही. भावना, विचार व्यक्त करण्याची ही शक्ती नष्ट होणं, हे अंधत्वानंतरचं सर्वात मोठं दु:ख!
संवाद हा या कलियुगातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे संवाद आणि सुसंवाद पण नको वाद हे सूत्र जपता आले तरच जीवनात आनंद तरंग हे मात्र नक्की.
"स्वप्नांच्या पलिकडले!:
स्वप्न केव्हां व कां पडतात?
स्वप्न खरी होतात कां? हो असेल, तर केव्हां?
स्वप्नांचे कोणते प्रकार असतात?
ह्या प्रश्नाला "सोमि" वर.आलेले उत्तर:
"मनी वसे ते स्वप्नी दिसे!आपल्या कंठामध्ये हिंता नावाची एक नाडी आहे. आपल्या केसाचा उभा हजारावा भाग केला तर तेवढ्या त्या नाडीमध्ये स्वप्नाचा जन्म होतो .काही स्वप्ने सूचक असतात आणि वेदांता प्रमाणे हे जग स्वप्नासारखे आहे. फक्त सत्य एकच .सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला!"
काही स्वप्ने सूचक असतात, हा अनुभव मलाही आलेला आहे. भविष्यात घडणार्या घटनांची कल्पना स्वप्नातून कां कशी कोणत्या शक्तीमुळे दिसते हे एक कोडे आहे!
ह्यावरून आठवले, एकदा अचानक स्वप्नात ‘तेयुश’ हा शब्द येत राहिला होता. कां कसा कुणास ठाऊक! अधिक विचार करता, जहाल तेजाब मधला ‘ते’ आणि आयु मधला ‘यु’ , प्रकाशातला ‘श’, हयांचा तो अदृश्य मिलाफ आहे हे जाणवले आणि वीज चमकावी तसे हे कोडे उलगडले़. जीवनात सतत वरिष्ठ वर्ग, कनिष्ठांवर आपले विचार व निर्णय लादत आला आहे. बिचारा कनिष्ठ वर्ग निमूटपणे हा जाच सहन करत आला आहे. तेजाबातील जहालपणा घेऊन आपल्यावरील आजवरचा होणारा अन्यायाची जाणीव ही वीज चमकावी, अशी प्रकाशात आता येत आहे हा ‘तेयुश’ चा मतितार्थ असू शकतो.
विविध क्षेत्रात आर्थिक, बौद्धिक, वैचारिक भावनिक, वा सामाजिक इ.इ. बाबतीत गुणात्मक असमानतेमुळे अनेक उच्च कनिष्ठ गट निर्माण होत रहातात, श्रेणी निर्माण होऊन, वरचढपणाचे दबावाचे खेळ चालत रहातात. त्यांचा अतिरेक झाला की "तेयुश" विद्रोह निर्माण करतो. सभोलताली जे घडत आहे त्याची ही पारदर्शी मीमांसा आहे
जगा आणि जगू देवू या एकमेकांचा आत्मसन्मान जपू या, संयम आणि सहनशीलता अंगिकारूया. माणसा माणसांमधली कटूता दूर करून एकमेकांतली दरी मिटवू या. हाच हया विचारमंथनाचा संदेश आहे.
जन्मगांठ:
माणसाचा स्वभाव अनाकलनीय असतो. व्यक्ती तशा प्रकृती किंवा स्वभाव ! संसारात दोन वेगळ्या स्वभावाची माणसे जोडीने रहाताना मतभेद किंवा वाद होणे सहाजिकच असते. दुसरा असेच का वागतो ह्याचा विचार त्याच्या दृष्टिकोनांतून समजून घेवून मगच आपण वागले, तर संसारात गोडी येते. आपला संसार सुखाचा करणे हे आपल्याच हातात असते. हा सारीपाट खेळणे मोठेच आव्हान असते. तडजोड, समंजसपणा आणि त्याग ह्या तीन बाजू प्रत्येकाने संभाळल्या तर हा खेळ मनाजोगती फळे देतो.
शेवटी एक मनोगत:
वाचन हा श्वास, लेखन हा निश्वास,
मालिका पहाणे हा ध्यास.
घडामोडींचा विचार हा अभ्यास,
सोशल मिडिया वापरणे हा विकास.
प्रवास करणे हा त्रास,
आरोग्य राखणे हा प्रयास.
सुधाकर नातू
माझ्या ब्लॉगची लिंक:
http//moonsungrandson.blogspot.com








