"नकोरे मनोरे, मनोरे नकोरे":
सध्या टोलेजंग इमारती बांधण्याच्या हव्यासामुळे जमीन खचून शेजारच्या कुटुंबांवर कष्टाने घेतलेली घरे सोडण्याची वेळ येत आहे. तसेच अचानक लागणार्या आगींमुळे वित्तहानी व जीवितहानी असे धोके निर्माण होत आहेत. नागरी सेवा सुविधा व वहातूकव्यवस्थेचे बोजवारे उडत आहेत. मुंबई सारख्या बेटावर अशा संभाव्य धोक्याचा विचार न करता, नियोजनशून्य धोरणांपायी ह्या चांगल्या शहराची दुरावस्था होताना आपण उघड्या डोळ्यांनी पहात आहोत. म्हणूनच......"नकोरे मनोरे, मनोरे नकोरे", हे आग्रहाने मांडणारा माझ्या ब्लॉगवरील हा लेख आहेे.
मुंबई शहरातील नागरी सेवा सुविधांचा किती बट्टयाबोळ झाला आहे त्याचे दर्शन वर्तमानपत्रातील तक्रारींच्या पाढ्यांवरून ध्यानांत येईल. काही उदाहरणे:
➡पाण्याची पाईपलाईन फुटलेली व अतोनात पाणी वाया चाललेले
➡रस्तोरस्तीचे खड्डे,
➡रस्तेदुरूस्थीचा ठेकेदार गायब आणि खडी, रेतीचा ढीग रस्त्यावर पडलेला
➡रेल्वेस्टेशनखाली अंधार
➡टोल फ्री क्रमांक बिनकामाचा
➡रस्त्याचा दुभाजक वाईट अवस्थेत, अपघाताचा धोका
➡कचरापेटी नादुरुस्त, कचर्याचे ढीग तसेच पडलेले
➡केबलवायरचे मोठे जाळे रस्त्यावर पडलेले, अपघाताचा धोका
➡गटार तुंबलेले किंवा गटाराचे झाकण गायब ➡स्टेशनात छप्पर नाही, किंवा स्टेशनांत अस्वच्छता, शौचालये वाईट स्थितीत ➡बसस्टापवर छप्पर नाही किंवा गर्दुचल्यांचा मुक्काम
➡मुलांना खेळायला मोकळ्या जागा नाहीत
➡बागांमध्ये स्वच्छता नाही, झोपाळे आदि मोडकळीस आलेले
➡लोकलगाड्या म्हणजे दररोजचे यमदूत ➡रस्तोरस्ती गल्लीबोळांमध्ये दोनही बाजूंना वहानांचे पार्कींग आणि त्यामुळे ट्रँफिक जँम, वेळेचा इंधनाचा अपव्यय
➡शहरामध्ये स्वच्छताग्रुहांची कमतरता, आहेत ती नीट देखभाली अभावी गलीच्छ. इ.इ. इ.इ. ………
हया तर्हेच्या तक्रारी मारूतीच्या शेपटाएवढ्या लांबच लांब असूनही कोणतीही लक्षणीय सुधारणा नाही आणि एके काळी शांत सुंदर असलेली ही मुंबापुरी आज झोपडपट्यांनी वेढलेली, अजस्त्र लोकसंख्येच्या आणि जीवघेण्या प्रदुषणापायी गुदमरत चाललेली एक बकाल नगरी झालेली सगळे उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. अशी दारुण अवस्था शहराची असताना गगनचुंबी उंचच उंच मनोरे झोपडपट्टी निर्मुलन अथवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास अशा गोंडस नावाखाली, तिचे लौकरांत लौकर, नरकपुरींत रूपांतर केले जात आहे. म्हणूनच आज सुंदर मुंबई, हरित मुंबई ही घोषणा इतिहासजमा जमा झालेली आहे. म्हणूनच आता घोषणा हवी:
नकोरे मनोरे, मनोरे नकोरे!
मुंबईत उंच मनोर्यांच्या इमारती बांधत रहाण्याच्या हव्यासामुळे, आधीच नागरी सुविधांचा बट्टयाबोळ आणि बजबजपुरी झालेल्या शहराची काय भयानक अवस्था होईल ह्याचा कोणी विचारच करत नाहीये. ह्या गदारोळांत मूळचे भूमीपुत्र विस्थापीत होऊन पहाता पहाता त्यांचा मागमूस रहाणार नाही, ह्या वास्तवाकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुनर्विकासाचे गाजर दाखवून अर्धवट अवस्थेतील इमारतींमधील मूळचे कितीतरी नागरिक ना घर, ना घरभाडे अशा दारुण स्थितीत जवळ जवळ देशोधडीला लागून पस्तावत आहेत. त्यांच्या दु:खाला, वेदनांना तुलना नाही. 70 ते 100 वर्षांहून जुन्या चाळी, इमारतींबद्दल पुनर्विकासाची आवश्यकता समजता येऊ शकतो. परंतु सार्याच नागरी सेवा सुविधांची दारुण विदारक अवस्था, आताच कडेलोट झालेली मुंबईची लोकसंख्या आणि प्रदुषणाचा पडलेला विळखा ह्यांचा विचार करता कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त सात मजल्यापर्यंतच नव्या इमारती बांधल्या जाणे योग्य ठरेल.70/80 वर्षे जुन्या, जीर्ण झालेल्या चाळींच्या पुनर्विकासाचे एक वेळ समजू शकतो. परंतु आता ही लाट केवळ ३०/४० वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींचेही पुनर्विकासाचे लोण आले आहे. ह्याचा अर्थ ह्या इमारती योग्य ती काळजी व सामूग्री वापरुन बनविल्या गेल्या नव्हत्या. अशा कमकुवत कामाकडे संबधीतांनी, यंत्रणांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. आता उत्तुंग मनोरे न बांधता अशा इमारतींचे मजबूतीकरणच करणे हाच उपाय शहाणपणाचा आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जावून मुंबईची धुळधाण लावण्याचा उद्योग चालूच राहील, हे भावी पिढ्ढ्यांचे दुर्दैवच ठरणार आहे. 30 ते 40 टक्के झोपडपट्टयांनी वेढलेल्या मुंबई शहराची अशी लाज वाटावी अशी भयानक अवस्था कोणी केली? कां, कशी झाली आणि त्या करता जे जबाबदार असतील त्यांच्या अशा अक्षम्य अपराधांबद्दल काहीही न करता, झोपडपट्टी निर्मुलन योजना असे गोंडस नांव देऊन आंधळेपणाने उंच मनोर्यांमागून मनोरे बांधणे हे जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणेच नव्हे, तर शहराला खड्यांत गाडणे नव्हे कां? झोपडपट्ट्यांना वर्षांमागुन वर्षे अधिक्रुत करत रहाणे हा सत्तेचा दुरुपयोगच नव्हे कां?
एक विनवणी निश्चित, जरा फक्त स्वत:कडेच न पहाता, भावी पिढ्यांसाठी आपण खेळण्यातल्या सारखी कुरकुर करणार्या खुळखुळ्यासारख्या शहराचा वारसा क्रुपया सोडून जावू नका.
बाबांनो,
‘नकोरे मनोरे, मनोरे नकोरे!!
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा