बुधवार, २५ जुलै, २०१८

"ह्याला जीवन ऐसे नांव":

"ह्याला जीवन ऐसे नांव!:

जीवन हे खरोखर चमत्कारीक आणि कल्पिताहूनही अद्भूत असते. आपण जन्माला कां येतो आणि आपल्या जीवनाचे प्रयोजन काय असते ह्याचा आपण गांभीर्याने विचार करतच नाही. काही काही माणसांची तर आयुष्ये फारच विचित्र आणि वादळांत भरकटलेल्या होडीसारखी असतात. त्यांच्याच वाट्याला तसे भोग कां येतात, हे कधीच कळत नाही. काही उदाहरणं सांगतो:

"हा मुलगा एका सरळमार्गी कुण्या खेड्यातल्या प्राथमिक शिक्षकाचा एकुलता एक. दहावी बारावीपर्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा, बहुधा हुशार म्हणूनच गणला जायचा. पण हाय पुढे काय झाले, कां होत गेले, कुणास ठाऊक! तो अचानक पूर्ण वाया गेला. कुठली तरी वाईट संगत लागली  आणि त्याला सिगरेट दारू जुगार अशी सगळ्या प्रकारची व्यसने लागली. दुर्दैवाने त्याच वेळेला त्याचे वडीलही अचानक मरण पावले. साधे प्राथमिक शिक्षक त्यामुळे आई आणि हा मुलाला त्यांच्या तुटपुंज्या पेन्शनवर जगायची वेळ आली. तो पुढे                   इतका फुकट गेला चक्क चोर्‍या मारामार्या करायला लागला. तो कोणत्याही नातेवाईकांच्या घरी जर तो आला, तर सारे जण त्याला टाळत असत व बाहेरच्या बाहेर त्याला हाकलून देत असत. आई बिचारी विधवा, एका खेड्यात राहणारी, हा मुलगा काय म्हणून महिने महिनेन् गायब व्हायचा. घरी आला की आईला छळायचा, पैसै मागत भांडत रहायचा. अशा दिशाहीन तऱ्हेने, पन्नाशी आली तरी त्याच्या जीवनाला कुठलाच मार्ग सापडलाच नव्हता. काय खायचा काय करायचा त्याचे त्यालाच ठाऊक हे असं उदाहरण बघितलं की वाटतं काय आणि कशा करता हा माणूस जन्माला आला, मागच्या जन्मीचा आई-वडिलांचा शत्रू तर नव्हता, असं वाटण्याजोगं आयुष्य ह्याच्या व असा नालायक मुलगा त्या अभागी आईच्याच पोटी कां जन्माला यावा, ह्या प्रश्नाला उत्तर आहे कां?

"हा मुलगा पाच सहा बहिणी मधला एक भाऊ आणि बहुदा अभ्यासात त्याचे लक्ष नव्हते व बुद्धीही बेताचीच असावी. कोकणातल्या खेड्यात कसाबसा चौथी पर्यंत शिकला आणि पुढे काय करायचं त्याचं त्यालाच कळेना. वीस-बावीस वर्षांचा होईतो त्याला कुठलीच दिशा मिळाली नव्हती. अखेरीस मुंबईत राहणाऱ्या त्याच्या एका नातेवाईकाने त्याला कुठेतरी शिपायाची नोकरी मिळवून दिली. तिथे त्याला खूप काम करायला लागेल चौथ्या मजल्यावर त्याचे ऑफिस आणि संपूर्ण पाच-सहा तास त्याला या मजल्यावरून त्या मजल्यावर अशी चढ-उतार करायला लागत असे.

पगारही तुटपुंजा, राहायला कुठेतरी झोपडीत कशीबशी सोय झालेली. हा तिशीला येईपर्यंत त्याचे आयुष्य असेच कसेतरी चालले होते. आणि अचानक काय झालं तो आजारी पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर लक्षात आलं की त्याच्या हृदयाची एक झडप नीट काम करत नाही. आणि दुर्दैवाने अखेरीस त्या अल्पवयातच तो मरणही पावला! म्हणून वाटते की त्या बिचार्याच्या आयुष्याचा अर्थ काय? तो जन्माला आला तेव्हा कुटुंबात आनंद झाला खरा, पण पुढे काय!  सारा निराशेचाच परवड होण्याचाच कारभार! सहाजिकच, लग्न होता, जीवनातल्या कुठल्याच आनंद क्षणांचा अनुभव न घेता, हा माणूस जगाचा निरोप घेतो, त्याचा अर्थ काय? आहे उत्तर?"

 "ही कथा आहे एका अशा मुलाची,की ज्याचं लाडाकोडात पालनपोषण झालं. इथेही परत दहावी-बारावी होईपर्यंत हा मुलगा ठीक होता.  पण नंतर सिगरेटचे व्यसन दारूचे व्यसन लागले. लहानपणापासून आईकडून खूप लाड व्हायचे, त्यामुळे तो खूप हठवादी आळशी होता. तिच्याकडून तो नेहमी पैसे घेऊन, ते छानछौकीत मौजमजेत उडवायचा. पुढचं शिक्षण सोडून दिलेलं आणि नंतर बारमध्ये जाऊन बारबालांच्या सान्निध्यात रहायला सुरवात त्याने केली. स्वत:हून एक दमडी त्याने कधीच मिळवली नाही. वडलांच्या जीवावर ऐतखाऊ आयुष्य काढता काढता, पुढे तो एका बारबालेला घेऊन एक दिवस घरी आला आणि वडिलांचा आई वडिलांचा विरोध असताना तिच्याशी लग्नही केलं. वडील बिचारे कामगार आणि vrs घेऊन घरी बसलेले. जे काही त्याचे पैसे आले त्या पैशाच्या जोरावर या मुलाचा संसार सुरू झाला. पुढे एक मुलगी पण झाली, पण काम धंदा काही नाही. इकडे वडलांची पुंजी संपली अन् घरी सगळ्यांचेच वांधे झाले खायचे-प्यायचे. अशा वेळेला त्याला अजून एक दुसरा मुलगाही त्याला झाला. कामधंदा परत काहीच नाही असे असताना दारू पिणे जुगारात पैसे घालवणे असले धंदे त्याचे चालूच होते. घरात रोज भांडणे बायकोला आई वडिलांना मारहाण करायला लागला. अखेर कंटाळून, पूर्वी बारबाला असलेली, त्याची बायको एक दिवस त्याला सोडूनही गेली. तिच्या वियोगामुळे तो बेभान होऊन, अधिकच दारू पीत राहिला आणि त्यातच शेवटी तो मरण पावला! बिचार्या आई-वडिलांवर हया लहान दोन मुलांना सांभाळायची वेळ आली."

आता येथे प्रश्न पडतो, ह्या मुलाच्या आयुष्याचा अर्थ काय? केवळ सगळ्यांना त्रास देण्यासाठीच तो जन्माला आला होता कां? कधीच त्याला असे जाणवले नाही की, आपण काय करतो ते सारे चूक आहे. आपली जबाबदारी पार पाडण्याची देखील त्याला कधीही सुचू नये. आपल्याबरोबर आपली बायको आई वडील आणि दोन निष्पाप मुले ह्यांच्या आयुष्याचे असे खेळखंडोबा करायची त्याला काय गरज होती? खरोखर त्याचे आयुष्य ही एक कादंबरीत शोभावी अशी कथा होती!

 अशी अनेक उदाहरणे सापडतील. माणूस जन्माला कां येतो आणि ठराविक काळानंतर जगाचा निरोप घेतो, मधल्या वेळात आयुष्याचं काहीतरी सोने करावे, असं अशा माणसांना का वाटत नाही? म्हणूनच म्हंटलं आहे "ह्याला जीवन ऐसे नांव"! जन्मपूर्वी माणूस कुठे असतो, मरणानंतर कुठे जातो? हा कायमच अनुत्तरीत प्रश्न जगाच्या अंतापर्यंत रहाणार आहे. आयुष्याला शेवटी काही अर्थ असतो कां? कां, हे सारे मृगजळच आहे?
खरं म्हणजे मानव जन्म दैवदुर्लभ होय. सर्व सजीवांमध्ये मानवाची सर्वोच्च प्रगती झालेली दिसते. आपली ज्ञानेंद्रिये आपल्याला विविध प्रकारच्या जाणिवांची ओळख करून देतात आणी त्यायोगे विविध प्रकारची सुखे, अनुभव आनंद आपल्याला उपभोगता येतो. परंतु कुणी ह्याची जाणीव ठेवतच नाही. जे आपल्याकडे असते ते नसले,तरच त्याचे महत्त्व कळते. म्हणून आपला जन्म कशासाठी झाला आहे याची जाणीव आपण विचारपूर्वक करून घेतली पाहिजे. आपल्या जीवनाचे ध्येय काय, याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपली मार्गक्रमणा केली पाहिजे. आपण जसा स्वतः आनंद घेऊ शकतो, तसाच तो इतरांनाही द्यावा ही इच्छा कायम ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे क्रुती करत राहिले पाहिजे. घेणं सोप असत देणं कठीण असतं. आपण देत राहिले पाहिजे. निसर्ग, आपण जे त्याला देतो,  त्याच्याहून कितीतरी पट भरभरून तो आपल्याला परत देतो. हे एखादे बी पेरलं की त्याच्यापासून झाड,  अनेक फळे, पुन्हा त्यापासून अनेक झाडे, एवढेच काय अखेरीस जंगल निर्माण होऊ शकतो, ही जाणीव ठेवली पाहिजे.

आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही, असे जरी आपण कायम वागलो, तरी ते पुरेसं होऊ शकते. पण आपल्याला लक्षात येतं की स्वतःपलीकडे कोणीच काही बघत नाही आणि म्हणूनच जीवनातले विविध कठीण अशा समस्या निर्माण होत असतात. वरील तीन उदाहरणे दिली आहेत, ज्यांनी आपली आयुष्य वाया घालवली. त्यावरून निदानहे धडे घेतले तरी पुरेसं आहे.
 अखेरीस "ह्याला जीवन ऐसे नांव" हेच खरे!
सुधाकर नातू
२४/७/'१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा