बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४
"मल्लिनाथी 1 ते 5 !":
🤣 "मल्लिनाथी !":🤣
🤑 "आधीच उल्हास,
त्यात फाल्गुन मास !": 🤑
😇 "दररोजच्या वर्तमानपत्रांमध्ये आधीच जाहिरातींचा सुळसुळाट जागोजागी असतो, पान पानभर जाहिरातीने अक्षरशः डोळे दुखतात. त्यात भर म्हणून अधून मधून, वर्तमानपत्राच्या आकाराबाहेर पूर्ण लांबीच कॉलमभर जाहिरातींचं शेपूट लावलेलं असतं !
बाजारू वृत्तीची ही परिसिमा नव्हे का? अशा शेपटामुळे वर्तमानपत्र वाचताना गैरसोय होते वाचकाची, त्याकडे कोण लक्ष देणार?
जाहिरातदारांना प्राधान्य, वाचकांना मात्र बॅकसीट असे असल्यावर, दुसरे काय होणार ?":😇
🤣 "मल्लिनाथी-2 !":🤣
🤑 " नाव मोठं लक्षण खोटं !": 🤑
😁 "एका दशकाहून अधिक वर्षे प्रतीक्षेनंतर अखेरीस 'गंगेत घोडं नहालं' आणि मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळाला. या विलंबामागे राजकीय हेतू किती, ते प्रथम तपासण्याची गरज आहे.
अभिजात दर्जा जरी मराठी भाषेला मिळाला असला, तरी सध्याची मराठी भाषा वापरात आणण्याची, साहित्याची आणि वाचनसंस्कृतीची अवस्था बघता, असेच म्हणावेसे लागते की,
"नाव मोठे झाले खरे, पण लक्षण खोटे"!:😁
: 🤣 "मल्लिनाथी-3 !":🤣
🤑 " 'अर्था'चा 'अनर्थ'-'नाव मोठं, लक्षण खोटं !": 🤑
🤣🤣🤣 "नुकतेच मी श्री अच्युत गोडबोले यांनी खूप कष्ट घेऊन, सखोल संशोधन करून आणि 127 संदर्भ ग्रंथांचा, शिवाय अनेक वेबसाईटस् आधार घेऊन 'अनर्थ' हे चार विभागात- (सद्यस्थिती, 'हवामान बदल-पर्यावरण प्रश्न, 'चंगळवाद' आणि 'समारोप') लिहिलेले पुस्तक वाचले.
त्यामधून जे जाणवले, ते खरोखर चिंताजनक असे आहे. पुस्तकामध्ये जागोजागी विविध विषयांवरील आकडेवारीसह जी माहिती चौकटीमध्ये उद्धृत केली आहे, त्यावरून आपण अर्थनियोजनाच्या बाबतीत अंध:कारात आहोत, जगात पाचवी अर्थव्यवस्था ते तिसरी अर्थव्यवस्था या भ्रमात आहोत, असेच प्रत्येक ठिकाणी पीछेहाट हा दर्शवणारी ही माहिती आहे.
थोडक्यात आर्थिक विषमतेची परिसीमा गाठण्यात मात्र आपल्याला यश आले आहे. श्रीमंत, अधिकाधिक श्रीमंत होत आहेत आणि तळागाळातले 90% लोक अक्षरशः कष्टप्रद जीवन जगत आहेत, असेच त्यावरून निष्कर्ष काढले जाऊ शकतात. जास्तीत जास्त वाचकांनी हे पुस्तक वाचले पाहिजे आणि वास्तवतेचा 'अनर्थ' कसा होत चालला आहे, ते समजून घेतले पाहिजे.
सारांश आपले अर्थतज्ञ, जो अर्थाचा अर्थ काढतात तो अर्थ नसून 'अनर्थ'आहे ! अर्थात 'नाव मोठे लक्ष लक्षण खोटं असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल !":🤣🤣
🤣🤣 "मल्लिनाथी 4 !":🤣🤣
"75 वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठांना जेव्हा ST बसने मोफत प्रवास करण्याची, तसेच महिलांना सरसकट अर्ध्या तिकिटाची ST प्रवासासाठी सुविधा देण्यात आली, तेव्हा कोणालाही ते गैर वाटले नव्हते. कदाचित 'लाडकी बहीण' ही योजना "येन केन प्रकारेण' सत्ता मिळविल्यानंतर ताबडतोब सुरू केली असती, तर त्यामागील हेतूंबद्दल शंका घेता आली नसती.
परंतु आता चक्क ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही वस्तू व सेवा निर्मिती शिवाय, विनाश्रम सर्वच महिलांना महिना पंधराशे रुपयाची खिरापत वाटणे हे एक प्रकारे अर्थविषयक असंतुलनाला हातभार लावणे जसे ठरते, तसेच हा चक्क 'आयजीच्या जीवावर बायजी उदार !' असा प्रकारच नव्हे कां? त्यापेक्षा रोजगार हमी योजनेप्रमाणे श्रम करू शकणाऱ्या साठ वर्षापर्यंतच्या महिलांसाठी अशा तऱ्हेची एखादी योजना सुरू करता येणे शक्य होते आणि साठ वर्षाहूून अधिक अशा ज्येष्ठ महिलांना विनाश्रम महिना पंधराशे रुपयाची सानुग्रह रक्कम देणे रास्त होते.
सहाजिकच या अनाठायी, अयोग्य समयी सुरू केलेल्या योजनेच्या मोबदल्यात काय मिळवायचे, तो सत्ताधाऱ्यांचा अंतस्थ हेतू आपोआपच उघड होत आहे. दुर्दैव असे की तो हेतू आड वळणाने ते प्रचारात मांडतही आहेत !
निवडणुकीच्या स्पर्धेत सर्वांना 'समान मैदान' याचेही त्यामुळे उल्लंघन होत नाही कां ?
सर्वात वाईट ह्याचे वाटते की, हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे, हे समजून समजूनही तो विधिवत कायदेशीर आणि शिष्टसंमत ठरत आहे ह्याचे !":🤣🤣
🤣🤣"मल्लिनाथी 5 !":🤣🤣
😝"महाराष्ट्राचे राजकारण इतक्या खालच्या थराला गेल्यापासून, काही शब्द हे परवलीचे झाले आहेत. 'गद्दार', '50 खोके आणि ओके' 'दिलासा' आणि 'धक्का' ! 2019 मध्ये सत्तारंभ करण्याच्या वेेळीच,प्रथम नीच पातळीवरच्या राजकारणाने भयानक 'धक्का' दिला, तेव्हापासून'गद्दार'या शब्दाचा उदय झाला !
कौरवांनी वचन न पाळल्यामुळे, पुढचे सारे 'महाभारत' घडले हे सर्वज्ञात आहे. त्याचप्रमाणे 'बंद खोलीत जो शब्द दिला' तो न पाळल्यामुळे पुढचे सत्तेसाठीचे राजकारण सुरू झाले. साहजिकच 'आद्य गद्दार' कोण ठरू शकतो, हे उघड आहे.
नंतर अडीच वर्षांनी सत्ता लालसे पोटी जे घडवण्यात आले, त्यामुळे '50 खोके आणि ओके' हा शब्द प्रकाशात आला. पक्ष फोडून बाहेर पडलेल्या या समूहाने जर 2019 मध्येच पक्षप्रमुखांची विचारधारा न पटल्याने सत्तेत सामील व्हायचे नाकारले असते आणि मूळ पक्षाच्याच नावाचे कुंकू लावले नसते आणि स्वतंत्र समूह म्हणून अस्तित्व राखण्याचे धार्ष्ट्य दाखवले असते, तर त्यांच्या नशिबी 'गद्दार' शब्द आलाच नसता.
आदल्या दिवशी भ्रष्टाचाराचा ज्यांच्यावर केला आरोप, लगेच दुसऱ्या दिवशीच त्यांना सन्मानाने सत्तेमध्ये घेणारे आणि ज्या कुटुंबप्रमुखाच्या छत्रछायेखाली राजकारणात एवढी उडी मारणारे, नंतर 'विकास' (कुणाचा ?!) करायचाय असा न पटणारा बहाणा करत सत्तेेत सामील होणारे, कुठल्या पातळीवरचे 'गद्दार' म्हणावयाचे ?
पाचही वर्ष सत्तेची पोळी भाजून खाणारे
हे 2 समुह आणि त्यांना हे सारे करायला भाग पाडणारे सारेच एका माळेचे मणी !
या साऱ्या नाट्यात दिलासा एवढाच की, यासाठी एवढा अट्टाहास करणाऱ्यांना शेवटी दुय्यम पदावर निमूटपणे राहावे लागले हा !
मात्र राजकारणाला काळ्याकुट्ट अंधारात गेली पाच वर्षे ढकलणाऱ्यांना जबरदस्त धक्का देण्याची संधी 20 नोव्हेंबरला मतदारांच्या हातात आली आहे, हाच खराखुरा दिलासा !":😝
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा