शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

"कावळ्यांची शाळा !"

 👍"👍"कावळ्यांची शाळा !": 😊

योगायोग काय बघा, काल आणि आज मी डॉक्टर

ज्ञानेश्वर मुळे यांचे "चिंतन", "मुंबई अस्मिता वाहिनी"वर ऐकले. निसर्ग आणि आपण यांचे नाते उलगडणारे, अंतर्मुख करणारे विचार, माझे डोळे उघडून गेले. 

पहिल्या भागात त्यांनी सांगितले की, माणूस निसर्गावर आपल्या विकासासाठी, सुखासाठी अन्याय करत आहे आणि त्यामुळे कित्येक प्रजाती हळूहळू नष्ट होत आहेत. हा सारा मार्ग विनाशाकडे नेणारा आहे, असा त्याचा सारांश होता. म्हणून माणसाने निसर्गाबरोबर राहायला शिकलं पाहिजे, नाहीतर विनाश अटळ आहे असे त्यांनी ठासून सांगितले. 

तर दुसऱ्या भागात त्यांनी दाखवून दिले की, निसर्ग आपल्याला कायम आवडतो, आपण निसर्गाकडे गेलो की आपले मन शांत होते,  अनेक कल्पना सुचू शकतात. विचारवंत नवतत्त्वज्ञान निर्माण करू शकतात आणि अध्यात्माकडे जाणाऱ्यांना मुक्तीचा, समाधीचा मार्ग सापडू शकतो, इतका निसर्ग अद्भुतरम्य आहे ! त्याची विविधता थक्क करणारी आहे. आपल्या डोळ्यांचे पाळणे फिटवणारे  सामर्थ त्या निसर्ग सौंदर्यात आहे. म्हणून सौंदर्य कुठे इतर ठिकाणी पाहायला जायची गरज नाही. निसर्गामध्ये अनेक अशा सामर्थ्याच्या खुणा आहेत. 

निसर्गापासून आपण दूर चाललो आहोत, ते थांबलं पाहिजे. निसर्गाला आपलंसं करा, कारण पंचमहाभूतांनी हा निसर्ग बनलेला आहे, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. आपलाही जन्म निसर्गापासून झाला आहे आणि लय देखील निसर्गातच होणार आहे. यास्तव अधून मधून तरी बाहेर पर्यटनाला जा, निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्या असा त्यांचा विचार, आपल्याला देखील एक नवा मार्ग दाखवतो, नवीन प्रेरणा देतो. 

साहजिकच आज सकाळी मी चहा पिताना आमच्या गॅलरीतल्या खिडकीतून समोर बघितले, वेगळ्या दृष्टीने. चांगली हिरवीगार झाडी, उंचच उंंच झाडं आमच्या सभोवताली आहेत. त्यावर मला दिसले की, "कावळ्यांची शाळा" भरली होती. सुरुवातीला कुठल्यातरी झाडावरच्या फांदीवर एखाद् दोन कावळे येऊन बसले, मग एकाचे दोन, दोनाचे चार असं करता करता, वेगवेगळ्या झाडांवरच्या वेगवेगळ्या उंचीवरच्या फांद्यांवर जवळजवळ 25 ते 30 कावळे जमा झाले आणि त्यांची शाळा सुरू झाली ! आश्चर्य असे की, वर्गात आपल्या जशी मुलं तासाला आहे तिथेच बसतात, तसं त्यांचं नव्हतं. त्यांना क्षणभर जरी बसलो तरी करमत नसावं. त्यामुळे क्षणाक्षणाला एक कावळा इकडून तिकडे, दुसरा कावळा तिकडून इकडे, असे रमत गमत फिरत होते आणि ते बघणं खरोखर गमतीशीर होतं.

प्रत्येक कावळा किती वेळ एका ठिकाणी बसतो, हे पाहण्यासाठी जणू आपल्याला स्टॉप वॉच वापरायला हवं. काय त्यांचं चालतं देव जाणे !  काळेभोर पिसांनी भरलेले अंग, राखाडी रंगाची मान आणि काळेभोर तोंड व चोच अणकुचीदार. मध्येच टोचायचं फांदीवर, काय वेचायचं देव जाणे आणि इकडे तिकडे मान वळवत राहायचं, भूरकन् उडायचं. अशी त्यांची शाळा पाहत राहिलो, किती वेळ ते कळलच नाही. पण पाहता पाहता बहुदा त्यांचा तास संपला आणि प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी दूरदेशी उडूनही गेला. 

काय काय चालतं त्यांचं कोण जाणे, कुठली त्यांची भाषा ! दिवसभर इकडे तिकडे फिरत असतील, पण रात्री ते कुठे राहतात, त्यांचं घर कसं असतं, ते झोपतात पण कुुठे, काय करतात आणि कसे झोपतात, सारा गुढ प्रकार. खरंच एका प्रजातीचे जर एवढे आगळेेवेेळे खेळ, तर शेकडो नव्हे हजारो प्रजाती सामावणाऱ्या  निसर्गामधील विविध प्रजातींचे जग किती वेगळे असेल !  माणसांच्या जगापेक्षा या प्रजातींचे जग, किती अद्भुत असेल, खरंच कल्पनाच करवत नाही. वनस्पती आणि त्यांचे जग, हे तर शिवाय विचारातच घ्यायला हवे. कारण ते सर्वच बिचारे आयुष्यभर एकाच ठिकाणी आपले पाय रोवून असतात !

खरंच, नवल आहे. आज मी वेगळ्याच जगात वावरत होतो आणि असे निसर्गाची नाते जोडणारे क्षण वेचत होतो. अधून मधून तसे तरी क्षण यावेत, ही प्रार्थना करतो. तुम्हीही विचार करा,  कधीतरी निसर्गाकडे डोळे उघडून उघडून पहा आणि नव्या जाणीवा, नवनवे अनुभव आपल्या मनामनात रुजवा !

धन्यवाद 

सुधाकर नातू


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा