"मुक्तसंवाद-'जन्मगांठी, कडू गोड, बर्या वाईट की, गुळपीठ?":
मागच्या मुक्तसंवादात "टेलीरंजन" मधून जन्मगांठ म्हणजे एकमेकांच्या फसवणुकीचा लपंडाव कसा असते ते मराठी मालिकांचे उदाहरण घेऊन दाखवले होते. आता या व्हिडिओमध्ये जन्मगांठी काही कडू काही बऱ्या वाईट किंवा विचित्र वा गुळपीठासारख्या असू शकतात, ते मराठी मालिकेमधील जोडप्यांच्या उदाहरणावरून उलगडणार आहे.प्रथम आपल्याला सध्या गाजत असलेल्या "आई कुठे काय करते" मध्ये आढळलेली जोडपी पाहू या. पहिलं आम्हाला जोडपं नजरेसमोर येतं ते म्हणजे शेखर आणि संजनाचं. ती एक सुशिक्षित, सुस्वरूप व महत्वाकांक्षी आधुनिक स्त्री आहे. ती कदाचित अयोग्य माणसाच्या प्रेमात पडते आणि शेखरसारखा काहीसा कमी शिकलेला, चांगले कामधाम नसलेला व रावडी असलेला असा जोडीदार प्रेमात आंधळे होऊन तिने केला आहे. दुसरं उदाहरण आपल्याला अनिरुद्ध व अरुंधतीचे दिसते. अनिरुद्ध संजनाच्या सौंदर्याला भाळून तिच्याशी बारा वर्ष गुपचूप संबंध ठेवतो. संजनाचे व आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत हे अरुंधतीच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी तिच्या लक्षात येते व तिचा भ्रमनिरास होतो, ती अक्षरशः उन्मळून जाते. साधी भोळी अरुंधती, ग्रहक्रुत्यदक्ष आणि सुस्वभावी स्त्री त्याउलट अनिरुद्ध बुद्धिमान पण बेरकी लंपट स्वतःचा सार्थ बघणारा पुरुष अशीही विचित्र जोडी.
अनिरुद्धचा धाकटा भाऊ अविनाश आणि नीलिमा यांचा संसार तर असाच धेडगुजरी किंवा तितकासा सुसंवाद जोडीदारांमध्ये नसलेला असा. कारण अविनाश तसा साधा सरळ मार्गी, मेहनती आईवडिलांची गरज जाणणारा, स्वाभिमानी तर बायको निलीमा आळशी, पक्की स्वार्थी उधळी परिस्थितीची जबाबदारीची जाणीव नसणारी आपमतलबी स्त्री. ही अशी विजोड जोडी म्हणजे मारून मुटकून संसार करणारी जोडी.
याउलट एकमेकांशी समजून-उमजून संसार करणारं जोडपं म्हणजे अर्थात अप्पा माणिक कांचंनच. त्यांनी आपला पन्नास वर्षांचा संसार गोडीगुलाबीने व खेळीमेळीच्या वातावरणात केला आहे आणि तो एक खरोखर आदर्श असाच म्हणून समजला जावा. कदाचित जी माणसं सरळ मार्गी असतात त्यांच्या बाबतीत हे असे समजूतीने व शहाणपणाने केलेले संसार असू शकतात. नशिबाने आई-वडिलांचं अनुकरण करणारी त्यांची मुलगी आणि त्यांचा समंजस जावई यांचं जोडपे तसंच अनुरूप आणि
मध्ये कारण नसताना संसारात संशयाचे वादळ येऊनही एकमेकांना सांभाळून घेणारं.
एकाच मालिकेत दिसणारी ही आगळीवेगळी जोडप्यांची उदाहरण बघून तुम्हाला पटलं असेल की दोन माणसं का एकत्र येतात कुणास ठाऊक ! ती एकमेकांशी जुळवून घेतात की नाही हेही कोणी आधी सांगू शकत नाही. साग्रसंगीत कांदे पोहे प्रोग्रॅम करून म्हणा किंवा प्रेमात पडून म्हणा विवाह केला तरी जोडीदारांना एकमेकांच्या सार्या व्यक्तिमत्वाची ओळख होतेच असं नाही. त्याबद्दलचं एक छान उदाहरण एका नाटकामधून आता नजरेस आणतो. ते म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानामुळे एकमेकांच्या प्रेमात पडलेले "व्हाईट लिली आणि नाइट रायडर" या नाटकातील जोडपे. माहितीच्या मायाजालात गुरफटून ओळखी होऊन परस्पर एकमेकांच्या प्रेमात ही जोडी पडते खरी,पण विवाह करण्यापूर्वी लिव्ह-इन-रिलेशनशिप सारखं आयुष्य जगायचं असं जेव्हा ती ठरवतात, तेव्हा कुठे त्यांना एकमेकांची व्यक्तिमत्वे किती विभिन्न आहेत आणि एकत्र संसार करणे किती कठीण आहे हे त्यांना ध्यानात येते. अर्थातच नंतर त्यांचा संसार सुरू होण्यापूर्वीच मोडतो हे उघडच !
विवाहाच्या वेळेला तरूण तरुणी आंधळी कां होतात याला उत्तर नाही. कदाचित वास्तव अशा जीवनात नाटकांमधून म्हणा मालिकांमधून म्हणा आपल्याला असेच अनुभव येतात. याउलट सर्वांना आदर्श ठरावे असे दोन जोडप्यांचे मी अनुभव आता सांगतो. एक जोडपं ज्यांचा प्रेमविवाह झालेला, त्यातील तरुणाशी मी जेव्हा ह्यासंबंधी संवाद साधला तेव्हा तो म्हणाला "मी प्रेमात पडलो खरा, परंतु अशाच एका तरुणीच्या जी मला सर्वस्वी अनुरूप अशीच असेल आणि मी अशी निवड केली मी आहे की माझे आई वडील झालं तर मी नकार देऊ शकणार नाहीत ! त्याचे बोलणे अगदी खरे होते दोघेही एकाच व्यवसायातील हुशार बुद्धिमान आणि एकमेकांना दिसण्यात, आवडीनिवडी देखील समान अशी अनुरूप. त्याचप्रमाणे जातीचाही प्रश्न येणार नाही अशी. शिवाय पत्रिकाही जुळतात अशी. दुसराही प्रेमविवाह आणि ही जोडीही अगदी अशीच एकमेकांना सर्वस्वी अनुरूप अशीच !
अर्थात अशी उदाहरणे अपवादानेच आढळतात. इतर वेळेला मात्र अगदी विरुद्ध असे चित्र दिसत असते. एकमेकांना पाहून केलेला विवाह असो व प्रेमविवाह तो यशस्वी होईलच याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. कारण कदाचित जन्मगांठ हा जणू काहीही न समजणारा असा जुगारच जणु असावा. एकमेकांना समजून उमजून, गुणदोष स्वीकारून समंजस व शहाणपणाने संसार करणारी जोडपी विरळाच असतात. कारण अशा तर्हेचे ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण दिले जात नाही. प्रत्येकाने आपापल्या स्वभावाप्रमाणे संसाराचा हा सारीपाठ खेळायचा असतो वा उधळायचा असतो. "जन्मगांठी, कडू गोड, बर्या वाईट की, गुळपीठ?": साराच अगम्य असा हा नियतीचा खेळ दुसरं काय म्हणायचं ?
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा