"हार जीतचा हा लपंडाव !":
क्रिकेट हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आणि अत्यंत आवडीचा विषय. गल्लीबोळात क्रिकेट खेळणे बालपणापासून जे सुरू होते ते अगदी प्रौढत्व येईपर्यंत. त्यातून आमच्या वेळी क्रिकेट मॅच बघायला न जाता प्रत्यक्ष मॅच बघायला मिळाल्याचा आनंद देणारा टीव्ही नव्हता. त्यामुळे रेडिओ वरच विजय मर्चंट डिकी रत्नगर आदींच्या कॉमेंट्रीज् ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो.मी साधारण दहा वर्षाचा असतानाची आठवण अशी की, आमच्या पंचक्रोशीतील कुठल्याशा संमेलनात मी इंग्रजीमध्ये क्रिकेटची रनिंग कॉमेंट्री अगदी विजय मर्चंट यांच्या अविर्भावात सादर केली होती. इंग्रजी मुळाक्षरे नुकतीच गिरवायला लागलेल्या मला त्या प्रयत्नाबद्दल बक्षीस व कौतुक प्राप्त झाले होते. योगायोगाने नोकरीत असताना प्रत्यक्ष विजय मर्चंट यांच्याशीही पत्रव्यवहार आणि नंतर त्यांच्या मिलमधील आलिशान ऑफिसमध्ये प्रत्यक्ष भेट देखील होऊन गेल्याचे स्मरते. दुसरी आठवण: आमच्या स्नेहसंमेलनाचे वेळी क्रिकेट मॅचेस व्हायच्या आणि त्यामध्ये मला आठवते की, एका संमेलनात बक्षीस समारंभात तर, सर्वोत्कृष्ट बॉलर म्हणून मला चक्क प्रमुख पाहुणे असलेल्या रुबाबदार व देखण्या श्री फरुक इंजिनियर यांच्या हस्ते बक्षीसही मिळाले होते. तो फोटोही माझ्या संग्रही आहे. या अशा मधूर आठवणी संभाळत आम्ही लहानाचे मोठे कधी झालो ते कळलेच नाही.
पहाता पहाता कदाचित आता मी हा प्रवाहाविरुद्ध जाणारा बनलोही असेन आणि त्याचे कारणही तसेच आहे. क्रिकेटची एवढी क्रेझ आता माझ्यापुरती तरी उरली नाही हेच खरे. त्याला कारण एक म्हणजे आमच्या वेळेला फक्त पाच दिवसांची ब्रेबाँर्न स्टेडियमवरची क्रिकेट टेस्ट मॅच नाँर्थ स्टँडमधून बघणे वा इतर ठिकाणच्या कॉमेंट्रीज् ऐकणे एवढाच क्रिकेटचा बोलबाला होता.
पण आता काळ बदलला आणि क्रिकेटला बाजारू स्वरूप आले आहे वा जाणीवपूर्वक आणले गेले आहे. टी ट्वेंटी आयपीएल आयसीसी वर्ल्ड कप अशा अनंत प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊन, त्यांतून पैशांचा पाऊस पडण्या व्यतिरिक्त खरंच काय वेगळं साधलं गेलं कळतच नाही. म्हणूनच कदाचित आता माझी ही अशी क्रिकेटची आवड कमी झाली असेल.
त्यातून टीवीवर क्रिकेट मॅच बघणे हा प्रकार मला तितकासा आवडत नाही. त्या तुलनेत बॅडमिंटन किंवा टेनिस वा फुटबॉल यांच्या मॅचेस बघणे अधिक उत्कंठा पूर्ण असते. जवळजवळ प्रत्येक क्षणाला पारडे बदलत असते आणि ती जी काही गंमत असते ती अवर्णनीयच. लंडनच्या वास्तव्यात चक्क विम्बल्डन स्पर्धेचा खेळ मला टीव्हीवरून बघायला मिळाला होता व तोअनुभव न विसरण्या जोगा असाच होता. T20,ओडीआय आणि टेस्ट मॅच हे सर्व क्रिकेटचे प्रकार किती झालं तरी वेळ काळ काढू आणि थ्रील न निर्माण करणारेच. आणि क्रिकेट म्हटलं, तर मला फक्त भारताबरोबर कुठल्या देशाची मॅच असली, तरच बघाविशी वाटते. इतर देशांच्या मॅचेस कारण नसताना मी सहसा बघतच नाही.
अर्थात इतरांना आयपीएल t20 वर्ल्ड कप इ.इ. अशा स्पर्धात्मक मॅचेस बघायला खूप खूप आवडतात, आणि म्हणूनच मी म्हटलं मी प्रवाहाविरुद्ध जाणारा आहे हे कदाचित सांगत असेन. तरुण व मध्यमवर्गीयांचे सोडा, शाळकरी, नातवंडं शोभतील अशा मुलांना तर आजकाल प्रत्येक मॅच बघायला हवीहवीशी वाटते. गंमत अशी की, त्यांना बहुधा सर्व देशांच्या, सर्व खेळाडूंचा पूर्ण कारकीर्दीचा इतिहास माहीत असतो. आता या वयात आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना ते काही ध्यानात ठेवणे अशक्यच असते.
अजून एक मुद्दा प्रामाणिकपणे सांगायचा तर, भारताबरोबर जर इतरांची मँच चालू असेल, तर शक्यतोवर मला भारताची बॅटींग बघायला आवडते आणि प्रतिस्पर्धी संघाचे बॅटिंग जर जिंकण्याच्या दिशेने जात असेल, असा जर खेळ चालू असेल. तर मी ती बॅटिंग नंतर बघतच नाही. आज सारं हे आठवायला कारण म्हणजे कालची भारत पाकिस्तान मधील World cup मधील, टी-20 ची सलामीत, मी फक्त भारताची अडखळत ठेचकाळत जाणारी बँटिंग पाहिली आणि नंतर पाकिस्तानची पहिली जोडी जेव्हा 50 धावा झाल्या तरी आऊट झाली नाही, ते पाहून मी चक्क टीव्ही बंद करून झोपी गेलो.
माझा मागचा एक अनुभव बरोबर उलटा होता, तो आठवला. अशाच स्थितीत भारत असताना व आपल्या विजयाची शक्यता कमी आहे असे वाटून मी टीव्ही बंद केला होता. पण दुसऱ्या दिवशी खरोखरच चमत्कार घडला आणि अशक्य असा भारताचा विजय खेचून आणला गेला होता. तसेच काही तरी आता घडेल असे मनोरथ करीत, काल
मी झोपी गेलो.
आज सकाळी उठताना, तसाच काहीतरी चमत्कार घडेल असे वाटून, मनात धडधडत बातम्या बघायला गेलो खरा आणि आपला दारुण पराभव झाला, हे कटू सत्य उमजले व माझे मन निराश झाले. भूतकाळात न गुंतता, वर्तमानात घट्ट पाय रोवूनच उज्वल भविष्य घडविता येऊ शकते, ह्याची जाणीव झाली. हार जीत हा तर जीवनातील व खेळांतील लपंडाव तर असतो, हे देखील मनाला पटले. नेहमी आपलीच जीत होईल असे मांडे खाणे योग्य नव्हे हे पटून गेले.
एक मात्र खरे, आपण काल नंतर मॅच बघितली नाही हे बरे झाले असेच वाटून गेले.
सुधाकर नातू