"ह्रदयसंवाद-३६": "सोशल मिडीया-एक वरदान":
सोशल मीडियावर किती वेळ घालवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हे जसं खरं, तसं सोशल मीडियातून काहीच मिळत नाही हे म्हणणेही योग्य नाही. तसा अनुभव मला तरी अधून मधून येत असतो, खूप काही नवीन गोष्टी, नवीन जाण वा नवीन माहिती आपल्याला सोशल मीडियातील विविध संदेशातून, व्हिडीओज् मधून मिळत असते. ती शोधायची वृत्ती मात्र आपल्याजवळ हवी, तरच आपल्याला ह्या अतिशय प्रगत माध्यमांपासून आनंद मिळवता येऊ शकेल, असं मला वाटतं."वागण्यातील विसंगतीचा विडीओ":
आजचंच उदाहरण घ्या. सहज व्हाट्सअँप उघडल्यावर मी दोन-तीन व्हिडीओज बघितले आणि मला एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखे वाटले. पहिला व्हिडिओ, हा आपण पुष्कळदा असे कसे वागतो हा प्रश्न निर्माण करणारा होता. ज्या वेळेला आपण भाजी मार्केटमध्ये भाजी घ्यायला किंवा अंडी वगैरे घ्यायला जातो, तेव्हा घासाघीस करून चार पैसे आपण वाचवले, याचा आपण स्वतःला अभिमान बाळगून समाधान मानतो. तेच आपण ज्या वेळेला एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो, त्या वेळेला चार पाचशे रुपयांहून अधिक खाऊन झाल्यावर, त्याचे दर योग्य आहेत की नाही याचा विचार न करता सरळ टीप म्हणून पन्नास-शंभर रुपये द्यायलाही कमी करत नाही, असे दाखवणारा तो व्हिडीओ होता, डोळ्यात अंजन घालणारा. त्यातून जो संदेश दिला होता तो असा की:
"आहेरे वाल्यांनी 'नाहीरे'वाल्यांशी वागताना शक्यतोवर थोडी माणुसकी आणि दयाळू वृत्ती दाखवावी आणि अशा किरकोळ विक्रेत्यांकडून काही गोष्टी घेताना जर भाव जास्त दिला गेला तरी खंत बाळगू नये. उलट आपल्याकडून अनाहूतपणे काही ना काही तरी समाजसेवा होते आहे, याचा खरोखर विचार करावा."
"कढीपत्ता मोफत कां?":
त्यानंतरचा व्हिडिओ मी सहज उघडून बघितला, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या विकत घेणारा एक माणूस, अखेरीला भाजी विक्रेत्याला हिशोब विचारतो आणि त्यामध्ये शेवटची गोष्ट कढीपत्ता अशी असते की, जिथे तो किंमत लावत नाही. उलट कढीपत्ता फुकट देत असतो. तेव्हा प्रश्न असा की, कढीपत्ता सगळेच भाजीवाले वर्षानुवर्ष फुकट कां देतात?
हा प्रश्न विचारल्यावर तो भाजी विक्रेता एक छानशी जुनी गोष्ट सांगतो आणि त्यातून कढीपत्ता ही पार्वतीमातेने लाखो वर्षापूर्वी मानवतेला दिलेली
देणगी आहे. म्हणूनच, ही कढीपत्त्यासारखी अत्यंत उपयोगी आणि अनेक रोगांवर उपाय असलेली चीज, सगळ्यांना देवाची परमेश्वराची- पार्वती मातेची देणगी असे समजून कोणीही भाजी विक्रेता सहसा कढीपत्त्याची काहीही किंमत लावत नाही, उलट खुल्या दिलाने तो फुकट देतो. आपणही नेहमी आतापर्यंत ते फुकटच घेत आलो आहोत. व्हिडिओतून ही नवीन माहिती आली.
कढीपत्ता हा पूर्वापार पुराणापासून आपल्यापर्यंत आलेला असा औषधी वस्तूचा ठेवा आहे आणि सहाजिकच माणुसकी आणि समाजाला मदत वृत्तीतून भाजीविक्रेते कढीपत्ता फुकट देतात, त्याचे रहस्य कळले, जे कधीही आत्तापर्यंत माहीत नव्हते. तर अशी गम्मत सोशल मिडियाची आहे की तुम्हाला काहीतरी नवीन जाणीव, नवीन माहिती त्यामधून मिळते.
"पुन्हा चिमणराव !":
तिसर्या विडीओत कुठल्याशा जुन्या गौरव पुरस्कारात अचानक रंगमंचावर येऊन ठेपलेल्या चिमणरावांचा दिलखुलास धर्मवीर विनोद करणारा असा मनोरंजक आविष्कार होता. आजच्या युगात इतक्या दशकानंतर त्याच वेशात येणारे चिमणराव आणि त्यांचे एकंदर बोलणे ऐकणे खरोखर आनंददायी होते. त्यामधून नव्या जमान्यामधील पिढीतील व्यक्तींशी त्यांची एकंदर जुळवून घेण्याची मनोवृत्ती तर व्यक्त होत होतीच, शिवाय नवीन पिढी आता जुन्या पिढीकडे कशा नजरेने बघते ते देखील समजत होते. वयोमानाप्रमाणे माणसं बदलतात, काळ बदलतो आणि त्याप्रमाणे सभोवतालची परिस्थिती सामाजिक व सांस्कृतिक जीवनशैली कशी बदलते, याचे खरोखर मनोरम चित्र त्यांत होते. काळाचा महिम्याबरोबरच
जुन्या काळातील माणसांचे पेहराव आणि वैशिष्ट्ये यांचे पुनर दर्शन खरंच जुन्या आठवणी जागवणारे होते. ते दिवस आणि तो काळ आता गेला, हे जसे खरे तसेच त्याची अशी विडीओ रूपाने आठवण देखील निर्मळ करमणूक करणारी.
दिलीप प्रभावळकरांच्या सारखा जातिवंत जीवंत अभिनय करत एखादे चिरंतन स्म्रुतीतील चिमणरावांचे व्यक्तिमत्व मनामनात बसवण्याचे सामर्थ्य असणारा अभिनेता चिमणरावांच्या वेशात पुन्हा पाहणे हे खरोखर आनंददायी होते. आज जवळजवळ एका शतकानंतरही चिमणराव हे कै. चिं वि जोशींनी रंगविलेले हे पात्र त्यांच्यामुळे आपल्या मनात राहिले आहे आणि ते केव्हाही पुनःप्रत्ययाचा आनंद आणि समाधान देत असते हे या व्हिडिओमुळे जाणवले.
आता जाताजाता साधा-सोपा whatsapp वर आलेला एक सुंदरसा संदेश येथे देऊन हे
हृदयसंवादाचे विवेचन पुरे करतो.
"सुवचन":
चांगल्या माणसांची कधी परिक्षा घेऊ नका....
कारण ते पार्यासारखे असतात....
जेव्हां तुम्ही त्यांच्यावर घाव घालता, तेव्हा ते तुटले जात नाहीत......
पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात."
ह्या संदेशामधूनही तुम्हाला आपण कसे चांगले वागावे, याचा नवीन मार्ग मिळेल, नवी दिशा मिळेल. माझे प्रामाणिक सांगणे हेच की, यापुढे सोशल मीडिया वापरताना अशी दृष्टी ठेवा की, त्यातून तुम्हाला काहीतरी चांगलं उपयुक्त मिळवायचं आहे. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हां, नीरक्षीरविवेक व्रुत्तीने, असे चांगले चुंगले वेचण्याचे क्षण येतील ते जरूर साधा. त्यांची नोंद ठेवा, इतरांबरोबर असे शेअर करा.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
माझा you tube channel
moonsun grandson
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे
एकसे बढकर एक.............
विडीओज् पहाण्यासाठी........
आजच ही लिंक उघडा...........
moonsun grandson Channel link:
https://www.youtube.com/user/SDNatu

