शनिवार, २७ जुलै, २०१९

"मनांतले, जनांत-१":


"मनांतले, जनांत!-१":

"भूतकाळाचा गर्भितार्थ समजत, वर्तमानातील अन्वयार्थाच्या दिशेने मार्गक्रमणा केली
तर, भविष्यात क्रुतार्थता लाभते."

"भाऊबंदकी, फितुरी आणि निष्क्रियता ह्यामुळे भवितव्याचा कायम र्हास होत रहातो."

"स्वार्थ सोडून, निस्वार्थ बुद्धिने चरितार्थ करायचे ठरवले, तरच जीवनांत खराखुरा चिरस्थायी अर्थ निर्माण होऊ शकतो."

आणि अखेरीस,
"कोड़े: कधीही न सुटणारे":
---------------------------------
माणूस मरतो, तेव्हांच कां मरतो? कुणी जन्मत:च, तर कुणी बालपणी वा कुणी एेन तारूण्यांत, तर काही प्रौढपणी, तर काही वृद्धापकाळी हे जग सोडून जातात. प्रत्येकाचे मरतेवेळी वय भिन्न असते, असे कां????....
--------------------------------
"चूक की बरोबर?":

आपण चूका करतो त्याची कल्पना तेव्हा येत नाही. त्यावेळेला घेतलेले निर्णय हे बरोबरच आहेत असं वाटत असतं. परंतु गंमत अशी घडते की, जे काही निर्णय घेतले, ते चूकीचे होते ते आपण घ्यायला नको होते असे केवळ
कालांतरानेच ध्यानात येतं.

चूक आणि बरोबर यांचा लपंडाव असा सतत चाललेला असतो आपल्या आयुष्यात! त्यामुळेच आपल्या सुखदुःखांच्या ऊन सावल्या आपल्याला जीवनात येतच रहातात. कदाचित त्याच्यावर उपाय नसावा.
२५/७/'१९
######################
सगळ्या आयाराम, गयारामांना मतदारांनीच शहाणपणाने, पराभवाच्या वनवासांत पाठवणे अत्यावश्यक नाही कां?
########################
" सोशल मिडियाचा वापर":

शक्यतो मी माझे स्वनिर्मित संदेशच सोशल मिडीयावर पोस्ट करतो. हा नवनिर्मितीसाठी उत्तम प्लँटफाँर्म आहे असा माझा समज आहे. त्यामुळे २०० हून अधिक लेख मी माझ्या ब्लॉगवर लिहू शकलो आणि कदाचित चांगले आवडीची पावती मिळविणारे स्वनिर्मित शेकडो संदेश मी सोमिवर पोस्ट करू शकलो.

सर्वात महत्वाचे मी जवळ जवळ कधीच मला आलेले संदेश पुढे ढकलत नाही. ते मी वाचल्यावर डिलीट करत़ो. अनामिक विडिओ न उघडताच डिलीट करतो. फोटोही पुष्कळदा असे डिलीट करतो. त्यामुळे माझा वेळ, डोके वापरण्याचा त्रास व डेटा वाचू शकतो.

आपण पाठवलेला संदेश पुढे किती जणांना कदाचित कोणाकोणाला देखील, पुढे ढकलला जातो, ते तो संदेश पाठवणार्याला कळले पाहिजे. दुर्दैवाने आपला संदेश पाठविणार्याने वाचला एवढेच सध्या तरी कळते.

########################
"कोरडे पाषाण":

उपदेशाम्रुत फक्त क्षणिक आणि वाचण्यापूरते उपयुक्त असते. अशा तर्हेच्या टिप्स पैशाला पासरी दररोज समोर येतात. असे असूनही आपण कोरडे पाषाणच रहातो.

व्यक्ती तितक्या प्रक्रुती, ह्या न्यायाने जो तो आपल्या कुवतीनुसार व अनुभवाप्रमाणे शिकतो, धडपडतो आणि चुकांमागून चुका करतच रहातो. 'करावे, तसे भरावे' ह्यानुसार जगरहाटी चालते, चालणार आहे व चालत राहील, हेच खरे!
#######################
।। "जीवन त्यांना कळले हो"।।

माणूस जेव्हा एकांतात स्वतःशी हृदय संवाद करायला बसतो, तेव्हा तो मागे वळून आयुष्याचा लेखाजोखा घेतो. काय चुकले, काय मिळाले, काय गमावले, काय भोगले आणि कुठे आलो, कुठे होतो असा त्याच्या जीवनाचा तो जमाखर्च असतो.

असे करताना कळत नकळत त्याच्या मनात विचार येतो, जीवनाचे प्रयोजन काय, अर्थ काय, हे अहंकार राग लोभ गर्वाचे खेळ, सारे कशासाठी, कुणासाठी?

आणि अशा वेळेला, त्याला अचानकपणे, लहानपणी शाळेमधली ती कविता आठवते, आणि त्यातील ते अविस्मरणीय उद्गार त्याला सांगतात:

"जीवन त्यांना कळले हो।
ज्यांचे मीपण, पक्व फळापरी गळले हो"।।
#########################
केव्हाही कोणताही चॅनेल लावावा,
तेव्हा कायम जाहिरातींचा पाऊसच कसा असतो? इतक्या जाहिराती कोण कशा देऊ शकतो? हे म्हणजे "आशय थोडा, सोंगे फार"!
--------------------------------
"घरकोंबडा":

कमाल आहे, एवढे लांबवर प्रवास करून व न चुकता नेहमी पर्यटनाच्या नवनवीन स्थळी जाणार्यांची. अभिनंदन. मी त्यामानाने घरकोंबडा आहे. सहाजिकच अशी पर्यटनाची आवड असणार्यांचे मला जसे कौतुक वाटते, तसाच नकळत हेवाही!
#########################
"न सुटणारे प्रश्न":
कालप्रवाहाच्या ओघात, घडामोडी
चांगल्याकडून अधिकाधिक वाईटाकडेच
कां होतात?
----------------------------------
"मिठी आणि तीर!":
मारली एकच एक अशी "मिठी",
जणु ठोक ठोक ठ़ोकणारी काठी!
मारला एकच एक नजरेचा "तीर",
करून जातो, चमत्कारच चमत्कार!!
----------------------------------
सुधाकर नातू
२७/७/'१९

बुधवार, १७ जुलै, २०१९

"चिंतनिका":


"लेखन आणि वाचन":

"लेखन फक्त दोन प्रकारचे असतं. एक सहज, सरळ सोपं वाचलं की, सगळ्यांना समजूं शकतं असं, तर दुसरं केवळ काही मूठभरांना बुद्धीचा कस लावला तरच उमजतं असं!

कुणी कसं लिहायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं, असं की तसं! पण वाचकाला मात्र सोपं तेच हवं असतं. कठीण, दुर्बोध ते अडगळीतच जातं.

वाचक वर्ग कमी झाला आहे, असा जो ओरडा होतो त्याच्या मागे कदाचित सोपं सरळ, दुर्मिळ तर दुर्बोध मात्र विपुल, हेच असावं. वाचनालयात जेव्हा आपण जातो तेव्हा अनेक पुस्तकं तिथे कपाटात हारीने मांडून ठेवलेली असतात. पण त्यातून निवडक असं उचलणं आणि मिळणं मोठी कठीण असतं. बहुतेक पुस्तकं बिचारी आपल्याला कोण उचलतं त्याचीच वाट पहात बसलेली असतात."
---------------------------
"उघडा डोळे व बघा नीट":

अनैतिकपणे व्यवहार बिनधास्तपणे करून स्वत:चा स्वार्थ आणि तुंबडी भरणारी विविध उदाहरणे आजच्या भ्रष्ट आणि आत्मकेंद्री वातावरणांत ठायी ठायी घडताना दिसतात.

'सय' ह्या श्रीमती सई परांजपे लिखीत पुस्तकात ह्याला छेद देणारी, त्यांच्या मातोश्री शकुंतलाबाई परांजपे ह्यांची एक अनुकरणीय आठवण दिली आहे. राज्यसभेच्या खासदार असताना, दिल्लीवरून विमानप्रवास करताना शकुंतलाबाईनी, सोबत असलेल्या दोन वर्षे नुकतेच पूर्ण केलेल्या आपल्या मुलीचे, काऊंटर वरील माणूस नको नको म्हणत असूनही, चक्क त्याच्या खनपटीस बसून पैसे भरून तिकीट काढले होते.

दुर्दैवाने अशी माणसे आता दुर्मिळ झाली आहेत. जो समाज कायदा व नैतिकता मानत नाही, त्याचा भविष्यकाळ अंध:कारमय राहील हेच खरे.
---------------------------
"चिंतनिका":

"'जमिनी'वरील यंत्रणेची परिस्थिती हाताळताना नाकी नऊ येत असताना, चांद्रयानासारखी स्वप्ने पहाणं, हे प्राधान्य चुकत तर नाही?"

"विकासाच्या संकल्पनांचा आणि सद्यस्थितीतील प्राधान्यांचा सर्वंकष आढावा घेण्याची कधी नव्हे इतकी आज गरज आहे कां?"

ठेविले अनंते तैसेची रहावे"!:
जेव्हापासून चलन चलनात आले तेव्हापासून नव्या नव्या चिंतांचा जन्म झाला.

"अंगभूत गुणवत्ता, दूरद्रुष्टी आणि ईप्सित ध्येयासक्ती ह्या जोडीला जिद्द आणि प्रामाणिक अहर्निश कष्ट घेणारी व्यक्ती, सामान्यातून असामान्यत्व मिळवते. समाजाचे आणि देशाचे पुनरूत्थान ही अशी महान दिग्गजांची मांदियाळी करत असते........"
---------------------------
"जाणा तुमच्यातील 'महागुरु'":

आज गुरुपौर्णिमा. माझा नमस्कार.

जीवनामध्ये जन्मापासून प्रथम आई आणि नंतर विद्यभ्यासांत गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण जगाचे एकंदर रंगरूप कसे आहे, कोणती आव्हाने आहेत ह्यांची कल्पना घेऊन पुढे जात असतो. मार्ग शोधतो.

ह्या सर्वांना मनापासून वंदन करताना मला प्रामाणिकपणे, असे वाटते की हे तर खरोखर सर्व श्रेष्ठगुरु यात वादच नाही. परंतु जीवनामध्ये जर खरोखरीच कुणी आपल्याला सर्वोत्तम गुरु भेटत असेल, तर तो म्हणजे आपण स्वतः आणि आपला अनुभव!

दुर्दैवाने आपल्यातील ह्या महागुरू कडे आपण किती लक्ष देतो? जर आपण एकदा दररोज आपणच आपल्या स्वतःशी दहा मिनीटे संवाद केला आणि आपल्या अनुभवांच्या आरशात डोकावून पाहिले, तर आपल्याला खरोखर सर्वोत्तम असे शिकायला मिळेल, दश दिशा गवसतील.

आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मीच माझ्या मनामध्ये डोकावून पाहिले आणि हे सुचले अन् लिहिले!
--------------------------
"विश्वकपाचे म्रुगजळ":

साखळी सामन्यात पहिला क्रमांक मिळविणार्या टीम इंडियाचा, चौथा क्रमांक मिळविणार्या न्यूझीँंलंड टीमकडून उपांत्य सामन्यात पराभव झाल्यामुळे विश्वकपांतील आपले आव्हान अखेर संपूष्टात आले आहे. ह्याला अनेक कारणे आहेत:

१. फलंदाजी गोलंदाजी व क्षेत्ररक्षण ह्या तीनही बाबतीत न्यूझीलंडची कामगिरी आपल्यापेक्षा कितीतरी सरस होती. विशेषत: आपल्या गलथान क्षेत्ररक्षणामुळे ज्या धांवा आपण दिल्या, त्या वाचवता न आल्याने आपला पराभव झाला.
२. संघ निवडीत तीन यष्टिरक्षक-पंत कार्तिक व धोणी ही निवड चुकीची व अनावश्यक होती. धोणीबरोबर उरलेल्या दोघांऐवजी शमी व केदार जाधवला घ्यायला हवे होते.
३. ह्या सामन्यात भोपळा फोडायला कार्तिकने १९/२० चेंडू घेतले आणि अननुभवी पंतने भान न ठेवता, अवेळी, बेदरकार चेंडू फटकावून आपली विकेट जवळ जवळ फेकली.
४. आधीचे सामने जिंकू देण्यात ज्या तीन आघाडीच्या फलंदाजांचा सिंहाचा वाटा होता, ते तिघेही ह्या सामन्यात दारुण अपयशी ठरले.
५. सर्वात चिंताजनक बाब ही की, धोणीच्या संथ फलंदाजीमुळे आपले सोपे लक्ष्य, अवघड झाले.

अर्थात पराभवानंतर अशी जर तरची भाषा व्यर्थच होय. कारण
Ultimately the Better team wins the game हेच खरे!
----------------------------
"ह्याला जीवन ऐसे नांव!":

जीवन एक कोडे आहे, यात शंका नाही. सभोवताली पहा. कुणाच्या नशिबात काय काय लिहिले असते ते! आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे माझ्या पाहण्यात अशीच काही उदाहरणे आली की, ज्यामध्ये खरोखर त्या त्या व्यक्तींच्या नशिबात असं कां म्हणून ठेवलं गेलं, याचं कोडंच पडते.

हे दांपत्य चांगले, हुशार दोघंही उत्तम अशा सुस्थितीतल्या नोकरीमध्ये. अशा वेळेला त्यांना दोन मुली झाल्या आणि त्या हुशारही निघाल्या. पण अचानक, ह्या दांपत्याच्या जीवनात एक मोठा आघात झाला. नवरा-बायको कुठेतरी फिरायला म्हणून गेलेले असताना, नवऱ्याने रस्ता क्रॉस केला. पण, हाय तोच रस्ता बायको क्रॉस करून येताना, भीषण अपघातात त्याच्या ती समोर मरण पावली. याला काय म्हणायचे? हे कुठलं कमनशीब!

परंतु, इथे ही गोष्ट थांबत नाही. त्या दोन मुली ह्या ग्रहस्थाने चांगल्या प्रकारे एकट्याने वाढवल्या. मोठी मुलगी तर उत्तम शिक्षण घेऊन परदेशातल्या चांगल्या नावाजलेल्या कुटुंबात सून म्हणून गेली. पण धाकटी अत्यंत सुस्वरूप गोड मुलगी तिच्या नशिबात काय ठेवलं होतं देव जाणे कॉलेजमध्ये असताना कुठे कोणाच्या प्रेमात पडली आणि आपल्या सगळ्या आयुष्याचाच राखरांगोळी करून गेली तिला बिलकूल शोभणार नाही असा मुलगा तिच्या प्रेमाचा साथी झाला वडिलांना तीच एकंदर प्रताप बघून संताप तर होता पण तिचे प्रेम इतक्या पराकोटीचे की ती लग्न करा याच मुलाची असं म्हणून हट्ट धरून बसली शिक्षण झालेलं नाही अशा आड वयात १८/१८ व्या वर्षी तिचं लग्न त्यांना बिचार्‍यांना करून द्यावे लागलं आणि पुढेच संबंध तिच्या आयुष्याची दशा झाली नवरा रिक्षावाला निघाला धड काही शिकलेला नाही आणि एकंदर संस्कारही चांगले नाही जुगार दारू पिणार अशा त्याच्या सवयी त्यामुळे त्या मुलीच्या संसाराची तर वाताहत झालीच पण त्यामुळे तिच्या वडिलांना फारच मला स्वीकारायला लागला मोठी मुलगी चांगल्या परदेशात संसार करत होती आणि इकडे ही कशी फरफटत जात होती.

खरोखर म्हणूनच म्हणतो एकाच आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या अपत्यांच्या नशिबी असे वेगवेगळे प्रारब्ध कां बरे यावे?
आहे उत्तर?
---------------------------

सुधाकर नातू
१७/७/'१९

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

"अंधेर नगरी, चौपट राजा":


"अंधेर नगरी, चौपट राजा":

माणसे म्रुत्युमुखी पडायला,रस्ते रेल्वे अपघात कमी होते म्हणून की काय, सध्या कोणत्याच गोष्टी योग्य तर्हेने घडत नाहीत. कुठे धरण फुटते, पूल कोसळतात, कुठे संरक्षक भिंती कोसळतात कुठे विद्यार्थी कोचिंग क्लास मध्ये आग लागल्यामुळे उड्या मारतात व प्राण गमावतात, कुठे रस्त्यात खड्डे पडल्यामुळे अपघात होतात आणि अनेक निष्पाप जीव जातात. तर कुठे गटारांमध्ये मुल पडून नाहक बळी जाते.

माणसाचाच आता काही भरवसा राहिला नाही. माणसांच जीवन म्हणजे किड्यामुंगीसारखे झाले आहे. सुस्त भ्रष्टाचारी यंत्रणा, हलगर्जीपणा दिरंगाई बेफिकीर करण्यात मग्न आहे. कुठे काही जीवघेणे संकट आले की चौकशी लावली, जे दोषी असतील त्यांना कडक शिक्षा होईल अशी टेप लावत, काही लाख अनुकंपा दान फेकले की आपली जबाबदारी संपली असे मानणारी मग्रूर कारभारी मंडळी वाट्याला आली. एकमेकांना दोषी ठरविण्यात आनंद मानू लागली. आपल्या विहीत उत्तरदायित्वाला विसरून लाज सोडून सत्ता उपभोगत राहिली की अनागोंदी अराजक दूर रहात नाही.

विकासाची स्वप्ने व गप्पा मारत, चलता है कल्चर चालत आहे. यंत्रणा राबवणारे जसे आपल्या उत्तरदायित्वाला विसरत आहेत तसेच ज्यांच्यासाठी यंत्रणा आहे, तेही आपल्या जबाबदारीची जाणीव नसणारे होत आहेत. म्हणूनच अनेक मानवनिर्मित अघटीत घटना घडत जात आहेत.

आमच्यासारख्या ज्येष्ठांना ह्या सार्या चिंता करायची तशी काही गरज नाही. परंतु रुखरूख हीच वाटते हे असेच चालू राहिले तर, उद्याच्या पिढी समोर अंध:काराशिवाय काहीही उरलेले नाही. ही जाणीव कुणीतरी कुणाला तरी करून द्यायला हवी. म्हणून पोटतिडकीने जे वाटले ते लिहिले. त्याचा काही उपयोग नाही, हेही दुर्दैवाने खरेच आहे.

अखेरीस प्रार्थना हीच:

"ज्याला त्याला, त्याने त्याची जबाबदारी तंतोतंत पाळण्यात खराखुरा आत्मानंद मिळत असतो, ही उमज जर मनापासूनआली व तसे त्याचे कायम वर्तन राहिले, तर समस्यांना पूर्णविराम मिळू शकेल............"

"कलियुग है भाई, कलियुग!":

विचारसरणी व धोरणे न पटल्याने पक्ष बदलण्याचे दिवस आता इतिहासजमा! आता आमिषे कारण असतील, तर ज्यांनी निवडून दिले त्यांच्याशी ही गद्दारीच नव्हे काय?
हा सत्तेसाठीचा खेळच निराळा!

"सध्याचा वाढता आयाराम-गयाराम हा खेळ बघता, एकदा निवडून आल्यानंतर तो पक्ष पुढील निवडणुकीपर्यंत कुणालाही सोडता येऊ नये असा कायदा करणे आवश्यक नाही कां?

तसेच विधी सभागृहाचा सभासद असल्याशिवाय कुणालाही मंत्री बनविता येणार नाही, असाही कायदा सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक नाही कां?"

"उघडा डोळे व बघा नीट":

अनैतिकपणे व्यवहार बिनधास्तपणे करून स्वत:चा स्वार्थ आणि तुंबडी भरणारी विविध उदाहरणे आजच्या भ्रष्ट आणि आत्मकेंद्री वातावरणांत ठायी ठायी घडताना दिसतात.

'सय' ह्या श्रीमती सई परांजपे लिखीत पुस्तकात ह्याला छेद देणारी, त्यांच्या मातोश्री शकुंतलाबाई परांजपे ह्यांची एक अनुकरणीय आठवण दिली आहे. राज्यसभेच्या खासदार असताना, दिल्लीवरून विमानप्रवास करताना शकुंतलाबाईनी, सोबत असलेल्या दोन वर्षे नुकतेच पूर्ण केलेल्या आपल्या मुलीचे, काऊंटर वरील माणूस नको नको म्हणत असूनही, चक्क त्याच्या खनपटीस बसून पैसे भरून तिकीट काढले होते.

दुर्दैवाने अशी माणसे आता दुर्मिळ झाली आहेत. जो समाज कायदा व नैतिकता मानत नाही, त्याचा भविष्यकाळ अंध:कारमय राहील हेच खरे.....

अखेरीस..
सध्या दिवसामाजी जे जे इथे तिथे मानवनिर्मित अघटीत घडते आहे, त्यापायी वाटते
" श्री पांडूरंगा आता तरी धांव रे,
आता तरी पाव रे,
आमचे डोळे उघड रे!"

सुधाकर नातू
१२/७/'१९

रविवार, ७ जुलै, २०१९

"निरीक्षणे व परीक्षणे!":


'असाही एक अनुभव':

'Beauty, lies in the eyes of the beholder':

एका नांवाजलेल्या लेखकाचे, तितकेच प्रसिद्ध पुस्तक, मोठ्या हौसेने मी घेतले आणि वाचायला लागलो, तेव्हाच माझ्या ध्यानात आले की, त्यांतील मजकूर खूपच लहान फाँट वापरून छापला आहे. हळुहळू ते पुस्तक चाळताना, मला उमगलं, की त्यामधील विषय आणि मुद्देही आता कालबाह्य झाले आहेत. शेवटी तर, समजून चुकले की, जुन्या काळी गाजलेले, केवळ त्याच्या नांवावरून हातात घेतलेले, हे पुस्तक मी नेट लावून जिद्दीने जर वाचले, तर माझे डोळे निश्चितच बिघडतील. म्हणून, नाईलाजाने मी पुस्तक वाचणे बंद केले आणि शांतपणे डोळे मिटून पडलो.

माझी निवड चुकली, ह्याचा विषाद आणि मनस्ताप व्हायला लागला. पण, अचानक मनात वीज चमकली आणि मला साक्षात्कार झाला की, आपली ही चूक क्लेशकारक तर खरीच, पण आपल्याला ती, अशी चटकन् ध्यानात येणे, हे तर किती तरी फायद्याचेच नव्हे कां?

तथ्यांश हा की, 'नांव' होणे' हे शेवटी कालसापेक्ष असते; कोणतीही निवड वा निर्णय साधक बाधक विचार करूनच घ्यावा; आणि सर्वांत महत्वाचे हे की, काहीही घडले, तरीसुध्दा अंतिमत: ते आपल्या हिताचेच असते, फक्त त्यासाठी आपली द्रुष्टि यथार्थपणे बदलायला हवी!
---------------------------
"विचार मालिका":

# "स्वतंत्र कल्पना करणे, ती अर्थपूर्ण योगदान देणार्या मूर्त
स्वरुपांत प्रत्यक्षात आणणे,
हयापरती नितांत आत्मानंद देणारी चिज नाही."

# "सध्याच्या राजकीय घडामोडी व वळणे पहाता, एकपक्षीय हुकूमशाहीकडे आता वाटचाल चालली आहे, असे म्हणता येईल कां?"

# "जागते रहो":

चंगळवाद बोकाळत गेला की, दुसरं काही होणं अशक्य असतं. भौतिक प्रगती होता होता नैतिक अधोगती कधी होत जाते, ते कळतंच नाही.

अशा समयी, जेव्हां पैसा हे केवळ साधन न रहाता, सर्वार्थाने एकमेव साध्य रहाते, तेव्हा नैतिक मूल्ये आणि समाजापुढचे आदर्श ढासळत जातात आणि पहाता पहाता माणूसपण तर हरवतेच अन् ते एकदा कां हरवले की भवितव्य अंध:कारमय होणे दूर रहात नाही.

आपल्या विहीत कर्तव्याचे उत्तरदायित्व मनापासून मानण्याच्या आणि अधिकाधिक सर्वोत्तम दर्जाचे काम नेहमी करण्याच्या, प्रत्येक नागरिकांच्या प्रव्रुत्तीमुळे, प्रगत देश आपले भूषणावह स्थान जगात टिकवून आहेत.

कंत्राटदार निक्रुष्ट काम करतो तेव्हा तो त्याच्या विहीत कर्तव्याशी प्रतारणा करतो. अशी कार्यसंस्क्रुती असल्यावर अधोगती अपरिहार्य असते.

इथे नितीमत्तेचा विषय नसून, कार्यसंस्क्रुतीचा संबंध आहे. जी ज्याची जबाबदारी ती उत्तम तर्हेने जर आपल्या इथे पाळली गेली असती, तर आज संपूर्ण चित्र वेगळे असते.

आणि आपण? कुठे आहोत व कसे आहोत?

वास्तव परिस्थिती स्विकारून आपल्या चुका व आपल्यातील कमतरता खुल्या दिलाने मान्य करण्यात हयगय करून काहीच साध्य होत नाही. आपल्या पिछेहाटीला आपणच कारणीभूत होत असतो, हे कटू सत्य आहे.

# "श्रेय घ्यायला नेहमी, पुढे येणार्यांनी,
वेळीच
आपली जबाबदारी मान्य करुन,
झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत असे वर्तन ठेवावे."

# "तुपारे" मालिकेतील ईशा आता गरोदर झालेली दाखवत आहेत.
पण प्रश्न हा की, हे बहुधा, विक्रांत हा गजा पाटील आहे हे ईशाला समजण्यापूर्वी तर झालेले दिसत नाही; मग ते जर नंतर असेल तर कां व कशासाठी?"

# "केव्हा जागे होणार आपण?":
"पुरे झाला हा जीवघेणा खेळ":

मुंबईची तुंबई उघड्या डोळ्यांनी पहाणारे, गेंड्याच्या कातडीचे कारभारी, मालाड सारखी अनेकांचे प्राण घेणारी दुर्घटना, "मरे"ची अमानुष गर्दीचा आगडोंब पहाता, भ्रष्ट यंत्रणांमुळे मुंबईकरांना कोणीही वाली उरला नाही, असेच दिसते.

अजून किती दिवस बिचार्या नागरिकांनी हे सारे जीवघेणे हाल सहन कां व कशासाठी सहन करावयाचे? म्हणूनच लष्कराच्या ताब्यात मुंबईची सर्व नागरी सेवासुविधा देण्याचा प्रयोग कां करू नये?

मानवनिर्मित दुर्घटना ज्यांच्या बेपर्वाई व चुकांमुळे होतात, त्यांना जर स्वत:च्या नाकर्तेपणाबद्दल काहीच लाज वाटत नाही आणि अशांना त्यांच्या क्रुत्याबद्दल वेळीच कठोर शिक्षा होत नाही, त़ो पर्यंत अशी संकटे निर्माणच होत रहाणार."

# "धरिला हा छंद":
कुणाला चित्रे काढण्याचा, तर कुणी फिरायला जाण्यात रमतो, कुणी स्टँपस्, जुनी नाणी वा वर्तमानपत्रातली कात्रणे जमवण्यात आनंद मानतो, तर आणखी कुणाला वाचनाचा छंद असतो. काही ना काही छंद असण्याची गरज निव्रुत्तीचे दिवस आले की प्रकर्षाने भासते. ज्यांना कुणाला कोणताच छंद नसतो, त्यांची स्थिती अशा वेळीच नव्हे तर जीवनातील कोणत्याही अवस्थेत कठीण होते.

अखेर छंद म्हणजे काय, तर जी गोष्ट आपल्याला आपल्या द्रुष्टिने चांगली जमते, जी पुन्हा पुन्हा कराविशी वाटते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जी केल्याने आपल्याला तर आनंद होतोच, समाधानही मिळते, पण जिच्यामुळे आपले व इतरांचे नुकसानही होत नसते, ती गोष्ट किंवा क्रिया ही आपला छंद होय. सुदैवाने मला वाचनाचा, बहुधा त्याही पेक्षा लिहीण्याचा छंद खरोखरच अधिक प्रिय आहे. मी माझा स्मार्ट फोन प्रामुख्याने दिसामाजी काही ना काही, जेव्हा जसे सुचेल तसे लिहीण्यासाठीच वापरतो. त्याचेच फळ आता मला मिळते आहे. माझा ब्लॉग सुरू केल्यापासून आजपर्यंत विविध विषयांवर १०० हून अधिक स्वतंत्र लेख लिहू शकलो आहे!

तुमचाही वेळ असाच, सत्कारणी लावण्यासाठी..........

माझ्या ब्लॉगवरील लेख वाचा: लिंक:

http//moonsungrandson.blogspot.com

सुधाकर नातू
७/७/'१९

बुधवार, ३ जुलै, २०१९

"आजचे मुद्दे व गुद्दे":


 "आजचे मुद्दे व गुद्दे":

# सत्ता मिळविणं जितकं सोपं असतं, त्यापेक्षा ती विहीत जबाबदारीनं संभाळणं महाकर्मकठीण असतं!

# सत्ताधारी सत्ता जबाबदारीपूर्वक राबविण्याऐवजी केवळ सत्तेचेच सत्तेसाठीचेच राजकरण करण्यात मग्न रहाण्यात भूषण मानीत असल्याने कारभाराची काय वाताहात झाली आहे, ते रोज घडणाऱ्या दुर्घटनातून व दररोजच्या मनुष्यहानीतून स्पष्ट दिसत आहे.

# केवळ मुंबईच नव्हे तर नाशिक पुणे आंबेगांव येथील दुर्घटना आणि आता चिपळूण येथील तिवरे धरण फुटण्याच्या दुर्दैवी घटनांमुळे व्यथीत होऊन महाराष्ट्रातील गेल्या पाच वर्षात जाणवलेल्या वास्तवतेचे भयचित्र ह्या संदेशात व्यक्त केले गेले.

# कै. शास्रीजीनी रेल्वेमंत्री
असताना, अपघाताबद्दल नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. आता खुर्चीवर चिकटून रहाणे हाच नैतिक पराक्रम.

# नितीमत्तेची मुल्ये चिरंतन शाश्वत असतात, असायला हवीत.

# ठिकठिकाणच्या आगी, जीवघेण्या दर्घटना व अपघात जेवढे गेल्या पाच वर्षात घडले, तितके आधी कधी घडले होते कां, हा संशोधनाचा विषय आहे.

---------------------------------
"आजचे धडे":

# "ज्याला त्याला,
त्याने त्याची जबाबदारी तंतोतंत पाळण्यात खराखुरा आत्मानंद मिळत असतो,
ही उमज जर, सर्वांना लौकर आली,
तर समस्यांना पूर्णविराम मिळेल."

# "दुर्घटनांमागून जेव्हा दुर्घटना घडत रहातात, तेव्हा यंत्रणा जशी खिळखिळी झालेली असते, तशीच ती संभाळणारे कारभारीही बेफिकीर व दूरद्रुष्टी नसणारे व अकार्यक्षम असतात."

# "एकमेकावर जबाबदारी ढकलण्यात
हे मग्न,
नागरिक मात्र
सून्न सून्न!"

# "ध्येय घोषित करणार्यावरच
ते पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व येते. त्याचा विसर पडतो, तेव्हा
विश्वास गमावण्याचा, पतनाचा प्रारंभ येतो."

स्वातंत्र्यपूर्व काळात, समाज व देशहित सापेक्ष राजकारण त्याग व सेवाभावी व्रुत्ती असे होते. तर स्वातंत्र्यानंतर ते उत्तरोत्तर अधिकाधिक व्यक्तिहित सापेक्ष स्वार्थ भ्रष्टाचाराने माखलेले आपण पहात आहोत. जणु, सारेच इथून तिथून सारखेच भ्रष्टाचाराने बरबटलेले!

अशा वेळी स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा विरुद्ध राजकीय सुधारणा ह्या द्वंदात राजकीय सुधारणावाद्यांचा झालेला उदय व विजय आता कमालीचा महाग पडतो आहे. माणूस म्हणून, समाज म्हणून नितीमत्तेला प्राधान्य देत सुधारणा प्रथम पूर्ण होणे गरजेचे होते, असेच सध्याचे दिशाहीन, अर्थहीन भरकटत चाललेला भवताल पाहून वाटते. एका न परतीच्या अंध:कारमय वाटेवर आपण आता फरफटत तर चाललो नाहीत?

 "कालाय तस्मै नम:"
----------------------------------
"आजचे विचार":

# "ध्येय घोषित करणार्यावरच
ते पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व येते. त्याचा विसर पडतो, तेव्हा
विश्वास गमावण्याचा, पतनाचा प्रारंभ येतो."

# "आपली व्रत वैकल्ये सणवार, शिस्त नियमन,
समाजमन निकोप ठेवत
सांस्क्रुतिक संस्कार करणारी,
आरोग्याचे रूतुमानानुसार भान ठेवणारी."

# "वाढती गुन्हेगारी घातपात,
जीवघेणे अपघात, संपता संपतच नाहीत. ह्यामागची प्रमुख कारणे:
अवाजवी अभिलाषा, घाई आणि वेग!"

# "कार्यतत्परता, सामंजस्य, परस्परावलंबन, क्रुतार्थता आणि चिरंतरता ह्या पंचसूत्री मूल्यांवरच, मानवतेचा हा प्रवाह अव्याहत रहाणार आहे."

# "नितीमत्ता, सदाचार प्रामाणिकपणा
दुर्मिळ झालेत.
भावी पिढीचे भवितव्य अंध:कारमय आहे. "When character is lost, everything is lost".

# "प्रत्येकाच्या आयुष्यात,
कधी ना कधी 'बहराचा काळ' येतो. त्याची वेळ, दर्जा व झेप ही ज्याच्या त्याच्या गुणमर्यादांवर निर्भर असते."

# "असूं द्यावे:
शब्द, फुलणार्या कळीसारखे
विचार, बहरणार्या फुलांसारखे
उच्चार, ध्यानस्थ व्रुक्षासारखे
आणि
आचार, निष्कलंक स्फटिकासारखे!"
-----------------------------------
👌"मन चंगा, तो कठौतीमे गंगा!"👌

(मनाची स्थिती + व्यक्तीचा द्रुष्टिकोन= स्वप्रेरणेची गुणवत्ता)÷(सभोवतालची परिस्थिती)~ निर्णय ~क्रुती=निष्पत्ती किंवा फळ

प्रत्येकाच्या जीवनाची वाटचाल ही अशी सतत चाललेली असते.

After all, Mind is the Driving force, that makes or destroyies your future.

If your Mind is Fit, You are Fit!
------------------------------------------
सुधाकर नातू
३/७/'१९