"रंगबिरंगी":
°ईडियट बाँक्स"चे पोरखेळ":
"तुपारे" मधला विक्रांत, सध्या कमर्शियल ब्रेक घेऊन लंडनला त्याच्या अश्रुंची फुले वेचायला बहुधा गेला असल्यामुळे, राजनंदिनीच्या पुनर्जन्माचा पोरखेळ मांडत वेळकाढूपणा तेथे चालला आहे........
" अशा ह्या दोघी" मध्ये तर देवाशिष कामत खून तपास चक्क 'युगानुयुगे' होल्डवर ठेवून तो तपासणारी जोडगोळीच केव्हांची गायब झाली आहे. आदित्यने सूड म्हणून, मीराला तिच्या सहीच्या एका फटकार्यानिशी बेघर करून चक्क चाळीत फेकण्याचा तमाशा त्यामुळे नाईलाजाने पहावा लागतो आहे.........
दुर्गाबाई देखील लंडनलाच पसार झाल्याने, सगळ्यांचे "सुखांच्या सरींनी मन बावरे" झाल्याने अनु, सिद्धार्थ जोडी पाण्यात जलसमाधी घेत असून, स्वार्थी वहिनी टु बेडरूममध्ये कधी शिफ्ट व्हायचे हा प्रश्न सोडवत आहे........
फिरवा हो फिरवा कथानकं, कशीही! पाणी घालत राहून मालिकांचे असे फदफदे करण्याचा उद्योग कधीच संपणार नाही........
कुठलेही ठरीव कथानक नसलेला, शोमध्ये भाग घेणार्या महाभागांवर ती जबाबदारी जणू सोडलेला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या सहनशक्तीचा अंत पहाणारी परिक्षा असलेला बाष्कळ, पांचट अशी कुठलीही विशेषणे सार्थ करणारा "बिग बाँस" हा कार्यक्रम तर, तो पहाणार्या दर्शकांच्याही सहनशक्तीचा अंत पहात असतो.
हे असले तमाशे लोकप्रिय होतात, ह्यातच अभिरुची किती रसातळाला गेली आहे, ते समजेल.........
"ये लोग नही सुधरेंगे", दुसरं काय!
--------------------------
दोन रसास्वाद:
१.
"रंगरेषा व्यंगरेषा": मंगेश तेंडूलकर.
अनुबंध प्रकाशन पुणे.
एक रसास्वाद:
एका अफलातून व मनस्वी माणसाच्या तितक्याच अफलातून जीवनाचे, अफलातून चित्र उभे करणारे हे पुस्तक! रेडिओ दुरुस्ती करणारा मेकँनिक, तंत्रज्ञ, सेल्समन, व्यंगचित्रकार, नाट्यसमीक्षक, अभिनेता आणि नेपथ्यकार अशा एकाहून एक अधिक भूमिका यशस्वीपणे वठवणार्या, मंगेश तेंडूलकरांच्या जीवनाचे, एखाद्या अद्भुत चलत् चित्रपटासारखे दृश्यमय नाट्यमय व प्रत्ययकारी शब्दात व्यक्त होणारे हे पुस्तक खरोखर वाचनीय असेच आहे.
माणसाचं जीवन कल्पनेपलिकडच्या परिस्थितीच्या चढ उतारांनी व चित्र विचित्र प्रसंगांनी पहाता पहाता कसं घडत जातं ते इथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. त्यातून आपल्याला अंतर्मुख करीत, दिशा देणारे, मार्गदर्शक असे कितीतरी विवेकी विचार आपल्यापुढे उलगडत जातात, हे ह्या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे.
एवढेही पुरे नाही, म्हणून तेंडूलकरांची उत्तमोत्तम निवडक व्यंगचित्रे, त्यामागची पार्श्वभूमी आणि उद्देशासहित प्रेरणा जशी येथे आहेत, तसेच त्यांचा जीवनपट प्रसंगोचित रंगीत व क्रुष्ण धवल छायाचित्रांनी ह्या पुस्तकाची श्रेष्ठता अधोरेखित करतो.
पुस्तकासाठी शब्दांकन करणाऱ्या स्वाती प्रभुमिराशी यांच्या ह्रदयस्पर्शी मनोगतातून, हे पुस्तक दुर्दैवाने मंगेश तेंडूलकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालं असं कळतं, तेव्हां मात्र मन व्यथीत होऊन जातं.
त्रिवार वंदन.
----------------------------
२.
""वाळवंटातील ओयासिस":
आजच्या-२६मे'१९ महाराष्ट्र टाईम्स मध्ये "आक्का" हा श्री. अशोक राणे यांचा लेख वाचला. ह्या आक्का म्हणजे प्रसिद्ध डॉक्युमेंट्री फिल्मस् मधील महर्षी शोभाव्यात, अशा श्रीमती विजया मुळ्ये!
ह्या सहजसुंदर भाषेतील लेखामध्ये आक्कांचे ९८ वर्षांच्या जीवनातील, प्रदीर्घ कार्य पाहून अक्षरष: मी भारावून गेलो. समाज प्रबोधनासाठी डॉक्युमेंट्री फिल्म सारख्या माध्यमातून जागतिक कीर्तीचे योगदान देणार्या ह्या विदुषीचे म्हणूनच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
एक व्यक्ती आपल्या आयुष्यात काय काय आणि किती किती विविधस्पर्शी उपयुक्त काम, समाजासाठी करू शकते आणि अंगीकृत ध्येयामागे निष्ठेने रहात, आपले सारे जीवन वेचू शकते, हे ह्या लेखावरून जाणवले आणि मी मनापासून नतमस्तक झालो.
अशा असामान्य व्यक्ती आपल्याला, आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात, पुन्हा उमेदीने उभे राहण्यासाठी प्रेरणा देत असतात आणि असे क्वचितच नजरेत येणारे लेख, जणू वाळवंटातल्या एखाद्या ओयासिस सारखे आपल्याला तृप्त, धन्य करून जातात!
---------------------------
"उडदामाजी काळे नि गोरे":
ईडीयट बाँक्सवरील पोरखेळ मांडणार्या संदेशाला जेव्हा 'रिमोट वापरा' असा टोमणा जेव्हां मारला जातो, त्याला माझे प्रत्युत्तर असे:
"रिमोट वापरायची वेळ येण्यापर्यंतचा अनुभव ते अजून न वापरणार्यांना सांगणे हा एक उद्देश आणि हे प्रभावी माध्यम कसेतरीच वापरले जातय ह्याची जाणीव सर्वांना करून देण्यासाठी हा प्रपंच!"
""सोमि" वर पोस्टींग करताना ते कां, केव्हां, कुणासाठी आणि कशाकरता करायचे ह्याचे तारतम्य ठेवणे, अत्यावश्यक आहे."
"सोमि" वरील कोणतेही पोस्टींग शेअर वा फाँरवर्ड करण्यापूर्वी प्रथम त्याची सत्यता आजमावली जाणे अत्यावश्यक आहे. तशी खात्री पटल्यानंतर त्याची उपयुक्तता ज्यांना असू शकते, त्यांनाच ते शेअर वा फाँरवर्ड करावे. आले पोस्टींग, न पूर्ण वाचता, केले शेअर वा फाँरवर्ड असे कधीही करू नये.
"कोणत्या गोष्टींना केव्हा व कां प्राधान्य द्यावयाचं आणि कोणत्या गोष्टींना दुर्लक्षित करावयाचं, हे ज्यांना अचूक जमतं, तेच परिस्थिती हवी तशी बदलू शकतात."
--------------------------
"काल नको, आज हवा"!:
द्वेष नको, आपुलकी हवी!
भक्ती नको, शक्ती हवी!
प्रौढी नको, शालीनता हवी!
विक्रुती नको, संस्क्रुती हवी!
सांगणे नको, करणे हवे!
बोल नको, मोल हवे!
स्वप्न नको, सत्य हवे!
गर्व नको, मर्म हवे!
रोष नको, जिव्हाळा हवा!
राग नको, लोभ हवा!
धिक्कार नको, सत्कार हवा!
अहंकार नको, सहकार हवा!
"काल नको, आज हवा"!
-------------------------
सुधाकर नातू
३१/५/'१९