सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

"रंगांची दुनिया": रसास्वाद, दिवाळी अंकांचा.

"काहीही विपुल नसणारा,विपुलश्री दिवाळी अंक'१८": "विपुलश्री" हे मासिक खूप चांगले असते असा अनुभव होता. म्हणून वाचनालयातून मुद्दाम होऊन विपुलश्रीचा दिवाळी अंक आणला. दहा दिवसांनी तो परत करायचा होता. पण त्या दहा दिवसात केवळ दोनदा तीनदा तो हातात घेतला, चाळला. परंतु तेव्हा प्रथम शशि कपूर यांचे जीवनचरित्र- श्री. सदानंद गोखले यांनी लिहिलेले वाचावेसे वाटले. त्यामधून शशी एक व्यक्ती म्हणून निर्माता म्हणून आणि कुटुंबवत्सल गृहस्थ म्हणून अभिनेता म्हणून कसा चांगला होता ही सर्वस्पर्शी ओळख झाली. देखणा आपली शिडशिडीत शरीरयष्टी कायम ठेवणार्या ह्या गुणवंताबद्दल, कधीही ज्याच्याबद्दल कुठलही गॉसिप आलं नाही, असा निर्मळ मनाचा हा अभिनेता खरोखर कौतुकास्पद होता हे जाणवले. एकाच कुटुंबात वडील आणि दोन भावांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळतो, ही देखील एक खरोखर अद्वितीय गोष्ट, त्यातून माहीत झाली. लेखातले फोटो चांगले होते. पण जास्त लक्षात राहिले ते म्हणजे विसाव्या वर्षी जेनिफरशी विवाह करून केवळ सेहेचाळीसाव्या वर्षी शशीने दुर्दैवाने तिला गमावले खरे, पण तिच्यावरचे त्याचे प्रेम खरोखर अद्वितीय असेच होते. एक प्रकारे जास्त वय झालेले नसताना, विधुर होऊनही ह्या माणसाने दुसरा विवाह केला नाही किंवा कोणत्याही दुसर्‍या स्त्रीच्या प्रेमात तो पडला आहे असेही कधी कानावरही आले नाही. हे खरोखर न विसरण्याजोगे. सहाजिकच, हा लेख हे एक या दिवाळी अंकाचे खास वैशिष्ट्य मानायला लागेल.
दुसरा जो लेख त्या दहा दिवसात वाचला तोही असाच लक्षात ठेवण्याजोगा. श्रीमती कल्याणी गाडगीळ यांनी देशाटन माणसं कां करतात, त्याचा अत्यंत अभ्यासपूर्ण असा लेखाजोखा आपल्या लेखात घेतला आहे. भारतामधील त्यामानाने निरुत्साही करणारी अशी परिस्थिती: म्हणजे शिस्त नाही भ्रष्टाचार पर्यावरणाची समस्या आणि एकंदरच सर्वसाधारण दररोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी अडथळे घाईगर्दी आणि त्यामुळे येणारे ताण-तणाव त्या जोडीला गुणवंतांना, आरक्षण आदी गोष्टींमुळे कमी किंवा जवळजवळ नसणाऱ्या संधी, यामुळे माणसं परदेशी जातात, हे त्यांनी सोदाहरण मांडले आहे. केवळ पैसा मिळवण्यासाठी माणसं देशाटनाला जातात असं पूर्णतया नव्हे हे देखील या लेखावरून समजते.पण तेवढेच एक कारण असते असे नाही. त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्यानी चांगल्या तऱ्हेने जीवन जगावे, म्हणूनही माणसं परदेशी जातात. कुणालाही पटेल अशी कारणे देत देशाटन माणसं कां करतात ते लेखिकेने एखाद्या वकिलाच्या ताकदीने मांडले आहे. पण तिथेच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी दुसरीही बाजू इथे मांडली आहे. पुन्हा परत भारतात येणार्या, डॉक्टर बंग, डॉ. अच्युत गोडबोले आदी अनेक उदाहरणं देऊन परदेशात राहिल्यानंतरही, आपले काही विशिष्ट ध्येय मनात ठेवून भारतात परत आलेल्या ह्या माणसांमुळे हा लेख परिपूर्ण झाला आहे. एक वैयक्तिक बाब. पंधरा सोळा वर्षापूर्वी, माझाही मुलगा नोकरीनिमित्त परदेशात गेला. तेव्हा माझ्या पत्नीला खूप दुःख झाले होते आणि तिचे काही वर्षे, कायम त्याच्या मागे लागणे असे: की बाबा रे तू परत ये. परंतु त्यावेळेला मला मात्र तसे काही वाटले नव्हते. ज्याची त्याची आवड व इच्छा ह्या नात्याने, मी त्याच्या परदेशात जाण्याचा स्वीकार केला होता. आज पंधरा वर्षांहून अधिक काळ त्याला परदेशात जाऊन झाल्यावर, माझ्या पत्नीलाही, आता हे पटले आहे की, तो तिथे सुखी आहे आणि तो आता कधीही कायम वास्तव्यासाठी, भारतात परत येणार नाही, कारण त्यातच त्याचे व त्याच्या कुटुंबाचे कल्याण आहे. ह्या उत्तम लेखामुळे आमच्या त्या दृष्टिकोनाला पुष्टीच मिळाली.
अजून एक गोष्ट मात्र या अंकाची खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आणि कौतुकास्पद आहे ती म्हणजे जागोजागी असणारी उत्तम व्यंगचित्रे. सध्याच्या सामाजिक राजकीय आणि सांसारिक जीवनातील मुद्दे, कोपरखळी देत हुशारीने तेथे मांडले आहेत आणि म्हणून तेही एक ह्या अंकाचे वैशिष्ट्य ठरते.
दुर्दैवाने दिवाळी अंक बदलायच्या दिवसापर्यंत मला याहून अधिक काही त्यातून, सापडले नव्हते. म्हणून शेवटच्या दिवशी जेव्हा मी पुन्हा एकदा अंक हाती घेतला आणि वाचायचा प्रयत्न केला, तेव्हा मला जाणवले की चीन वरचा पर्यटन विषयक लेख सोडला तर बाकी लांबण लावणार्या कथा व इतर वैचारिक लेख ह्या कशातही काही दम नव्हता. त्यामुळे तासाभरातच मी त्या अंकाच्या वाचनाचा फडशा पाडला. जर खरोखरच हे साहित्य मन खिळवून ठेवणारे असते, तर मी लेट फी भरून अंक वाचनालयात उशीराने परत केला असता.
थोडक्यात वरील तीन/चार गोष्टी सोडल्या, तर बाकी अंकामध्ये पाने पुढे ढकलत जावं असाच मजकूर आहे. जर गुण द्यायचेच झाले तर दहा पैकी केवळ चार इतकेच गुण, मी अंकाला देईन. विशेषत: विपुलश्रीचा मासिक अंक,
ज्या दर्जाचा असतो, त्या पातळीचा हा दिवाळी अंक काही वाटला नाही, हे खेदाने नमूद करणे भाग आहे.
°पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने° ह्या नजरेने ह्या विवेचनाकडे पहावे, ही विनंती.
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा