सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

"एका गुणवंताची दुर्दैवी जीवनगाथा":


"एका गुणवंताची दुर्दैवी जीवनगाथा":
"आणि सुबोध भावे!":
"आणि डॉ. काशीनाथ घाणेकर" हा चित्रपट पाहिला. विलक्षण मनस्वी माणसाचे नाट्यमय
चढउतार असणारे जीवनचरित्र, अडीच तासांच्या एका खेळात बसविण्याचा हा प्रयत्न, जितकी त्याबद्दल हवा निर्माण करण्यात आली, तितकासा परिणामकारक नाही, हे प्रारंभीच धाडस करून मांडतो. ह्याला प्रमुख कारण म्हणजे येथे चरित्रनायक त्याचे निळे डोळे वगळता, कायम तो सुबोध भावेच वाटतो आणि ज्या ताकदीने व जिद्दीने डॉक्टरसाहेब आपल्या भूमिका रंगवत त्याच्या जवळपासही सुबोधचा हा काशीनाथ पोहोचत नाही. डॉक्टरांचा लाल्या, संभाजी म्हणजे सळसळती वीज होती, तर गारंबीचा बापू अवखळ मनस्विता होती.
प्रसाद ओक, प्रदिप वेलणकर, सोनाली कुलकर्णी व मोहन जोशी ही मंडळी त्या त्या भूमिकेत चपखल बसलेले जितके भासतात, तितकी इतर प्रमुख पात्रांची-वसंत कानेटकर, ईरावती व कांचन ह्यांची निवड त्या त्या व्यक्तींरेखांसाठी अयोग्यच दिसते. आपल्या वाट्याला आलेली पाटी, ते टाकतात इतकेच!
चित्रपटातील अनेक नाट्यमय घडामोडींची, घटनांची, विश्वसनीयता वा सत्यतेची शहानिशा जाणकार करतीलच- विशेषतः, दोन डॉक्टर अभिनेत्यांंमधील एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल असे भावनिक युद्ध! तसेच कानेटकर घाणेकरांमधील दुष्मनी. ह्या सार्यात, मात्र खटकारी एक बाब ही:
"काशीनाथ आपल्या पत्नीला ईरावतीला, तो कांचनशी लग्न करणार आहे हे बिनदिक्कत चक्क रस्त्यात कांचन भेटल्यावर सांगतो ही घटना, त्यानंतर ईरावती जणू काही विचित्र, अपमानास्पद, चिड आणणारे घडलेच नाही, ह्या आविर्भावात ते स्विकारून, पुन्हा वर त्याला सांगते की, आता त्या प्रेमी जीवांनी कुठेही बाहेर न भेटता, त्यांच्या घरीच न भेटावे, कारण ती नेहमीच दिवसभर क्लिनिकमध्ये असते!" हे असे कितपत् खरे घडले होते?
चित्रपटामध्ये काशिनाथ आणि त्यावेळच्या एकंदर माहोलाचा लेखाजोखा मांडण्यासाठी नाटकातले तसेच चित्रपटातले काही भाग दाखवले आहेत. मात्र ते त्रोटक आहेत. विशेषतः एक आनंदी गोपाळ सोडलं तर इतर नाटकांचे भाग ह्यांची तुलना, जर प्रत्यक्ष डॉक्टरांनी रंगभूमीवर केलेल्या कलाकृतींची केली तर ती पुष्कळच उणी वाटते. फक्त गोमूचे नृत्य आणि गीतांत सुबोध छान दिसला व त्याने चांगला प्रभाव दाखवला आहे. पिंजरा चित्रपटामधलं 'तुम्हावर.....हे गीत अजून विस्ताराने दाखवले गेले असते तर ते योग्य ठरले असते. प्रत्यक्ष चित्रपटातील स्वतंत्र, गीत वा गीते तेवढीशी काही लक्षात राहत नाहीत आणि म्हणूनच प्रभाव पाडू शकत नाहीत. जुन्या नाटक चित्रपटातली काही दृश्य बघायला मिळणे, हे मात्र ह्या चित्रपटातील, एक आकर्षण ठरू शकते.
एका गोष्टीचा मात्र कौतुक केलं पाहिजे की ह्या चित्रपटात, डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या बद्दल काही गोष्टी अगदी प्रांजळपणे आणि पारदर्शक पद्धतीने मांडल्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे, कारण कोणतेही असू दे. काशिनाथ त्यांच्या वडिलांच्या दृष्टीने कुठल्याही किमतीचे नव्हते ही. तिचा सल या माणसाला कायम लागला. दुसरी गोष्ट, रंगभूमीवर ज्या माणसाने आपल्या जबरदस्त अभिनय आणि तन्मयतेने सुपरस्टारगिरी प्रस्थापित केली, त्या गुणवंताला त्यामानाने चित्रपटांमध्ये, विशेष वाव मिळाला नाही आणि जो काही मिळाला त्यामुळे ठसा उमटवा अशी कामगिरी काही त्यांना करता आले नाही हे आणि ते सुद्धा काशिनाथ ह्यांना चित्रपटसृष्टीला आवश्यक चॉकलेट गुलछबू व्यक्तिमत्व लाभले होते तरी! शेवटी एकेकाचे कर्तृत्व त्या त्या माध्यमात सारखेच नसते हेच खरे!
चित्रपटात नायकापेक्षा प्रभाकर पणशीकर झालेल्या प्रसाद ओकनेच आपल्या भूमिकेला व त्यांच्या काशीनाथ बरोबरच्या निखळ मैत्रीला बावन्नकशी न्याय दिला आहे. त्याच बरोबर मोहन जोशी, मूर्तीमंत भालजी उभे करण्यात यशस्वी झाले आहेत. उंची, शारीरिक ठेवण व रंग ह्या बाजू लक्षात घेतल्या तर तस्सेच निळे घारे डोळे असलेला अभिजीत केळकर हा अभिनेता, काशीनाथ म्हणून अधिक शोभला असता किंवा सुबोधप्रमाणे निळ्या डोळ्यांसाठी योग्य त्या तंत्राचा उपयोग करून उमेश कामतही काशीनाथ वाटला असता.
सारांश असा की, बालगंधर्व, लोकमान्य ह्या अजरामर भूमिकांत हुबेहुब शोभलेला व त्या भूमिकांना पूर्ण न्याय देणारा अत्यंत गुणवंत सुबोध भावे डॉ. काशीनाथ घाणेकर ह्या नात्याने इथे पुष्कळच उणा पडला. कादंबरीत शोभेल असे यशापयशाचे विस्मयकारक आयुष्य लाभलेलां रंगभूमीवरील एकमेव सुपरस्टार डॉ. काशीनाथ घाणेकरांच्या जीवनाची ही शोकांतिका, ह्या उण्या बाजूचा विचार करूनच पहावी असे अखेरीस सगळ्यांना सांगणे भाग आहे.
"म.टा. संवाद पुरवणी"
"एक सांस्कृतिक मेजवानी":
महाराष्ट्र टाइम्स रविवार दि. ११नोव्हेंबर'१८ ची संवाद पुरवणी, ही विविध क्षेत्रातील अंतर्गत पद्धतींचा, घडामोडींचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या निष्पन्नाचा सहजपणे परामर्ष घेणारी होती. राजकारण, मालिका निर्मिती आणि पुस्तक निर्मिती-प्रकाशन, मुले व स्मार्ट फोन अशा विविध आणि वेगळ्या बाबींवर येथे वाचनीय लेख होते.
" रामाविण.........
मोठी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवल्यानंतर, दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्याऐवजी केवळ अधिकाधिक सत्ता कशी मिळेल याकडे लक्ष देत आपल्या धोरणांचे आणि कृतींचे लक्ष भलतीकडे नेत शेवटी विकासाचे वारू वादळात भरकटल्यानंतर शेवटी काय केले आणि त्याचा काय फायदा झाला हे दाखवणे कठीण झाल्यामुळे, अखेर रामाची आठवण झाली. ह्या वास्तवतेचा परखड पण सहज शैलीत घेतलेला आढावा "रामाविण...." श्री. सुनील चावके यांच्या लेखात होता.
"अवंतिकेमागची कहाणी":
टीवीवरील मालिका या सर्वांनाच ह्या सर्वांनाच बघायच्या असतात. परंतु सर्वच मालिका काही लोकप्रिय व चर्चेचे कारण ठरत नाहीत. हल्लीच्या भरकटत चाललेल्या मालिकांबद्दल तर बोलायलाच नको! या पार्श्वभूमीवर रोहिणी निनावे यांनी "अवंतिका" ह्या अतिशय लोकप्रिय मालिकेच्या बीजनिर्मिती पासून ते संपूर्ण प्रवासाचे चित्र आपल्या लेखात उत्तमपणे उभे केले आहे. त्यामुळे आपण जे छोट्या पडद्यावर बघतो, त्याच्या मागे किती जणांचे किती आणि कस कसे कष्ट प्रयत्न आणि प्रतिभा असते, ह्याचे दर्शन घडून गेले.
पुस्तक प्रकाशन विश्व:
पुस्तक हा एक वेगळाच विषय. परंतु अखेरीस तेही एक विक्री योग्य अशी वस्तू आहे, ह्याचे भान ज्या प्रकाशकाला असते, तोच या उद्योगात पाय रोवून बसू शकतो, हा मुद्दा श्री.दिलीप माजगावकर यांचा आणि त्यांच्या राजहंस प्रकाशनाचा अगदी जवळून परिचय करून देताना, लेखिकेने त्यांच्याबरोबरचे आपले अनुभव मांडले आहेत. ह्या साऱ्या निवेदनात पुस्तक कसे तयार होते, आणि त्यामागे लेखक मुद्रक प्रकाशक आणि वितरक आणि शेवटी वाचक ही साखळी कशी बांधली जाते, ते पुस्तक विश्वाचे दर्शन या लेखात हुबेहूब घडवले आहे. ते पुरे नाही म्हणून की काय पण यशस्वी प्रकाशक कसा असतो, कसा वागतो त्याची दूरदृष्टी योजकता कशी असते, त्याचे उत्तम उदाहरण, दिलीप माजगावकरांच्या व्यावसायिक प्रतिमा उभी करताना, ह्या लेखात झाले आहे.

स्मार्ट फोनचा अतिरेक:
त्याचमुळे आजची महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी ही, जाणिवेचे विश्व अधिक विस्तारित करणारी झाली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. "आइसिंग आँन द केक" म्हणून आधुनिक जगातला सर्वात आवश्यक असा स्मार्टफोन हे साधन आणि बाळ-बुद्धी ह्यांचं नातं कसं आहे, कसं असावं, हे सोदाहरण एका लेखात मांडले आहे. हल्ली पालकांना मुले आपले काही ऐकत नाहीत, कायम मोबाईल धरून असतात ही व्यथा असते. अशा अतिरेकापायी मुले, हट्टी मतलबी होऊ शकतात आणि त्यांच्यावर अनिष्ट संस्कार होऊन, समंजस सुसंस्कृत नागरिक बनण्याची प्रक्रिया कोळम खोळंबू शकते हे सध्या काय चुकते आहे त्यावरून एकीकडे दाखवले तर आहेच, परंतु त्याचबरोबर ह्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी कोणते कोणते वेगवेगळे मार्ग आणि संधी आहेत, त्याचीही उदाहरणे दिल्यामुळे आणि ती खरोखरच सगळ्यांसाठीच अनुकरणीय असल्यामुळे खरोखरच हा लेख दर्जेदार झाला आहे.

थोडक्यात आजची मटा संवाद पुरवणी ही वाचकांसाठी एक वैचारिक मेजवानीच होती. आणि म्हणून अभिनंदन.
छोटा पडदा-मल्लीनाथी:
"ललित २०५": आजींचा एक मुलगा व सून, कुरळ्या केसांची नात
"राधा प्रेम रंगी रंगली": प्रेमची आत्या व तिचा ड्रग अँडिक्ट मुलगा, प्रिया, तिचे वडील आणि परांजपे, लल्लनची बहिण
"घाटगे अँड सून": अम्रुताचे आई बाबा व काका
"राधा प्रेम रंगी रंगली" मधील नायिकेच्या वडीलांना खोट्या केस मध्ये अडकवायच्या आयडीयाची काँपी, "तुला पाहते रे" मधील ईशाच्या वडीलांसाठीही? अरेरे!
आतापर्यंतचे पोरखेळ पुरे नाही झाले, म्हणून ईशा & कंपनीची एका रात्रीत ढीगभर चकल्या बनवायची किमया! "तुला पाहते रे" चेही नामकरण "ईशाचा जादुचा दिवा" असे करावे!
प्रेक्षकांना बालबुद्धिचे समजणे पुरे करा!!
नव्या आयडिया घेऊन येणारा, कल्पक लेखक तातडीने हवा आहे:
१. "नकळत सारे घडले": आतापर्यंत शक्य तेवढ्या अनेक युक्त्या वापरून मालिका पुढे खेचत नेल्या खर्या, पण आता काय करायचे ते मुळीच कळत नाही. प्रताप व नेहा एकमेकांवर प्रेम करतात, नाही करतात असा खेळ वापरून चोथा झाला. म्हणून आयडीयाबाज कुणी नवा लेखक आहे कां?
२. "राधा प्रेम रंगी रंगली": लल्लनला मारून टाकलं, त्याच्या बहिणीला बदलापूरला हाकललं! परांजपे व विक्रम गायब तर प्रेम व आई अमेरिकेत देवयानी बेड रिडन त्यामुळे आता कोणतीच कल्पना उरली नाही. दीपिकाच्या डोक्याचा आटा ढिला झालाय, हेच पुन्हापुन्हा दाखवून प्रेक्षकांबरोबरच, निर्माताही कंटाळला. म्हणून कल्पक लेखक तातडीने हवा आहे!
सुधाकर नातू, माहीम मुंबई१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा