शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

" शारदोत्सव- अनुराधा दिवाळी अंक 25 !":

संपादक अनुराधा दिवाळी अंक'25 सादर वंदन, मी, श्री सुधाकर नातू एक ज्येष्ठ नागरिक. वाचनाची मला खूप आवड आहे. दरवर्षीचे अनेक दिवाळी अंक मी नेेहमी वाचत असतो. आपल्या ह्या वर्षीच्या दिवाळी अंकातील अनुक्रमाणिकेसंबंधी मला हा अनाहूत संदेश पाठवावासा वाटला: सहसा कुठल्याच दिवाळी अंक मला तरी अशी अनुक्रमणिका पाहिल्याचे आठवत नाही. म्हणून प्रथमच मत व्यक्त करतो की, 😇 "इकडे तिकडे वाकडे तिडके !":😇 😭 "कुठेतरी काहीतरी चुकतंय !":😭 आपल्या दिवाळी अंकात 35 कथा 13 लेख आणि 13 कविता आहेत. त्यातील प्रत्येक साहित्यकृतीचे शीर्षक त्या त्या लेखकाच्या नांवासमोर कां दिले नाही, हे मला पडलेले कोडे आहे. कोणतेच विशेष प्रसिद्ध लेखक व लेखिका या नसताना केवळ नावे आणि पृष्ठ क्रमांक आपण देऊन काय साधले, कुणास ठाऊक ! अशा वाचकांना त्रासदायक अनुक्रमणिका असलेल्या तुुमच्या दिवाळी अंकातील साहित्यकृती वाचताना वाचताना प्रथम पान नंबर अनुक्रमणिकेत बघायचा आणि मग त्या प्रुष्ठावरील शीर्षकावरून ती साहित्यकृती वाचायची की नाही ठरवायचे असेच मला करावयास लागले. हा असा द्राविडी प्राणायाम निदान आपण कविता विभागाचे बाबतीत तरी टाळू शकला असतात. कदाचित लेखकाचे नांव, व शीर्षके प्रत्येक साहित्यकृती बरोबर देण्यासाठी अजून एक पान अधिक खर्ची घालावे लागले असते, म्हणून आपण अशी खटकणारी अनुक्रमाणिका बनवली की काय, एवढेच मला शेवटी वाटले. कथा मला विशेष वाचाव्याशा वाटतच नाहीत- "पसंद अपनी अपनी, खयाल अपने अपने !" मात्र कथेबरोबर चौकटीमध्ये त्याचा सारांश आपण दिला असतात तर बरे झाले असते. बहुतेक संपादक असा वेधक सारांश कटाक्षाने नेहमी देतात. उदाहरणार्थ 'यू टर्न' या कथेच्या बाबतीत "एक तरुणी, तिच्या मागे लागलेला तिचा बॉस आणि तिसराच एक तरुण तिच्यावरील त्याचे प्रेम व्यक्त करतो. परंतु ती त्याला, तिला वाटणारे संयुक्तिक कारण देऊन नकार देते: कारण तिला मूल होऊ नये असे वाटत असते. पण त्या तरुणाच्या कोकणातील घरी मी दोघे जाऊन आल्यावर तिथे मतपरिवर्तन कसे होते ते या कथेत वाचा..." 'इच्छामरण' ही कथा नसून एक वैचारिक लेख असल्यामुळे तो त्या विभागात समाविष्ट केला असता तर चांगले. मात्र अंकातील बहुतेक ललित लेख आणि कविता मी वरील सोपस्कार पूर्ण करून वाचले. ते निश्चितच वाचनीय, विचार प्रवर्तक वैविध्यपूर्ण विषयांवरील आहेत, हाच काय तो मला या दिवाळी अंकांने दिलेला दिलासा. परखड मताबद्दल क्षमस्व. धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा